देतान्त : देतान्त या फ्रेंच शब्दाचा अर्थ ‘तणाव कमी करणेʼअसा आहे. प्रामुख्याने शीतयुद्धाच्या संदर्भात रशिया–अमेरिका संबंधात तणाव शिथिल होण्याच्या किंवा करण्याच्या प्रक्रियेसाठी हा शब्दयोजण्यात येतो.

दुसऱ्‍या महायुद्धानंतर परस्परविरोधी (भांडवलवादी विरुद्ध साम्यवादी) मतप्रणालींमुळे तसेच एकमेकांच्या प्रभावक्षेत्राच्या विस्ताराच्या भयामुळे रशिया व अमेरिका यांच्यात परस्परांच्या राष्ट्रीय हेतूंबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले. याचीच परिणती वाढत्या शस्त्रास्त्रस्पर्धेत आणि नाटो व वॉर्सा यांसारख्या करारांच्या निर्मितीत झाली. स्टालिनच्या मृत्यूनंतर शीतयुद्धाची तीव्रता कमी होऊ लागली व या दोन्ही राष्ट्रांना किमान सामंजस्याची गरज भासू लागली. या दृष्टीने १९५५ च्या जिनीव्हा शिखरपरिषदेपासून अशा प्रकारच्या वाटाघाटींचे एक पर्व सुरू झाले. १९५५ ते १९७५ पर्यंत दोन्ही देशांच्या नेत्यांत दहा शिखरपरिषदा झाल्या आहेत.

तणाव शिथिल करण्याच्या या प्रयत्नांच्या पाठीशी आंतरराष्ट्रीय वस्तुस्थितीसंबंधी या दोन्ही राष्ट्रांनी काही समान गृहीतके स्वीकारलेली दिसतात : (१) संभाव्य आण्विक महायुद्ध हे सर्वनाशी म्हणून अनिष्ट आहे. (२) आण्विक व्यूहतंत्रात्मक शस्त्रस्पर्धेतून कोणत्याही एका पक्षास फार काळपर्यंत वर्चस्व मिळविणे अशक्य आहे. (३) आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘दोन ध्रुवʼराहिले नसून त्यात अनेक राष्ट्रांनी स्वतंत्र स्थान मिळविले आहेदोन्ही गटांची एकात्मता भंग पावली आहे. (४) अवकाशसंशोधन,विज्ञाने,तंत्रज्ञान इ. विषय हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या कक्षेबाहेरचे असून त्या क्षेत्रांत सहकार्याची आवश्यकता आहे. (५) जागतिक शांतता टिकविणे ही दोघांचीही संयुक्त जबाबदारी आहे.

क्यूबा प्रश्नावरील १९६२ मधील पेचप्रसंगातून, १९६८च्या चेकोस्लोव्हाकियामधील रशियन हस्तक्षेपातून तसेच अरब–इझ्राएल युद्धातून (१९७३) वरील गृहीतकांना पुष्टी मिळाली. निक्सन हे अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर ताण–शिथिलीकरणास वेग आला व अण्वस्त्रप्रसारविरोधी करार करण्यात आला. हेल्सिंकी येथे व्यूहतंत्रात्म शस्त्रांवर मर्यादा घालण्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या (१९७२), जर्मनीसंबंधी तडजोड करण्यात आली (१९७१),आण्विक युद्ध टाळण्यासंबंधीचा करार झाला (१९७३) व भूमिगत आण्विक चाचणी व प्रक्षेपणास्त्रविरोधी शस्त्रे यासंबंधी तह झाले. १९७३ ते १९७५ दरम्यान यूरोपच्या संरक्षणासंबंधी परिषद होऊन काही सर्वमान्य तत्त्वे ठरविण्यात आली. व्हिएटनाम युद्धही समाप्त झाले (१९७४–७५). सत्तासमतोल स्थिर करण्यासाठी,शस्त्रास्त्रस्पर्धा मंदावण्यासाठी आणि अपघाती महायुद्ध टाळण्यासाठी तसेच दोन्ही गटांतील स्पर्धेचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. आंतरराष्ट्रीय संबंधातील ही प्रक्रिया अद्याप चालू आहे. देतान्तची ही प्रक्रिया केवळ बड्या राष्ट्रांपुरतीच मर्यादित न राहता,ती इतर विकसनशील राष्ट्रांपर्यंत पोहोचविली पाहिजे,तरच तिचा मूळ हेतू सफल होईल.

मोरखंडीकर,रा. शा.