जंगल युद्धतंत्र : जंगलात किंवा बहुतांश जंगलव्याप्त अशा प्रदेशात ज्या तंत्राने युद्ध लढले जाते, ते जंगल युद्धतंत्र होय. दुसऱ्या महायुद्धात इंडोचायना, मलाया, इंडोनेशिया व पॅसिफिक महासागरातील जंगलव्याप्त बेटे काबीज करताना जपानी सेना ज्या पद्धतीने लढली, त्यावरून जंगल युद्धतंत्र हा शब्दप्रयोग प्रचारात आला.
जगातील उष्ण कटिबंधांतील जंगलात बऱ्याच लढाया झाल्या आहेत. महाराष्ट्रात बहामनी राजवटीत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतील जंगलात मराठा देशमुखांनी मुस्लिम सैन्याचा पराभव केला होता. प्रतापगडच्या पायथ्याशी कोयनेच्या खोऱ्यातील जंगलव्याप्त भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्याचा अपुरे बळ असूनही पराभव केला. आसाम-बंगाल येथेही सतराव्या-अठराव्या शतकांत मोंगल व पठाण सैन्यांशी स्थानिक लोकांनी यशस्वी मुकाबला केला. इंडोनेशियात डचांच्या आधुनिक सैन्याचा व व्हिएटनाममध्ये अमेरिकी सैन्याचा जंगल युद्धतंत्र आणि गनिमी कावा वापरून केलेला पराभव, ही आधुनिक काळातील उत्कृष्ट उदाहरणे आहेत.
सामान्यतः घनदाट, दुय्यम आणि समुद्रकिनारी अशी तीन प्रकारची जंगले असतात. जंगलातील वस्तुस्थितीमुळे हालचाली करणे कठीण असल्याने छोटी सेनादले वापरावी लागतात, म्हणून जंगलात आक्रमणक्षमता व संरक्षणक्षमता कमी असते. तथापि तेथील उंच गवत व झाडेझुडपे यांत लपणे सुलभ असते. तसेच दृष्टीचा पल्ला कमी असतो, म्हणून शत्रूला चकित करणे कठीण नसते. परंतु उंच झाडांमुळे विमानांतून गस्त घालून टेहळणी करणे व तोफखान्याला सूचना देणे मात्र अशक्य असते. जंगलात आरोग्य उत्तम राखणे अत्यंत आवश्यक असते. तसेच तेथे संभवणारे पशुपक्ष्यांचे आवाज व इतर आवाज यांतील फरक कळणे आवश्यक असते.
सैनिकाला व्यक्तिशः व सांघिक रीत्या जंगली वस्तुस्थितीशी समायोजन साधता येईल, असे शिक्षण दिले जाते. वस्तुस्थितीतील स्वाभाविक व मानवनिर्मित बदल ओळखणे, रात्री हालचाल करणे, लपणे, मायावरण ओळखणे [⟶ मायावरण, सैनिकी] व आवाज न करता काम करणे वगैरेंवर अशा शिक्षणात भर असतो.
जंगलातील असाधारण परिस्थितीमुळे सैनिकाचे मनोधैर्य टिकून राहणे आवश्यक असते. रसदपुरवठा बिनचूक व वेळेवर होणे महत्त्वाचे असते. योग्य रस्त्यांच्या अभावामुळे हलक्या यांत्रिक गाड्या व खेचरे यांच्याकडूनच सामानाची वाहतूक करावी लागते. याकरिता शस्त्रसंभार हलका व आकारमानाने लहान असावा लागतो. जंगलातील मोकळ्या मैदानात विमानातून रसद टाकता येते. जंगलात रेडिओ संदेशवहन तांत्रिक कारणामुळे बिनभरवशाचे ठरते. दूरध्वनीच्या तारा तोडून शत्रू यातही व्यत्यय आणू शकतो. त्याचप्रमाणे तारांच्या मार्गावरून शत्रूला मोर्चे ओळखता येणे शक्य असते.
जंगलात गंभीर जखमी सैनिकांना दूरवर हलविणेही कठीण असते. जंगलातील शत्रुव्यूह, मोर्चे व बगला यांचा माग घेण्यासाठी पायदळी गस्त व टेहळणी तुकड्या रात्रंदिवस फिरत्या ठेवाव्या लागतात.
जंगल युद्धात लष्करी कारवायांची आखणी बिनचूक तर असावी लागतेच, शिवाय आकस्मिकपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीशी मुकाबला देऊ शकेल इतका लवचिकपणा आखणीत राखावा लागतो. लष्करी नेतृत्वात खंबीरपणा व स्वावलंबन हे गुण आवश्यक असतात.
