तेजी : अर्थव्यवस्थेच्या व्यापारचक्रातील भावपातळीचे शिखर व त्या शिखराकडे होत असणारी अर्थव्यवस्थेची वाटचाल. जगातील आर्थिक घडामोडींच्या सर्वसाधारण पातळीमध्ये वारंवार चढउतार होत असतात. एकोणिसाव्या शतकात व दुसऱ्या जागतिक महायुद्धापूर्वीच्या काळात असे चढउतार काहीशा नियमितपणाने दर सहा ते आठ वर्षांनी होत असत. या चढउतारांना अनुक्रमे ‘तेजी’ व ‘मंदी’ या संज्ञा प्राप्त झाल्या. अर्थशास्त्रज्ञांनी या चढउतारांचा अभ्यास सुरू केला, त्या काळी रोजगार वा उत्पादन यासंबंधी अधिकृत आकडेवारी उपलब्ध नव्हती म्हणून भावनिर्देशांकांच्या साहाय्यानेच व्यापारचक्राचे विश्लेषण करण्याची प्रथा पडली. या विश्लेषणात असे आढळते की, अर्थव्यवस्थेतील भावपातळी वर जाण्यास काही कारणांनी सुरुवात झाली, म्हणजे सर्वसाधारणपणे भाव वाढतच जातात. सुरुवातीस कच्च्या मालाचे भाव वाढतात व नंतर इतरही वस्तूंचे भाव वाढत जातात. भाववाढीमुळे कर्मचारी वेतनवाढीची मागणी करतात व ती पुरी केल्यावर उत्पन्नात भर पडल्याने मागणीत वाढ होऊन किंमती आणखी वाढल्या, तर नफ्याचे प्रमाण वाढते. व्यापारी व कारखानदार यांना भविष्यकाल उज्ज्वल भासू लागतो कारण मालाची विक्री अधिक वेगाने होत असते व नफाही वाढत्या प्रमाणावर मिळत असतो. अर्थव्यवस्थेतील उत्पादनात आणि रोजगारात वाढ होते. बँकांकडून कर्जपुरवठाही सुलभतेने मिळू लागतो. व्यापाऱ्यांचा भविष्यकाळाच्या उज्ज्वलतेवरील विश्वास दृढतर होतो. अशा रीतीने भावपातळी वर जात जात शिखर गाठते. नंतर मात्र काही कारणांमुळे उलट प्रतिक्रिया सुरू होऊन व्यापारचक्र मंदीकडे झुकू लागते.

तेजी ही संज्ञा शेअरबाजारातील व कृषिउत्पादन विनिमय केंद्रांमधील व्यवहारांच्या शिखरकाळासाठीदेखील वापरण्यात येते. व्यापारचक्राच्या तेजीच्या काळात या बाजारांतील व्यवहारांनाही विशेष वेग येतो. या बाजारांत होणाऱ्या एका विशिष्ट खरेदी व्यवहारासही तेजी असे म्हणतात. एखाद्या शेअरची किंवा वायद्याची किंमत नजीकच्या काळात वाढेल, अशा अपेक्षेने जेव्हा खरेदीदार शेअर किंवा वायदा खरेदी करतो, तेव्हा त्या व्यवहारास तेजी असे संबोधतात.

पहा : कृषिउत्पादन विनिमय केंद्रे व्यापारचक्र व्यापारविषयक संज्ञा.

धोंगडे, ए. रा.