जननक्षमता व प्रजननशीलत्व : जिवंत प्राण्यांच्या प्रजोत्पादनशक्तीला जननक्षमता म्हणतात. प्रजोत्पादन ज्यावर अवलंबून असते त्या अंड (स्त्री–प्रजोत्पादक पेशी) किंवा शुक्राणू (पुं. प्रजोत्पादक पेशी) यांच्या (युग्मकांच्या) उत्पादन क्षमतेला प्रजननशीलत्व म्हणतात. प्रजननशीलत्व एखाद्या प्राणिजातीची प्रजोत्पादनक्षमता दर्शविते. जननक्षमता ती प्राणिजात प्रत्यक्षात काय करते हे दर्शविते. ज्या प्राण्यांचे प्रजननशीलत्व उच्च असते त्यांना बहुधा विध्वंसक परिस्थितीत जीवन जगावे लागते. याउलट कमी प्रजननशीलत्व असलेले प्राणी सुसह्य परिस्थितीत वाढतात, म्हणजेच क्षणाक्षणाला मृत्यूस सामोरे जावे लागणाऱ्या प्राण्यांमध्ये प्रजननशीलत्व भरपूर असते. अंड्यांची संख्या जेवढी अधिक तेवढीच त्यांचा नाश होण्याची शक्यताही अधिक. जॉर्जिया सामुद्रधुनीतील हेरिंग मासे प्रतिवर्षी ८ ते ७५ अब्ज अंडी घालतात परंतु त्यांपैकी फक्त ०·१% अंड्यापासूनच पूर्ण मासा तयार होतो. मानवासारख्या सस्तन प्राण्यांचे प्रजननशीलत्व कमी असूनही त्यांची जननक्षमता चांगली असल्याचे दिसते.
प्रजननशीलत्व आश्चर्यकारक पराकोटीस पोहोचू शकते. उदा., एक कालव त्याच्या आयुष्यात ५.५ ते ११·४ कोटी अंडी घालते. अटलांटिक महासागरातील कॉड माशाची मादी प्रतिवर्षी ४ ते ९ लक्ष अंडी घालते. एका कोंबडीची तिच्या आयुष्यभरात सु. ३,६०० अंडी घालण्याची क्षमता असते. फीतकृमी आपल्या एका खंडकात ८,००० अंडी तयार करतो व दर चोवीस तासांत अशी १३ ते १४ खंडके मूळ कृमीपासून अलग होत असतात.
प्रजननशीलत्वामध्ये अधिकांश भर स्त्री-युग्मकावर दिला जातो कारण पु-युग्मके (शुक्राणू) भरमसाठ प्रमाणावर तयार होतात. सर्वच स्त्री-युग्मके (अंड) उत्पादनक्षम असतातच असे नव्हे. काही प्राण्यांमध्ये ही युग्मके मुळातच (स्वाभाविकतया) कार्यशील नसतात. विषारी पदार्थ किंवा क्ष-किरणांमुळे काही युग्मके अकार्यक्षम बनतात. उपयुक्त युग्मक तयार होण्याकरीता ⇨ हॉर्मोनांचे संतुलन, तसेच इतर शरीरक्रिया आणि परिसरीय वातावरण एकमेकांशी जुळणारी असावी लागतात. तशी नसल्यास अनिष्ट परिणाम होतो. याच कारणांमुळे नैसर्गिक वातावरणातून काढून प्राणिसंग्रहालयाच्या कृत्रिम वातावरणात वाढविण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या युग्मक उत्पादनात ऱ्हास होतो. काही प्राण्यांमध्ये स्त्री-युग्मकांचे उत्पादनच मैथुनावर किंवा पुं-युग्मकाच्या शरीरांतर्गत सान्निध्यावर अवलंबून असते. अनेक सस्तन प्राण्यांमध्ये कार्यक्षम पु-युग्मकांचे उत्पादन एकूण शारीरिक तापमानापेक्षा कमी तापमान असलेल्या शरीरभागातच होते. उदा., मानवांमध्ये वृषण (पुरुषातील जनन ग्रंथी) मुष्कात (वृषण सामान्यतः ज्यात असतात त्या पिशवीत) न उतरता ते जर पोटातच राहिले, तर अशा वृषणात शुक्राणू उत्पन्न होत नाहीत.
जननक्षमता तीन गोष्टींवर अवलंबून असते : (१) प्रजननशीलत्व, (२) अंडनिषेचनाची (अंडाचे फलन होण्याची) शक्याशक्यता आणि (३) निषेचनानंतर निषेचित अंडाच्या वाढीची शक्याशक्यता. बहुतेक सर्व सागरी प्राण्यांमध्ये अंडनिषेचन क्रिया शरीराबाहेरच होते. या उलट जरायुज (पिल्लांना जन्म देणाऱ्या) सस्तन प्राण्यांमध्ये अंडनिषेचन शरीराअंतर्गत होते, म्हणून सागरी प्राण्यांच्या प्रजननशीलत्वाचा जसा अंदाज बांधता येतो, तसा सस्तन प्राण्यामध्ये बांधता येत नाही. युग्मकांचा संयोग होण्यामध्ये येणारा कोणताही अडथळा जननक्षमता कमी करतो. सर्व प्राणिजातींमध्ये मानवात अंडनिषेचन आणि अंडमोचन (गर्भाशयातून अंड बाहेर पडणे) यांचे गुणोत्तर अत्यल्प असते. भ्रूणावस्थेतच नाश होणे हेही जननक्षमता कमी होण्याचे कारण असते.
