द्विविध उपक्रम : (संतर्पणापतर्पण आयुर्वेद). निसर्गात स्थूलमानाने दोन प्रकारची द्रव्ये असतात. काही पृथ्वी व आप या महाभूतांच्या जड, स्निग्ध इ. समगुणांनी घटित आणि दुसरी तेज, वायू व आकाश या महाभूतांच्या लघुरुक्षादि गुणांनी घटित असतात. शरीराची पुष्टी करणे हे पहिल्या वर्गातील द्रव्याचे कार्य तर दुसऱ्या वर्गातील द्रव्यांचे कार्य शरीर कृश करणे असे घडते. या कार्यांनाच अनुक्रमे संतपर्ण किंवा बृंहण आणि अपतपर्ण- कार्श्यकर किंवा लंघन अशी नावे आहेत.
सम प्रकृतीच्या व्यक्तीने शरीर समस्थितीत ठेवण्यासाठी ही दोन्ही द्रव्ये गरजेइतकी सेवन करावयास हवी. असे न झाले तर, संतर्पक द्रव्यसेवनाचे अतिस्थौल्यादी उपद्रव होतात आणि ते घालविण्यासाठी अपतर्पक द्रव्याचे सेवन वा तसे उपचार करावे लागतात किंवा याच्या उलट अपतर्पणाचे अतिकार्श्यादि उपद्रवांकरिता संतर्पण उपचार करावे लागतात.
संतर्पक द्रव्यांच्या सेवनाचीच प्रवृत्ती व्यवहारात अधिक आढळते व यामुळे खऱ्या चिकित्सकाला संतर्पक उपचाराचे प्रसंग कमी व अपतर्पण उपचारच अधिकांश करावे लागतात, म्हणजेच अपतर्पण चिकित्सा करावी लागते म्हणून तिचाच येथे प्रामुख्याने विचार केलेला आहे. अपतर्पण चिकित्सेचे शमन व शोधन असे दोन प्रकार संभवतात.
शमनरूप अपतर्पण : वाढलेले दोष पचविण्याचे शरीराला संधी देणे व या क्रियेत त्याच्या साह्यार्थ या दोषांच्या विपरीत गुणी द्रव्यांचे साह्य घेऊन त्या दोषांची वाढ थांबविणे ही शमनरूप अपतर्पण चिकित्सा होय. दोष अल्प प्रमाणात वाढले असतानाच ही चिकित्सा उपयुक्त होते. अल्पशी वाढ म्हणजेच दोषांची संचयावस्था. या अवस्थेतच दोषांना जिंकावे.
शमन चिकित्सेचे सात प्रकार आहेत : (१) पाचन, (२) दीपन, (३) क्षुधा, (४) तृषा, (५) व्यायाम, (६) आतप (उन्ह) आणि (७) मारुत (वारा).
पाचन व दीपन : यामध्ये ‘पाचन दीपनम्’ म्हणजे दोषवृद्धी मध्यम प्रमाणात असताना (फार किंवा अगदीच कमी नाही) अशा अवस्थेत लंघनाबरोबर पाचक व दीपक द्रव्यांचा विचार करावा लागतो. पाचक द्रव्यांनी दोषाचे पचन होते व दीपक द्रव्ये जठराग्नी प्रदीप्त करून आहार द्रव्याचे पचन करण्यास मदत करते. पाचक द्रव्ये हे दोषांवर कार्य करीत असते, तर दीपनाचे कार्य जठर, ग्रहणी यासारख्या अग्नीचे कार्य करणाऱ्या अवयवांवर म्हणजे अग्नीवरच घडत असते. केवळ लंघनाने ह्या मध्यमावस्थेत भागत नाही.
क्षुधा : शरीराकडून आहाराची मागणी होणे याचे नाव क्षुधा किंवा भूक. आहाराने भूख शमते. आहारोत्पन्न घटक अधिक निर्माण झाले म्हणजे दोषवृद्धी झाली की भूक नाहीशी होते.
क्षुधानाशाचे दोन प्रकार संभवतात. एका प्रकारात विशिष्ट दोषवर्धक द्रव्यांचाच तिटकारा उत्पन्न होऊन ती नकोशी होतात आणि विपरीत गुणांची मात्र इच्छा होत असते. अशा वेळी नकोशी द्रव्ये वर्ज्य करणे हे अशतः लंघनच होय. यालाच निदानपरिवर्जनही म्हणतात. दुसऱ्या प्रकारात कोणताही पदार्थ नकोसा वाटतो. अशा अवस्थेत संपूर्ण लंघनच करावे लागते. असे हे दोन्ही प्रकार ‘क्षुधा’ नामक शमन चिकित्सेत येतात.
