दूरदर्शक : आकाशातील अथवा पृथ्वीवरील दूरच्या वस्तूंचे प्रकाशीय निरीक्षण करण्यासाठी दूरदर्शक (दुर्बिण) हे एक महत्त्वाचे साधन आहे. त्याच्या आनुषंगिक बहुविध उपकरणांमुळे विश्वासंबंधी विपुल माहिती मिळू शकते. प्रकाशाऐवजी ताऱ्यांपासून व ग्रहांपासून निघालेले रेडिओ तरंग प्राप्त करून घेऊन त्यांपासून माहिती मिळविण्यासाठी रेडिओ दूरदर्शकाचा पण वापर आजकाल सुरू आहे. [→ रेडिओ दूरदर्शक]. त्याचप्रमाणे क्ष–किरण, जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश) किरण व अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या पलीकडूल अदृश्य) किरण यांचाही यांसाठी उपयोग होऊ लागला असून त्या त्या किरण विशेषासाठी खास उपकरणेही बनविण्यात आली आहेत [→ ज्योतिषशास्त्र].

प्रकाशीय दूरदर्शकाचे मूळ चष्म्याच्या काचेत आहे. तेराव्या शतकापासून लघुदृष्टिदोष (दूरचे पाहण्यातील अडचण) निवारण्यासाठी अंतर्गोल भिंग वापरण्यात येत आहे. लिहिण्या वाचण्याचा प्रघात सामान्य जनतेत कमी होता. दीर्घदृष्टिदोष (जवळचे पाहण्यातील अडचण) दूर करणारा बहिर्गोल भिंग हा उपाय ज्ञात होण्यास आणखी दोनशे–तीनशे वर्षे उलटावी लागली.

इ. स. १६०८ च्या सुमारास हॉलंडमधील हॅन्स लिपरशे या चष्म्याच्या दुकानदारांना दूरदर्शकाचा शोध सहजगत्या लागला. एकमेकांपासून काही अंतरावर ठेवलेल्या दोन बहिर्गोल भिंगांतून दूरच्या वस्तूकडे पाहिले असता ती वस्तू जवळ आल्याचा भास होतो, असे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा ०·५ मी. लांब व २·५ सेंमी. व्यासाची एक नळी घेऊन तिच्या दोन टोकांना एक एक अशी दोन बहिर्गोल भिंगे त्यांनी बसविली व एक दूरदर्शक बनविला. या नवलपूर्ण नळीची वार्ता सर्व यूरोप खंडात लवकरच पसरली. रोम येथील प्रसिद्ध शास्त्रज्ञ गॅलिलीओ (१५६४–१६४२) यांनी तिचे मर्म ओळखून स्वतःच एक दूरदर्शक बनविला व तो आकाशाकडे वळवून त्यातून चंद्रावरील पर्वत, सूर्यावरील डाग, गुरूचे उपग्रह, शनीची वलये, आकाशगंगेतील ताऱ्यांची दाटी इ. चमत्कार त्यांनी पाहिले आणि लोकांनाही दाखविले. स्वतंत्रपणे केलेली रचना आणि तिच्या साहाय्याने लावलेले शोध यांमुळे गॅलिलीओ यांना दूरदर्शकाचे जनक अशी कीर्ती मिळाली.

गॅलिलीओ यांनी बरचे दूरदर्शक बनविले. त्यांपैकी दोन अजून फ्लॉरेन्स येथील वस्तुसंग्रहालयात आहेत. त्यांपैकी मोठ्याची लांबी १·५ मी. असून नळीचा व्यास ५ सेंमी. आहे. दूरची वस्तू त्यातून ३२ पट मोठी दिसते.

दूरदर्शकातील भिंगांपैकी वस्तूच्या बाजूकडील भिंगास वस्तुभिंग व ज्यातून पहावयाचे त्या भिंगास नेत्रभिंग किंवा नेत्रिका अशी नावे आहेत. १६७० च्या सुमारास इंग्लंडमध्ये न्यूटन यांनी एक वेगळ्या प्रकारचा दूरदर्शक बनविला. त्यामध्ये वस्तुभिंगांएवेजी १५ सेंमी. व्यासाचा अंतर्गोल आरसा वापरला होता. नेत्रभिंगासाठी बहिर्गोल भिंग वापरले होते. त्यातून दूरची वस्तू ३८ पट मोठी दिसे. हा दूरदर्शक सध्या इंग्लंडमधील रॉयल सोसायटीच्या वस्तुसंग्रहालयात आहे.

जगातील एक मोठा दूरदर्शक अमेरिकेतील मौंट पॅलोमार येथील वेधशाळेत आहे. त्याचा आरसा सु. ५·१ मी. व्यासाचा असून १९४७ पासून त्याचा वापर सुरू आहे. आरशाचे वजन १५ टन असून संपूर्ण दूरदर्शकाचे वजन ५५० टन आहे. तरीसुद्धा त्याची बैठक अशा कौशल्याने मांडली आहे की, फक्त १/३ किवॉ. शक्तीच्या चलित्राच्या (मोटरच्या) साहाय्याने तो कोणत्याही दिशेला वळविता येतो. यापेक्षाही मोठा असा सु. ६ मी. व्यासाचा दूरदर्शक रशियातील उत्तर कॉकेशस पर्वतात उभारण्याचे काम १९७६ सालच्या अखेरीस पूर्ण झाले आहे.


प्रणमनी दूरदर्शक : स्थूलमानाने दूरदर्शकांची प्रणमनी (भिंगांचे) आणि परावर्तनी (आरशांचे) या दोन प्रकारांत विभागणी करतात. पहिल्यामध्ये गॅलिलीओ यांच्या दूरदर्शकाप्रमाणे वस्तुभिंग म्हणून बहिर्गोल भिंग वापरलेले असते. दुसऱ्यात वस्तुभिंगाऐवजी अंतर्गोल आरसा वापरतात. सतराव्या शतकात जेव्हा दूरदर्शक बाल्यावस्थेत होता, तेव्हा काच व तिच्यापासून इष्ट शक्तीची भिंगे बनविण्याची तंत्रविद्या यूरोप खंडात बरीच पुढारली होती. त्यामुळे सुरुवातीचे सर्व दूरदर्शक प्रणमनी प्रकारचे होते.

वस्तुभिंगाचे मुख्य कार्य म्हणजे दूरच्या वस्तूची प्रतिमा निरीक्षकाच्या सन्निध निर्माण करणे. प्रतिमेचे आकारमान मोठे हवे असल्यास वस्तुभिंगाचे केंद्रांतर मोठे हवे. ४ मी. लांबीच्या केंद्रांतराच्या वस्तुभिंगामधून चंद्राच्या प्रतिमेचा व्यास फक्त १ सेंमी. एवढाच होईल. ही प्रतिमा नीट दिसण्यासाठी ती अधिक वृद्धिंगत करावयास हवी, हे कार्य नेत्रभिंगाकडून होते.

वस्तुभिंगामुळे तयार झालेली प्रतिमा अधिक तेजस्वी होण्याकरिता अधिकाधिक प्रकाश या भिंगामधून येणे जरूर आहे. त्याकरिता त्या भिंगाचे आकारमान (यास ‘छिद्रव्यास’ असे म्हणतात, भिंगाच्या अक्षास समांतर असलेली किरण शलाका भिंगाच्या जेवढ्या पृष्ठभागातून आत जाऊन प्रतिमा पाडू शकते तेवढ्या भिंगाच्या पृष्ठभागाचा व्यास म्हणजे छिद्रव्सास–ॲपर्चर–होय) मोठे करावे लागेल. शिवाय मूळ वस्तूमधील अतिसमीप असलेले दोन भिन्न बिंदू निराळे स्पष्ट दिसण्यासाठीदेखील भिंगाचा छिद्रव्यास मोठा असणे जरूर आहे [→ विभेदनक्षमता] पण त्यामुळे प्रतिमा निर्माण होताना गोलीय विपथन (भिंगाच्या गोलत्वामुळे प्रतिमेच्या आकारात निर्माण होणारा दोष), प्रतिमाविकार, दृष्टिवैषम्य, क्षेत्राची वक्रता, वर्णविपथन (पांढऱ्या वस्तूंच्या प्रतिमांच्या कडा रंगीत दिसणे) इ. अनेक दोषांचा प्रादुर्भाव होतो [→ प्रकाशीय व्यूहांतील विपथन भिंग].

आ. १. गॅलिलीओ यांचा दूरदर्शक : १. दूरच्या वस्तूच्या टोकाकडून येणारे किरण, २. बहिर्गोल वस्तुभिंग, ३. अंतर्गोल नेत्रभिंग, (४-४) वस्तुभिंगामुळे मिळणारी उलटी प्रतिमा, (५-५) अंतिम सुलटी प्रतिमा.

