द्वार : इमारतीच्या अथवा इमारतीतील खोलीच्या प्रवेशस्थानी चौकटीत वा कमानीत जी झडप बसवलेली असते, तीस द्वार म्हणतात. दार, दरवाजा, दींडीदरवाजा, प्रवेशद्वार, कवाड इ. नावांनी हा वास्तुविशेष ओळखला जातो. दाराची झडप लाकडाची वा लोखंडादी धातूची वा काचेचीही असू शकते तसेच ती उघडझाप करण्यायोग्य सरकती, घडीची वा आपोआप बंद होणारी असते. दाराचे मुख्य उद्देश इमारतीची वा खोलीची चौकट पूर्णपणे बंद करून ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळवणे, परक्या लोकांचा गृहप्रवेश नियंत्रित करणे इच्छित खाजगीपणा साधणे अशा प्रकारचे असू शकतात. नगरे, गढ्या, किल्ले यांच्या तटबंद्यांतून प्रवेशनियंत्रणासाठी दारांची योजना केलेली असते. अनेकदा त्याच्या बाजूंस बुरूज असून, त्यावर टेहळणीसाठी सोय केलेली असते, महाद्वारांचा वरील बाजूस पुष्कळदा सज्जेही असतात. तेथून पूर्वीच्या काळात नगारे वाजवून व ललकाऱ्या देऊन राजादिकांचे व विजयी वीरांचे आगमन सूचित केले जाई. राजवाडे, मंदिर, क्रीडांगणे यांच्या कोटासही दरवाजे असतात. त्यावर अनेकदा वैभवदर्शक बोधचिन्हे तसेच भौमितिक पर्णफुलांचे नक्षीकाम केलेले आढळते. नगरातील मध्यवर्ती चौक, सार्वजनिक उद्याने अशा ठिकाणी स्मारकरूप प्रवेशद्वारे, कमानी दरवाजे इ. उभारण्यात येतात. त्यांच्या एका अंगास पुष्कळदा शिलालेख खोदलेले दिसून येतात. ही स्मारके भावी पिढ्यांना स्फूर्तिप्रद ठरावीत, अशा उद्देशाने उभारली जातात.

द्वारकल्पनेचा उगम अतिप्राचीन काळात झाल्याचे दिसून येते. अश्मयुगातील मानव डोंगरातील गुहेच्या प्रवेशस्थानी एक मोठा दगड ठेऊन रात्री वन्य श्वापदांपासून आपले संरक्षण करीत असे. त्यानंतरच्या मानव डोंगरातील गुहेच्या प्रवेशस्थानी एक मोठा दगड ठेवून रात्री वन्य श्वापदापासून आपले संरक्षण करीत असे. त्यानंतरच्या नवाश्मयुगातील मानव तंबूच्या प्रवेशस्थानी कातड्यांचा पडदा लावून दाराची योजना करीत असे. त्याचप्रमाणे झोपडीत तोंडाशी वाळलेल्या पालापाचोळ्यात चटईवजा झडप विणून बसवण्याचीही कल्पना ह्या काळात रूढ होती. नंतरच्या काळात निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या तऱ्हेच्या द्वारप्रकारांची निर्मिती झाली.

ईजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व काळात देवालयाची कमानी–प्रवेशद्वारे भव्य असत. त्यांची उंची कधीकधी १२ मी. पर्यंत असे. सुमेरियास विटांच्या अर्धगोलाकार कमानी असत. ग्रीसमध्ये खाली रुंद वर निमुळत्या व अंदाजे ५ मी. उंचीच्या संगमरवरी दगडांच्या कमानी योजत असत. ख्रिस्तकालीन रोममध्ये दगडांच्या अथवा विटांच्या अर्धगोलाकृती कमानी असत. तशाच प्रकारच्या कमानी बायझंटीन आणि रोमनेस्क युगातही आढळतात. गॅथीककालीन कमानीचा आकार भाल्याच्या पात्याप्रमाणे निमुळता असे. प्रशोधनकाळी कमानीचा आकार पुनश्च अर्धगोलाकृती झाला होता. द्वाराच्या योजनोसाठी निरनिराळ्या आकारांच्या शोभिवंत कमानी निर्माण करणे, हे त्या काळाचे खास वैशिष्ट्य होते.

