चेमकूर वेंकट कवि : (सतरावे शतक). एक तेलुगू कवी. विजयानगरच्या कृष्णदेवरायाप्रमाणेच तंजावरच्या रघुनाथ नायक याच्या कारकीर्दीत (१६००–३१) तेलुगू वाङ्‌मयास अभूतपूर्व उत्तेजन मिळाले. रघुनाथ नायक हा स्वतः कवी होता. त्याच्या ‘इंदिराभवन’ किंवा ‘विजयविलास’ नामक दरबारात काव्यशास्त्रविनोदाची लयलूट होत असे. त्याच्या पदरी चेमकूर वेंकट कवी हा प्रतिभासंपन्न राजकवी होता. साहित्येतिहासकारांच्या मते तो रघुनाथ नायकाच्या राजसभेसच नव्हे, तर तेलुगू साहित्यातील दक्षिणांध्र युगास भूषणभूत होता. शार्ङ्‌गधरचरित्र  आणि विजयविलासमु (सु. १६३०) ही त्याची साहित्यमूल्याच्या दृष्टीने सारख्याच तोलाची प्रबंधकाव्ये (महाकाव्यासारखा तेलुगू काव्यप्रकार) होत.

दोहोंपैकी शार्ङ्‌गधरचरित्र  हे नैतिक दृष्टीने हिणकस, अश्लील समजले जाते पण केवळ काव्यमूल्याच्या दृष्टीने पाहता विजयविलासमुपेक्षा त्याची योग्यता कमी ठरत नाही. शृंगार-करुणरसांनी युक्त असे हे शार्ङ्‌गधरचरित्र  काव्य आहे. ते वाचीत असताना सम्राट अशोकाचा पुत्र कुणाल याच्या कथेची आठवण होते. राजराजनरेंद्राची पत्नी चित्रांगी ही स्वतःचा सावत्र मुलगा शार्ङ्‌गधर याच्यावर लुब्ध होती. तो एकदा तिच्या हाती सापडला असता त्याने तिच्या नीतिबाह्य विनंतीचा अव्हेर केला आणि अनाचारापासून तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. याचा सूड घेण्यासाठी तिने राजाकडे उलटी कागाळी केली. या अपराधाबद्दल शार्ङ्‌गधराचे हातपाय तोडले गेले. शारीरिक यातना आणि असह्य अपमान यांनी व्यथित झालेला दुर्दैवी शार्ङ्‌गधर हातपाय तोडणाऱ्यांस, हिंस्र प्राणी आणि दावाग्नी यांस आपले प्राण त्वरित घेण्याची विनवणी करतो, तेव्हा करुणरसाची परमावधी होते. आंध्र प्रदेशात या काव्याला अफाट लोकप्रियता लाभली.

विजयविलासमु  हे दक्षिणांध्र युगातील उत्कृष्ट प्रबंधकाव्य होय. मनुचरित्राच्या काळी तेलुगू भाषा पूर्ण विकसित झाली होती, तर चेमकूर वेंकट कवीच्या काळी तिने माधुर्याची परम सीमा गाठली होती. विजयविलासमु   हे प्रबंधकाव्य या विधानाची सत्यता पटविते. यात ३ आश्वास आणि ६७२ पद्ये आहेत. श्रीनाथाच्या हरिविलासातील आणि रामराजभूषणाच्या वसुचरित्रातील काही स्थळे विजयविलासमुहून सुंदर आहेत पण विजयविलासमुत प्रथमपासून शेवटपर्यंत माधुर्य ओतप्रोत भरून राहिले आहे. अर्जुनाचे चित्रांगदा, उलूपी आणि सुभद्रा यांच्याशी झालेल्या विवाहांचे वर्णन त्यात आहे. दुर्बोधता टाळून श्लेषचमत्कार, वाक्‌प्रचारादिकांचा समयोचित उपयोग, पदलालित्य, प्रसाद इ. गुणांमुळे हा काव्यग्रंथ साहित्यशारदेचे एक तेजस्वी आभूषण ठरला आहे. वेंकट कविकृत श्लेष केवळ शब्दावरच नव्हे, तर भावार्थावरही आधारलेला आहे. त्यामुळे त्याच्या शैलीचे अनुकरण अशक्य असल्याचा अभिप्राय स्वतः रघुनाथ नायकानेच दिला आहे. प्रत्येक पदात श्लेष साधण्याची कवीची आकांक्षा विजयविलासमुत सफल झाली आहे.

टिळक, व्यं. द.