गॅलिलीओ यांच्या दूरदर्शकाचे तत्त्व आ. १ वरून समजून येईल. त्यात प्रतिमा निर्माण करणाऱ्या किरणांचे मार्ग सरळ रेषांनी दर्शविले आहेत. वस्तुभिंग आणि नेत्रभिंग अंतर्गोल असल्यामुळे प्रतिमा दोष बऱ्याच प्रमाणात एकमेकांचा निरास करतात. शिवाय प्रतिमा सुलटी येते. असा दूरदर्शक पृथ्वीवरील वस्तू पाहण्यास फार सोयीस्कर असतो, परंतु नेत्रभिंगांतून गेल्यावर किरण अक्षापासून दूर वळतात. त्यामुळे दृष्टिक्षेत्राची मर्यादा कमी होणे हा याचा दोष आहे.

दूरदर्शकाची विवर्धनक्षमता (अंतिम प्रतिमेने निरीक्षकाच्या डोळ्याजवळ अंतरित केलेला कोन व मूळ वस्तूने अंतरित केलेला कोन यांचे गुणोत्तर) वस्तुभिंग आणि नेत्रभिंग यांच्या केंद्रांतरांच्या गुणोत्तराएवढी असते. गॅलिलीओ यांच्या दूरदर्शकात ही ५–६ पटींपेक्षा जास्त वाढविल्यास दृष्टिक्षेत्र फार लहान होऊ लागते. प्रेक्षागारात बसून रंगमंचावरील पात्रांचा अभिनय अथवा मैदानी खेळांचे सामने पाहण्यास हा दूरदर्शक फार सोयीचा आहे. 


 आ. २. केप्लर यांचा दूरदर्शक : १. वस्तूच्या वरच्या टोकापासून येणारे किरण, २. वस्तुभिंग, (३-३) वस्तुभिंगामुळे तयार झालेली प्रतिमा, ४. नेत्रभिंग, (५-५) अंतिम उलटी प्रतिमा.केल्पर यांचा दूरदर्शक : यामध्ये दोन्ही भिंगे बहिर्गोल प्रकारची असतात. प्रतिमेतील वर्णविपथन कमीतकमी करण्यासाठी वेळोवळी ज्या सुधारणा घडून आल्या त्या वगळता आजच्या प्रणमनी दूरदर्शकाचे स्वरूप योहानेस केल्पर (१५७१–१६२९) यांच्या मूळ कल्पनेप्रमाणेच राहिले आहे. या दूरदर्शकात दूरस्थ बिंदूपासून निघालेले किरण वस्तुभिंगावर समांतर येऊन पडतात व त्यामुळे त्याच्या केंद्रप्रतलात उलटी प्रतिमा निर्माण होते. ही प्रतिमा प्रकाशकिरण प्रत्यक्षात एकत्र येऊन तयार झालेली असते (आ.२). तिच्यातून पुढे गेलेले किरण नेत्रभिंगातून गेल्यावर अंतिम प्रतिमा निर्माण होते. वस्तुभिंगामुळे तयार झालेली प्रतिमा नेत्रभिंगाच्या केंद्रप्रतलाच्या किंचित अलीकडे असेल, तर अंतिम प्रतिमा मूळ वस्तुप्रमाणेच अतिदूर राहील. अशा वेळी वस्तुभिंग व नेत्रभिंग यांतील अंतर त्यांच्या केंद्रांतरांच्या बेरजेइतके असते. पहिली प्रतिमा नेत्रभिंगाच्या अधिक जवळ असेल, तर अंतिम प्रतिमा ही निरीक्षकाच्या अधिक जवळ येईल. ही अंतिम प्रतिमा भासमान किंवा भ्रामक असते.

या दूरदर्शकाची विवर्धनक्षमता वस्तुभिंग व नेत्रभिंग यांच्या केंद्रांतरांच्या गुणोत्तराएवढी असते. यात अंतिम प्रतिमा उलटी असते. पृथ्वीवरील वस्तू पाहण्यास प्रतिमेचा उलटेपणा ही गैरसोयीची बाब असली, तरी आकाशातील ग्रह, तारे इत्यादींचे अवलोकन करण्यास त्याची अडचण येत नाही म्हणून यास ज्योतिषशास्त्रीय (अथवा खगोलीय) दूरदर्शक असे नाव आहे.

वस्तुभिंगामुळे जेथे प्रतिमा निर्माण होते, तेथे एखादी पारदर्शक पट्टी अथवा लंघक तंतू (एकमेकांना लंब असलेले व ज्यांचा छेदबिंदू दूरदर्शकाच्या अक्षावर आहे अशा धातूच्या सूक्ष्म तारा, कोळ्याच्या जाळ्याचे धागे व तत्सम सूक्ष्म तंतू) अशी काही वस्तू ठेवल्यास तीही नेत्रभिंगातून पाहता येते आणि तीमुळे प्रतिमेचे आणि त्यावरून मूळ वस्तूचे आकारमान मोजणे शक्य होते. शिवाय प्रतिमेपासून निघालेले किरण नेत्रभिंगातून पलीकडे येतानाच अक्षाकडे वळतात. त्यामुळे दृष्टिक्षेत्राची मर्यादा वाढण्यास मदत हाते. असे अनेक गुण केल्पर यांच्या दूरदर्शकात असले, तरी त्यात गोलीय विपथन व वर्णविपथन हे दोष अधिक प्रमाणात दिसून येतात. या दूरदर्शकाची रचना केप्लर यांनी आपल्या ग्रंथात (१६११) वर्णन केली होती, तरी प्रत्यक्षात ख्रिस्तोफर शायनर या गणिताच्या अध्यापकांनीच प्रथम बनविला.

नळीविरहित दूरदर्शक : प्रतिमेचे आकारमान वाढविण्यासाठी दीर्घ केंद्रांतरांचे वस्तुभिंग वापरून मोठ्या लांबीचे दूरदर्शक बनविण्याची चढाओढ लवकरच सुरू झाली. लहान दूरदर्शकात कागदाच्या नळ्या वापरीत असत. ३ ते ४ मी. पेक्षा लांबी वाढल्यावर लोखंडी पत्र्याच्या अथवा बांबूच्या नळ्या वापरण्याची जरूरी भासू लागली. वादळी हवेत अशा नळ्या वाकत असत व त्यामुळे वेधात चुका होत. यासाठी क्रिस्तीआन हायगेन्झ यांनी १६५० मध्ये नळीविरहित दूरदर्शकाची कल्पना सुचविली. यामध्ये वस्तुभिंग एका लहानशा नळीत बसवून ती नळी एका उंच खांबाला अडकवून ठेवलेली होती. दुसऱ्या एका नळीत नेत्रभिंग बसवून त्या दोन्ही नळ्या एका जाड तारेच्या साहाय्याने एका रेषेत समोरासमोर आणल्यास त्यांचा एक चांगला दूरदर्शक तयार होऊ शकतो असे आढळले. क्रिस्तीआन व कॉन्स्टंटीन या कायगेन्झ बंधूंनी असे दूरदर्शक बनविण्यामध्ये बराच पुढाकार घेतला. ४ मी. लांबीपासून सुरुवात करून ४० मी. लांबीचे दूरदर्शक बनविण्याचा पल्ला त्यांनी गाठला (आ. ३). यामुळे दूरदर्शकाचा छिद्रव्यास १५ सेंमी. इतका मोठा करता आला. यानंतर इंग्रज ज्योतिर्विद जे. ब्रॅड्ली यांनी ७० मी. लांबीचा व फ्रान्समध्ये आद्रियन औझू यांनी १०० ते २०० मी. लांबीचे दूरदर्शक बनविले. अशा दूरदर्शकांना वेगळ्याच बैठकीची गरज असते, पण त्यांच्या वापरण्याच्या गैरसोयीमुळे त्यांच्या बनावटीची हौस मागे पडली.