(१)निदानपरिवर्जन : (अंशतः लंघन). दोष वाढविण्याची जी कारणे झाली असतील ती कारणे वर्ज्य करणे. दोषवर्धक आहार-विहार वर्ज्य करणे. हे एक प्रकारचे अंशतः लंघनच होय. वाढलेल्या दोषांच्या समगुणी द्रव्यांचा द्वेष होत असतो. या लंघनात ज्या गुणांची द्रव्ये शरीरात अधिक झालेली असतात त्या द्रव्यांचा बाहेरचा पुरवठा बंद करून शिल्लक असलेल्यांचा उपयोग करण्याची संधी निर्माण करणे होय. याने द्वेष्य दोष द्रव्ये पचून ती सम होऊन नित्याच्या गरजेकरिता त्यांची भूक निर्माण होते.
दैनंदिन जीवनक्रमात शरीरघटक झिजत असतात. झिजलेल्यांची पूर्तीही करावी लागते. शरीरात अधिक शिल्लक असलेल्या दोष घटकांमधून पाहिजे तितके घटक घेऊन अनुरूप पचन करून शरीर ती पूर्ती करीत असते. निदानपरिवर्तन केले नाही, तर शरीराला वरीलप्रमाणे शिल्लक दोषांचा विनियोग करता येत नाही कारण अशा अवस्थेत शरीरात बाहेरून येणाऱ्या द्रव्यांना तसेच ठेवून या दोषांचा उपयोग शरीर करून घेऊ शकत नाही. प्रथम त्यांचे पचन करावे लागते. नाहीतर ती अपाचित द्रव्ये या शिल्लक पाचित द्रव्यांपेक्षा शरीराला फार घातक होतात.
विपरीतसेवन : वाढलेल्या दोषांच्या विपरीत गुणांची द्रव्ये शरीरात गरजेइतकी किंवा कमी असतात. शिवाय दैनंदिन शारीरकर्मात ती झिजून कमी होतात म्हणून त्याची शरीराला गरज असते आणि त्यामुळे शरीराला इच्छा होत असते. या आहारघटकांच्या आधारानेच वाढलेल्या दोषांचा प्रतिकार शरीर करीत असते. ही शमने होत.
शरीरात रुक्षता अधिक आहे, रुक्ष द्रव्ये अधिक आहेत, त्वचा रुक्ष असल्याने तडतडते, तो त्रास वाटतो. ती रुक्ष द्रव्ये बोचतात, अशा वेळी तेल लावले की, लगेच त्या रुक्ष द्रव्यांचा बोचकपणा बोथट होतो. ढालीसारखा तेल या स्निग्ध द्रव्याचा शरीर उपयोग करून घेते व तेल पचवून घेतल्यावर ती रुक्षपणा नाहीसा करते, त्वचा स्निग्ध करते, रुक्षतेचा वाढलेला तोल आवश्यक तितकी स्निग्धता निर्माण करून बरोबर करते. हे विपरीत गुणी शमन होय.
(२) संपूर्ण लंघन : ज्या वेळी दोष अधिक होतात, दोन्ही किंवा तिन्ही दोषांची वृद्धी होते, त्या वेळी अन्नच घेऊ नये अशी इच्छा होते म्हणजे शरीर संपूर्ण लंघनाचीच मागणी करीत असते. म्हणून गरजेप्रमाणे एक ते सात दिवस किंवा जरूरीप्रमाणे अधिकही दिवस अन्नत्याग करणे, याला संपूर्ण लंघन म्हणतात. बल कमी असेल, तर संपूर्ण लंघन त्यातल्या त्यात अधिक दिवसांचे देता येत नाही. म्हणून नित्याचे अन्न वर्ज्य करून पेय, मूष इ. लघ्वन्न द्यावयाचे असते हे अंशतः लंघन होय.
संपूर्ण लंघनानंतर हे अंशतः लंघन द्यावेच लागते. एकदम नेहमीसारखा आहार घेतला, तर तो न पचता दोषवृद्धीच पुन्हा होईल. लंघनानंतर पेज, कट क्रमाने अधिकाधिक दाट घेऊन घन अन्नावर यावे लागते.
