धनुर्विद्या : एक पारंपरिक अस्त्रविद्या. धनुर्वेदाच्या वर्गीकरणानुसार धनुष्याचा बाण हे एक यंत्रमुक्त म्हणजे यंत्राद्वारे सोडलेले अस्त्र होय. धनुष्य, बाण आणि बाण ठेवण्याचा भाता मिळून हे संपूर्ण अस्त्र बनते. धनुष्यबाण हे आक्रमक म्हणजे हल्ला करण्याचे अस्त्र आहे. आत्मरक्षणासाठी धनुर्धरास ⇨ चिलखत व शिरस्त्राण घालावे लागते, धनुर्धराच्या रक्षणासाठी ढाल घेतलेला एक वेगळा योद्धा ठेवण्याची प्रथाही प्राचीन काळी होती.
घटक : धनूष्य, दोरी व बाण हे या अस्त्राचे मुख्य घटक असून त्यांची रचना, स्वरूप व उपयोग पुढीलप्रमाणे असतात.
धनुष्य : लवचिक पण कठीण काठीला बाक देऊन तिची दोन टोके दोरीने जोडल्यावर साधे धनुष्य बनते. भारतीय पुराणात धनुष्याचे शार्ङ्ग (शिंगाचे) व वांश (वेळूचे) असे दोन प्रकार सांगितले आहेत. पुढे मात्र शास्त्रीय ज्ञानात जसजशी प्रगती झाली आणि शिंग, गोंद चामडे इ. नवनवीन कच्चा माल, हत्यारे व साधने प्रचारात आली तसतसा धनुष्याच्या रचनेत विकास घडून आला. त्यामुळेच दोन मीटर लांबीइतके संयुक्त धनुष्य बनविणेही शक्य झाले. एकबहिर्गोल आणि द्विबहीर्गोल असाही आकार धनुष्याला देऊन त्याचा पल्ला व आघातशक्ती कमी न करताही त्याची लांबी कमी करता येऊ लागली. लाकडी पट्टी व शिंगांचे थर एकमेकांवर चिकटवून आणि त्यांवर आतड्याचे तंतू गुंडाळून संयुक्त धनुष्याची कमान बनविली जाई. प्रथम तुर्कमोगलांनीच हे धनुष्य बनवून प्रचारात आणले, असे म्हटले जाते परंतु भारतात मौर्यकालामध्ये अशी संयुक्त धनुष्ये बनविली जात असावी, असाही एक तर्क आहे. पिनाक, शार्ङ्ग ही संयुक्त धनुष्येच असून त्यांची लांबी दोन मीटरपर्यंत असे. ही दीर्घ धनुष्ये धनुर्धराच्या उंचींइतकी वा त्याहूनही लांब असत. पूर्वी रथारूढ किंवा अश्वारुढ धनुर्धर मात्र आखूड संयुक्त धनुष्येच वापरीत असत. मोठ्या धनुष्यांचा उपयोग भारी बाण दूरवर मारण्याकडे होतो. त्यांचा लक्ष्यवेधही अचूक असतो. त्यांचे एक टोक जमिनीवर पायाने दाबून ठेवावे लागते. त्यांच्यावर तापमानाचा परिणाम लवकर होतो. म्हणून धनुष्याची दोरी फक्त कामाच्या वेळीच जोडावी लागते. तसेच धरून ठेवण्यातही कुशलता असावी लागते. अशा धनुष्यांवरून बाण झटपट सोडणे कठीण असते, म्हणून धनुर्धर आजानुबाहू आणि फार बलवान असावा लागतो. भारतात प्राचीन काळी मोठे धनुष्य सैनिकप्रिय होते. त्याने दोनशे मीटरपेक्षाही लांबवर बाण फेकता येतो. मोठ्या धनुष्याने दर मिनिटाला सहा बाण सोडणे निष्णात धनुर्धराला कठीण नाही.