 आ. ३. हायगेन्झ यांचा नळीविरहित दूरदर्शक : १. नेत्रभिंग, २. जाड तार, ३. वस्तुभिंग, ४. उंच खांब.पार्थिव दूरदर्शक : केप्लर यांच्या दूरदर्शकात काही बदल करून अंतिम प्रतिमा मूळ वस्तूच्या सापेक्ष सुलटी बनविता येते. अशा दूरदर्शकाला पार्थिव (पृथ्वीवरील वस्तू पाहण्याचा) असे विशेषण दिले जाते. एका प्रकारच्या पार्थिव दूरदर्शकात वस्तुभिंग आणि नेत्रभिंग या दोहोंच्यामध्ये आणखी दोन बहिर्गोल भिंगे ठेवलेली असतात. त्यांतील पहिले अशा जागी ठेवलेले असते की, वस्तुभिंगाने बनलेली प्रतिमा त्याच्या केंद्रावर पडावी. त्यामुळे त्यातून पुढे जाणारे किरण समांतर बनतात. हेच किरण दुसऱ्या  भिंगातून पार गेल्यावर त्याच्या केंद्रावर एकत्रित होऊन तेथे प्रतिमा बनवितात. परिणामी या दोन नवीन भिंगांमुळे पहिल्या प्रतिमेची उलटी प्रतिमा निर्माण होते व ही प्रतिमा नेत्रभिंगातून पाहिल्यास अंतिम प्रतिमा मूळ वस्तूच्या सापेक्ष सुलटी व विवर्धित दिसते (आ. ४). शायनर यांनी दोन बहिर्गोल भिंगांऐवजी प्रतिमा सुलट दिसण्यासाठी एकच भिंग वापरले (आ. ५). यामुळे भिंगांच्या संख्येत बचत झाली खरी, पण दूरदर्शकाची लांबी नवीन भिंगाच्या केंद्रांतराच्या चौपटीने अधिक वाढली. वास्तविक प्रतिमा दोषांची तीव्रता कमी करण्याकरिता अधिक भिंगे वापरणे श्रेयस्कर असते.

आ. ४ पार्थिव दूरदर्शक : वस्तूच्या वरच्या टोकापासून येणारे किरण, २. वस्तुभिंग, (३-३) पहिली प्रतिमा (उलटी), (४, ५) दोन जादा भिंगे, (६-६) दुसरी प्रतिमा (सुलटी). ७. नेत्रभिंग.

लोलकी द्विनेत्री दूरदर्शक : यामध्ये तंतोतंत एकसारखे असे दोन दूरदर्शक त्यांचे अक्ष परस्परांना समांतर ठेवून एकत्र जोडलेले असतात. दोन नेत्रभिंगांमधील अंतर मानवी डोळ्यांमधील अंतराइतके असून पाहणाऱ्या व्यक्तीच्या जरूरीप्रमाणे ते कमीजास्त करता येते. हे दोन दूरदर्शक दोन डोळ्यांना लावून एकाच देखाव्याचे दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळी निरीक्षण करता येते. प्रत्येक दूरदर्शकात दोनदोन पाेराे लोलक बसविलेले असतात (सामान्य द्विनेत्री दूरदर्शकात असे लोलक बसविलेले नसतात).

आ. ५. शायनर पद्धतीचा पार्थिव दूरदर्शक : १ वस्तूच्या वरच्या टोकाकडून येणारे किरण, २. वस्तुभिंग, (३-३) पहिली प्रतिमा (उलटी), ४. जादा भिंग, ५. दुसरी प्रतिमा (सुलटी), ६. नेत्रभिंग.

त्यांच्यामुळे अंतिम प्रतिमा सुलटी होते. त्याचबरोबर दूरदर्शकाची विवर्धनक्षमता जास्त ठेवूनही त्याची लांबी खूपच कमी होते व उपकरण सुटसुटीत होते. त्याचप्रमाणे मोठ्या छिद्रव्यासाची वस्तुभिंगे वापरता आल्याने अंधुक प्रकाशातसुद्धा यातून देखावा स्पष्ट दिसू शकतो. आ. ६ मध्ये लोलकी द्विनेत्री दूरदर्शक दाखविला असून आ. ७ मध्ये पोरो लोलक व प्रकाशमार्ग दाखविले आहेत.

आ. ६. लोलकी द्विनेत्री दूरदर्शक : १. वस्तुभिंग, (२-३) पोरो लोलक, ४. नेत्रभिंग, ५. नेत्रभिंगातील अंतर बदलण्यासाठी बिजागरीसारखी योजना

वस्तुभिंगामुळे तयार होणारी देखाव्याची प्रतिमा उलटी असते. पहिल्या (आ. ६ मधील २ या) लोलकाची काटकोन असणारी कड उदग्र (उभी) असते. तिच्यामुळे प्रतिमा उजव्या–डाव्या दिशेने सरळ होते. दुसऱ्या लोलकाची (३) काटकोन असणारी कड क्षितिजसमांतर असते. तिच्या योगे प्रतिमा वर–खाली या दिशेने सरळ होते. आ. ७ मध्ये ही क्रिया कशी होते हे दाखविले आहे. दोन्ही डोळ्यांनी एखादा देखावा पाहिल्यास त्यातील त्रिमितीची (कोणती वस्तू अलीकडे, कोणती पलीकडे आहे याची) चांगली कल्पना येते. आपण दोन्ही डोळ्यांची नजर जेव्हा एकाच वस्तूवर केंद्रित करतो तेव्हा त्यासाठी डोळ्यांची बुबुळे काही विशिष्ट कोनातून फिरवावी लागतात. वस्तू जितकी जास्त दूर तितका हा कोन कमी असतो. या कोनावरून आपणाला त्या वस्तूच्या अंतराची कल्पना येते. कोन विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी झाल्यानंतर त्यापुढे अंतरे समजू शकत नाहीत.


 आ. ७. पोरो लोलकाने प्रतिमा सुलटी होणेमानवी डोळ्यांच्या बुबुळांमधील सरासरी अंतर सु. ६५ मिमी असते. त्याच्या अनुरोधाने आपणाला नुसत्या डोळ्यांनी पाहताना जास्तीतजास्त सु. ४५० मी. पर्यंतच्या अंतरावरील वस्तूंच्या बाबतीत त्रिमितीचा बोध होऊ शकाते परंतु द्विनेत्री दूरदर्शकाच्या दोन वस्तुभिंगांमधील अंतर डोळ्यांमधील अंतराच्या सु. दुप्पट ठेवतात. दूरदर्शकाची विवर्धनक्षमता M असल्यास या द्विनेत्रीच्या साहाय्याने २ M X ४५० मी. पर्यंत त्रिमितीची कल्पना येऊ शकते. हा याचा सर्वांत मोठा फायदा आहे. खेळांच्या स्पर्धा, रंगभूमीवरील नाट्य वगैरे पाहताना त्याचप्रमाणे प्रदेशाची लष्करी हालचालीच्या दृष्टीने पहाणी करताना हा गुण फारच महत्त्वाचा आहे.

परावर्तनी दूरदर्शक : दूरदर्शकात वस्तुभिंगाऐवजी अंतर्गोल आरसा वापरण्याची कल्पना न्यूटन यांनी काढली. त्यापूर्वी काचेतून होणारे प्रणमन व अपस्करण (प्रकाशकिरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना त्याच्या दिशेत होणारा बदल म्हणजे प्रणमन आणि रंगानुसार–तरंगलांबीनुसार –होणारी त्यांची मार्ग विभागणी म्हणजे अपस्करण) अभ्यासून ती समप्रमाणात असतात असे त्यांनी पाहिले होते. मात्र सर्व पदार्थात ती त्याच प्रमाणात असतात अशी चुकीची समजून त्यांनी करून घेतल्यामुळे व ती पडताळून न पाहिल्यामुळे काचेच्या भिंगातील वर्णविपथन कधीही टाळता येणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. परिणामी आरशाचा दूरदर्शक बनवला गेला आणि अशा रीतीने वर्णविपथनविरहित संयुक्त भिंगे मिळण्यासाठी शास्त्रीय जगाला आणखी पाऊणशे वर्षे वाट पहावी लागली. भिंगाऐवजी आरसा वापरल्यामुळे वर्णविपथनाचे निरसन होते. अंतर्गोल अन्वस्ताकार (अन्वस्त–पॅराबोला–हा वक्र अक्षाभोवती फिरविल्यास मिळणाऱ्या आकाराचा) आरसा वापरल्यामुळे गोलीय विपथनही नाहीसे होते पण प्रतिमाविकार हा दोष राहतोच.

आ. ९. न्यूटन यांचा दूरदर्शक : १. अंतर्गोल आरसा, २. तिरकस ठेवलेला सपाट आरसा, ३. अंतर्गोल आरशाचा केंद्र बिंदू, ४. नेत्रभिंग.

