जखमा आणि इजा : त्वचेच्या अथवा श्लेष्मकलेच्या (शरीरातील विविध पोकळ्यांच्या अस्तर त्वचेच्या) पृष्ठभागांवर बाह्य आघातामुळे खंड पडल्यास त्याला ‘जखम’ किंवा ‘क्षत’ असे म्हणतात. आघातामुळे पृष्ठभागावर खंड पडलेला नसूनही आतील ऊतकांना (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांना) किंवा इंद्रियांना दुखापत झाली असल्यास तिला ‘इजा’ असे म्हणतात. जखम झाली असताही कित्येक वेळा आतील इंद्रियांना अशी इजा झालेली असते. ठेचल्यामुळे होणाऱ्या इजेला ‘तुन्नाघात’ असे म्हणतात. यात त्वचेखाली रक्तस्राव होतो. भाजल्यामुळे वा पोळल्यामुळे होणाऱ्या जखमांसंबंधीची माहिती ‘भाजणे व पोळणे’ या नोंदीत दिली आहे.
प्रकार : जखमांचे अनेक प्रकार असून त्यांपैकी महत्त्वाचे खाली दिले आहेत.
(१) छेदित : तीक्ष्ण शस्त्रामुळे झालेली जखम. त्वचेच्या खालीच ज्या ठिकाणी अस्थी असतील तेथे बोथट शस्त्राने आघात झाला असता जी जखम होते, तीसुद्धा चाकूने कापल्यासारखी म्हणजे ‘छेदित’ जखमेसारखी सरळ असते. उदा., डोक्यावरील वा गुडघ्याखाली नडगीवर झालेल्या जखमा. छेदित जखमांमधून फार रक्तस्राव होतो, जखमेचे तोंड पसरट होते. बहुधा त्वचेखाली रक्तस्राव होत नाही. अशा जखमांमध्ये रक्तस्राव, त्वचेखालच्या तंत्रिका (मज्जा), स्नायू व स्नायुकंडरा (स्नायूची हाडाला चिकटणारी मजबूत तंतुमय दोरीसारखी टोके) तुटणे व जंतुसंसर्ग यांची भीती असते. असल्या जखमा छाती किंवा पोटावर झाल्या, तर त्या खोलवर उदरगुहेपर्यंत (पोटाच्या पोकळीपर्यंत) किंवा वक्षगुहेपर्यंत (छातीच्या पोकळीपर्यंत) जाणे शक्य असते.
(२) विदारित : बोथट शस्त्रे, यंत्रे, रस्त्यावरील व इतर अपघात, युद्धांतील शस्त्रे वगैरे गोष्टींच्या आघातामुळे अशा जखमा होतात. या प्रकाराच्या जखमांत त्वचेखालची ऊतके व अंतस्त्ये (छातीच्या आणि पोटाच्या पोकळीतील इंद्रिये) यांना इजा झालेली असते. त्वचा अथवा श्लेष्मकला वेडीवाकडी फाटलेली असते. अशा जखमांमध्ये मोठ्या रक्तवाहिन्यांना बहुधा इजा होत नाही लहान रक्तवाहिन्या त्वरित आकसून बंद होतात व त्यामुळे रक्तस्राव फार होत नाही. आतील इंद्रियांना किती इजा होईल हे आघाताच्या जोरावर अवलंबून असते. जखम वेडीवाकडी असल्यामुळे जंतुसंसर्गाचा संभव अधिक असतो. शिवाय आघाताच्या वेळी बाह्य पदार्थ जखमेत घुसणे शक्य असते. अशा जखमांमध्ये मुख्य भीती ⇨अवसादाची (शॉकची) असते. रक्तस्रावामुळे गंभीर अवसाद होतो. विदारित जखमा बऱ्या होण्यास किती काळ लागेल ते जंतुसंसर्गाच्या तीव्रतेवर आणि ऊतकनाश किती झाला आहे त्यावर अवलंबून असते.
(३) अंतर्वेधित : या जखमा लांब आणि तीक्ष्ण शस्त्रामुळे खोलवर झालेल्या असतात. या जखमांचे तोंड बारीक असले, तरी शस्त्र आत खोलवर घुसलेले असल्यामुळे आतील ऊतकांना आणि इंद्रियांना इजा झालेली असते. शरीरगुहांपर्यंत खोल गेलेल्या अशा जखमांमधून रक्तस्राव व जंतुसंसर्ग झाल्यास पू बाहेर पडणे अशक्य होते. या प्रकारच्या जखमांमुळे धनुर्वात होण्याचे भय असते. सुई घुसून हातात मोडणे हे या प्रकाराच्या जखमांचे उत्तम उदाहरण आहे.