जपानी दीर्घ धनुष्याच्या कांबेचा मुठीवरील भाग कांबेच्या खालील भागापेक्षा थोडा लांब असतो. मात्र धनुष्याची एकूण लांबी २१० सेंमी. (७ फूट) इतकी असते. आदिवासी व बुटके यांच्यांत आखूड आणि साधे धनुष्य वापरतात. त्यांचे बाण अनेकदा विषारी असतात. चीनमध्ये इ. स. पू. तिसऱ्या शतकात संकर धनुष्य (क्रॉस बो) प्रचारात आले. त्याची कमान फारच आखूड व बहुतांशी पोलादी पट्ट्याची असे कांब वाकविण्यासाठी त्याला दंतपट्टी-अटककुत्रे आणि हस्त घर्घरी किंवा भ्रामणी रहाट यांचा उपयोग करावा लागतो. यापासूनच पुढे पुनरावर्ती संकर धनुष्य (रिपिटिंग क्रॉस बो) बनवून बाण मारण्याचा वेग खूपच वाढविण्यात आला. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात उल्लेखिलेली शतघ्नी वगैरे अस्त्रे-यंत्रे याच प्रकारची असण्याचा संभव आहे. याच संकर धनुष्याची नक्कल तेराव्या-चौदाव्या शतकांत तुर्क, मोगल, अरब व त्यानंतर यूरोपियनांनी केली.
हल्ली तंतुकाच, कृत्रिम गोंद यांसारख्या नवीन सामग्री उपलब्ध झाल्यामुळे धनुष्ये अतिशय कार्यक्षम झाली आहेत. त्यामुळे दीड किमी. अंतरावरील लक्ष्याचा देखील वेध घेता येतो. धनुष्याचे वजन म्हणजे त्याची दोरी आकर्ण ओढण्यासाठी लागणारी ताकत अथवा बल हे बल किंवा ताकत पौंडांत अथवा किग्रॅ. मध्ये मोजली जाते. २८ किग्रॅ. वरील धनुष्य वजनदार समजले जाते. ४७ किग्रॅ. ची (१०० पौंडी) धनुष्येही वापरात आहेत. तटबंदी फोडण्यासाठी अवजड लोखंडी बाण आवश्यक असतात. त्यासाढी मोठ्या यांत्रिक धनुष्याची आवश्यकता असते. त्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रात महाशरयंत्र (बॅलिस्टिक्स) म्हटले आहे.
दोरी : आतड्याचे स्नायू, वादी, वेतासारख्या वनस्पती किंवा कृत्रिम तंतू यांपासून धनुष्याची दोरी बनवितात. ती दोरी ओढताना दुखापत होऊ नये म्हणून बोटावर आवरण (मणिबंध) घालतात. धनुष्याच्या दोरीला ज्या, मौर्वी, प्रत्यंचा, गुण इ. शब्द वापरले आहेत. धनुष्यास दोरीला लावली म्हणजे ते सज्य होते. उष्ण व दमट हवामानात धनुष्याची व दोरीची कार्यक्षमता क्षीण होते. ग्रीसचे हवामान अनुकूल नसल्यामुळे ग्रीक धनुर्विद्येत प्रगती करु शकले नाहीत, असे म्हटले जाते. हिंदुस्तानच्या उष्ण व दमट हवामानामुळे धनुष्याची कमान कमजोर होते, असे बाबरने बाबरनाम्यात म्हणजे आपल्या समृतिचित्रणात म्हटले आहे. प्रतिकूल हवामान, उत्तम घोड्यांची वानवा व धनुर्विद्येची उपेक्षा लक्षात घेता, इराणी, मध्य आशियाई व मोगल धनुर्धरांपेक्षा हिंदू धनुर्धर निकृष्ट का ठरले, हे कळते.
