छानक, विद्युत् : (इलेक्ट्रिक फिल्टर).इच्छित कंप्रतांच्या (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांच्या संख्यांच्या) संकेतांचे प्रेषण आणि नको असलेल्या कंप्रतांच्या संकेतांचे क्षीणन करणारे आणि धारित्र (विद्युत् भार साठविणारे साधन), प्रवर्तक (विद्युत प्रवाहात बदल झाल्यास विद्युत् चालक प्रेरणा निर्माण करणारा घटक) व (काही वेळा) रोधक हे घटक वापरून बनविलेले चार अग्री विद्युत् जाल म्हणजे छानक होय. काही छानकांमध्ये वरील घटकांशिवाय इलेक्ट्रॉन नलिका, ट्रँझिस्टर अशासारख्या सक्रिय घटकांचाही उपयोग केलेला असतो. हे छानक इच्छित कंप्रतेच्या संकेतांचे विवर्धनही करतात.
मेलित (कंप्रताची जुळवणी केलेले) प्राथमिक आणि मेलित द्वितीयक वेटोळी असणारे रोहित्र (विद्युत दाब बदलणारे साधन) ते ज्या कंप्रतेस मेलित केलेले असते ती कंप्रता व तिच्या दोहो बाजूंच्या अरुंद पट्टांतील कंप्रतांचे प्रेषण करते. म्हणून असे रोहित्र एक प्रकारचे (पट्ट पारक) छानकच होय. दूरचित्रवाणी ग्राहीमध्ये (संकेत ग्रहण करणाऱ्या साधनामध्ये) इच्छित संकेताखेरीज इतर संकेत येऊ नयेत म्हणून ‘तरंग स्थानबद्धक’ वापरतात. ही अनेकसरी (समांतर जोडलेली) अनुस्पंदित आणि एकसरी ( एकापुढे एक जोडलेली ) अनुस्पंदित मंडले असतात [⟶ अनुस्पंदन]. ही मंडले पट्ट निरास छानकाचे (याचे वर्णन खाली दिले आहे) साधे स्वरूप होय.
छानकांचे कार्य त्यांच्या प्रेषण फलनाच्या संदर्भात समजून घेता येते. प्रदान (बाहेर पडणारा) संकेत आणि आदान (आत येणारा) संकेत यांच्या गुणोत्तराचे स्थिर अवस्थेतील मूल्य म्हणजे प्रेषण फलन होय. या फलनावरून छानकातून कोणत्या कंप्रता पट्टांचे प्रेषण होते (पारक पट्ट) आणि कोणत्या कंप्रता पट्टांचे क्षीणन होते (स्तंभक पट्ट) हे कळते.
वर्गीकरण :छानकांचे वर्गीकरण त्यांत वापरलेले घटक, प्रेषण फलनाचा प्रकार, अभिकल्पामध्ये (आराखड्यामध्ये) वापरलेल्या कसोट्या व त्यांचा उपयोग या गोष्टींनुसार वेगवेगळ्या प्रकारे करतात. पहिल्या पद्धतीनुसार छानकांचे निष्क्रिय (केवळ प्रवर्तक-धारक किंवा धारकरोधक असे घटक वापरलेले जाल) आणि सक्रिय असे प्रकार संभवतात.
प्रेषण फलनावर आधारलेले पुढील वर्गीकरण सामान्यपणे अधिक प्रचारात आहे. बहुतेक छानक खाली नमूद केलेल्या चारांपैकी कोणत्यातरी एका प्रकारात मोडतात.
निम्न पारक छानक : या छानकाकडून शून्य कंप्रतेपासून (सरल प्रवाह) कोणत्या तरी एका मज्जाव कंप्रतेपर्यंतच्या पट्टातील सर्व कंप्रता जवळजवळ सारख्याच प्रमाणात प्रेषित होतात. मज्जाव कंप्रतेपेक्षा उच्च कंप्रतांचे क्षीणन होते.