तृषा : तृषा म्हणजे तहान. शरीरात जलीय द्रव्ये अधिक साचली तर तहान लागेनाशी होते. जलांश पचून ते आत्मसात होईपर्यंत जल वर्ज्य करणे हाच याला उपाय आहे. यामुळे शरिरस्थ जल पचविणारा अग्नी प्रदीप्त होतो. उदर, शोथ इ . विकारांत जल वर्ज्य करणे हे तृषारूप शमन होय. जलीय दोष फार झाले, तर रेचकाने किंवा वेध करून शोधन करावे लागते. क्षुधा म्हणजे लंघन व तृषा म्हणजे जलवर्जन या दोन्ही प्रकारांना अद्रव्यचिकित्सा म्हणतात.
व्यायाम : शरीरावयवांना श्रम घडविणे याला व्यायाम म्हणतात. अर्थात व्यायाम हे कर्म आहे. ही कर्म चिकित्सा होय. जेव्हा दोष कोष्ठात फार कमी असून शाखेमध्ये हातपाय इत्यादींत विशेष जास्त असतात तेव्हा व्यायामाने संधी, मेद आणि मांस यांमध्ये घर्षणजन्य उष्णता म्हणजेच अग्नी निर्माण करावा लागतो. पचन होऊन ते साररूपी बनल्यानंतर शरीरात आत्मसात होतात व नवीन आहार द्रव्यांची मागणी, भूक निर्माण होते. हे व्यायामरूप शमन होय. हे शमय प्रमेहासारख्या रोगांत फार उपयुक्त पण संधिवातासारख्या रोगात मात्र अजिबात वर्ज्य असते.
आतपसेवन : आतप म्हणजे उन्ह. शाखेमध्ये विशेषतः त्वचेमध्ये संचित झालेल्या दोषांचे पचन आणि विलयन घामरूपाने थोडे शोधन काढण्याकरिता ह्याचा उपयोग होतो. आतपाच्या उष्णतेने स्रोतसे विकसित होतात, त्याचप्रमाणे ती प्रकाशानेही विकसित होतात आणि स्रोतसांचा अवरोध नाहीसा होऊन त्वचारोगासारखे रोग नाहीसे होतात. हे एक स्वेदन आहे. पित्तप्रकृतीच्या माणसात किंवा पित्तरोगात ह्याचा उपयोग होणार नाही.
मारुतसेवन : मारुत म्हणजे वारा. त्वचेतील स्निग्ध व उष्ण गुणांच्या दोषांच्या अंगावर वारा घेतल्याने शमन होते. त्वचा, तिच्या खालचे मेद, मांस ह्यांच्यावरील वायूच्या आघाताने उष्णता व रुक्षता निर्माण होते. त्या योगाने त्यातील स्निग्धादि गुणी कफदोषाचे शमन होते व ते कमी होतात. मारुतसेवनाने आगही नाहीशी होते, तीक्ष्ण गुण शमतो.
क्षुधा, तृषा, व्यायाम, आतप व मारुप ही पाचही शमने अल्प दोषांमध्ये उपयुक्त आहेत. दोष मध्यम असले, तर लंघनाबरोबर पाचनदीपनाचा उपयोग करावा लागतो. आतपमारुतसेवन व दीपन–पाचन या द्रव्य चिकित्सा होत.
शोधन : दोष जेव्हा फार प्रमाणात असतात तेव्हा ते नुसत्या लंघनाने कमी होत नाहीत, तर ते शरीराच्या बाहेर काढून टाकणेच शरीराला हितकारक ठरते. शोधन पाच प्रकारचे आहे. दोष हे ज्या स्थानात असतील व ज्या जातीचे असतील त्यांवर कोणते शोधन द्यावयाचे ते अवलबून असते.
वमन : दोष कफ किंवा कफपित्त असेल, तर ते आमाशयात अधिक असतात. आमाशयातले दोष वांतीने काढणे हेच शरीराच्या हिताचे असते. ते दोष खाली ग्रहणीमध्ये जाऊन शरीरात जाणे हे रोगकारक होते व असे होताना शरीरांचे बलही खूप कमी होते. ते दोष रेचकाने खाली नेणे व काढणे हेही तितके बरोबर नाही म्हणून वमन देणेच योग्य असते.