ईजिप्तमध्ये पिरॅमिड, मस्ताबा आदी थडग्यांची दारे दगडांची असत. ती पूर्वनियो.जित ठिकाणी वरील बाजूतून सरकवत असत. त्यायोगे थडग्यांचे प्रवेशद्वार कायमचे बंद होत असे. त्यामुळे कुणाही व्यक्तीला आतील ‘ममी’ला उपसर्ग पोहचविणे किंवा मौल्यवान जवाहीर, कपडेलत्ते आदी चिजा चोरणे अशक्य होत असे. देवालयांची व प्रसादाची द्वारे प्रायः लाकडाची असत व त्यांवर सुरेख नक्षीकाम केलेले असे. बॅबिलोनियातील प्रासादांना भरीव पितळी दरवाजे असत.


१. दौलताबाद किल्ल्याचे संरक्षक प्रवेशद्वार, १२ वे शतक. २. विधानसौघातील मंत्रिमंडळाच्या दालनाचा कोरीव चंदनी दरवाजा, बंगलोर, १९५८. ३. तिसऱ्या शॅल्मानीझरच्या कारकिर्दीतील ब्राँझ द्वाराचा भाग, ॲसिरीया, इ. स. पू. ८५९-८२४. ४. बीबीका मकबरा (औरंगजेबाची राणी रबिया दौरानीची कबर) : प्रवेशद्वार,१६७९. ५. फॅरेन्सचे बाप्तिस्मागृह : उत्तरेकडील ब्रँझ द्वार (१५ वे शतक) – गीबेर्ती. ६. एका आधुनिक गृहाचे अंतर्द्वार. ७. मंदिरवास्तूचा दर्शनी दरवाजा, भुवनेश्वर. १९ व्या शतकाचा उत्तरार्ध.


प्राचीन इराणी प्रवेशद्वारांवर चकचकीत रंगीत विटांचे नक्षीकाम करीत. ग्रीसमधील पार्थनॉन व इरेक्थीयम या विख्यात मंदिरांच्या कमानी

राजा केळकर वस्तुसंग्रहालयातील (पुणे) शिल्पसंपन्न मंदिरद्वार, रामनाड, द.भारत, १९ व्या शतकाच्या उत्तरार्ध.

संगमरवरी होत्या आणि त्यांवर ब्राँझ धातूचे नक्षीकाम केलेले पत्रे जडविलेले होते. त्याचप्रमाणे इटलीमध्ये पॉंपेई येथे ख्रिस्तपूर्व काळात संगमरवरी कोरीवकाम केलेल्या झडपा वापरल्याचे उल्लेख आढळतात. रोममधील पँथीऑंन (दुसरे शतक) या मंदिराची दारे सोनेरी मुलामा दिलेली पत्र्याची होती. अशाच प्रकारची दारे अन्य रोमन वास्तूंमध्ये तसेच ‘सांता सोफिया’ या बायझंटिन चर्चमध्येही आढळतात. त्यातील काही द्वारांवर ऐतिहासिक प्रसंगांचे चित्रण केलेले आढळते. मध्ययुगीन यूरोपात चर्चच्या दारांवरही अशाच ऐतिहासिक प्रसंगांचे चित्रण आढळते. लोरेंत्सो गीबेर्ती (१३७८–१४५५) या प्रख्यात इटालियन मूर्तिकाराने पंधराव्या शतकात फ्लॉरेन्स येथील बाप्तिस्मागृहासाठी घडविलेली ब्राँझ द्वारे त्यांवरील शिल्पांकनासाठी प्रख्यात आहेत.