अंतर्गोल आरशामुळे बनलेली प्रतिमा एकतर लहान असते आणि ती पाहताना आरशावर येत असलेले किरण निरीक्षकामुळे अडविले जातात. पहिल्या अडचणीवर ती प्रतिमा नेत्रभिंगातून पाहणे हा एक उपाय आहे, पण दुसऱ्या अडचणीमुळे असा दूरदर्शक अव्यवहार्य समजला गेला. मोठ्या आकारमानाचे दूरदर्शक तयार होऊ लागले तेव्हा ती दुसरी अडचण विशेष त्रासाची वाटली नाही. मौंट पॅलोमार येथील ५·१ मी. छिद्रव्यासाचा (२०० इंची) ‘हेल’ दूरदर्शक इतका मोठा आहे की, निरीक्षक त्याच्या आत सहज बसू शकतो. तरीही मूळ प्रकाशकिरणांपैकी फारच थोडे किरण निरीक्षकामुळे अडविले जातात. जॉर्ज एलरी हेल या अमेरिकन ज्योतिर्विदांच्या पुढाकाराने हा दूरदर्शक बनविला गेला म्हणून त्यांचे नाव याला देण्यात आले आहे. यातील अंतर्गोल अन्वस्तीय आरशाचा व्यास सु. ५·१ मी. आहे. तो पायरेक्स काचेचा बनविला आहे. हा दूरदर्शक आकाशात कोणत्याही दिशेने रोखता येतो. त्याचप्रमाणे त्याचा वापर कॅसेग्रेन (कॉसग्रँ) पद्धतीने, कूडे (कूद) पद्धतीने व इतर पद्धतींनीही (या पद्धतींचे वर्णन पुढे दिले आहे) करता येतो. आ.८ मध्ये या दूरदर्शकांची रचना व उभारणी दाखविली आहे.


आ. ८. हेल दूरदर्शक : १. मुख्य आरसा, २. कॅसेग्रेन पद्धतीने वापरल्यास येथे प्रतिमा मिळते, ३. क्रांति-अक्ष, ४. कूडे व कॅसेग्रेन दुय्यम आरसा, ५. निरिक्षक बसण्यासाठी पििंजरा, ६. मुख्य आरशाचा केंद्रबिंदू, ७. घुमट, ८. घुमटाचे झाकण, ९. कूडे पद्धतीने येथे प्रतिमा मिळते, १०, ११. उत्तरेकडील व दक्षिणेकडील आधार स्तंभ, १२. नियंत्रक फलक.

 आ. १० ग्रेगरी यांचा दूरदर्शक : १. मुख्य आरसा, २. मुख्य ारशाचा केंद्रबिंदू, ३. विवृत्ताकार आरसा, ४. विवृत्त (ज्याच्यावरून ३ हा बनविलेला आहे), ५. नेत्रभिंग, ६. येथे दुसरी प्रतिमा तयार होते. लहान आरसा असलेल्या दूरदर्शकात निरीक्षणासाठी निराळी सोय करणे आवश्यक असते, तेव्हा प्रतिमा प्रत्यक्ष न पाहता परावर्तित प्रकाशकिरणांच्या मार्गात तिकरस ठेवलेल्या लहान सपाट आरशातून ती पाहण्याची क्लृप्ती न्यूटन यांनी काढली. या आरशामुळे किरण दूरदर्शकाच्या नळीतून एका बाजूला बाहेर काढले जातात व तेथे बनलेली प्रतिमा नेत्रभिंगातून वर्धित करून पाहता येते. आरसा बनविण्यासाठी न्यूटन यांनी तांबे व कथिल यांच्या मिश्रणापासून केलेल्या मिश्रधातूचा पत्रा वापरला होता आणि चकाकीसाठी त्यात आर्सेनिक मिसळले होते.

ग्रेगरी व कॅसेग्रेन यांची दूरदर्शक : स्कॉटिश गणिती जेम्स ग्रेगरी (१६३८–७५) यांनी आरशाच्या दूरदर्शकाची एक नवीन रचना सुचविली (आ.१०). त्यात एका नळीच्या बुडाशी अन्वस्ताकार आरसा ठेवला आहे व त्याच्या मध्यभागी एक लहान भोक असून त्याच्या टोकाशी नेत्रभिंग ठेवले आहे. आरशामुळे (२) येथे दूर अंतरावरील वस्तूची प्रतिमा बनते. त्यातून पुढे गेलेले किरण (३) या विवृत्ताकार (विवृत्त –लंबवर्तुळ–अक्षाभोवती फिरविल्यास मिळणाऱ्या आकाराच्या) आरशावर पडून, तेथून परावर्तित होऊन (६) येथे दुसरी प्रतिमा तयार करतात. ती नेत्रभिंगातून पाहिल्यामुळे आणखी वर्धित होते. दोन परावर्तनांमुळे प्रतिमा सुलटी बनते.

एन्. कॅसेग्रेन यांनी १६७२ मध्ये मांडलेल्या योजनेतील दूरदर्शकात असाच एक मोठा अन्वस्ताकार आरसा असतो (आ.११). त्याने निर्माण केलेली प्रतिमा (२) या केंद्रावर पडण्यापूर्वीच वाटेत ठेवलेल्या एका लहान केंद्रांतरांच्या बहिर्गोल आरशावर किरण पडल्यामुळे (४) येथे खरी प्रतिमा निर्मिली जाते. ही प्रतिमा उलटी असते आणि नेत्रभिंगाच्या मदतीने पाहिली जाते.

न्यूटन, ग्रेगरी आणि कॅसेग्रेन यांनी आपापल्या दूरदर्शकांच्या कल्पना एकाच सुमारास मांडल्या पण त्यांपैकी फक्त न्यूटन यांचाच दूरदर्शक प्रत्यक्षात बनविला गेला. इतर प्रकारांत विशिष्ट आकाराचे व वक्रतेचे आरसे बनविणे जरूर होते आणि तीच खरी अडचण होती. न्यूटन प्रकारात लागणारा अंतर्गोल आरसा सहजसाध्य होता. मात्र यानंतर सु. १०० वर्षांनी जेम्स शॉर्ट यांनी ग्रेगरी पद्धतीचे बरेच दूरदर्शक बनविल्याचा उल्लेख सापडतो.


 आ. ११. कॅसेग्रेन यांचा दूरदर्शक : १. मुख्य आरसा, २. मुख्य आरशाचा केंद्रबिंदू, ३. बहिर्गोल आरसा, ४. येथे बहिर्गोल आरशामुळे खरी प्रतिमा मिळते, ५. नेत्रभिंग.कॅसेग्रेन यांच्या दूरदर्शकात फायदे तर काहीच नाहीत, उलट गैरसोयीच फार आहेत, असे मत न्यूटन यांनी प्रदर्शित केले होते. पण प्रत्यक्षात न्यूटन पद्धतीची गैरसोयच मोठ्या आकारमानाचे दूरदर्शक वापरताना विशेष जाणवली. माल्टा येथील १·२५ मी (४८ इंची) दूरदर्शकामध्ये निरीक्षकासाठी १·५ ते ३·० मी. उंचीच्या वेगळ्या मनोऱ्यात ठेवावी लागली. निरनिराळे खगोलस्थ पदार्थ पाहताना दूरदर्शक निरनिराळ्या दिशांनी फिरवावा लागतो आणि त्याचबरोबर निरीक्षकाचा मनोराही वर्तुळाकृती रूळमार्गावर फिरवावा लागे. पुष्कळ वेळा हे सर्व रात्री अंधारात करावयाचे असल्यामुळे असा दूरदर्शक वापरण्यात निरीक्षकाला किती अडचणींना तोंड द्यावे लागत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. याउलट कॅसेग्रेन पद्धतीत निरीक्षकास नेहेमी जमिनीवरच रहावयाचे असल्यामुळे कॅसेग्रेन पद्धतीच्या दूरदर्शकाचा वापर करणे सुखावह ठरले.

आ. १२. कूडे दूरदर्शक : १. मुख्य परावर्तक, २. बहिर्गोल परावर्तक, ३, ४. सपाट परावर्तक, ५. प्रतिमाबिंदू, ६, ७. या दोन अक्षांभोवती दूरदर्क्षक फिरविला जातो.

कूडे दूरदर्शक : (वळण किंवा कोपर या अर्थाच्या Coude या फ्रेंच शब्दावरून या दूरदर्शकास हे नाव देण्यात आले आहे). दूरदर्शक आकाशात कोणत्याही दिशेने रोखला, तरी प्रतिमा एका ठराविक बिंदूवरच पडेल अशी या दूरदर्शकात व्यवस्था केलेली असते. खास करून ताऱ्यांचे वर्णपट घेण्यासाठी या रचनेचा विशेष उपयोग होतो. याच्या प्रतिमाबिंदूच्या ठिकाणी वर्णपटलेखकाची फट ठेवून वर्णपटमापक कायमचा बसविता येतो. आ.१२ मध्ये विषुववृत्तीय पद्धतीचे आरोपण केलेला कूडे दूरदर्शक दाखविला आहे. मुख्य परावर्तकाच्या केंद्रबिंदूच्या अलीकडे (२) हा बहिर्गोल परावर्तक ठेवलेला आहे (३) व (४) हे दोन सपाट परावर्तक असे बसविलेले आहेत की, (२), (३) व (४) यांवरून परावर्तन होऊन शेवटी (५) येथे प्रतिमा बनते. (६) व (७) या अक्षांभोवती उपकरण कसेही फिरविले, तरी प्रतिमा शेवटी (५) येथेच पडते.