उच्च पारक छानक : यात मज्जाव कंप्रतेवरील सर्व उच्च कंप्रता जवळजवळ सारख्याच प्रेषित होतात व मज्जाव कंप्रतेच्या खालच्या कंप्रता अडवल्या जातात.
पट्ट पारक छानक :निम्न आणि उच्च मज्जाव कंप्रतामधील कंप्रता पट्ट या छानकाकडून प्रेषित होतो. पारक पट्टाबाहेरील निम्न व उच्च कंप्रतांचे येथे क्षीणन होते.
पट्ट निरास छानक : याला पट्ट स्तंभक व पट्ट अस्वीकारी छानक अशीही नावे आहेत. हा छानक एक विशिष्ट कंप्रता पट्ट वगळता इतर कंप्रतांचे प्रेषण करतो व त्या विशिष्ट पट्टातील कंप्रता अडविल्या जातात.
प्रेषण अभिलक्षणे :एखादा छानक मज्जाव कंप्रतेच्या जवळ जेवढ्या काटेकोरपणे कंप्रतांचे क्षीणन करील तो काटेकोरपणा छानकाच्या मंडल अभिकल्पावर अवलंबून असतो. नीच क्षीणनाकडून उच्च क्षीणनाकडे असा एकदम बदल घडवावयाचा असल्यास मंडलाची रचना अतिशय जटिल होते. आदर्श छानकामध्ये हे संक्रमण एकदम घडते. आदर्श छानक व्यवहारात आणणे अशक्य आहे. तथापि अधिकाधिक जटिल मंडलांची योजना करून त्या आदर्शाप्रत जाता येते. आ. १ मध्ये वरील चार प्रकारच्या छानकांचे आदर्श प्रेषण आणि कंप्रता यांचे आलेख दाखविले आहेत. व्यावहारिक छानकांमध्ये वापरलेल्या प्रवर्तक आणि धारित्र यांमध्ये काही अंशी रोधक घटक असल्यामुळे त्यांची प्रेषण अभिलक्षणे आकृतीत दाखविल्याप्रमाणे कधीच काटोकोर नसतात.त्यांच्याकडून क्षीणन पट्टातील मज्जाव कंप्रतेच्या जवळपासच्या कंप्रतांचे काही प्रमाणात प्रेषण होतेच.
छानकांचे गुणधर्म प्रतिमा संरोध (व्याख्या खाली पहा), त्यांची मज्जाव कंप्रता (किंवा अनेक कंप्रता) आणि प्रेषण स्थिरांक (व्याख्या खाली पहा) या प्रचलांवर (विशिष्ट परिस्थितीत निरनिराळी मूल्ये देता येणाऱ्या स्थिर राशींवर) अवलंबून असते.
आदान अग्रांमध्ये मोजलेला संरोध (सर्व प्रकारचा एकूण रोध) हा सीमान्त संरोधाएवढा येईल अशा बेताने प्रदान अग्रांमध्ये जोडावयाचा संरोध निवडलेला असल्यास छानकाचा शेवट त्याच्या प्रतिमा संरोधामध्ये केला आहे असे म्हणतात. ही व्याख्या आ. २ च्या संदर्भाने अधिक स्पष्ट होईल. ZΙ1हा संरोध २-२ या अग्रांमध्ये जोडला असता १-१ या अग्रांमध्ये मोजलेला संरोध ZI1एवढा येत असल्यास ZI1हा आदान अग्रांमधील प्रतिमा संरोध झाला. या ठिकाणी अग्रे २-२ मध्ये प्रत्यक्ष संरोध जोडला असून अग्रे १-१ मध्ये तेवढाच संरोध येतो. म्हणून त्याला (अग्रे १-१ यांच्या दिशेत पाहिलेला) प्रतिमा संरोध असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे ZI2एवढा संरोध आदान अग्रांमध्ये जोडला असता प्रदान अग्रांच्या दिशेत पाहिलेला संरोध ZI2एवढा येत असल्यास ZI2हा त्या दिशेतील प्रतिमा संरोध झाला.