बाण : बाणाचा दंड धनुष्याला जोडून ओढताना किंवा लक्ष्यावर आदळताना तो वाकता वा मोडता कामा नये, हा दंड सामान्यतः बांबू, वेत, साल, तंतुकाच किंवा पोलाद यांपासून बनविलेला असतो. दंडाच्या वजनावर बाणाचा पल्ला आणि गमनातील स्थिरता अवलंबून असते. बाणाच्या अग्रटोकाला संहारशीर्ष लावलेले असते. ते शीर्ष हाड, गारगोटी, तांबे, कासे किंवा पोलाद यांपासून बनवितात. निरनिराळ्या प्रकारच्या लक्ष्यासांठी सु. एकवीस प्रकारची बाणाग्रे आढळत असली, तरी घुसणारे, फोडणारे आणि तडाखा देणारे असे त्यांचे मूलतः तीन वर्ग संभवतात. शरीरात बाण घुसल्यावर रक्तस्त्राव होऊन प्राणी गतःप्रणा किंवा निर्बल होतो. अशा घुसणाऱ्या बाणांची अग्रे पुष्कळदा काटेरी असतात. गोल शीर्ष असलेला बाण तडाखा देऊन लक्ष्याला गतःप्राण करतो किंवा निपचित पाडतो. बाणाची लांबी दिड मीटरपर्यंत असतो. अडीच ते तीन मी. लांबीचेही बाण भारतात प्राचीन काळी असल्याचे दिसून येते.
बाणाच्या मागच्या टोकाला पक्ष्यांची पिसे खोवून बाणाचा गमन मार्ग स्थिर राखला जातो. ज्या बाणांची अग्रे गोल व जड असतात, त्यांना पिसांची आवष्यकता नसते. प्राचीन काळी बाण सोडण्यापूर्वी एखाद्या देवतेचा मंत्र म्हणून तो टाकीत. उदा., अग्नीचा मंत्र म्हणून सोडलेला बाण म्हणजे अग्न्यस्त्र होय. या बाणामुळे अग्नी निर्माण होत असे [→ अस्त्र, विद्या प्राचीन]. बाणाला विष लावण्याचीही प्रथा होती.
बाण दोरीवर चढविला गेला, तरी तो धरून ओढण्यासाठी मात्र आंगठा व बोटांचा (करंगळी सोडून) उपयोग केला जातो. धनुर्वेदात कांबेवर बाण धरणे वा बाणाला धरणे यासंबंधी माहिती दिलेली आहे. धनुष्याची दोरी कानापर्यंत वा हनुवटीपर्यंत ओढण्याची पद्धत आहे. कमान एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वाकविली, तर बाणाचा पल्ला कमी होतो. जमिनीला समांतर मारा करण्यासाठी बाण हलके, परंतु अग्रभागी जड असतात. याला भारतात ‘स्त्री’ बाण म्हणतात. शत्रूच्या डोक्यावर वा उंचीवरील लक्ष्यावर मारा करण्यासाठी बाण खाली पडताना त्याला द्रुतगती मिळणे आवश्यक असते. म्हणून ‘पुरुष’ बाण मागील टोकाला जड असतात. धनुष्याच्या रचनेला अनुकूल असेच बाण वापरावे लागतात व त्यांचे वजन आकारमान इ. गोष्टी एकसारख्या राखाव्या लागतात. केवळ सरावासाठी असलेल्या बाणास ‘नपुंसक’ बाम म्हणतात.
धनुर्वेदात धनुर्विद्येविषयी विवेचन आहे. या विवेचनात वैयक्तिक शिक्षणावर विशेष भर आहे युध्दोपयोगी शिक्षणावर मात्र फारसा नाही. धनुष्यबाण तयार करण्यासाठी कोणते पदार्थ निवडावे, धनुष्यबाणांचे प्रकार कोणते, तसेच मोजमाप व त्याचा उपयोग यांबद्दलही माहीती मिळते. त्यावरून धनुर्धराचे उभे रहाणे, कांब पकडणे, दोरी ओढणे, नेम धरणे, श्वासोच्छवास नियंत्रण करणे, लक्ष्याचे प्रकार इत्यादींचे ज्ञान लाभते. रिसाला- इ-तीर-ओ-कमान या ग्रंथात मोगली धनुर्विद्येचे विवेचन आहे. हा ग्रंथ धर्नुवदाचीच मोगली आवृत्त्ती वाटते.
इतिहास : धनुर्विद्येचा इतिहास सु. १०,००० वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे दिसते. मानवनिर्मित यंत्रांमध्ये धनुष्य हे पहिले यंत्र मानले जाते. धनुष्यबाण व गोफन ही अस्त्रे प्राचीन काळी जोडीने वापरली जात. कापूस पिंजणे, भोक पाडणे, अग्नी उत्पन्न करणे यांसाठीही धनुष्य वापरून मानवाने आपले कष्ट कमी करण्याचा प्रयत्न केला. प्राचीन काळी हात, बोट यांप्रमाणे बाण हे लांबी मोजण्याचेही एक माप होते.