आधुनिक मोठ्या दूरदर्शकांत अशी सोय केलेली असते की, जरूरीनुसार ते कॅसेग्रेन किंवा कूडे पद्धतीने वापरता येतील. त्याचप्रमाणे मुख्य परावर्तकाच्या केंद्राच्या ठिकाणी छायाचित्रीय काच बसवून ताऱ्यांची व ⇨ दीर्घिकांची छायाचित्रे घेण्याचीही व्यवस्था केलेली असते.

वर्णविपथनविरहित वस्तुभिंग : परावर्तनी दूरदर्शक वापरून वर्णविपथनाचा प्रश्न सुटला, तरी दुसरी एक अडचणी त्यामुळे निर्माण झाली. काचेची परावर्तनक्षमता फारच कमी असते. त्यामुळे उत्तम परावर्तनाकरिता धातूचा पत्रा घेऊन त्याचा पृष्ठभाग इष्ट तसा वळवून, घासून चकचकीत करून त्याला योग्य तो आकार दिल्यावर त्याचा चांगला आरसा बने. धातुविज्ञानाची पुरेशी प्रगती झाली नसल्यामुळे चांगले परावर्तक कोणते, याची त्या वेळी कल्पना नव्हती. शिवाय हवेच्या तापमानातील दैनंदिन अथवा ऋतुमानाप्रमाणे होणाऱ्या बदलामुळे धातूचे आकुंचन व प्रसरण मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे आरशाचा आकार प्रतिमेचा रेखीवपणा नष्ट करण्याइतका सहज बदले, म्हणून असे दूरदर्शक मोठ्या प्रमाणात प्रचारास आले नाहीत. अठराव्या शतकाच्या मध्यावर जेव्हा वेगवेगळ्या काचांच्या भिंगांची संयुक्त रचना वापरून वर्णविपथनाचे निवारण करण्याचा उपाय सापडला. तेव्हा परावर्तनी दूरदर्शक एकदम मागे पडले. या संबंधात इंग्लंडमध्ये चेस्टर मूर हॉल, पीटर व जॉन डोलाँड हे पितापुत्र आणि जर्मनीमध्ये जे. फ्राउन होफर यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत.


 प्रकाशाचे अपस्करण अंतर्गोल भिंगांत एकमेकांच्या विरुद्ध पडते. बर्हिर्गोल भिंगात निळे किरण लाल किरणांपेक्षा अधिक प्रमाणात अक्षाकडे वळतात आणि अंतर्गोल भिंगात ते लाल किरणांपेक्षा अक्षाकडे कमी प्रमाणात वळतात. एक अंतर्गोल व एक बहिर्गोल अशी एकाच काचेच्या बनावटीची दोन भिंगे एकापुढे एक अशी काही विशिष्ट अंतरावर ठेवल्यास वर्णविपथनापासून मुक्त अशी प्रतिमा मिळू शकते पण भिंगांतील अंतर बरेच असल्यामुळे मोठ्या आकारमानांच्या भिंगाचा समान अक्ष ठेवणे अवघड होते. चेस्टर मूर हॉल यांना या संबंधात पुढील तोड सापडली. बहिर्गोल भिंग नेहमीच्या क्राऊन काचेचे आणि अंतर्गोल भिंग जाड फ्लिंट काचेचे, पण इष्ट त्या वक्रतेच्या पृष्ठभागाचे करून ती दोन्ही एकमेकांशी चिकटून ठेवल्यास त्या दोहोंच संयुक्त भिंग वर्णविपथनापासून मुक्त अशी प्रतिमा बनविण्यास समर्थ होते, असे त्यांना दिसून आले. डोलाँड पितापुत्रांनी अशा संयुक्त भिंगाची निर्मिती इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर केली.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला फ्राउनहोफर या जर्मन शास्त्रज्ञ –कारागिरांना उत्तम संयुक्त भिंगे बनविण्याची कला साध्य झाली व तत्संबंधी त्यांस प्रसिद्धीही मिळाली. डोलाँड यांनी बनविलेल्या दूरदर्शकाची नीट पाहणी केल्यावर त्यांस आढळून आले की, त्यात वर्णविपथन पूर्णपणे नष्ट होत नाही. कोणत्याही काचेचे प्रणमनांक प्रत्येक रंगासाठी वेगळा असतो. चांगल्या भिंगासाठी इष्ट तो प्रणमनांक व अपस्करण असलेली काचच प्रथम बनविली पाहिजे आणि तिच्यापासून बनविलेल्या भिंगाचे पृष्ठभाग घासून ते योग्य त्या वक्रतेचे घडविणे जरूर आहे, असे त्यांच्या लक्षात आले. स्वतः उत्तम कारागीर आणि गणिती असल्यामुळे प्रथम चांगली भट्टी बनवून अपेक्षित गुणधर्माची फ्लिंट काच त्यांनी बनविली व नंतर त्यापासून इष्ट त्या शक्तीची भिंगे बनविली. क्राऊन व फ्लिंट यांची संयुक्त भिंगे वापरून २५ सेंमी. छिद्रव्यासाचा ‘डॉर्पाट’ (आग्नेय एस्टोनियातील डॉर्पाट या जर्मन नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावाच्या नावावरून नाव दिलेला) दूरदर्शक त्यांनी बनविला. भिंग इतके चांगले झाले की, वस्तुभिंगाचा छिद्रव्यास F/१५ (F = वस्तुभिंगाचे केंद्रांतर) इतका मोठा ठेवणे शक्य झाले.

परावर्तनी दूरदर्शकातील सुधारणा : प्रणमनी दूरदर्शकांची अशी प्रगती चालू असताना परावर्तनी दूरदर्शकांची निर्मिती इंग्लंडमध्ये धीमेधीमे चालू होती. १७२२ मध्ये नाव घेण्यासारखा पहिला परावर्तनी दूरदर्शक जॉन हॅडली यांनी बनविला. तांबे आणि कथिल ६८:३२ या प्रमाणात वितळवून नवीन मिश्रधातू त्यांनी बनविली. तीपासून १५ सेंमी. छिद्रव्यासाचा सु.२ मी. केंद्रांतराचा अन्वस्ताकार आरसा बनविली. या दूरदर्शकात न्यूटन यांची पद्धती वापरली होती आणि विवर्धन २३० पर्यंत प्राप्त झाले होते. याच्या अगोदर काही वर्षांपूर्वी तयार झालेल्या हायगेन्झ यांच्या ४ मी. केंद्रांतराच्या प्रणमनी दूरदर्शकाशी तुलना करता हा हॅडली दूरदर्शक फारच समाधानकारक ठरला. उत्तम आरसे बनविण्याचे प्रशिक्षण हॅडली यांनी अनेकांना दिले व त्यानंतर मोठमोठ्या छिद्रव्यासाचे आरसे बनविण्याची धडपड सुरू झाली. मोठ्या आकारमानाचे भिंग बनविण्यामध्ये बऱ्याच अडचणी असतात. काच पूर्णपणे एकविध (एकसारखी) असावी लागते. तिच्यात हवेचे बुडबुडे, अंतर्गत ताण वगैरे बिलकुल असता कामा नयेत. शिवाय काचेचे पृष्ठभाग जरूर त्या प्रमाणात घासून इष्ट ती वक्रता दिल्यावर झिलई द्यावी लागते व या सर्व क्रिया फार बारकाईने कराव्या लागतात. त्यामानाने मोठ्या छिद्रव्यासाचे परावर्तक बनविणे सोपे असते. याचे प्रत्यंतर १७८८ मध्ये प्रसिद्ध ज्योतिर्विद विल्यम हर्शेल यांनी बनविलेल्या ४५ सेमी. छिद्रव्यासाच्या परावर्तनी दूरदर्शकात मिळते. परावर्तनी दूरदर्शकात मुख्य अडचण अशी की, त्यांच्या आरशावरून प्रकाशाचे परावर्तन भरपूर प्रमाणात होत नसे. त्यामुळे त्याला झिलई द्यावी लागे. दूरदर्शक वापरणारी व्यक्ती ज्योतिर्विद व कसबी कारागीर या दोन्ही अंगानी तज्ञ असावी लागे.