पारक पट्ट आणि स्तंभक पट्ट जिथे एकत्र येतात त्या कंप्रतांना छानकाच्या मज्जाव कंप्रता म्हणतात. केवळ अवरोधनी (संरोधापैकी प्रवर्तकत्व किंवा धारिता यांच्यामुळे निर्माण होणारा रोध असलेले) घटक वापरुन बनवलेल्या छानकांच्या बाबतीत या कंप्रतांनी छानकाच्या अभिलक्षणात एकदम बदल होतो. पारक पट्टामध्ये व्यय न होता प्रेषण घडले, तर स्तंभक पट्टामधील सर्व कंप्रतांचे क्षीणन होईल. थोडक्यात पूर्ण आणि व्ययी प्रेषण यांमधील सीमारेषा म्हणजे मज्जाव कंप्रता होत. छानकामध्ये रोधक असल्यास पारक पट्टात मज्जाव कंप्रतेजवळ काही प्रमाणात क्षीणन होते. छानक विश्लेषणामध्ये सर्व घटक शुद्ध अवरोधकात्मक आहेत, असे मानलेले असते. यामुळे हे गणिती विश्लेषण पुष्कळच सोपे होते.
छानकामधून विद्युत संकेतांचे किती कार्यक्षमतेने प्रेषण होते, ते प्रेषण स्थिरांकावरुन समजते. प्रेषण स्थिरांक (y)म्हणजे आदान (I1) वप्रदान (I2) प्रवाहांच्या गुणोत्तराचा नैसर्गिक लॉगरिथम होय. सामान्यपणे yहा सत् भाग αआणि असत् भाग βयांनी मिळून बनलेला असतो. (सत् व असत् यांच्या व्याख्यांसाठी ‘संख्या’हीनोंद पहावी). αया भागाला छानकाचा क्षीणन गुणांक व βया भागाला कला गुणांक म्हणतात. प्रेषण स्थिरांकाची गणिती व्याख्या पुढीलप्रमाणे आहे.
y = α + jβ = log |
I1 |
, ( j = √-1) |
I2 |
α नेपरमध्ये (दोन प्रवाहांचे गुणोत्तर मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या परिमाणरहित एककामध्ये ) आणि β अरीयमानामध्ये [रेडियनमध्ये,⟶ कोन]मोजतात. छानकाच्या प्रदान अग्रांमध्ये जोडलेला संरोध त्याच्या प्रतिमा संरोधाएवढा असल्यास αडेसिबेलमध्ये (शक्तीच्या दोन मूल्यांचे गुणोत्तर मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या परिमाणरहित एककामध्ये) व्यक्त करता येतो. αची सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
α (डेसिबलमध्ये)= 20 log10 |
I1 |
I2 |
α(डेसिबेलमध्ये) = 8·666 xα(नेपरमध्ये)
छानकामधील घटकांची जोडणी अनेक प्रकारे करता येते. टी (T ), पाय (π), एल (L), जालक, सेतू टी आणि जोड किंवा समांतर टी हे जोडणीचे प्रकार अधिक वापरात आहेत. आ. ३ मध्ये तीन प्रकारच्या मूलभूत छानक जोडण्या दाखविल्या आहेत. आकृतीत दाखविलेल्या जोडण्यांना छानक विभाग असेही म्हणतात. टी किंवा पाय प्रकारचे छानक विभाग एकापुढे एक असे जोडत गेल्यास शिडी जाल तयार होते. टी किंवा पाय छानक विभागांचे दोन भाग केले म्हणजे त्यांच्यापासून अर्ध विभाग तयार होतात. छानकांचा शेवट अशा अर्ध विभागांनी करतात.