वमनोपग द्रव्ये : कफाच्या स्थितीवर वमनामध्ये काही द्रव्ये घालावी लागतात. ती द्रव्ये घातल्यानंतर कफाला बाहेर निघण्याला योग्य बनवून शरीराला कष्ट न होता सुखाने बाहेर काढतात. या द्रव्यांना वमनोपग द्रव्ये असे म्हणतात. उदा., कफ चिकट आणि वातड असेल, तर जेष्ठमध आणि पिंपळी यांचा उपयोग गेळफळाबरोबर उपयुक्त ठरेल. कफ खूप दाट असेल, तर सैंधव उपयुक्त ठरेल. कफ अगदी पातळ आणि चिकट असा आलेल, तर निंब आणि वेताची पाने यांचा उपयोग अधिक होऊ शकेल. असे दोषांच्या निरनिराळ्या अवस्थांना अनुसरून जोडद्रव्ये द्यावी लागतात. ह्या दोषांशी ज्या धातूंचा संबंध असेल. त्याच्याकडे लक्ष द्यावे लागते. रसधातू जर थोडा क्षीण असेल, तर लाह्यांचे पाणी व उसाचा रस आणि रक्तदुष्टीशी संबंध असेल, तर उसाचा रस याबरोबर गेळफळ द्यावयाचे असते. असे अनेक सूक्ष्म विचार करून वमन व इतर रेचन इ. शोधने द्यावी लागतात. त्यामुळे योग्य अशी चिकित्सा होते. वमनाची औषधे शरीरात न पचताच रस आणि वीर्याने त्याचे कार्य आमाशयावर होते.
विरेचन : दोष आमाशयाच्या खाली ग्रहणीमध्ये पित्त व पित्तभूयिष्ठ असे असतात तेव्हा त्यांच्यावर विरेचन हेच मुख्य शोधन होय. विरेचक व विरेचनोपग द्रव्ये वरीलप्रमाणे दोषदूष्यांचा सूक्ष्म विवेक करून उपयोगात आणवयाची असतात. सर्वच शोधनांमध्ये या द्दष्टीने विचार करावयाचा असतो. रेचक द्रव्ये विपाक व वीर्य यांनी काम करते. ते अधोगामी असते.
शोधक बस्ती : पक्वाशय व पक्वधान ह्या भागांत जेव्हा दोष असतात तेव्हा शोधनाकरिता शोधक बस्ती (निरूड) आणि गर्भाशय व योनी यांच्या शुद्धीकरिता उत्तर बस्ती द्यावा लागतो.
अअशा तऱ्हेने वमनाने आमाशय, विरेचनाने ग्रहणी, बस्तीने पक्वाशय आणि उत्तर बस्तीने गर्भाशय व योनी यांतील दोष शरीराबाहेर काढले जातात. वमनाने कोष्ठातील वरच्या भागाचे, विरेचनाने मधल्या भागातले व बस्तीने खालच्या भागातले दोष काढले जातात. या तिन्ही शोधनांनी प्राधान्याने कोष्ठशुद्धी होते.
रक्तस्राव : रक्तसृती शिरा वेधून करावयाची असते. सर्व शरीरभर व त्वचेवर असलेल्या रोगामध्ये, रक्ताच्या सर्व रोगांमध्ये रक्तस्राव हा अत्यत्कृष्ट उपाय आहे. याने प्रामुख्याने मध्यममार्ग व शाखांची शुद्धी होते.
शिरोविरेचन : मान व डोके यांतील सामान्य रोग व पंचज्ञानेंद्रियांचे रोग यांतील दोष नाकामध्ये रेचक औषध घालून नाकातून स्राव करून डोक्यातील दोष बाहेर काढून टाकावयाचे असतात.
शोधनाची पूर्वकर्मे : स्नेहन : ज्या स्थानात शोधन द्यावयाचे असते त्या स्थानामधील दोष त्या स्थानापासून सुटलेले असले पाहिजेत. कफज ज्वरात जेव्हा तोंडाला पाणी सुटते, मळमळते, घशाशी येते इ. चिन्हे होतात तेव्हा कफ हा मोकळा होऊन तो बाहेर फेकण्याचा शरीर प्रयत्न करीत आहे असे वरील लक्षणांवरून दिसून येते. अशा वेळी एकदम वांतीचे औषध दिले तर चालते पण दोष शरीरात आणि आपल्या आशयात स्थगित झालेले असतात, शरीरघटकांशी निगडित असतात अशा वेळी धातुघटकांपासून सुटावेत व ते कोष्ठातील आशयात यावेत आणि शरीराला क्लेश न होता बाहेर जावेत अशी व्यवस्था करावी लागते.