परावर्तनी दूरदर्शकाची गुणवत्ता त्याच्या अर्ध्या आकारमानाच्या प्रणमनी दूरदर्शकाइतकी पडे कारण परावर्तनाच्या वेळी जवळजवळ ४०% प्रकाश वाया जाई. यातून मार्ग म्हणून मुख्य आरसा प्रकाशकिरणांशी किंचित कलता ठेवण्याची कल्पना हर्शेल यांनी काढली. न्यूटन यांचा छोटा सपाट आरसा अजिबात काढून टाकला आणि नळीच्या पुढच्या टोकाजवळ एका बाजूला प्रतिमा निर्माण करून ती नेत्रभिंगातून पाहण्याची व्यवस्था केली. मोठ्या आकारमानाचे परावर्तनी दूरदर्शक बनविण्याचे विल्यम पार्सन्स (अर्ल ऑफ रॉस), जे. नॅसस्मिथ वगैरेंनी बरेच कष्ट घेतले. तरीही फ्राउनहोफर यांच्या २५ सेंमी. छिद्रव्यासाच्या प्रणमनी दूरदर्शकाची बरोबरी त्यांना करता आली नाही.


 युस्टुन फोन लीबिक यांनी १८५० च्या सुमारास काचेवर धातूचा पातळ लेप देण्याची रासायनिक प्रक्रिया शोधून काढली. हा लेप सफाईदार असल्यामुळे प्रकाशाच्या परावर्तनाचे प्रमाण खूपच वाढले. चांदीवरून परावर्तन अधिक चांगले होते असेही आढळून आले. मात्र त्यात निळ्या रंगाचे परावर्तन लाल रंगापेक्षा कमी प्रमाणात होते असे दिसून आल्यामुळे अलीकडे चांदीऐवजी ॲल्युमिनियम वापरण्याचा प्रघात पडला आहे. जर्मनीमध्ये सी. ए. फोन स्टाइनहाईल आणि फ्रान्समध्ये जे. बी. एल्. फूको या शास्त्रज्ञांनी दूरदर्शकास योग्य असे आरसे बनविण्यात पुढाकार घेतला.

विद्युत् विलेपनामुळे अधिक टिकाऊ आणि एकविध लेप देता येतो, असे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला कळून आले. १९३० नंतरच्या दशकात जॉन स्ट्राँग यांनी निर्वातात ऊर्ध्वपातन करून काचेवर ॲल्युमिनियमाचा लेप देण्याची प्रक्रिया शोधून काढली. ॲल्युमिनियमाच्या लेपाचा हवेशी संपर्क आल्यावर त्याचे जलद ऑक्सिडीभवन (ऑक्सिजनाशी संयोग) होऊन कठीण व टिकाऊ परावर्ती लेप तयार होतो. ॲल्युमिनियमाचा लेप चांदीपेक्षा पुष्कळच टिकाऊ असतो. चांदीचा लेप दर काही महिन्यांनी पुन्हा द्यावा लागतो, तर ॲल्युमिनियमाचा पाच ते दहा वर्षे टिकतो. जीवर धातूचा लेप द्यावयाचा ती काच प्रकाशीय दृष्ट्या उच्च दर्जाची असली पाहिजे असे नाही फक्त ती मजबूत असावी एवढीच अपेक्षा असते. काचेचा प्रसारण गुणांक (१० से. तापमान वाढल्यास एकक लांबी, क्षेत्रफळ वा घनफळ यांचे होणारे प्रसरण) कमी असल्यामुळे आणि धातूंमध्ये परावर्तनक्षमता अधिक असल्यामुळे धातू व काच यांचा असा संयोग करून चांगला आरसा बनविण्याची तंत्रविद्या याप्रमाणे प्रगत झाली. या सुधारणांमुळे परावर्तनी दूरदर्शक पुन्हा अधिक उपयोगात येऊ लागले.

आज जगातील मोठ्यात मोठा परावर्तनी दूरदर्शक ६ मी. छिद्रव्यासाचा आहे, पण सर्वांत मोठा प्रणमनी दूरदर्शक फक्त १ मी. छिद्रव्यासाचा आहे. आरशाचा छिद्रव्यास वस्तुभिंगाच्या ६ पट मोठा असल्यामुळे या परावर्तनी दूरदर्शकातून ६ X ६ पटीने अधिक मंदप्रकाशी तारे पाहणे शक्य होते. या कारणाने परावर्तनी दूरदर्शकाशी चढाओढ करणे प्रणमनी दूरदर्शकांना अशक्यप्राय झाले. तरीसुद्धा एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ०·७५ मी. छिद्रव्यासाचे प्रणमनी दूरदर्शक बऱ्याच वेधशाळांत उभारण्यात आले. अमेरिकेतील वॉशिंग्टन आणि मकॉर्मिक वेधशाळांत, व्हिएन्ना, लेनिनग्राड, विशॉफस्टाइन (जर्मनी), ग्रीनिच (इंग्लंड), पॅरिस, पॉट्सडॅम येथील वेधशाळांत ६५ ते ७६ सेंमी. (२६ ते ३० इंची) छिद्रव्यासाचे प्रणमनी दूरदर्शक आहेत. यांच्यापेक्षा थोडा अधिक मोठा दूरदर्शक अमेरिकेतील ‘लिक’ वेधशाळेत बसविलेला आहे. जगातील सर्वांत मोठा प्रणमनी दूरदर्शक १०१ सेंमी. (४० इंची) असून तो अमेरिकेतील यर्कीझ या वेधशाळेत आहे.

१·५ मी. छिद्रव्यासाचे परावर्तनी दूरदर्शक जगात बऱ्याच ठिकाणी आहेत. ग्रिनिच येथे नवा २·५ मी. छिद्रव्यासाचा परावर्तनी दूरदर्शक १९६७ मध्ये बसविण्यात आला.


१२५ सेंमी. (५० इंच) व त्याहून मोठे परावर्तनी दूरदर्शक

वेधशाळेचे ठिकाण

आकारमान (सेंमी).

छिद्रव्यास (इंच)

वापरण्यास सुरुवात (साल)

मौंट विल्यम (अमेरिका)

१५२

६०

१९०८

ब्लूमफाउंट (द. आफ्रिका)

१५२

६०

१९३३

बास्क आलगेर (अर्जेंटिना)

१५२

६०

१९४२

हारवर्ड, ओकरिज (अमेरिका)

१५५

६१

१९३४

पर्किन्स वेधशाळा, डेलावेअर (अमेरिका)

१७८

७०

१९३२

डोमिनियन वेधशाळा, व्हिक्टोरिया (कॅनडा)

१८३

७३

१९१८

डनलाप वेधशाळा, टोराँटो (कॅनडा)

१८८

७४

१९३४

रेडक्लिफ वेधशाळा, प्रिटोरिया (द. आफ्रिका)

१८८

७४

१९४८

मौंट स्टॉमलो वेधशाळा (ऑस्ट्रेलिया)

१८८

७४

१९५५

ऑट प्रोव्हिन्स वेधशाळा (फ्रान्स)

१८८

७७

१९५८

मकडॉनल्ड, मौंट लॉक (अमेरिका)

२०८

८२

१९३९

किट पीक, अरिझोना (अमेरिका)

२१३

८४

१९६३

हूकर, मौंट विल्सन (अमेरिका)

२५४

१००

१९१७

क्रिमिया (रशिया)

२५९

१०२

१९६०

लिक वेधशाळा (अमेरिका)

३०५

१२०

१९५९

मोट पॅलोमार (अमेरिका)

५०८

२००

१९४८


हेल दूरदर्शकापेक्षाही मोठा असा ६ मी. छिद्रव्यासाचा दूरदर्शक उभारण्याचे काम १९७० मध्ये रशियात झल्यिंचूक्सकाइअ येथे सुरू होऊन ते १९७६ च्या अखेरीला जवळजवळ पूर्ण झाले. या दूरदर्शकाचा अन्वस्तीय परावर्तक पायरेक्स काचेचा असून त्याचे वजन ३८·१३९ टन आहे. वातावरणाच्या परिणामामुळे प्रतिमेमध्ये होणाऱ्या विकृती लक्षात घेता याच्यापेक्षा मोठा दूरदर्शक तयार करणे निरुपयोगी होणार आहे. वर्षातील जास्तीत जास्त दिवस वेध घेता यावेत या दृष्टीने या दूरदर्शकाच्या ठिकाणाची निवड केलेली आहे.

भारतामध्ये दूरदर्शक असलेल्या वेधशाळा तीन ठिकाणी आहेत. एक कोडईकानल येथे, दुसरी हैदराबाद येथे व तिसरी नैनिताल येथे. या सर्वच वेधशाळांत प्रणमनी व परावर्तनी प्रकारचे दूरदर्शक आहेत, पण ते बरेच लहान छिद्रव्यासाचे आहेत. सर्वांत मोठा सु. १ मी. छिद्रव्यासाचा परावर्तनी दूरदर्शक नैनिताल येथे बसविण्यात आलेला आहे. सर्वांत मोठा प्रणमनी दूरदर्शक फक्त २५ सेंमी. छिद्रव्यासाचा आहे.