समांतर टी जोडणी वापरली असता प्रेषण अभिलक्षणात ‘शिडी’ प्रकारापेक्षा अधिक लवचिकता येते. या प्रकारात आदान आणि प्रदान यांच्यामध्ये दोन मार्ग उपलब्ध करून कोणत्याही इच्छित कंप्रतेस प्रेषण शून्य करता येते. यात प्रत्येक मार्गाकडून मिळणारी प्रदाने इच्छित कंप्रतेस एकमेकांचा पूर्ण निरास करतील अशा रीतीने जाल घटकांची मूल्ये निवडलेली असतात. आ. ४ मध्ये या जोडणीचे मंडल व त्याचा प्रेषण-कंप्रता आलेख दाखविला आहे. आकृतीत दाखविलेले जाल एखादी विशिष्ट कंप्रता पूर्णपणे क्षीण करून टाकण्यासाठी वापरतात.
छानक अभिकल्पाचे प्रकार: पुढे काही प्रमुख छानक अभिकल्पांच्या प्रकारांचे वर्णन दिले आहे.
स्थिर—क (k) छानक:टी विभागातील Z1 आणि Z2 या संरोधांमधील संबंध पुढीलप्रमाणे असल्यास तयार होणाऱ्या छानकास ‘स्थिर-क छानक’ म्हणतात.
Z1· Z2 = k = Rk2
Z1 आणि Z2 हे संरोध शुद्धअवरोधनात्मक असतात. k हा स्थिरांक असून त्याची परिमाणे ओहम२ या राशीच्या परिमाणासारखी असतात. Rk हा पारक पट्टातील सीमान्त रोध आहे. या छानकाची अभिकल्प समीकरणे सोपी असून केवळ मज्जाव कंप्रता व Rk एवढ्या दोन गोष्टी माहीत झाल्या म्हणजे स्थिर—क छानक विभाग तयार करता येतो.
Z1आणि Z2यांचे कंप्रतेशी असणारे चलन व्यस्त आहे, हे वरील समीकरणात अंतर्भूत आहे. स्थिर-क छानकाचे पारक व स्तंभक पट्ट पुढील अटींवरून ठरतात.
-4 ⩽ Z1/Z2⩽ 0(पारक पट्टासाठी) Z1/Z2 ⩽–4 (स्तंभक पट्टासाठी) आणि Z1/Z2 = –4 (मज्जाव कंप्रतेस असणाऱ्या संरोध गुणोत्तरासाठी).
या छानकाचा सीमान्त संरोध पारक पट्टामध्ये स्थिर असून त्याचे मूल्य जवळजवळ Rkएवढे असते. या प्रकारच्या निम्न पारक छानकाचे प्रचल पुढील सूत्रांनी मिळतात.
Z1 · Z2 = L/C = Rk2 — ωc2 LC = – 4
येथेω c = 2π fc = 2 π Xमज्जाव कंप्रता, L प्रवर्तकत्व व C धारिता. आ.५ मध्ये स्थिर—क प्रकारच्या छानकांच्या आकृत्या दिल्या आहेत.
छानकाच्या साध्या सैद्धांतिक विवेचनात उगम संरोध आणि भार संरोध सारखेच असून त्या दोहोंच्यामध्ये छानक जोडलेला असतो, असे मानले जाते. परंतु उगम संरोध व भार संरोध भिन्न असल्यास छानक मंडलाची अभिलक्षणे बरीच भिन्न असतात.
म (m ) – अनुसाधित छानक :स्थिर-क छानकांपेक्षा अधिक काटेकोर मज्जाव साधण्यासाठी हा छानक वापरतात. स्थिर-क छानकातील घटकांत बदल करुन अनुसाधित छानक तयार करतात. स्थिर-क छानकाच्या टी विभागातील Z1 आणि Z2 ह्या संरोधांच्या जागी Z1‘ आणि Z2‘ हे संरोध वापरtन म—अनुसाधित छानक विभाग तयार होतो. नव्या व जुन्या संरोधातील संबंध पुढील सूत्राने दाखविला जातो.
Z1‘= m Z1 Z2‘ = |
Z2 |
+ |
(1-m2) |
. Z1 |
m |
4m |
येथे m हा अभिकल्प प्रचल आहे (0 < m < 1). आ. ६ मध्ये म-अनुसाधित छानक विभाग दाखविले आहेत.