भारतीय धनुर्विद्या : सिंधुसंस्कृतिकालात बाण असावेत, असा तर्क उत्खननात आढळलेल्या तांब्याच्या बाणशीर्षांवरून करता येतो. धनुष्याबद्दल मात्र काही सांगता येत नाही. गलोलचाही वापर त्या काली अस्त्र म्हणून करीत असत. वैदिक वाङ्मयात धनुर्बाणांचे पुष्कळ उल्लेख आहेत. ऋग्वेदात धनू व धनुर्धरांना महत्त्व दिले आहे. रुद्र हा धनुष्यबाणाचा स्वामी असून त्याच्या साह्याने तो शत्रूंना मारणार असल्याचा उल्लेख त्यात आढळतो. कौषीतकि ब्राह्यणात एक धनुष्य व तीन बाणांची दक्षिणा ही श्रेष्ठ दक्षिणा म्हटली आहे. वेदकालीन धनुष्य वेळूचे व त्याची दोरी स्नायूंची असे. धनुष्याची लांबी दीड मी. (६ वितस्ति) आणि बाण वेळूचाच हातभर लांबीचा असे. बाणाचे अग्र मात्र हाडाचे असावे. बाण ठेवण्यासाठी भाता (इषुधि) असे. दोरीच्या आघाताने हाताला इजा होऊ नये म्हणून हस्तवाप घालीत. दोरी ओढणाऱ्या बोटांवरदेखील मणिबंध चढवीत. रामाचे कोदंड हे वेताचे धनुष्य प्रसिद्ध आहे. रामाने कोदंड वापरून परशुधारी परशुरामाचा पराभव केला. यावरून हे अस्त्र प्राचीन शस्त्रप्रकारातील परशूचा पुढचा टप्पा सूचित करते. कोदंडधारी राम हा धनुर्विद्येतील एक आदर्श समजला जातो. ‘रामबाण’ हा वाक्प्रचार त्याच्या अचूक लक्ष्यभेदावरून रूढ झालेला आहे. महाभारतकाळात साधी व संयुक्त धनुष्ये प्रचारात होती. पिनाक व शार्ङ्ग ही शिंगाची संयुक्त धनुष्ये होती. अर्जुनाचे गांडीव धनुष्यही संयुक्त धनुष्य असावे. अर्जुन हा सव्यसाची धनुर्धर म्हणजे डाव्या हातानेसुद्धा बाण ओढून सोडणारा म्हणजे दोहोंपैकी कोणत्याही हाताने बाण ओढून सोडणारा, ते शीघ्रतेने सोडू शकणारा व दीर्घकाल शरसंधान करणारा असा होता. द्रौपदिस्वयंवरात मत्स्यभेद करून त्याने पण जिंकला, हे सर्वश्रुत आहे. द्रोणाचार्यांच्या पार्थिव मूर्तीसमोर स्वाध्यायाने धनुर्विद्या संपादित करणारा एकलव्य हाही या कलेत निपुण होता. त्याकाली वेत व नाली (रीड) यांपासून बाण बनवीत. लोखंडी शीर्षेदेखील बाणाला लावीत, त्या काळचे अर्धचंद्राकार व भल्लशीर्षे असलेले बाण फार परिणामकारक असावेत. महाभारतातील भीष्म, द्रोण व कर्णपर्वांत धनुर्विद्येची माहिती मिळते. केवळ ध्वनिवेध घेऊन शरसंधान साधल्याची उदाहरणेही आढळतात. दशरथाने आवाजाच्या रोखाने सोडलेल्या बाणामुळे घडलेला श्रावणवध किंवा इतिहास कालात पृथ्वीराज चौहानाने दाखविलेली धनुर्विद्येतील निपुणता सर्वश्रुत आहे. भारतीय धनुर्धरांचे भाते अक्षय्य असत, त्याचप्रमाणे एकाच वेळी अनेक बाण सोडण्याचे कौशल्यही त्यांच्या ठायी होते, असे म्हटले जाते.