जंगलातील परिस्थितीमुळे लष्करी हालचाली टप्याटप्याने कराव्या लागतात. आधारतळ असल्याशिवाय चढाई करणे कठीण असते. जंगलातील स्थितीचा फायदा घेऊन हालचालीत सतत आक्रमणशीलता ठेवणे, असे या तंत्राचे मूलसूत्र आहे. इतर युद्धतंत्राप्रमाणे या तंत्रातही हल्ला, बचाव व अपक्रमण (विथ्ड्रॉअल) अशा तीन प्रकारच्या कारवाया कराव्या लागतात. अशा कारवायांत छुपे हल्ले फारच उपयुक्त ठरतात.
जंगलात पुष्कळदा शत्रूवर समोरून हल्ला करणे भाग पडते. समोरचा हल्ला टाळता आला तर उत्तमच कारण त्यात होणारी हानी ताबडतोब भरून काढणे कठीण असते, तसेच शत्रूच्या आघाडीच्या बगला निश्चित करणे अवघड असते. त्या ओळखता आल्यास शत्रूच्या मध्य आघाडीची मुस्कटदाबी करून व त्याच्या बगलांवर आघात करून, सबंध आघाडीला गुंडाळता येते. जंगलात बगल हल्ल्यावर नियंत्रण ठेवणे व त्यात एकसूत्रता राखणे हे इतर युद्धतंत्रांपेक्षा अधिक जिकिरीचे असते. जंगलात रात्रीचा हल्ला हे एक दिव्यच असते. रात्री दिशावधान राखणे, शत्रूचा आघाडीव्यूह समजणे, आपल्या सैन्याच्या हल्ल्याची संरचना गुप्त राखणे, कारवायांवर नियंत्रण ठेवणे इ. गोष्टी अत्यंत कठीण असतात.
जंगलात सैन्यसंख्या नेहमीच अपुरी असते. त्यामुळे हाती असलेल्या सैन्याला बचावात्मक भूमिका टप्प्याटप्प्याने घेऊन विश्रांती, रसदपुरवठा व पुनर्संघटना इ. गोष्टी साधाव्या लागतात. यासाठी सुरक्षित आधार तळ वारंवार स्थापावे लागतात. जंगलातील बचाव इतर युद्धतंत्रातील बचावापेक्षा वेगळा आहे. बिगर जंगली युद्धक्षेत्रात बचावफळीला जर कोठे धोका निर्माण झाला, तर राखीव दलाचा उपयोग झटपट करता येतो. तसे जंगलात करणे कठीण असते. टेहळणी, गस्त्या व इतर सुरक्षाव्यवस्था नसेल, तर बचावफळीला शत्रूकडील घूसखोर धोका निर्माण करतात. जंगलात बचावभूमीचे चौफेर रक्षण करावे लागते.
छुपे हल्ले व गस्ती तुकड्या यांना जंगल युद्धात अधिक महत्त्व असते. त्यामुळे शत्रूच्या आक्रमक हालचालींवर दबाव आणून त्याचे नुकसान करता येते. गस्ती तुकड्यांमुळे सर्व जंगलभूमीवर आपलेच प्रभूत्व आहे, हे शत्रूला पटवून देता येते व त्यास बचावात्मक भूमिका घेणे भाग पडते.
जंगलातील अपक्रमण कारवाईत खास असे वैशिष्ट्य नाही. तथापि जंगलात अपक्रमण करताना शत्रू कोठेही असू शकेल, हे ध्यानात ठेवावे लागते. शत्रूची मनःस्थितीही संशयग्रस्त असल्यामुळे भीतभीत सावकाशपणे पाठलाग करणे, तो पसंत करतो.
प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे युद्धतंत्र वापरावे लागते. सांप्रतच्या नागरी जीवन जगणाऱ्या सैन्याला ज्याप्रमाणे डोंगरी व वालुकामय प्रदेशांत लढण्यासाठी विशिष्ट युद्धतंत्रे वापरावी लागतात त्याचप्रमाणे जंगलांतील युद्धासाठी जंगलाला अनुकूल असेच तंत्र वापरावे लागते. पारंपरिक युद्धतंत्रांबरोबर गनिमी रणतंत्र वापरले जात आहे. त्यामुळे जंगल रणतंत्र फार गुंतागुंतीचे झाले आहे. सैन्याला पूरक म्हणून जंगलातील कष्टमय जीवनाचा अनुभव घेणारी जनताही लढायांत सामील होते. म्हणून पारंपरिक जंगल युद्धतंत्रांत सुधारणा करणे आवश्यक आहे.
दीक्षित, हे. वि.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..