तेनालि रामकृष्ण : (सु. १४९५–सु. १५६५). पांडुरंग–माहात्म्यमु हा प्रख्यात तेलुगू महाकाव्याचा कर्ता. तो तेनाली येथील रहिवासी. मातापिता लक्ष्मम्मा व रामय्या. कृष्णदेवरायाच्या दरबारात तो अष्टदिग्गजांपैकी एक असावा, असे काही अभ्यासक मानतात. तेलुगू व संस्कृतचा तो पंडित होता. त्याला तरुणपणीच ‘कुमार भारती’ अशी उपाधी प्राप्त झाली होती. सुरुवातीस तो शैव होता व त्याचे नाव रामलिंग असे होते तथापि नंतर त्याने वैष्णव मताचा स्वीकार केला आणि रामकृष्ण हे नाव धारण केले. त्याचे सुरुवातीचे उद्भटाराध्यचरित्रम् हे काव्य शैव प्रबंधकाव्य (महाकाव्य) आहे आणि पांडुरंग–माहात्म्यमु हे वैष्णव प्रबंधकाव्य आहे. या दोन्हीही काव्यात दिलेली कवीची वंशावळ एकच असून या दोन्हीही काव्यांची शैलीही सारखीच आहे. त्यावरून त्यांचा कर्ता एकच असावा असे मत बहुतेक अभ्यासक व्यक्त करतात. काही अभ्यासक मात्र हे दोन वेगळे कवी मानतात. त्याच्या कालाबाबतही अभ्यासकांत दोन मते रूढ असून काहींच्या मते तो चंद्रगिरीचा राजा वेंकटपतिराय (१५२५–१६१४) यांच्या दरबारात, तर काहींच्या मते कृष्णदेवरायाच्या दरबारात कवी होता. विनोदी कविता आणि चुटके यांसाठी तेनाली रामकृष्ण आंध्र प्रदेशात विशेष प्रसिद्ध आहे. विनोदासाठी ‘विकटकवी’ म्हणून त्याची प्रसिद्धी आहे.
त्याच्या चातुर्यकथांमध्ये बिरबलाच्या कथांचे स्मरण होते. त्याच्या विनोदी प्रकृतीबाबतच्या अनेक दंतकथा केवळ आंध्र प्रदेशातच नव्हे, तर कनार्टक, केरळ व तमिळनाडू प्रदेशांतही रूढ आहेत.
उद्भटाराध्यचरित्रम् कवीने तरुणपणी लिहिलेले दिसते. या तीन आश्वासांच्या काव्यात शैलीचा भारदस्तपणा दिसत नाही. पांडुरंग–माहात्म्यमुमध्ये तिर्थ, क्षेत्र आणि दैवत या तिन्ही दृष्टींनी पुंडरीक क्षेत्राचा म्हणजे पंढरपूरचा महिमा पाच आश्वासांत वर्णिला आहे. भक्तश्रेष्ठ पुंडलिकाबरोबरच निगमशर्मा, सुशिला, अयुत–नियुत इ. भक्तांच्या कथा यात आहेत. हा ग्रंथ तिर्थक्षेत्रांसंबंधी असूनही प्रौढ, आलंकारिक शैली आणि वर्णनप्रधानता यांमुळे त्याला महाकाव्याची योग्यता प्राप्त झाली. यातील निगमशर्मोपख्यानम् हा भाग उत्कृष्ट असून तो विशेष लोकप्रिय आहे.
रामकृष्णाच्या साहित्यकृतीत श्रीनाथाप्रमाणे छंदयोजना, कृष्णदेवरायाप्रमाणे कल्पनावैभव आणि नाचन सोमनाप्रमाणे प्रसंग किंवा दृश्य यांचे वर्णन ही वैशिष्ट्ये आढळतात. असे असले, तरी कवीची स्वतंत्र प्रतिभा या ग्रंथात दिसल्यावाचून राहात नाही. श्रीनाथाने सीस छंदाला जे महत्त्व प्राप्त करून दिले होते, ते रामकृष्णाने आणखी वाढविले. काही ठिकाणी सामासिक आणि दुर्बोध शब्दांचा उपयोग केल्यामुळे ग्रंथ सामान्यांना अडल्यावाचून राहत नाही. घटिकाचलमाहात्म्य नावाचे घटिकाचल क्षेत्राचे माहात्म्य वर्णन करणारे तीन आश्वासांत रचलेले त्याचे आणखी एक काव्य उपलब्ध आहे. त्याच्या नावावर कंदर्पकेतु विलासमु आणि हरिलीला विलासमु ही काव्ये सांगितली जातात. त्याच्या अनेक विनोदी व चातुर्यकथा आंध्र प्रदेशात रूढ आहेत.
टिळक, व्यं. द.
“