बंदुकीच्या वा पिस्तुलाच्या गोळ्यांनी झालेल्या जखमा ‘अंतर्वेधित’ प्रकारच्याच असतात. घुसलेल्या गोळ्या कित्येक वेळा आरपार जातात. गोळी जेथे आत घुसते ती जखम लहान असून जेथून बाहेर पडते ती मोठी असते. गोळी आत कोणत्या दिशेने गेली असेल त्याची कल्पना करून त्यावरून आतल्या कोणकोणत्या इंद्रियांना इजा झाली असेल ते ओळखावे लागते. गोळी शरीरातच राहिली असेल, तर क्ष-किरण परीक्षेने तिचे स्थान निश्चित करावे लागते.
(४) विषारी : साप, नाग, विंचू, मधमाशी, गांधील माशी वगैरे चावल्यास होणाऱ्या जखमांत त्या प्राण्यांचे विष जात असल्यामुळे अशा जखमांची तीव्रता त्या विषांवर अवलंबून असते. या जखमा खोल नसतात, विषारी प्राण्याचे दात किंवा नांगी घुसलेल्या ठिकाणी एक किंवा दोन लहान जखमा असून त्यांवर रक्ताचा एकएक थेंब दिसतो किंवा मोठी गांध आलेली दिसते.
लक्षणे : सर्व प्रकारच्या जखमांत वेदना हे लक्षण कमीअधिक प्रमाणात दिसते. जखमेचे स्थान आणि होण्याचे कारण यांवर वेदनांची तीव्रता अवलंबून असते. वेदना फार असल्यास अवसाद होतो.
रोहिणीभेद झाल्यास रक्तस्राव फार होतो, रक्ताच्या चिळकांड्या उडतात. नीलाभेद झाल्यास काळसर रक्ताचा प्रवाह सारखा वाहिल्यासारखा दिसतो. केशवाहिन्या (सूक्ष्म रक्तवाहिन्या) तुटलेल्या असल्यास रक्त पाझरल्यासारखे दिसते. जखमेवर दाबून धरले असता रक्तस्राव थांबतो. रक्तस्रावाचा वेग व त्यामुळे शरीरातील किती रक्त बाहेर पडते ते पाहणे फार महत्त्वाचे आहे.
चिमटणे, ठेचणे, चेंगरणे या प्रकारांत अवसाद होतो. त्यात रोग्याला घाम सुटून चेहरा पांढरा फटफटीत पडतो. नाडी जलद आणि हाताला न लागण्याइतकी क्षीण होते. वेळीच उपचार न झाल्यास मृत्यू ओढावतो.
चिकित्सा : (१) छेदित जखमांमधून होणारा रक्तस्राव थांबविणे हे पहिले काम असते. ज्या वाहिनीमधून रक्तस्राव होत असेल ती शोधून बांधून टाकावी लागते. त्यासाठी जरूर तर रोहिणी-दाबयंत्र (दाबामुळे रक्तस्राव थांबविणारे यंत्र) वापरावे लागते. जखम स्वच्छ धुऊन तिला टाके घातले, तर ती लवकर भरून येते. मात्र जंतुसंसर्ग झाला असल्यास सर्व जखम बंद करणे धोक्याचे असते. अशा वेळी रक्त आणि पू आत साठून राहू नये म्हणून जखमेत रबराची नळी घालतात. जखमेवर निर्जंतुक पट्टी बांधून ठेवतात. जखमी भागास पूर्ण विश्रांती देण्यासाठी जरूर तर फळी किंवा प्लॅस्टर वापरतात विशेषतः स्नायू, तंत्रिका आणि स्नायुकंडरा टाके घेऊन जुळविलेली असल्यास जखमी भागाची हालचाल अजिबात बंद करणे इष्ट असते. क जीवनसत्व दिल्यास जखम भरून येण्यास मदत होते. ७ ते १० दिवसांनी टाके काढून टाकतात. जंतुसंसर्ग झालेला असल्यास जखमेभोवती सूज येऊन जखमेतून पू वाहू लागतो. अशा वेळी टाके काढून टाकून प्रतिपूय (पू न होऊ देणाऱ्या) औषधांची पट्टी बांधतात.
(२)विदारित जखमांमध्ये अवसादावर उपाय करणे हे पहिले काम असते. त्यासाठी नीलेवाटे रक्तद्रव किंवा रक्त देणे, अफूच्या अर्काच्या (मॉर्फिनाचे) अंतःक्षेपण (इंजेक्शन) हे उपाय करतात. स्राव होणाऱ्या वाहिन्या शोधून बांधून टाकतात. धनुर्वात आणि वायुकोथ (रक्तप्रवाह बंद झाल्यामुळे एखाद्या भागाचा मृत्यू होऊन जंतुसंसर्गामुळे वायू उत्पन्न होणे) यांवर प्रतिबंधक लस देणे अगत्याचे असते. यांशिवाय पेनिसिलिनासारखी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधेही द्यावी लागतात. जखमेमध्ये मृत ऊतक आणि बाह्य पदार्थ असल्यास ते काढून टाकतात. नंतर जखम स्वच्छ करून पट्टी बांधतात. अशा जखमा निर्जंतुक असल्याची खात्री असल्यासच टाके घालतात.