विसाव्या शतकातील सुधारणा : परावर्तनी दूरदर्शकात इतर सर्व विपथन जवळजवळ नाहीसे झाले असले, तरी प्रतिमाविकाराचा दोष फार मोठ्या प्रमाणात शिल्लक राहतो. त्यामुळे अक्षापासून दूर असलेल्या वस्तूची प्रतिमा विकृत होते व आरशाचे उपयुक्त क्षेत्र त्याच्या आकारमानाच्या मानाने बरेच लहान होते. यासाठी सी. केल्नर यांनी १९१० मध्ये एक उपाययोजना सुचविली परंतु ती प्रत्यक्ष अमलात आणून दूरदर्शक बनविण्याचे काम जर्मनीतील हँबर्ग वेधशाळेचे बेर्नहार्ट श्मिट यांनी १९३१ मध्ये पुरे केले. यामध्ये अन्वस्ताकार आरशाऐवजी गोलाकार आरसा व एक विशिष्ट वक्रतेचे भिंग या दाहोंचा एकत्रित उपयोग केला जातो. एका अर्थी प्रणमनी आणि परावर्तनी अशा दोन्ही प्रकारांचा यात समन्वय झाला आहे, असे म्हणता येईल. हा दूरदर्शक छायाचित्रणासाठीच विशेष उपयुक्त असून तो श्मिट कॅमेरा या नावानेही ओळखण्यात येतो.

आ. १३. श्मिट पद्धती : १. श्मिट काच, २. केंद्रबिंदू, ३. गोलीय परावर्तक.गोलाकार अंतर्गोल आरसा अन्वस्ताकार आरशापेक्षा बनविण्यास सोपा आहे. त्याने बनलेली प्रतिमा वर्णविपथन, दृष्टिवैषम्य व प्रतिमाविकार या तीनही दोषांपासून मुक्त असते. फक्त गोलीय विपथन हा एकच दोष त्यात राहतो. तो टाळण्यासाठी आरशासमोर एक उच्च दर्जाची काच ठेवलेली असते. या काचेचा सपाट पृष्ठभाग प्रकाशकिरणांना सन्मुख असताे. नीट घासलेल्या दुसऱ्या पृष्ठभागाला त्याच्या मध्यभागी कळेल न कळेल इतपतच बहिर्गोल व सभोवती कडांना किंचितसा अंतर्गोल असा आकार दिलेला असतो. गोलीय विपथन नष्ट करण्याइतपतच वक्रता या काचेला दिलेली असते, हीच श्मिट पद्धती होय. काचेमुळे जे दोष निर्माण होतात ते काचेचा छिद्रव्यास लहान असेल, तर अगदी क्षुल्लक वाटतील असेच असतात. जरी श्मिट काच फार कमी प्रमाणात घासावी लागत असली, तरी मोठ्या छिद्रव्यासाची व प्रकाशदृष्ट्या परिपूर्ण अशी काच तयार करणे फार कष्टाचे काम आहे. त्यामुळे १·२ मी. आकारमानापेक्षा मोठा श्मिट प्रकारचा दूरदर्शक अद्याप तयार झालेला नाही. या आकारमानाचे दूरदर्शक मौंट विल्सन आणि मौंट पॅलोमार येथील वेधशाळांत वापरले जात आहेत. मोठ्या दृष्टिक्षेत्रामुळे या दूरदर्शकातून एकाच वेळी अनेक ताऱ्यांसंबंधी माहिती गोळा करता येते. १९५०–५२ या दोन वर्षांत संपूर्ण आकाशाचे सर्वेक्षण वरील दोन वेधशाळांनी श्मिट दूरदर्शकांच्या मदतीने पुरे केले.

आ. १४. माक्सूटोव्ह पद्धती : १. माक्सूटोव्ह काच, २. केंद्रबिंदू, ३. अन्वस्ताकार आरसा.

एक अडचण सोडविण्यासाठी योजलेल्या उपायामुळे नवीनच अडचणी निर्माण होतात, असे अनेक वेळा घडते. श्मिट दूरदर्शकाच्या बाबतीत हाच अनुभव आला. त्यात क्षेत्रवक्रता हा दोष निर्माण झाला. या दोषाचा परिणाम म्हणजे अंतिम प्रतिमा एकाच प्रतलात तयार न होता एका वक्र गोलाकार पृष्ठावर तयार होते. त्यामुळे छायाचित्र घेताना छायाचित्रणाची फिल्म अशा वक्र पृष्ठावर राहील अशी योजना करावी लागते. डोळ्यांनी निरीक्षण करताना याची विशेष अडचण येत नाही पण छायाचित्रावरून दूरस्थ वस्तूमधील अंतरे काढताना बऱ्याच दुरुस्त्या कराव्या लागतात. श्मिट योजनेला पर्याय म्हणून दुसरी उपाययोजना १९४० नंतर रशियातील डी. डी. माक्सूटोव्ह आणि नेदर्लंड्समधील ए. बाऊर्स यांनी स्वतंत्रपणे केली. माक्सूटोव्ह यांच्या पद्धतीतही अन्वस्तकार आरसाच वापरला आहे, पण काच अंतर्गोल ठेवली आहे. त्या काचेचे दोन्ही पृष्ठभाग किंचित गोलाकार असतात व मध्यभागी त्याची जाडी थोडीशी कमी असते. वर्णविपथनापासून ही काच मुक्त असते. काचेचे पृष्ठभाग गोलाकार असल्यामुळे असा आकार देणे यांत्रिक दृष्ट्या सुकर होते. या दृष्टीने ही पद्धती श्मिट पद्धतीपेक्षा सोयीस्कर आहे. दोन्ही प्रकारांत आरशाच्या केंद्रांतराच्या दुप्पट अंतरावर ही काच ठेवलेली असते व आरशाच्या केंद्र प्रतलात तयार झालेल्या प्रतिमेचे छायाचित्र जवळच ठेवलेल्या कॅमेऱ्यामधून घेतले जाते [→ छायाचित्रण].


 विभेदनक्षमता : दूरदर्शकाची विभेदनक्षमता φ पुढील सूत्राने काढता येते : φ = 1.22 .λ/a यात λ प्रकाशाची तरंगलांबी असून a वस्तुभिंगाचा व्यास आहे [→ विभेदनक्षमता].

वर्धनक्षमता : एखाद्या दूरच्या ताऱ्याने दूरदर्शकाशी (डोळ्यांशी) α हा कोन अंतरित केला, तर त्याचे कोनीय आकारमान α आहे असे म्हणतात. वस्तुभिंगाने बनविलेल्या प्रतिमेचा व्यास α एवढा असतो. (F = वस्तुभिंगाचे केंद्रांतर). हीच प्रतिमा नेत्रभिंगाच्या केंद्रावर पडली असेल, तर प्रतिमेने डोळ्याशी (किंवा नेत्रभिंगाशी) केलेला कोन α F/f एवढा होईल. (f = नेत्रभिंगाचे केंद्रांतर). नेत्रभिंगाने बनविलेल्या प्रतिमेने व प्रत्यक्ष वस्तूने डोळ्याशी केलेल्या कोनांचे गुणोत्तर α F/f = F/f म्हणजेच दूरदर्शकाची वर्धनक्षमता होय. वस्तुभिंगाचे केंद्रांतर मोठे आणि नेत्रभिंगाचे लहान ठेवण्यामधील मर्म यावरून समजून येईल.

आ. १५. हायगेन्झ नेत्रभिंगसमूह १. क्षेत्रभिंग, २. नेत्रभिंग, ३. डोळ्याकडे जाणारे किरण, ४. वस्तुभिंगातून येणारे किरण, ५. फक्त वस्तुभिंगामुळे निर्माण झाली असती अशी प्रतिमा, ६. क्षेत्रभिंगामुळे बनलेली प्रतिमा.

नेत्रभिंगसमूह : वस्तुभिंगाने बनविलेली प्रतिमा वर्धित करणे हे नेत्रभिंगाचे कार्य आहे. गोलीय विपथन कमी करण्यासाठी नेत्रभिंग एका बाजूने सपाट असलेले (सपाट-बहिर्गोल) वापरणे इष्ट असते. दुसरी वक्र बाजू डोळ्याकडे असते. तरीही थोड्याफार प्रमाणात वर्णविपथन राहतेच. ते दूर करण्यासाठी हायगेन्झ यांनी दोन सपाट–बहिर्गोल भिंगे वापरून नेत्रभिंगासमूह बनविण्याची तोड काढली (आ.१५). यातील मोठे भिंग डोळ्यापासून दूर व लहान डोळ्याजवळ ठेवून त्यातून प्रतिमा पहावयाची असते. यातील मोठ्या भिंगाचे केंद्रांतर लहानाच्या तिप्पट असून दोहोंतील अंतर लहान भिंगाच्या केंद्रांतराच्या तिप्पट आहे. यामुळे गोलीय विपथन बरेच कमी होते कारण भिंगातून प्रकाशकिरण जातेवेळी प्रकाशकिरणांच्या दिशेत जो बदल होतो, तो दोन्ही भिंगांवर सम प्रमाणात वाटला जातो. वर्णविपथन कमी करण्याकरिता दोन भिंगांतील अंतर त्यांच्या केंद्रांतरांच्या सरासरीइतके असते. अशा रीतीने सर्व तऱ्हांचे विपथन फारच कमी होते.

