धन : (वेल्थ). आर्थिक उपयोगिता व आर्थिक महत्त्व आहे, असा अस्तित्वात असलेला भौतिक उपयुक्त वस्तूंचा साठा, ‘धन’ हा शब्द ‘वेल्थ’ ह्या इंग्रजी शब्दाचा पर्याय आहे. धनाच्या संकल्पनेशी निगडित असणाऱ्या इतरही संकल्पना रुढ आहेत. उदा., मत्ता (ॲसेट्स), मालकीच्या वस्तू (बिलाँगिंग्ज), चीजवस्तू (इफेक्ट्स), संपदा (इस्टेट), संपत्ती (प्रॉपर्टी) इत्यादी. तथापि अर्थशास्त्रामध्ये ‘धन’ या संकल्पनेचा विशिष्ट असा अर्थ मानलेला आहे. अर्थशास्त्रीय दृष्ट्या धन म्हणजे कोणत्याही क्षणी अस्तित्वात असलेल्या वस्तूंचा साठा, मात्र त्या वस्तू पुढील अटी पूर्ण करणाऱ्या असल्या पाहिजेत : (१) त्यांना उपयोगिता असली पाहिजे, म्हणजेच त्या मानवी गरजा पुरविण्यास समर्थ असल्या पाहिजेत, (२) त्यांचे पैशात मूल्य करता आले पाहिजे, (३) त्यांचा पुरवठा मर्यादित असला पाहिजे व (४) त्या बाह्य असल्या पाहिजेत, म्हणजेच त्यांची मालकी एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित करता आली पाहिजे. धनामध्ये सर्व प्रकारच्या उपयोग्य वस्तू, कच्चा माल, अर्धनिर्मित वस्तू, यंत्रसामग्री, जमीन, घरे, खाणी, कारखाने इत्यांदींचा सामावेश होतो. आपल्या मुळाबाळांच्या व कुटुंबाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या घरमालकिणीचे कार्य फार उपयोगी आहे, परंतु ते हस्तांतरित करता येण्यासारखे किंवा विनिमयक्षम नसल्यामुळे त्याची धनात गणना करता येत नाही. सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यांसारख्या वस्तू अत्यंत उपयोगी आहेत परंतु त्याचा पुरवठा अमर्याद असल्याने त्यांचा धनात समावेश होत नाही. एखाद्या व्यक्तीच्या धनामध्ये केवळ मूर्त वस्तूच नव्हे, तर अमूर्त पण बाह्य वस्तूही समाविष्ट होऊ शकतात कारण त्यांचा उपयोग करून तिला मूर्त वस्तू मिळविता येतात. अर्थात तिचे व्यक्तिगुण किंवा शक्ती यांचा जरी तिला आपल्या उदरनिर्वाहासाठी उपयोग होत असला, तरी त्या बाह्य नसून अंतर्गत असल्याने त्यांचा समावेश धनामध्ये होत नाही. त्याचप्रमाणे तिचे मित्रसंबंधही सामान्यतः धनामध्ये धरले जात नाहीत. मात्र ज्या मित्रसंबंधाना प्रत्यक्षात व्यावसायीक मूल्य आहे, त्याचा समावेश धनामध्ये करावा लागतो. उदा., उद्योग संस्थेचे किंवा दुकानाचे ख्यातिमूल्य. ॲडम स्मिथसारखे काही अर्थशास्त्रज्ञ व्यक्तीच्या धनात तिच्या औद्योगिक कार्यक्षमतेच्या मुळाशी असणाऱ्या सर्व शक्तींचा, गुणांचा व सवयींचा सामावेश करतात. यामुळे घोटाळा होऊ नये म्हणून धन या संज्ञेने फक्त बाह्य संपत्तीच दर्शविली जावी, असे ॲल्फ्रेड मार्शलचे मत आहे.
ॲल्फ्रेड मार्शल, आर्थर पिगू यांसारख्या नव-सनातनवादी अर्थशास्त्राज्ञांच्या मते धन हे साध्य नसून साधन आहे. धन आणि कल्याण यांचा जवळचा संबंध असला, तरी धनाची वाढ म्हणजे कल्याणाची वाढ, असे समीकरण मांडता येत नाही व धनाचा अभ्यास मानवी कल्याणाकडे लक्ष ठेवूनच केला पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादले. हे मानवी कल्याण म्हणजे पैशाच्या फुटपट्टीने मोजता येणारे आर्थिक कल्याण होय, असे त्यांचे मत होते.
धन हे समाजाच्या आर्थिक कल्याणाचे माप असले, तरी हे माप सर्वसाधारण स्वरूपाचे व अंदाजी माप आहे. मानवी कल्याणाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या अनेक वस्तूंचा व सेवांचा धनामध्ये समावेश होत नाही, कारण त्या विनिमयक्षम नसतात. याउलट अफू, मद्य, विष यांसारख्या वस्तूंचा व्यक्तींच्या आरोग्यावर विघातक परिणाम होत असला, तरीही त्यांचा धनामध्ये समावेश होतो. म्हणून धनाच्या वाढीबरोबर कल्याणात वाढ होईलच, असे ठामपणे म्हणता येत नाही. सत्यसृष्टीत समाजामध्ये धनाची वाढ झाली, म्हणजे धनिक लोकच अधिक धनिक बनतात आणि बहुसंख्य जनता गरीबच राहून तिचे कल्याण साधले जात नाही, असे आढळून येते. म्हणूनच सामाजिक कल्याणाचा प्रश्न जितका धनाच्या वाढीचा आहे, तितकाच धनाच्या व उत्पन्नाच्या समप्रमाणात विभाजनाचा आहे, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
पहा: आर्थिक विषमता कल्याणकारी अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न.
सुर्वे, गो. चिं. धोंगडे, ए. रा.
“