सक्रिय छानक :या छानकांमध्ये अक्रिय तसेच सक्रिय असे दोन्ही प्रकारचे घटक असतात. छानकाचा आकार लहान करण्यासाठी किंवा त्याची किंमत कमी करण्यासाठी किंवा पारक पट्टामध्ये लाभांक मिळविण्यासाठी सक्रिय घटकांचा उपयोग करतात. इच्छित निष्पत्तीसाठी यात पुनःप्रदायाचा (प्रदान संकेताचा काही भाग आदान संकेताला देण्याच्या क्रियेचा) उपयोग केलेला असतो.
सुजोड छानक :छानक आणि त्याचा सीमान्त रोध यांमध्ये संरोध सुजोड मिळविण्यासाठी सुजोड छानक किंवा छानक विभाग वापरतात. कालानुवर्ती (कालानुसार बदलणाऱ्या) विद्युत् संकेताच्या अभिलक्षणा बरोबर सुजोड साधण्यासाठीही सुजोड छानक वापरतात. आदान संकेताबरोबर गोंगाट (अनिष्ट विद्युत् व्यत्यय) असल्यास अशा छानकामुळे प्रदान संकेत भागिले गोंगाट ह्या गुणोत्तराचे मूल्य शक्य तेवढे जास्त करता येते.
स्फटिक छानक :यामध्ये दाबविद्युत् स्फटिकाचा (विद्युत् क्षेत्रात ठेवल्यास ज्या स्फटिकाचे एका अक्षावर आकुंचन आणि दुसऱ्या अक्षावर प्रसरण होते अशा स्फटिकाचा, उदा., क्वॉर्ट्झ, तोरमल्ली इत्यादींच्या स्फटिकाचा) उपयोग करण्यात येतो. रेडिओ ग्राहीतील मध्यम कंप्रता विवर्धकाचा पारक पट्ट अरुंद करण्यासाठी या छानकांचा उपयोग करतात. स्फटिकाचा Q गुणांक (साठविणारी शक्ती व नष्ट होणारी शक्ती यांचे गुणोत्तर ) उच्च असल्यामुळे या छानकामध्ये पारक पट्ट अरुंद मिळतो. रेडिओ तारायंत्र विद्येमध्येही या छानकांचा उपयोग होतो. ४५५ किलोहर्ट्झ कंप्रतेच्या स्फटिक छानकांचा प्रारक पट्ट ५० हर्ट्झ एवढा अरुंद करता येतो. या उलट ४५५ किलोहर्ट्झ कंप्रतेस मेलित मंडलापासून मिळणाऱ्या पारक पट्टाची रुंदी सु. ५,००० हर्ट्झ एवढी असते.
मूलभूत स्फटिक छानक मंडलाचे विद्युत् सममूल्य मंडल आ. ७ मध्ये दाखविले आहे. Z+Z1हा संरोध स्फटिकाच्या अनुस्पंदनाच्या वेळी असणाऱ्या संरोधापेक्षा कमी असल्यास Z1मधून वाहणारा प्रवाह व त्याच्यावर असणारा विद्युत् दाब या राशी स्फटिकाच्या (Xच्या ) संरोधाच्या जवळजवळ व्यस्त प्रमाणात असतात. अशा स्थितीत अनुस्पंदन वक्र अत्यंत काटेकोर असतो.
या उलट Z+Z1हा संरोधXच्या अनुस्पंदनाच्या वेळी असणाऱ्या संरोधांपेक्षा जास्त केल्यास अनुस्पंदन कंप्रतेपासून आदान कंप्रता जशी दूर जाऊ लागेल तसाZ1वर असणाऱ्या विद्युत् दाबामध्ये फारसा फरक पडणार नाही. शेवटी अशी स्थिती येईल की, Xचा संरोध जवळजवळZ+Z1एवढा होईल. परिणामी कंप्रता आणि Zवर येणारा विद्युत् दाब यांचा वक्र रुंद होऊ लागतो. म्हणजेच स्फटिक छानकाची विवेचकता (निरनिराळ्या कंप्रतांमध्ये भेद करण्याची क्षमता) कमी होते. व्यावहारिक स्फटिक छानकाचे मंडल आ. ८ मध्ये दिले आहे. यात Zव Z1ह्या संरोधाच्या जागी मेलित मंडले असतात.