मौर्यकालीन धनुर्विद्येची माहिती कौटीलीय अर्थशास्त्रात आहे. काही प्राचीन लढायांत पदाती धनुर्धरांच्या पुढे लढाईत उभे असत. दीर्घ धनुष्य व दीर्घ बाण यांचाच उपयोग त्याकाळी विशेषतः केला जाई. एकामागोमाग एक असे बाण सोडण्याचा त्यांचा वेग फार कमी असावा. शिवाय धनुष्याचे एक टोक जमिनीवर पायाने दाबून ठेवावे लागे. त्या काळी भारतात धनुर्धरांचे घोडदळ नसावे असे अलेक्झांडर पोरस यांच्या युद्धावरून वाटते. त्याऐवजी रथी धर्नुधर असत. चार घोड्यांच्या रथात सहा सैनिकांपैकी दोन धनुर्धर असत. अलेक्झांडरच्या इराणी घोटेस्वारांपुढे भारतीय रथी धनुर्धर निष्प्रभ ठरले. मौर्यकालात अवजड लोखंडी बाण सोडण्यासाठी महाशरयंत्रे असावीत.
धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद असल्याचे चरणव्यूहात म्हटले आहेत. वसिष्ठ, विश्वामित्र, भरद्वाज, जमदग्नी इ. ऋषींनी वेळोवेळी तपश्चर्या करून परमेश्वराकडून धनुर्विद्या मिळविली म्हणून हे ऋषी धनुर्वेदाचे प्रणेते समजले जातात. मूळ धनुर्वेद उपलब्ध नाही. धनुर्वेदसंहिता नावाचा ग्रंथ मात्र उपलब्ध आहे. कामन्दकीय नीतिसार इ. नीतिग्रंथ आणि अग्नि, मत्स्य, विष्णु इ. पुराणे तसेच वीरमित्रोदय, कथासरित्सागर, युद्धजयार्णव, युक्तिकल्पतरू, इ. ग्रंथांत मुस्लिमपूर्वकालातील धनुर्विद्येसंबंधी माहिती मिळते. त्याचप्रमाणे जुनी नाणी व सांची, भारहूत, अहिच्छत्र, नागार्जूनकोंडा, अजिंठा येथील शिल्पे व चित्रे यांवरूनही प्राचीन धनुष्यबाणांची व धनुर्धरांची माहिती मिळू शकते. शक-कुराण धनुर्धारी घोडेस्वारांच्या प्रभावाने गुप्तकाळात धनुर्धारी घोडेस्वारांचा उदय झाला असावा. सांची स्तूपाच्या उत्तर द्वारावरील षड्गंडस्थलयुक्त गज, या शिल्पावरून तत्कालीन धनुर्धर चिलखत वापरीत नसावेत, तर त्यांच्या छातीवर पागोठ्यासारखे आवरण असावे असा तर्क करता येतो. इराणी, तुर्क, मोगल हे उत्तम धनुर्धर घोडेस्वार होते. त्यांची संयुक्त धनुष्ये अत्यंत कार्यक्षम होती. ते कमानीच्या आतल्या बाजूस लवचिक व कठीण लाकडी पट्टी चिकटवीत. पट्टीवर कुराणातील वचने कोरीत. दोरी ओढण्यासाठी बोटावर कवच वापरीत. मात्र मोगल धनुर्धर दोरी ओढण्यासाठी अंगठा वापरीत. मोगल संकर धनुष्यदेखील वापरीत. त्यास ‘तक्ष कमान’ म्हणत. ‘कमान-इ-गुरोहा’ या नावाच्या धनुष्याने शिसे व दगडाच्या गोळ्या झाडता येत. मोगली ‘लक्ष कमान’ धनुष्य १२० सेंमी. लांबीचे असे. ७५ सेंमी लांबीचे बाण असत. तुर्क- मोगल हे घोडा धावताना पुढे व मागे वळून बाण मारू शकत. हिंदू राजांनी धनुर्धारी घोडदळ निर्माण केले नाही. विजयानगरचा राजा देवरायाला ही उणीव टोचत असे. त्याने भाडोत्री तुर्की धनुर्धरांना भरती करण्याची प्रथा पाडली पण त्याचा विपरीत परिणाम कसा झाला, हे शेवटच्या राक्षतांगडीच्या (१५६५) लढाईवरून समजून येते.