याकरिता दोषांना अनुसरून तूप, तेल इ. स्नेह तत्तद रोगनाशक, त्या त्या धातुगामी व त्या त्या दोषनाशक द्रव्यांनी ते सिद्ध करून द्यावे लागतात. ह्या प्रकाराने धातुघटकांशी निगडित व दृढमूल झालेले दोष या स्नेहाने स्निग्ध होऊन ते क्लिन्न (ओले) शिथिल होतात आणि धातुघटकांपासून अलग होतात.
स्वेद : स्नेहनानंतर शेकणे आवश्यक असते. शेकण्याचे तेरा प्रकार आहेत. या तेरा स्वेदांपैकी योग्य त्या प्रकाराने घाम काढावा. स्वेदाच्या उष्णतेने शरीरातील दोष जे स्नेहनाने क्लिन्न झालेले असतात ते उष्णतेने अधिक ओले होतात व पातळ होतात आणि शाखेतून कोष्ठाकडे येऊन त्यांच्या आशयात राहतात व नंतर दिलेल्या शोधनाने शरीराच्या बाहेर सहज रीतीने जातात, धातू व आशय यांना त्रास होत नाही.
स्नेहन, स्वेदन न करता वमन, रेचक इ. आशुकारी अवस्थेशिवाय देणे आयुर्वेदीयांच्या दृष्टीने अतिशय चुकीचे आहे. रेचकाची पुडी रात्री घेणे हे योग्य नाही. अल्प स्नेहन, स्वेदन तरी अशा शोधनापूर्वी घेणे इष्ट असते.
शोधन योग्य प्रमाणात झाले की नाही हे लक्षणे पाहून ठरवावे लागते. कमी प्रमाणात झाले असेल, तर तेच किंवा त्या परिस्थितीत योग्य वाटेल ते शोधन देऊन शुद्ध करावे लागते.
उत्तरकर्म : दोष प्रमाणापेक्षा वाढणे ही दोषांची दुष्टी आणि वाढलेल्या दोषांना युक्त शरीर ही शरीरदुष्टी असते. शरीर शोधनाने शुद्ध झाल्यावर अशक्त झालेले असते आणि जठराग्नीही अबल झालेला असतो. तसेच शरीराची उष्णताही कमी झालेली असते. म्हणून भूक लागली असता पेज, पेजेपेक्षा दाट असे आटवल, नंतर फोडणी देऊन केलेले आटवल तसेच डाळीचे कढण, मांसरस यांपैकी एक दोन किंवा तीन या क्रमाने हळूहळू पचेल असे सेवन करीत नेहमीच्या अन्नावर यावे. म्हणजे अन्नाचे पचन झाल्यावर त्रिधातू, सप्तधातू इ. शरीरघटकच तयार होऊन शरीर आरोग्यसंपन्न होते.
जर अन्न एकदम सुरू केले, तर ते शोधनाचे दुर्बल झालेल्या शरीराच्या दुर्बल अग्नीकडून नीट पचणार नाही व पुन्हा दोषांच्या उत्पत्तीची नांदीच सुरू होईल. शरीर व अग्नी क्षीण झालेले असतात. म्हणून अशा परिस्थितीत उत्पन्न झालेले दोष शरीराला फार घातक ठरतात. म्हणून वामक, रेचक इ. शोधने झाल्यानंतर पातळ आणि हलक्या अन्नापासूनच आहाराची सुरुवात करावी.
अन्य शोधने : वरील पंचकर्मांखेरीज अनेक शोधने आहेत. तोंड, डोळे, फुप्फुसे ह्याही अवयवांची शोधने अनुक्रमे गंडूष, अंजन, धूम्रपान अशी आहेत. ही शोधने त्या त्या अवयवांच्या दोषांचे शोधन करतात. तसेच उद्घर्षण (शरीर घासणे), खाजवणे इ. देखील शरीराची शोधनेच आहेत. त्या त्या ठिकाणचे दोष काढण्याचाच तो प्रयत्न होय. लेखन (दोष खरडून काढणे), क्षरण (झिजवून)ही एक प्रकारची शोधनेच होत. पोत विधी हा एक शोधन आहे. हळकुंड तापवून हात अथवा पाय यांवर डाग देऊन तेथेच ते दाबून ठेवून तो व्रण वाहू देतात.