स्फटिक छानक, विशेषतः ते विशिष्ट कंप्रतेच्या संकेत ग्रहणासाठी समायोजित केलेले असले म्हणजे, व्यत्यय आणि पार्श्व गोंगाट पुष्कळच कमी करतात. यामुळे अत्यंत क्षीण संकेतसुद्धा सहजपणे नोंदून घेता येतात. छानक जास्तीत जास्त विवेचनक्षम बनविलेले असतील तर पारक पट्ट एवढा अरुंद असतो की, ग्रहण करावयाच्या संकेताची कंप्रता अत्यंत स्थिर असणे आवश्यक असते. तसेच ग्राहीमधील स्थानिक आंदोलकही [ज्याचा प्रदान संकेत आदान संकेताबरोबर मिसळून ग्राहीच्या मध्यस्थ कंप्रतेइतकी बेरीज वा वजाबाकी असलेली कंप्रता निर्माण करणारा आंदोलक ⟶ आंदोलक]अतिशय स्थिर असावा लागतो.
यांत्रिक छानक :ही एक यांत्रिक प्रेषण प्रयुक्ती असून तीत वापरलेल्या घटकांच्या द्रव्यमान वा निरूढी परिबल (एखाद्या अक्षाभोवती फिरणाऱ्या वस्तूच्या कोनीय प्रवेगास होणाऱ्या त्या वस्तूच्या विरोधाचे माप) आणि स्थितीस्थापक प्रतिसादित्व (आवर्ती, म्हणजे ठराविक कालाने पुन्हा लागू होणाऱ्या, प्रेरणेला एखाद्या यांत्रिक संहतीचा मिळणारा प्रतिसाद मोजणारा गुणांक) या राशी कंप्रतेनुरूप बदलणाऱ्या असतात. विद्युत् यांत्रिक ऊर्जापरिवर्तकाच्या (एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत रुपांतर करणाऱ्या प्रयुक्तीच्या) साहाय्याने ह्या छानकांचे विद्युत् जालाशी युग्मन (जोडणी) करता येते. आ. ९ मध्ये कॉलिंझ यांचा यांत्रिक छानक दाखविला आहे. एक आदान ऊर्जापरिवर्तक, धातूच्या अनेक तबकड्यांनी बनलेला अनुस्पंदनी यांत्रिक विभाग आणि एक प्रदान ऊर्जापरिवर्तक या घटकांनी हा छानक बनलेला आहे. १०० किलोहर्ट्झ ते ५०० किलोहर्ट्झ या पट्टात यांत्रिक छानकांचा आकार पुष्कळ लहान असतो आणि त्यांची विवेचनक्षमताही पुष्कळ चांगली असते. यांत्रिक छानकाची कंप्रता अभिलक्षणे स्थिर असून त्यात समायोजन करण्याची जरूरी नसते आणि ते करताही येत नाही. हे छानक वाताभेद्य पेटीमध्ये बंद केलेले असतात.
मेलित छानक :यात विवर्धक टप्प्यांची प्रपातासारखी रचना केलेली असून हे टप्पे मेलित युग्मक जालांनी जोडलेले असतात. वेगवेगळ्या अनुस्पंदक मंडलांची अनुस्पंदन कंप्रता आणि पट्टविस्तार हवा तसा जुळवून घेऊन या छानकाच्या प्रेषण फलनास इच्छित गुणधर्म प्राप्त करून देता येतात.