भारतेतर धनुर्विद्या : प्राचीन काळी धनुर्विद्येत अक्कड, हिटाइट व ॲसिरिया ही राष्ट्रे अग्रेसर होती. संयुक्त धनुष्याचा व संघटित रीत्या धनुर्धरांचा युद्धात उपयोग करण्यास तेथेच सुरुवात झाली. ईजिप्तमधील पिरॅमिडच्या भित्तिचित्रांत धनुष्यबाणाचे उत्पादन, शिक्षण व लढायांतील धनुर्धरांची करामत इ. गोष्टींचे दर्शन घडते. ग्रीक व रोमन धनुर्विद्येत मागासलेले होते. क्रीट, न्युमिदिया, सिथिया इ. देशांतील भाडोत्री धनुर्धर त्यांच्या सैन्यांत होते. तुर्क-मोगलांच्या संपर्कामुळे धनुर्विद्येत चीनने बरीच प्रगती केली. संस्कर धनुष्याचा जन्म प्रथम चीनमध्ये झाला व तेथून तुर्क मोगलांच्या आक्रमणामुळे यूरोपात त्याचा प्रसार झाला. सिथियन, हूण व तुर्क-मोगलांच्या धनुर्विद्येचा यूरोपीय धनुर्विद्येवर बराच परिणाम झालेला आहे. फ्रेंच भाषेतील ‘तीर’ व ‘आर्च’ म्हणजे ‘कमान’ हे धनुष्यबाणासाठी असलेले शब्द त्याचाच परिणाम आहे.
रणतंत्र : महाभारतातील एका वचनाप्रमाणे परंपरा, देश आणि कुलाचाराला युक्त असा धनुर्धरांचा उपयोग युद्धांत केला जात असावा. अर्थशास्त्र या ग्रंथात (१०·५·३६) रणांगणामध्ये पुढे लढाईत व मागे धनुर्धर असत, असा उल्लेख आहे. पायदळातही धनुर्धारी असत. इ. स. ३२६ मध्ये झेलम नदीकाठी जलालपूर येथील पोरस-अलेक्झांडर यांच्यातील लढाईची ग्रीकांनी जी वर्णने दिली आहेत, त्यांवरून तत्कालीन रणतंत्राची कल्पना येते. त्या काळी धनुर्धर बगलांवर राहून आघाडीवरील हत्ती आणि रथ यांच्या मधोमध उभे राहून मारा करीत. त्यांच्या रक्षणासाठी पायदळ असे. सर्वांत अग्रभागी रथी धनुर्धर असून ते प्रथम हल्ल्याची सुरुवात करीत किंवा पुढे आलेल्या शत्रूवर हल्ला चढवीत. पोरसाकडे अश्वधनुर्धारी नव्हते. अलेक्झांडरच्या इराणी व शक अश्वधनुर्धरांनी पोरससेनेच्या बगलांवर हल्ले केले. शक-कुशाण अश्वधनुर्धरही शत्रूवर सरळसरळ हल्ला न करता बगलांवर व पिछाडीवर हल्ला करून शत्रूला वेढून टाकीत. तुर्क-मोगलांचेही तंत्र याच प्रकारचे होते. हिंदू पायदळी धनुर्धर अशा तंत्राला तोंड देऊ शकले नाहीत. शत्रूवर चाल करताना धनुर्धर आपल्या सेनेच्या पुढे व बगलांवर राहून मुख्य सेनेचा बचाव करीत. अश्वधनुर्धर टेहळणी वा पाठलाग करण्यासाठी फार उपयोगी पडत.नाविक युद्धात आगलाव्या बाणांचा शत्रुजहाजावर मारा करून व मग जहाजाला जहाज लावून सैनिक शत्रूवर तुटून पडत. अश्वधनुर्धर किंवा पदाती धनुर्धर जरी प्रभावी असले, तरी बहुतांशी त्यांच्यामुळे युद्धाचा निकाल लागत नसे.
