चैतन्यचरितामृत: एक बंगाली काव्यग्रंथ. कृष्णदास कविराजांनी १५७० ते १५७५ च्या सुमारास रचिलेले चैतन्य महाप्रभूंचे हे काव्यात्मक चरित्र होय. बंगालीतील ‘पयार’ छंदात त्यांनी ते रचले. हे काव्य १६१२ किंवा १६१६ मध्ये रचिले गेले असावे, असेही एक मत आहे. कवीने पूर्वीच्या चैतन्यचरित्रकारांच्या ग्रंथांचा आधार आपल्या काव्यास घेतला. मुख्यतः मुरारीगुप्त यांचे संस्कृतमधील चैतन्यचरितामृत, स्वरूप दामोदर यांचा कडचा (कविताबद्ध चरित्र), कविकर्णपूरविरचित संस्कृत चैतन्यचंद्रोदय  नाटक आणि वृंदावनदासांचे चैतन्यभागवत  या ग्रंथांच्या आधारावर कृष्णदासांनी चैतन्यचरितामृत  रचिले. पूर्वीच्या ग्रंथांतून चैतन्य महाप्रभूंच्या जीवनाचा शेवटचा भाग विस्तृतपणे आलेला नसल्याने वैष्णव भक्तांनी कृष्णदास कविराज यांना आग्रह केल्यावरून, त्यांनी हा ग्रंथ आयुष्याच्या अखेरीअखेरीस लिहिण्यास घेतला. कृष्णदासांनी लहानपणीच घर सोडले व ते वृंदावन येथे गेले. ते संस्कृतचे गाढे पंडित होते. ते नित्यानंदांचे अनुयायी होते. चैतन्य संप्रदायांच्या वृंदावन शाखेप्रमाणे त्यांनी चैतन्यास राधा व कृष्ण या दोघांचाही संयुक्त परिपूर्णावतार मानले आणि ह्या दृष्टिकोनातूनच त्यांनी चैतन्यचरित्र वर्णिले. एक चरित्र म्हणून त्यांचे हे काव्य श्रेष्ठ प्रतीचे आहे. आपल्या मतास ते अधिकृत आधार दिल्याशिवाय राहत नाहीत. म्हणूनच केवळ चैतन्यचरितामृत  चरित्रच नव्हे, तर वैष्णव संप्रदायाच्या गूढ आणि तात्त्विक अंगाचा एक मानदंडच मानले जाते.

ग्रंथाचे आदिलीला, मध्यलीला आणि अंत्यलीला असे तीन भाग पाडले असून, प्रत्येक भागाचे पुन्हा अध्याय पाडलेले आहेत. आदिलीलेत चैतन्य महाप्रभूंचे बाळपण, किशोरकाळ व तारुण्याच्या पूर्व भागातील लीला वर्णिल्या आहेत. मध्यलीलेत महाप्रभूंचे शांतिपुरास आगमन व अद्वैत प्रभूंच्या गृही महोत्सव यांचे वर्णन आहे. अंत्यलीलेत महाप्रभूंचे नीलाचलावर गमन व त्यानंतरची जीवनकथा आहे.

चैतन्यचरितामृत  एक तत्त्वज्ञानात्मक चरित्र आहे. गौडीय वैष्णवधर्माचे तात्पर्य व तत्त्वज्ञान त्यात पूर्णपणे व्यक्त झालेले आहे. महाप्रभूंच्या जीवनाचे सार वर्णन करताना, आपले वक्तव्य सुस्पष्ट करण्यासाठी कवीने रामायण, महाभारत, पुराणादींतून आवश्यकतेनुरुप मालमसाला घेतला आहे. बऱ्याच संस्कृत ग्रंथांचे सार त्यात संकलित आहे. असंख्य ग्रंथांतून श्लोक उद्‌धृत केले आहेत. कवीचे संवेदनशील मन व प्रगाढ पांडित्य या काव्यात प्रगट झालेले आहे. इतिहासाची दृष्टी असलेले प्राचीन बंगाली काव्य याशिवाय दुसरे नाही. बंगाली साहित्यातील श्रेष्ठतम ग्रंथांत या ग्रंथांचे स्थान असून वैष्णव काव्यसाहित्यात गीता  आणि भागवतानंतर चैतन्यचरितामृताचाच मान आहे.

सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)