(३) अंतर्वेधित जखमा झाल्या असता धनुर्वात-प्रतिबंधक लस टोचणे महत्त्वाचे असते. आतील इंद्रियांना किती इजा झाली आहे त्यावर चिकित्सा अवलंबून असते. आंत्रासारखे (आतड्यासारखे) अंतस्त्य फाटले असल्यास पोट उघडून अंतस्त्य शिवावे लागते. मोडलेल्या सुईसारखे पदार्थ त्वचेखाली हाताला लागत असल्यासच अंतस्त्य काढण्याचा प्रयत्न करतात. असे पदार्थ स्नायुक्रियेमुळे शरीरात दूरवर जाऊ शकतात. क्ष-किरण परीक्षा व लोहचुंबक यांचा उपयोग होतो.
(४) विषारी जखमांमध्ये विषाच्या जातीवर चिकित्सा अवलंबून असते. सापाच्या विषाला प्रतिविष शक्य तितक्या तातडीने द्यावे लागते. जखमेच्या वर रोहिणी-दाबयंत्र लावून जखमेतून रक्त वाहून जाऊ देतात व त्यात पोटॅशियम परमँगनेटाचे स्फटिक चोळतात किंवा त्याच्या विद्रावाने धुतात. यामुळे विषाचा प्रतिकार होतो. विंचवाच्या दंशाच्या जागी कोकेन टोचल्यास वेदना थांबतात. गांधील माशी वा मधमाशी चावलेल्या जागी सौम्य अम्ल किंवा क्षार (अल्कली) विद्राव लावतात. अशा जखमेच्या बाबतीत अधिहर्षताजन्य (ॲलर्जीजन्य) विकृतीचा धोका असतो.
जखमा भरून येण्याचे प्रकार : (१) लहान सरळ जखमांच्या कडा एकमेकींस नीट जुळलेल्या असतील व तेथे जंतुसंसर्ग झालेला नसेल, तर त्या लवकर भरून येतात. जखमेच्या कडांच्यामधील फटीत रक्त व लसीका (ऊतकांतून रक्तात मिसळणारा व रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव पदार्थ) साठून त्यांमध्ये भक्षिकोशिका (सूक्ष्मजंतू, प्रजीव आदी खाऊन टाकून पचविणाऱ्या कोशिका) येतात. या कोशिका मृत ऊतके खाऊन पचवितात. बाजूच्या अचर (स्थायी) कोशिकांपासून तंतू उत्पन्न होऊन जखम सांधली जाते व जखमेच्या जागी वण तयार होतो. या वणात तंत्रिकाग्रे (मज्जेची टोके) नसल्यामुळे तो संवेदनाक्षम नसतो. वण प्रथम लाल व पुढे फिकट पांढरा दिसतो.
(२) जखम मोठी असेल, तिच्यात जंतुसंसर्ग असेल किंवा जखमेत मृत ऊतकांचे प्रमाण अधिक असेल, तर जखमेमध्ये नवीन कोशिकांचे जाळे तयार होऊन तेथे कणोतक (नवीन केशवाहिन्यांची व कोशिकांची वाढ होऊन ती वाढ कणासारखी दिसणारे ऊतक) उत्पन्न होऊन जखम तळापासून भरू लागते. ती वरपर्यंत भरून आली म्हणजे बाजूची त्वचा वाढून जखम आच्छादली जाते. केव्हा केव्हा त्वचाधान (एका भागातील त्वचेचा तुकडा काढून दुसरीकडे लावणे) करावे लागते.
मान, काख वगैरे जागी नेहमी एकमेकांस चिकटलेल्या भागांत जखम झाली, तर ती भरून येताना ते भाग एकमेकांस तंत्वात्मक धाग्यांनी (एकमेकाला लागून असलेल्या संयोगी ऊतकांच्या धाग्यांनी) चिकटतात. हा धोका टाळण्यासाठी ते भाग अलग व दूर ठेवावे लागतात. असे भाग अधिक प्रमाणात चिकटलेले असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.
तुन्नाघातात त्वचा फाटलेली नसल्यामुळे रक्त त्वचेखालीच साठते. असे रक्त एके ठिकाणीच साठल्यास तेथे रक्ताची गाठ तयार होते. त्यालाच ‘रक्तार्बुद’ असे म्हणतात. ते प्रथम मऊ व डुळडुळीत असून पुढे टणक बनते. बहुधा ते जिरून जाते, परंतु केव्हा केव्हा ते शस्त्रक्रियेने काढावे लागते.
आयुर्वेदीय चिकित्सा : पहा शल्यतंत्र व शल्यशालाक्य.
ढमढेरे, वा. रा.
“