तूलूझ : (रोमकालीन तलोसा). द. फ्रान्समधील ऑट गारॉन प्रांताची राजधानी. लोकसंख्या ३,९६,८०० (१९७१ अंदाज). बॉर्दोच्या आग्नेयीस २१३ किमी.वर मोक्याच्या जागी असलेले हे इतिहासप्रसिद्ध शहर लोहमार्ग प्रस्थानक, कालव्यावरील बंदर, फ्रान्सच्या विमान उद्योगाचे केंद्र व दक्षिणोत्तर जाणाऱ्या मार्गांचे केंद्र असून पिरेनीजमधील प्रवाहांमुळे उपलब्ध झालेल्या जलविद्युत शक्तीमुळे विकास पावलेल्या दारूगोळा, खते, कागद, कापड, कातडी सामान, तंबाखू, यंत्रे, रासायनिक पदार्थ इत्यादींच्या कारखान्यांमुळे औद्योगिक दृष्ट्या पुढारलेले आहे. हे आजूबाजूंच्या विभागातील शेतमालाचे व कापडाचे वितरण केंद्र व बाजारपेठ आहे. हे मध्ययुगीन काळापासून यूरोपचे एक प्रसिद्ध सांस्कृतिक केंद्र असून येथे तेराव्या शतकापासून विद्यापीठ, कलाशास्त्र–साहित्यादींच्या अकादमी, वस्तुसंग्रहालये, ग्रंथालये, उद्याने, वेधशाळा, वनस्पति–उद्यान, व्यावसायिक व तंत्रविद्यालये, रोमॅनेस्क शैलीचे सुप्रसिद्ध सेंट सर्निन चर्च व इतर अनेक धार्मिक व ऐतिहासिक वास्तू आहेत. इ. स. पू. चौथ्या शतकात वसलेल्या तूलूझने अनेक राजकीय स्थित्यंतरे व सत्तांतरे, १५६२ मधील प्रॉटेस्टंटांची कत्तल, १७२१ पासूनचा फ्रेंच अंमल, १८१४ मधील ब्रिटिशांचा फ्रेंचांवरील विजय, दुसऱ्या महायुद्धकाळातील सु. पावणेदोन वर्षांची जर्मन राजवट इ. अनुभविले आहे.
ओक, द. ह.