द्विवेदी, हजारीप्रसाद : (१९ ऑगस्ट १९०७–). निबंधकार, कादंबरीकार, समीक्षक, संशोधक या विविध नात्यांनी हजारीप्रसाद द्विवेदी हिंदी साहित्यात प्रख्यात आहेत. त्यांचाजन्म बलिया जिल्ह्यातील दुबेका छपरा नावाच्या गावी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. घराण्यात संस्कृत अध्ययनाची मोठी पंरपरा होती त्यामुळे त्यांचे संस्कृतचे अध्ययन घरीच झाले. १९३० मध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालयातून ‘ज्योतिषाचार्य’ही पदवी घेतल्यानंतर व इंटरची परीक्षा पास झाल्यावर ते शांतिनिकेतनमध्ये प्राध्यापक झाले. रंवीद्रनाथ टागोर आणि त्यांच्या अन्य प्रतिभावान सहाध्यायांचा घनिष्ठ सहवास लाभला. १९४०–५० या काळात ते शांतीनिकेतनामधील हिंदी भवनाचे संचालक होते. १९५० मध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालयाने हिंदीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून त्याची नियुक्ती केली. १९४९ मध्येच त्यांच्या हिंदी साहित्यातील महनीय कामगिरीबद्दल त्यांना लखनौ विद्यापीठाने सन्मान्य डी. लिट्. दिली. १९५५ मध्ये राष्ट्रभाषा आयोगाचे ते सदस्य झाले. १९५७ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ देऊन त्याच्या कार्याचा गौरव केला. नॅशनल बुक ट्रस्टचे सदस्य काशी नागरी प्रचारिणी सभेचे उपाध्यक्ष, ह्या सभेच्या संशोधन विभागाचे मार्गदर्शक व सभेच्या पत्रिकेचे संपादक १९६० पासून पंजाब विद्यापीठात हिंदीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख साहित्य अकादेमीचे सदस्य हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९६७)इ. पदावर त्यांनी काम केले. विविध प्रकारचे शैक्षणिक मानसन्मानही त्यांना मिळालेले आहेत.
हजारीप्रसाद मुख्यतः मूलगामी व चिंतनशील संशोधक आहेत. हिंदी साहित्य की भूमिका (१९४०) या संशोधनपर ग्रंथात त्यांनी मांडलेली मते त्यांच्या स्वतंत्र चिंतनाची साक्ष देतात. हिंदी साहित्यांच्या अभ्यासकांनी मुसलमानी आक्रमणाला दिलेले महत्त्व कसे अनावश्यक आहे, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. कबीर (१९४२) या समीक्षात्मक ग्रंथात कबीराच्या समकालीन परिस्थितीचा, कबीराच्या व्यक्तिमत्त्वाचा व साहित्याचा त्यांनी घेतलेला परामर्श स्वतंत्र चिंतनक्षमतेबरोबर त्यांच्या सर्जनशील रसिकतेचीही साक्ष देतो. हिंदी साहित्य का आदिकाल (३ री आवृती. १९६२) व नाथ संप्रदाय (१९५०) या ग्रंथांना हिंदी साहित्यात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. सूर साहित्य (१९३६) हा ग्रंथ त्यांच्या गुणग्राहक समीक्षेचा प्रत्यय देतो.
हजारीप्रसादांचे निबंधही व्यासंग, रसिकता आणि मर्मग्राही चिंतन इ. गुणांनी संपन्न असल्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेत. अशोक के फूल (१९४८), कल्पलता (१९४८), विचार प्रवाह (१९५९) इ. त्यांचे निबंधसंग्रह होत. परंपरा आणि आधुनिकता, गंभीरता आणि विनोद यांचा दुग्धशर्करासंयोग त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला असल्यास प्रत्येय हे निबंध वाचताना येतो. बाणभट्ट की आत्मकथा (१९४७) आणि चारुचंद्रलेख या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या होत. कालिदास आणि रवींद्रनाथ टागोर या आवडीच्या लेखकांबद्दल लिहिलेले त्यांचे ग्रंथ त्यांच्या रसग्राहीसमीक्षेची साक्ष देतात. नाथसिद्वों की बानियाँ (१९५७) व पृथ्वीराज रासो (३ री आवृ. १९६१) हे त्यांचे नमुनेदार संपादित ग्रंथ होत. हिंदी साहित्यामध्ये मानवतावादी विचारप्रणाली दृढ करण्याचे श्रेय हजारीप्रसाद द्विवेदी यांना द्यावे लागेल.
संदर्भ : सिंह, दिवप्रसाद, संपा. शांतिनिकेतनसे शैवालिक, वाराणसी, १९६७.
बांदिवडेकर, चंद्रकांत
“