जपान, चीन, थायलंड यांसारख्या पौर्वात्य देशांतील ‘पॅगोडा’ वास्तूंमध्ये प्रायः लाकडाची कोरीवकाम केलेली दारे उपयोजित असत. त्यांसाठी दोन अथवा अधिक खांब उभारीत आणि त्यांवर आडव्या तुळया ठेवून वर उतरते छप्पर ठेवत असत. नंतरच्या काळात अशाच तऱ्हेची दगडाची दारे बनवीत असत. मध्यपूर्वेतील आणि भारतातील मशिदींची व थडग्यांची दारे विशिष्ट प्रकारची होती. सर्वसाधारणपणे प्रवेशद्वारी विटांची अथवा दगडाची अर्धगोलाकृती भव्य कमान असे. अनेकदा तिच्या पृष्ठभागांवर पानाफुलांचे नक्षीकाम असे, या द्वारप्रकारांत आग्रा येथील ताजमहालाची दारे आणि फत्तेपुर सीक्री येथील मशिदीचा ‘बुलंद दरवाजा’ या विजयद्वाराचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. फतेपुर सीक्री येथील सलीम चिश्तीच्या थडग्याच्या दारावर अत्यंत नाजूक कोरीवकाम केलेले आहे.

बौद्ध स्तूपांच्या भोवती असलेल्या प्रांगणात चार दिशांना चार ‘तोरण’ नामक प्रवेशद्वारे असत. सांची येथील स्तूपाभोवती असलेल्या तोरणांची उंची सु.१२ मी. असून त्यावर जातककथा कोरलेल्या आढळतात. त्यांचे बांधकाम जरी दगडी असले, तरी ते मूळ लाकडी नमुन्यावरून बनविले आहे, हे स्पष्ट दिसते.

पुरातन भारतीय किल्ल्यांची प्रवेशद्वारेही विशेष उल्लेखनीय आहेत. भिंतीच्या बांधकामाशी संलग्न अशी, भुयारात जाण्यासाठी गुप्त प्रवेशद्वारेही असत. शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी किल्लाची प्रवेशद्वारे अत्यंत मजबूत व भव्य असत. त्यांची उंची कधीकधी १० मी. पर्यंत असे. व लाकडी दरवाज्यांना लोखंडी अणकुचीदार खिळे ठोकून अभेद्य करीत. हत्तीच्या धडकेपासून संरक्षण व्हावे, हा उद्देश त्यामागे असे. पुष्कळदा शौर्य व वैभव यांचे दर्शक असे हत्तीचे शिल्प द्वारांच्या बाजूस असे. ह्या द्वारांमध्ये नेहमीच्या रहदारीसाठी ‘दिडी’ नामक एक छोटेसे दार असे.


हिंदू देवालयांतील द्वारप्रकारांत दक्षिणेतील द्रविड शैलीच्या देवालयांत दिसून येणारा ‘गोपुरम्’ हा प्रवेशद्वारप्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे. मदुरा येथील मीनाक्षीसुंदरम्‌च्या देवालयाभोवतीच्या प्रांगणात अशी गोपुरे आहेत. ती पाच ते सात मजली असून टोकाशी निमुळती होत जातात. अशा गोपुरांवर देवादिकांच्या मूर्ती कोरलेल्या आढळतात. तसेच उत्तरेकडील आर्य पद्धतीच्या अथवा नैर्ऋत्येकडील चालुक्य पद्धतीच्या देवालयांच्या प्रवेशद्वारांवर द्वारपालांच्या अथवा यक्षांच्या मूर्ती कोरलेल्या आढळतात. विघ्नहर्ता श्रीगणेशाचे शिल्प द्वाराच्या शिरोभागाच्या गणेशपट्टीवर कोरण्याचीही  प्रथा आढळते. जैन देवालयांच्या प्रवेशद्वारांवरही अत्यंत नाजूक कोरीवकाम केलेले दिसून येते. अबू येथील दिलवाडा मंदिराच्या संगमरवरी दरवाज्यावर केलेले कोरीवकाम अप्रतिम सुंदर आहे.

