तैपे (तैबे) : तैवानची पर्वतवेष्ठित राजधानी, लोकसंख्या १८,६४,६९७ (१९७२). हे व्यापरी, औद्योगिक, आर्थिक, वाहतूक, शैक्षणिक व शासकीय केंद्र दानश्वे नदीवर, कीलुंग बंदरापासून सु. ४० किमी. असून कीलुंग व दानश्वे बंदरांपासून येथपर्यंत नदीमार्गे वाहतूक चालते. मूळचे गाव पाचसहा गावांच्या एकत्रीकरणामुळे खूपच वाढले आहे. चीनच्या फूक्येन प्रांतातील स्थलांतरितांनी १७०८ मध्ये वसविलेले हे गाव १८८५ मध्ये जपान्यांनी घेतले व १८९५ मध्ये तैवानची राजधानी केले. १९४५ पर्यंतच्या जपानी अंमलात त्याची खूपच वाढ झाली. नंतर तैवानबरोबरच ते चीनकडे गेले. व १९४६ मध्ये चीनमध्ये कम्युनिस्टांची सत्ता आल्यानंतर ‘राष्ट्रीय चीन’ या चीनच्या परांगत शासनाची तात्पुरती राजधानी झाले आणि अधिकच विकास पावले. येथे कापडगिरण्या, इलेक्ट्रॉनिक व वीजउपकरणे, वीजयंत्रे, तारा व केबल, डबाबंद पदार्थ, लोखंडाच्या भट्ट्या, मोटारीचे भाग जोडणे, काच, तेलशुद्धी, प्रशीतन, जहाजबांधणी, मोटारसायकली, रबरी वस्तू, तांदूळ व चहा यांवरील प्रक्रिया, रसायने, आसवन्या, छपाई इत्यादींचे कारखाने आहेत. लोहमार्ग, सडका, सुंगशान आंतरराष्ट्रीय विमानतळ या व आरोग्यविषयक उत्तम सोयी येथे आहेत. येथील सौम्य हवामानामुळे वर्षभर हिरवेगार सृष्टिसौंदर्य दिसते. तैवान राष्ट्रीय विद्यापीठ, ग्रंथालये, आकाशवाणी, वनस्पती उद्योग, अनेक धार्मिक प्रार्थना मंदिरे इत्यादींमुळे शहराच्या सांस्कृतिक महत्त्वात भर पडली आहे. १९४९ नंतर येथे आणलेल्या प्रचीन चिनी कलाकुसरीच्या आणि चिनीमातीच्या वस्तू, चित्रे, सुलेखन इत्यादींचा जगातील सर्वांत मोठा संग्रह येथील नॅशनल पॅलेस म्यूझियममध्ये आहे. येथून जवळच विहारस्थळे, उष्णोदकाचे झरे, पुळणी, नौका आणि जलक्रिडा स्थाने, गोल्फसारखे खेळ याच्या सोयी आहेत.
ओक, द. ह.
“