मानवातील जननक्षमता प्रजोत्पादनाकरिता आवश्यक असणाऱ्या दोन व्यक्तींवर म्हणजेच स्त्री व पुरुष यांवर अवलंबून असते. स्त्रीची किंवा पुरुषाची वैयक्तिक जननक्षमता निरनिराळी असते. दोन्ही मिळून वैवाहिक जननक्षमता तयार होते. अतिजननक्षमता किंवा संपूर्ण वंध्यत्व सहसा आढळत नाही. वैवाहिक जोडीदारांपैकी एकातील उणीव दुसरा भरून काढण्याची शक्यता असते. दोन्ही जोडीदारांची जननक्षमता अगदी कमी असल्यास वंध्यत्व संभवते. वंध्यत्वाची इतरही कारणे आहेत. [⟶ वंध्यत्व].
वैयक्तिक जननक्षमता वयोमानाप्रमाणे बदलते. स्त्रियांची जननक्षमता वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत खालच्या पातळीवर असते. २० ते २४ या वयात ती पराकोटीस पोहोचते. त्यानंतर हळूहळू कमी होत जाऊन ३५ नंतर जलद रीत्या कमी होते. मासिक पाळी बंद होण्याच्या वयात (४० ते ४५) व ती बंद होताच जननक्षमता संपुष्टात येते. पुरूषामध्ये जननक्षमता वयाच्या १४–१५ वर्षापासून ७०–७५ पर्यंत कायम असते. स्त्री-पुरुषांच्या जननक्षमतेवर संयमन वा अतिमैथुनाचा परिणाम देत नाही.
प्रजोत्पादनाविषयीचे सूक्ष्मज्ञान जसे वाढत गेले तसे जननक्षमता कमी करण्याचे किंवा वाढविण्याचे उपायही सापडत गेले. [⟶ कुटुंबनियोजन]. जननक्षमता कमी करण्याकरीता तोंडाने द्यावयाच्या औषधापासून ते थेट शस्त्रक्रिया करण्यापर्यंत इलाज करता येतात. स्त्रीची जननक्षमता वाढविण्याकरिता क्लोमिफेन किंवा क्लोमीड नावाच्या औषधांचे प्रयोग करण्यात आले आहेत. या औषधी गोळ्यांच्या सेवनामुळे अंडमोचन अनियमित असल्यास नियमित करता येते व त्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. हे औषध घेणाऱ्या स्त्रियांपैकी १०% स्त्रियांमध्ये जुळे झाल्याचेही आढळले आहे. हे औषध वैद्यकीय देखरेखीखालीच घ्यावे लागते कारण त्याचे दुष्परिणामही आढळले आहेत. मानवी पोष ग्रंथीतील (मेंदूच्या तळाशी असणाऱ्या ग्रंथीतील) जनन ग्रंथीपोषक हॉर्मोन देऊनही स्त्रियांतील अंडमोचन नियंत्रित करता येते. अशा स्त्रियांपैकी काहींत गर्भबाहुल्य आढळले आहे.
भालेराव, य. त्र्यं.
पशूंतील जननक्षमता : पशूंची जननक्षमता ही त्यांच्या पैदाशीच्या क्षेत्रातील आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब आहे. पशूंच्या जननक्षमतेचा अभ्यास मुख्यत्वे गोवंशातील पशूंच्या बाबतीत झालेला आहे. जिवंत अपत्याला जन्म देण्याची क्षमता म्हणजेच जननक्षमता. पशूंमध्ये लैंगिक प्रजोत्पादन असल्यामुळे नर आणि मादी या दोघांच्या जननक्षमतेचा प्रजोत्पादनाच्या दृष्टीने विचार करणे प्राप्त ठरते कारण वंध्य नर व वंध्य मादी यांचा संयोग फलद्रूप होत नाही, तद्वतच पूर्ण जननक्षम नर परंतु वंध्यमयी मादी (एक नर व एक मादी अशा जन्मलेल्या जुळ्यातील मादी) यांचा संयोगही फलद्रूप होऊ शकत नाही.