उपयोग :इलेक्ट्रॉनीय संदेशवहन आणि नियंत्रण सामग्रीच्या जवळजवळ प्रत्येक प्रकारामध्ये छानकांचा अनेक कामांसाठी उपयोग करतात. रेडिओ संदेशवहन प्रणालीच्या प्रेषकामध्ये निर्माण केलेल्या विद्युत् संकेतांची कंप्रता रेडिओ कंप्रतेच्या (१० किलोहर्ट्झच्या) दोन्ही बाजूंच्या अरुंद पट्ट्यात असतात. म्हणून रेडिओ ग्राहीमध्ये पट्ट पारक छानकांचा उपयोग केलेला असतो. हे छानक प्रेषकाकडून आलेल्या विद्युत् संकेतांचे विवेचक रीत्या विवर्धन करतात आणि नको असलेल्या कंप्रतांचे क्षीणन करतात. त्याचप्रमाणे दूरचित्रवाणी संकेतामध्ये असणाऱ्या श्राव्य व दृक् संकेतांवर वेगवेगळ्या संकेत प्रक्रिया करण्यासाठी ते छानकांच्या साहाय्याने वेगळे करतात. उपयोगानुसार या छानकांचा पट्टविस्तार हर्ट्झच्या काही अंशापासून कित्येक दशलक्ष हर्ट्झपर्यंत असतो.
दूरध्वनी मंडलामध्ये छानकाचा केला जाणारा उपयोग हा फार महत्त्वाचा उपयोग आहे. निरनिराळे संकेत एकाच वेळी एका परिवाहातून (विद्युत् संकेत प्रेषित करण्याच्या मार्गातून) पाठविले, तरी ते छानकांच्या साहाय्याने पूर्णपणे वेगळे करून योग्य त्या ग्राहींकडे पाठविता येतात.
अनेक टप्प्यांनी किंवा विभागांनी बनलेल्या एखाद्या प्रणालीमधील या वेगवेगळ्या घटकांमध्ये अनावश्यक परस्परक्रिया घडू नये म्हणून ते टप्पे छानक वापरून अलग केलेले असतात. उदा., विवर्धकाचा प्रत्येक टप्पा आणि त्याचा समाईक शक्ती उगम यांच्यामध्ये एक निम्न पारक छानक जोडतात. या छानकाला अयुग्मक छानक म्हणतात (आ. १०).
एकदिशकारकामधून (प्रत्यावर्ती म्हणजे उलटसुलट दिशेने वाहणाऱ्या प्रवाहाचे एकदिश म्हणजे एकाच दिशेने वाहणाऱ्या प्रवाहात रूपांतर करणाऱ्या प्रयुक्तीमधून) मिळणाऱ्या एकदिश प्रदानामध्ये काही प्रमाणात प्रत्यावर्ती घटक असतो. याचे दमन करुन निव्वळ एकदिश प्रदान मिळावे याकरिता छानक वापरतात. याला सरलीकारक छानक म्हणतात. याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आ.११ मध्ये सामान्यपणे वापरला जाणारा पाय (π) या प्रकारचा छानक दाखविला आहे.
काही वेळी व्यत्यय संकेताची निश्चित कंप्रता माहीत असते. उदा., ५० हर्ट्झ कंप्रतेच्या विद्युत् शक्ती प्रेषक तारांमुळे श्राव्य प्रणालीमध्ये येणारा व्यत्यय. बहुतेक वेळा अशा प्रणालीमध्ये येणारा व्यत्यय हा विषम प्रगुण (पटीत असणाऱ्या) कंपनांमुळे येतो. अशा प्रणालीमध्ये या कंप्रतेला काटेकोरपणे मेलित केलेला पट्ट अस्वीकारी छानक वापरतात. व्यत्ययकारी कंप्रतेएवढी मज्जाव कंप्रता असलेला उच्च पारक छानक वापरूनही हे काम होऊ शकेल. परंतु त्यामुळे हव्या असलेल्या नीच कंप्रताही थांबविल्या जातील.
संदर्भ : 1. Cockrell, W. D., Ed. Industrial Electronics Handbook, New York, 1958.
2. Orr, W. I. Ed., The Radio Handbook, Summerland, Calif., 1959.
पार्डीकर, पु. गो. शिरोडकर, सु. स.
“