दोरा–१ : अनेक जातिजमातींचे एक बिरुद. दोरा याचा अर्थ स्वामी असा असून हे बिरुद अनेक जातिजमातींना लावतात. उदा., बोया, एकारी, जटापू, कोंड, दोरा, पात्रा, तेलगा, मुत्रचा इत्यादी. वेलमा, यानाती व गोदावरी जिल्ह्यांतील कोयी ऊर्फ कोचा लोकांना कोयी दोरा उर्फ दोरलू असे म्हणतात. कोंड दोरा आंध्र व ओरिसा राज्यांत आढळतात. त्यांची आंध्र प्रदेशातील संख्या ८६,९११ एवढी असून ते श्रीकाकुलम्, विशाखापटनम् आणि पूर्व व पश्चिम गोदावरी जिल्ह्यांत आढळतात. यांच्या दोन शाखा आहेत : पेद्द उर्फ मोठे कोंडालू आणि चिन्न ऊर्फ लहान कोंडालू. पेद्द कोंडालूमध्ये नाम, भाग (बाघ), कोच्छिनी (कासव) वगैरे असगोत्रीय विवाही कुळी आहेत.
कोंड दोरा पोडू पद्धतीची शेती करतात. ओरिसातील कोंड दोरा प्रामुख्याने कोरापुट जिल्ह्यात राहतात व त्यांची लोकसंख्या १६,५२६ एवढी होती. आंध्र प्रदेशातील कोंड दोरांप्रमाणे हेदेखील इतर लोकांत मिसळून गेलेले आहेत.
कोंड दोरांशिवाय मन्ने दोरा म्हणूनही एक जमात आंध्र प्रदेशात असून तिची वसती श्रीकाकुलम्, विशाखापटनम्, पूर्व आणि पश्चिम गोदावरी, चित्तूर व नेल्लोर या जिल्ह्यांत आढळते. त्यांची लोकसंख्या ८,५७६ होती. यांच्यात विवाह साटेलोट पद्धतीने होतात. हे गळ्यात यज्ञोपवीत घालतात. शेती हा त्यांचा व्यवसाय असून ते जोंधळा, नाचणी, हळद व मिरच्या पिकवितात. यांच्यात मृताला पुरतात.
त्याशिवाय मुख दोरा नावाचीही एक जमात आंध्र प्रदेशात असून हेही लोक शेतीच करतात.
भागवत, दुर्गा
“