नर व मादी यांनी विवक्षित काळात किती अपत्यांना जन्म दिला, हेच त्यांच्या जननक्षमतेचे माप असू शकते. गाय, घोडी यांसारख्या मोठ्या जनावरात ऋतुकालानंतर अंडमोचनाच्या वेळी एकच अंड परिपक्व होऊन अंडवाहिनीत टाकले जात असल्यामुळे व गर्भकाल नऊ महिन्यांचा असल्यामुळे दर वर्षाला एका अपत्याला जन्म दिल्यास संयोगासाठी उपयोगात आणलेल्या नर व मादी यांची जननक्षमता चांगली आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. याच हिशोबाने प्रत्येक वेतात दहा पिले याप्रमाणे वर्षाला दोन वेते देणाऱ्या डुकरीणीची जननक्षमता चांगल्या प्रतीची आहे, असे निर्विवादपणे म्हणता येते. सशक्त शुक्राणू अगर अंड उत्पन्न होणे, अंडमोचनानंतर शुक्राणूचा अंडाशी संयोग होण्यासारखी परिस्थिती असणे व निषेचित अंडापासून निर्माण होणारा भ्रूण जगण्याची शक्याशक्यता या तीन गोष्टींवर जननक्षमता अवलंबून असते. बहुतेक जलचर प्राण्यांत अंडनिषेचन शरीराबाहेर होत असल्यामुळे जननक्षमता अजमावणे कठीण असले, तरी त्यांची शुक्राणू व अंड तयार करण्याची क्षमता अजमावणे शक्य असते. याउलट जरायुज प्राण्यांमध्ये जननक्षमता अजमावणे त्या मानाने सोपे असते. याठिकाणी जननक्षमता आणि शुक्राणू व अंड उत्पन्न करण्याची क्षमता म्हणजे युग्मकनिर्मिती क्षमता यांतील सूक्ष्म फरक लक्षात घेणे जरूर आहे [⟶ गर्भधारणा व गर्भबाहुल्य].
जननक्षमतेचा संपूर्ण अभाव म्हणजेच वंध्यत्व. त्याचप्रमाणे जननक्षमता कमी असणे हेही त्याप्रमाणात वंध्यत्व, असेही म्हणता येईल म्हणूनच जननक्षमता कमी असणे व वंध्यत्व यांचा विचार एकत्र करण्याची प्रथा आहे. जननक्षमतेचा संपूर्ण अभाव व सामान्य जननक्षमता यांमध्ये जननक्षमतेचे अनेक प्रकार असू शकतात. जननक्षमता कमी असणे हा गुणधर्म जन्मजात तसेच उपार्जितही (नंतर उत्पन्न झालेला) असू शकतो. ती तात्पुरती किंवा कायमची कमी असू शकते.
नर व मादी यांच्या युग्मकांच्या सफल संयोगात जननक्षमता अडथळे आणणारे कोणतेही कारण जननक्षमता कमी करण्यास कारणीभूत होते. अंडमोचन व अंडनिषेचन यांचे पशूंमधील गुणोत्तर मनुष्यप्राण्यापेक्षा बरेच जास्त आहे. शरीरबाह्य अंडनिषेचन होणाऱ्या प्राण्यांमध्ये हे प्रमाण बरेच कमी असावे असे वाटते, तथापि यांतील काही प्राण्यांत माद्यांकडून अंडमोचन व नराकडून शुक्राणू शरीराबाहेर टाकण्याच्या वेळेमध्ये चांगलाच समन्वय असल्याकारणाने जननक्षमता चांगली असल्याचे आढळून आले आहे.
मनुष्यप्राण्याप्रमाणेच पशूंमध्ये वाढत्या वयाबरोबर त्यांची जननक्षमता कमी होत जाते. मेरीनो जातीच्या मेंढ्या उष्ण कटिबंधात पाळल्यास त्याची जननक्षमता कमी होते व मेंढ्याच्या रेतामध्ये दोष उत्पन्न होऊन तात्पुरते वंध्यत्व येण्याचीही शक्यता असते. याउलट जननऋतूत सकस व भरपूर आहार दिल्यास निदान मेंढ्याच्या जननक्षमतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
डेन्मार्कमध्ये विमा उतरवलेल्या १३,००० वळूंपैकी १०% वळूंच्या बाबतीत नुकसानभरपाई देण्याची वेळ आली व यांतील १/३ वळूंमध्ये जननक्षमतेचा दोष असल्याचे लागरलव्ह यांना आढळून आले. गायीच्या काही जातींमध्ये जननक्षमता कमी असल्याचे दिसून आले आहे.
विशिष्ट स्त्रीमदजनीय (अंडकोशात स्त्रवणाऱ्या) व पौरुषजनीय (वृषणात स्रवणाऱ्या) हॉर्मोनांच्या अंतःक्षेपणाने (टोचण्याने) जननक्षमतेत वाढ होणे शक्य असते पण या उपचारामध्ये तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा नुकसानच होण्याची म्हणजेच क्वचित वंध्यत्व येण्याची भीती असते.
दीक्षित, श्री. गं.
संदर्भ : 1. Johansson, I. Rendel. J. Genetics and Animal Breeding, London, 1968.
2. Parkes. A. S., Ed. Marshall’s Physiology of Reproduction, London, 1956.
3. Rice. V. A. Andrews, F. N. Warwick, E. J. Legates, J. E. Breeding and Improvement of Farm Animals, New York, 1957.
“