महत्त्वाच्या घटनांच्या अथवा स्थळांच्या स्मृत्यर्थ भव्य द्वारे उभारलेली आढळतात. अशा प्रकारांत रोमन कमानी, नवी दिल्ली येथील ‘इंडिया गेट’, अहमदाबाद येथील ‘तीन दरवाजा’ हे विजयप्रवेशद्वार आणि मुंबई येथील ‘गेटवे ऑफ इंडिया’ यांचा समावेश होतो. यांपैकी सर एड्‌विन लट्‌येन्झ यांनी योजिलेले ‘इंडिया गेट’ हा नव्या दिल्लीच्या वास्तुकल्पाचा केंद्रबिंदू मानला जातो. ‘इंडिया गेट’ च्या आतील व बाहेरील पृष्ठभागांवर महायुद्धात वीरगती पावलेल्या सैनिकांची नावे कोरली आहेत. अहमदाबाद येथील मशिदींच्या प्रवेशद्वाराच्या धर्तीवर जॉर्ज विटेट यांनी ‘गेटवे ऑफ इंडिया’ ची रचना केली. आधुनिक काळातील विशेष उल्लेखनीय द्वाररचना म्हणजे चंडीगढ येथील उच्च न्यायालयाचे प्रवेशद्वार. ल कॉर्ब्यूझ्ये यांनी निर्मिलेल्या या वास्तूतील तीन भव्य कमानी या वास्तुशिल्पाच्या उदात्ततेची ग्वाही देतात.

आधुनिक काळात वैज्ञानिक शोध व तांत्रिक प्रगती यांमुळे विविध प्रकारंची द्वारे बनविता येणे शक्य झाले आहे. पोकळ अथवा भरीव लाकडी झडपा, लोखंडाची वा ॲल्युमिनियमची हलकी दारे, संपूर्ण काचेची दारे, तऱ्हेतऱ्हेच्या यांत्रिक क्लृपत्यांमुळे आपोआप बंद होणारी, सरकणारी अथवा घडीची द्वारे, आगीचा प्रतिबंध करण्यासाठी लोखंडी द्वारे, इ. प्रकारची द्वारे आधुनिक काळात पहावयास मिळतात. उपाहारगृहांसाठी अथवा मोठ्या दुकानांसाठी फिरती दारे, कार्यालयात किंवा घरी वापरली जाणारी झुलती दारे, दुकाने अथवा गुदामे यांसाठी  वरती सरकणारे सरकते दरवाजे, तसेच प्रशस्त दिवाणखाने व व्हरांडे यांमध्ये सरकती व घडीची द्वारे इ. प्रकार आधुनिक काळात निर्माण झाले आहेत. विशिष्ट प्रकारच्या इमारतींमध्ये विशिष्ट प्रकारची द्वारे बसवावी लागतात. उदा., ध्वनिमुद्रणगृहासारख्या ठिकाणी उष्णतारोधक, कारखान्यातील भट्ट्यांसारख्या ठिकाणी उष्णतारोधक अणुकेंद्रिकीय प्रयोगशाळांसारख्या ठिकाणी किरणोत्सर्गरोधक (रेडिएशन प्रुफ) इत्यादी.

आधुनिक वास्तुनिर्मितीमध्ये द्वारांचे नियंत्रण विद्युत्‌शक्तीचा वापर करून, प्रकाशविद्युत घटांसारख्या साधनांद्वारे करतात. संरक्षणखात्यातील नोकरांना पेन्सिलवजा एक छोटे विद्युत् उपकरण दिले जाते  त्यातील विद्युतलहरीनेच फक्त प्रवेशद्वार आपोआप उघडले जाते. आणखी एका प्रकारात प्रवेशद्वाराच्या शिरोभागी एक छिद्रित धातूची नळी अतून त्यातून खूप जोराचा हवेचा फवारा वाहत असतो, त्यामुळे त्यातून प्रवेश करणे दुरापास्त होते. फक्त ठराविक ठिकाणी गुप्तपणे बसविलेली कळ दाबताच हवेचा फवारा काही क्षणांपुरता थांबतो. हा द्वारप्रकारही विद्युतशक्तीवर नियंत्रित असतो. बँकांच्या सुरक्षित ठेवघरांच्या दरवाज्यांसाठी प्रकाशविद्युत घटाच्या साहाय्याने अशी व्यवस्था केलेली असते, की रात्री तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यास त्याची वर्दी नजीकच्या पोलीस ठाण्यात घंटी वाजवून दिली जाते. अशा प्रकारे आधुनिक काळामध्ये अत्याधुनिक यांत्रिक-तांत्रिक क्लृप्त्यांच्या साहाय्याने द्वारप्रकारांमध्ये सुविधा व सुरक्षितता साधल्याचे दिसून येते.

संदर्भ :  Haberer, Albert, Doors and Gates, London, 1964.

देवभक्त, मा. व.