ही पंचकर्मे विकार झालेला नसतात ऋतूंमुळे प्रकुपित होणाऱ्या दोषांवरही करावी लागतात. अशी शोधनकर्मे जर दरसाल योग्य वेळी केलीत, तर त्या त्या दोषांचे व त्या त्या दोषस्थानांचे विकार कधीही होणार नाहीत, अशी शास्त्रज्ञांची प्रतिज्ञा आहे. कोणते रोग कोणत्या शोधनाने होणार नाहीत हे त्या त्या शोधनविधीत सांगितले आहे. म्हणून पंचकर्मांचे रोगहरण करणे एवढेच ध्येय नाही, तर स्वास्थ्य टिकविणे ह्याही दृष्टीने अतिशय महत्त्व आहे.
अन्य शमने : प्रतिमर्शनस्य, अंजन, आश्र्चोतन , धूत्र, गंडूषण, प्रतिसारण, आलेप, अनुवासनबस्ती इ. देखील शमनेच होत. ह्या सर्व शमनांपैकी काही शमने दिनचर्येत समाविष्ट केली आहेत. ती दररोज सेवन केलीत, तर शमनसंबद्ध अवयवांचे विकार होणार नाहीत, अशा शास्त्रकारांच्या प्रतिज्ञा आहेत. उदा., अणुतेलाच्या नस्याने शिरोरोग व इंद्रियांचे रोग न होता शिरस्थ इंद्रिये व अवयव बलवान राहतात असे सांगितले आहे.
शमने ही सूक्ष्म प्रमाणात शोधने व बृंहणेच होत : आपण जी शमने पाहिलीत त्यांपैकी बहुतेक शमनांनी शरीरामध्ये अग्नी निर्माण करून दोषांचे पचन व विभजन करून त्याचे सारघटक शरीराचे धातू बनतात आणि मलद्रव्य त्या त्या मलायनाकडे पाठविली जातात. अर्थात त्या मलाबरोबर ती शरीराच्या बाहेरच टाकली जातात. शमन कार्यामध्ये सारघटकांनी शरीराचे अल्पप्रमाणात बृंहण होते व मलद्रव्ये बाहेर गेल्याने मूलदोषांचे अल्प शोधनच होते.
बृंहण-शमन : वायू आणि पित्त हे केवल दोष वाढले असताना त्यांची चिकित्सा कफधर्मी (कफवर्धक नव्हे) स्वस्थहित द्रव्यांनी करावयाची असते. पित्ताला शीत, स्निग्ध, गुरू, मंद, मृदु इ. आणि वाताला स्निग्ध, उष्ण, गुरू इ. द्रव्यांनी करावयाची असते. ही द्रव्ये शरीराची पुष्टी करणारी असतात. यांना बृंहन-शमन असे म्हणतात.
ही कर्मे शरीर करते द्रव्य करीत नाही : जे दोष वाढलेले असतात त्याच्या विपरीत गुणी द्रव्याने त्याचे शमन केले जाते. द्रव्यांनी शमन होते असे जरी आपण म्हणत असलो, तरी मुख्य कार्य शरीरच करीत असते. द्रव्य हे शरीराचे साधन होत असते. द्रव्याला शरीर पचवते व नतंर त्याच्या त्या दोषाच्या विपरीत गुणांचे शमन करण्याकरीता उपयोग करुन घेते. ते द्रव्य शरीराने पचवले नाही, तर अगोदर वाढलेले दोष कमी तर होणार नाहीतच परंतु त्यांच्याच जोडीला त्यांच्या विपरीत गुणी दोषांची नवी भर पडते. द्वंद्वज दोष अशा रीतीच्या आहारापासून बहुधा उत्पन्न होतात. वमन द्रव्यांचे कार्य पचन न होताना होते वमन आमाशय करते, द्रव्य करीत नाही. ते द्रव्य आमाशयाला उद्युत करते, हे येथे लक्षात ठेवायला पाहिजे. असेच इतर शोधनशमनांचे समजावे.
शरीर निसर्ग जोषरूपी शल्य पचवून किंवा शरीराबाहेर घालवून निर्दोष होण्याचा सतत प्रयत्न करते, चिन्हांनी व्यक्त करते. तज्ञाने ह्याचा अर्थ समजून कोणत्या शमन-शोधनाची शरीर मागणी करते किंवा त्याला गरज आहे हे जाणून योग्य ते शमन-शोधन योजावे.
जोशी, वेणीमाधवशास्त्री
“