क्रिडाप्रकार : स्थूलमानाने पाहता इ. स. चौथ्या शतकापासून धनुर्विद्येकडे एक क्रीडाप्रकार म्हणून पाहिले जाऊ लागले. जगातील बहुतेक देशांतही एक स्पर्धात्मक क्रीडाप्रकार म्हणून त्यास मान्यता लाभलेली आहे. या खेळातील धनुष्य सामान्यतः सु. १·८३ मी. (सु. सहा फूट) लांब असून ते लाकूड, शिंगे वा लोह यांपासून तयार करतात. धनुष्याच्या खालच्या व वरच्या टोकांना जोडण्यासाठी ताग, रेशीम किंवा कापूस यांच्या सुतापासून बनवलेल्या टणक दोरीचा वापर करतात. धनुष्याचे मध्यबिंदूपासून या दोरीपर्यंतचे अंतर सु. १५·२४ सेंमी. (सु. सहा इंच) असते. बाण देखील लाकडापासून बनवतात. तो सु. ६८·५८ सेंमी. (सु. २७ इंच) लांब व सु. १२·७० सेंमी. (पाच इंच) गोलाईचा असतो. त्याचे टोक धातूचे असून ते अणकुचीदार असते.
समोर लक्ष्य ठेवलेले असते. लक्ष्याचे अंतर हे स्त्रीपुरुष स्पर्धकांनुसार व त्यांच्या वयोगटानुसार वेगवेगळे असते. कोणाचा बाण किती लांबवर जाईल हे धनुष्याच्या मजबुतीवर व बाणाच्या वजनावरही अवलंबून राहते. लक्ष्य हे सामान्यतः जमिनीपासून सु. १२१· ९२ सेंमी. (४८ इंच) उंचीचे व तितक्याच व्यासाचे असते. त्यावर निरनिराळ्या रंगांची वर्तुळे काढलेली असतात. त्यांपैकी विशिष्ट रंगाच्या वर्तुळास बाण लागला, तर ठराविक गुण मिळतात. ते गुण असे : सोनेरी रंग – ९ तांबडा –७ निळा –५, काळा –३, पांढरा –१. जो धनुर्धर किंवा ज्या देशाचा संघ जास्तीतजास्त गुण मिळवतो तो विजयी होतो.
धनुर्विद्या या क्रीडाप्रकारासाठी जागतिक पातळीवर एक स्वतंत्र संघटना १९३१ सालीच स्थापन झाली आहे. ऑलिपिंक स्पर्धांमध्ये या खेळाचा अंतर्भाव १९००, १९०४, १९०८ व १९२० मध्ये व त्यानंतर १९७२ पासून पुन्हा करण्यात आला. धनुर्विद्येत बेल्जियम, फ्रान्स हे देश पुढे आहेत, तर बेल्जियमच्या ह्यूबर्ट व्हॅन इनीस या धनुर्धराने सर्वांत जास्त म्हणजे ४ वेळा सुवर्णपदक मिळविलेले आहे.
भारतात १९७२ पर्यंत धनुर्विद्येचा क्रीडाप्रकार विशेष लोकप्रिय नव्हता परंतु १९७३ साली अखिल भारतीय आर्चरी फेडरेशनची स्थापना झाली असून जगदलपूर येथे १९७३ च्या ऑक्टोबर महिन्यात पहिली राष्ट्रीय स्पर्धा भरवण्यात आली होती. त्यात सहा राज्यांतील खेळाडूंनी भाग घेतला. त्यात पश्चिम बंगालचा संघ अग्रेसर ठरला आणि मेघालयाचा संघ उपविजेता ठरला. या पहिल्याच स्पर्धेत ३०, ४०, ५० व ७० मी. अंतरावरून अचूक बाण मारण्याची चढाओढ ठेवण्यात आली होती. पश्चिम बंगालचा डी. घोष हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ धनुर्धर ठरला. त्याने २९२ गुण मिळविले.
पंडित बाळ ज.
संदर्भ : वझे, कृ. वि. प्राचीन युद्धविद्या, मुंबई, १९३४.
“