देउसकर, सखाराम गणेश : (१७ डिसेंबर १८६९–२३ नोव्हेंबर १९१२). बंगालीत लेखन करणारे महाराष्ट्रीय पत्रकार व साहित्यिक. देउसकरांचे घराणे महाराष्ट्रीय असले, तरी त्यातील अनेक पिढ्या त्या वेळी बंगालच्या हद्दीत असलेल्या देवगड (बिहार) येथे गेल्या होत्या आणि बंगाली संस्कृतीचा त्यांनी स्वीकार केलेला होता. देउसकर कुटुंबीयांना बंगाली भाषा उत्तम प्रकारे येई. सखाराम देउसकर पाच वर्षांचे असताना त्यांची आई निवर्तली. त्यानंतर त्यांना त्यांच्या आत्याने वाढविले. ती वाङ्मयप्रेमी आणि धार्मिक प्रवृत्तीची होती. हे संस्कार तिने त्यांच्यावर केले. देवगड येथील ‘हाय इंग्लिश स्कूल’ मधून १८९० मध्ये ते प्रवेश परीक्षा (एन्ट्रस एक्झॅमिनेशन) उत्तीर्ण झाले. १८९३ मध्ये ‘वैद्यनाथधाम हाय इंग्लिश स्कूल’ मध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी पतकरली परंतु हितवादी ह्या राष्ट्रीय बाण्याच्या नियतकालिकाशी त्यांचा संबंध असल्यामुळे १८९७ मध्ये त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. पुढे १९०५–०७ ह्या काळात ते हितवादीचे संपादक होते. लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य चळवळीचा फार मोठा प्रभाव बंगालवर पडला होता मराठी माणसे व मराठ्यांचा इतिहास ह्यांबद्दलची आस्था बंगालमध्ये वाढीला लागली होती. टिळकांबद्दल नितांत आदर असलेल्या देउसकरांनी बंगालमध्ये ‘शिवाजी उत्सव’ आयोजित केले मराठी ऐतिहासिक कागदपत्रांचे संशोधन करून काही ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे तेजस्वी स्वरुपात बंगाली वाचकांपुढे मांडली. बाजीराव (१८९९), झांसीर राजकुमार (१९०१), शिवाजी (१९०६) ही त्यांपैकी काही होत. त्यांनी केलेल्या अन्य लेखनात महामति रानडे (१९०१, महादेव गोविंद रानडे–चरित्र), देशेर कथा (१९०४), कृपकेर सर्वनाश (१९०४), शिवाजीर महत्त्व (१९०३), तिलकेर मोक्कदमा ओ संक्षिप्त जीवनचरित (१९०८) ह्यांचा समावेश होतो. देउसकर हे मुख्यतः यशस्वी पत्रकार असले, तरी बंगालीतील एक दर्जेदार लेखक म्हणूनही त्यांनी लौकिक संपादिला होता.
देउसकरांची सामाजिक दृष्टी काहीशी सनातनीच होती. देशाच्या परंपरांचा त्यांना अभिमान होता. ते स्वातंत्रवादी होते परंतु कोणत्याही पक्षाचे नव्हते. टिळकांना ते आपले राजकीय गुरु मानीत. राष्ट्रवादी भूमिकेतून ब्रिटिश शासनाचा त्यांना तिरस्कार होताच तथापि पश्चिमी शिक्षणपद्धतीबद्दलही त्यांचे मत प्रतिकूल होते. देवगड येथे ते निधन पावले.
कमतनूरकर, सरोजिनी