चैत्रहिंदू कालगणनेतील पहिला महिना. पौर्णिमेच्या सुमारास चंद्र चित्रा नक्षत्रात असल्यामुळे चैत्र हे नाव बहुधा वैदिककालाच्या अखेरीस पडले. तत्पूर्वी याला मधुमास म्हणत. सूर्य मीन राशीत असताना चैत्रास सुरुवात होते. मेष संक्रात चैत्रात येते. चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शालिवाहन शकाचा वर्षारंभ व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून त्या दिवशी गुढ्या-तोरणे उभारून नवीन वर्षाचे स्वागत करतात. पंचांगाची पूजा करतात व कडूनिंबाचा पाला हा मिरी, हिंग, लवण, जिरे व ओवा यांसह वाटून खातात. याच दिवशी वसंतऋतू,संवत्सर व चंडिका नवरात्र (वासंतिक देवी नवरात्र) सुरू होतात. या दिवशी आरोग्य प्राप्तिव्रत, विद्याव्रत आणि तिलकव्रत करतात. याच प्रतिपदेला सूर्योदयास ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली असे मानतात व सूर्योदयाच्या वेळचा वार वर्षेश मानतात. शुद्ध पक्षात गौरीपूजन, मत्स्यजयंती (तृतीया), भवानीची उत्पत्ती (अष्टमी), रामनवमी, दोलोत्सव (एकादशी), दमनोत्सव, महावीरांचा जन्म, महाराष्ट्रात गौरींची स्थापना (शुद्ध तृतीया) आणि हनुमान जयंती व चैत्री याग (पौर्णिमा) हे महत्वाचे दिवस असतात. वद्य त्रयोदशीला शततारका नक्षत्र आल्यास १०० सूर्यग्रहणांचा व शनिवार आल्यास महावारुणी योग समजतात. अमावस्येला रावणाचा वध झाला. पूर्वी शुद्ध त्रयोदशीला चैत्रावली उत्सव करीत. चैत्रात विशिष्ट रांगोळ्या (चैत्रांगण) काढणे दही, दूध, तूप व साखर वर्ज्य करणे इ. गोष्टी कराव्यात, असे सांगितले आहे.

ठाकूर, अ. ना.