नेत्रभिंगसमूहामुळे दृष्टिक्षेत्र वाढते हा एक आणखी आनुषंगिक फायदा आहे. केप्लर यांच्या दूरदर्शकाची रचना पाहिल्यावर असे लक्षात येईल की, जर वस्तुभिंगाने बनविलेली प्रतिमा नेत्रभिंगाच्या मानाने समान आकारमानाची अथवा मोठी असेल, तर तिच्या टोकापासून निघालेले सर्व किरण नेत्रभिंगातून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रतिमेच्या कडा काहीशा अस्पष्ट आणि अंधुक वाटतात. नेत्रभिंगसमूह वापरल्यास त्यातील पहिल्या भिंगाने (क्षेत्रभिंगाने) प्रकाशकिरण अक्षाकडे वळतात व त्यामुळे दृष्टिक्षेत्राचे आकारमान ४० अंशांपर्यंत वाढविता येते. वस्तुभिंगाने बनविलेली प्रतिमा समूहाच्या दोन भिंगांच्या मधे पडेल अशा रीतीने समूहाची स्थापना केलेली असते.

आ १६. रॅम्सडेन नेत्रभिंगसमूह : १. वस्तुभिंगातून आलेले किरण, २. वस्तुभिंगामुळे बनलेली प्रतिमा (येथेच लंघक तंतू बसवितात), ३. क्षेत्रभिंग, ४. नेत्रभिंग, ५. डोळ्याचे स्थान.

चांगले दृष्टिक्षेत्र मिळण्यासाठी आणि विकृती कमी करण्यासाठी जे. रॅम्सडेन यांचा नेत्रभिंगसमूहदेखील वापरला जातो. यात सपाट बहिर्गोल भिंगे असतात व ती समान केंद्रांतराची असतात. त्यांतील अंतर केंद्रांतराच्या २/३ इतके असते. वर्णविपथन निवारण्याचे कार्य त्यात हायगेन्झ नेत्रभिंगसमूहाच्या मानाने निकृष्ट असते. ते उत्तम करण्यासाठी दोन भिंगांतील अंतर दोन्ही केंद्रांतरांच्या सरासरीइतके ठेवलेले असते तर पुढच्या भिंगावरचे चरे, धूलिकण इ. गोष्टीच जास्त स्पष्ट झाल्या असत्या म्हणून तसे केले जात नाही. रॅम्सडेन नेत्रभिंगसमूहामुळे दृष्टिक्षेत्र ३५ अंशांपर्यंत सहज वाढविता येते. पुढच्या भिंगासमोर f/४, (f = केंद्रांतर), अंतरावर लंघक तंतू ठेवून त्या ठिकाणी वस्तुभिंगाने निर्माण झालेली प्रतिमा येईल अशा तऱ्हेने हा नेत्रभिंगसमूह ठेवला, तर प्रतिमेचे मापन करणे शक्य होते, हा या नेत्रभिंगसमूहाचा विशेष गुण आहे. हायगेन्झ व रॅम्सडेन या नेत्रभिंगसमूहांच्या रचनांत थोडा थोडा बदल करून इतर अनेक पर्यायी नेत्रभिंगसमूह तयार करण्यात आलेले आहेत.


 दूरदर्शकाचे आरोपण : कोणत्याही वस्तूचे बराच वेळ निरीक्षण करावयाचे असेल, तर दूरदर्शकाला व्यवस्थित दृढ बैठक देणे जरूर आहे. साधारणत: १२–१३ सेंमी. अथवा त्याहून लहान दूरदर्शक एखाद्या घडीच्या तिपाईवर बसविलेले असतात. त्यामुळे ते कोठेही नेऊन वापरता येतात. मोठे दूरदर्शक वजनदार असल्यामुळे त्यांना कायमचे आराेपण द्यावे लागते.

सर्व तारे जणू काही वर्तुळाकार कक्षांतून फिरत असतात आणि २४ तासांत आपली प्रदक्षिणा पुरी करतात, असा आपणास पृथ्वीच्या अक्षीय भ्रमणामुळे भास होतो. यामुळे एखाद्या ताऱ्याचे अखंड निरीक्षण करताना दूरदर्शक सतत फिरता ठेवावा लागतो. हे करण्यासाठी दूरदर्शकाचे आरोपण करण्याच्या दोन पद्धती आहेत. ‘उदग्र–क्षैतिज–अक्षांकित’ नावाच्या पद्धतीत दूरदर्शक एका उदग्र अक्षाभोवती क्षैतिज प्रतलात कसाही फिरविता येतो. त्याच वेळी दुसऱ्या क्षैतिज अक्षाभोवती वरखाली करता येतो. ही पद्धत फक्त छोट्या दूरदर्शकांच्या आरोपणासाठीच वापरतात. परंतु रशियात बसविण्यात आलेल्या नव्या ६ मी. छिद्रव्यासाच्या दूरदर्शकाचे वजन फार प्रचंड झाल्याने त्याचे आरोपण याच पद्धतीचे आहे. हेल दूरदर्शकासारख्या मोठ्या दूरदर्शकासाठी विषुववृत्तीय आरोपण पद्धतीचाच अवलंब आतापर्यंत करीत. यामध्ये एक अक्ष ध्रुवताऱ्याच्या दिशेने म्हणजे पृथ्वीच्या भ्रमणाच्या अक्षाला समांतर असा कायमचा रोखून ठेवलेला असतो. या ध्रुवीय अक्षाशी काटकोनात दुसरा क्रांती अक्ष असतो. त्याच्याभोवती दूरदर्शक फिरवून इष्ट त्या ताऱ्यावर रोखता येतो. एखाद्या घड्याळाच्या चक्राला हा ध्रुवीय अक्ष जोडून दिला व  २४ तासांत त्याचे एक परिवलन पुरे होईल असा त्याला वेग दिला की, कोणताही तारा सतत दूरदर्शकाच्या दृष्टिक्षेत्रात ठेवता येतो.

या रचनेत थोडा बदल करून विषुववृत्तीय आरोपणाच्या इंग्रजी व जर्मन अशा दोन पद्धती प्रचारात आल्या. या दोन प्रकारांचे नमुने अनुक्रमे मौंट विल्सन आणि डोमिनियन वेधशाळांत वापरले आहेत.

विशिष्ट ताऱ्याचा प्रकाश दूरदर्शकाची दिशा न बदलता सतत दूरदर्शकात येत राहण्यासाठी तारकास्थिरक (साइडिरोस्टॅट) नावाचे पूरक उपकरणही वापरतात. ताऱ्याचा प्रकाश ठराविक दिशेने (क्षितिजसमांतर) परावर्तित होत राहील, अशी योजना या उपकरणात केलेली असते. याकरिता एक वा अनेक सपाट आरसे घड्याळी यंत्रणेने आपोआप फिरत राहतील, ताऱ्यापासून येणारा किरण दूरदर्शकाच्या अक्षाच्या दिशेनेच परावर्तित होऊन येईल आणि ताऱ्याची प्रतिमा दूरदर्शक एकसारखा न हलविता दिसेल अशी व्यवस्था या उपकरणात केलेली असते. यामुळे ताऱ्याची प्रतिमा सतत दृश्यक्षेत्राच्या मध्याशी राहू शकते. आकाशाचा कोणताही भाग सतत दिसत राहण्यासाठी वापरण्यात येणारे सीलस्टॅट व सूर्यासाठी वापरण्यात येणारे हीलिओस्टॅट ही उपरणेही अशाच स्वरूपाची आहेत. काही खास प्रकारच्या दूरदर्शकांचे वर्णन खाली दिले आहे.

स्नो दूरदर्शक : सूर्यावरील डागांच्या आविष्काराचा अभ्यास करण्यासाठी हेल व जी. डब्ल्यू. रिची यांनी यर्कीझ वेधशाळेत हे उपकरण बनविले. या प्रकल्पासाठी आर्थिक साहाय्य देणाऱ्या हेलेन स्नो यांच्या नावावरून या उपकरणाला हे नाव देण्यात आले. याच्या साहाय्याने सूर्याचा वर्णपट व वेगवेगळ्या वर्णरेषांच्या प्रकाशात सूर्याची छायाचित्रे उत्तम तऱ्हेने घेता येतात.

मनोरा दूरदर्शक : सूर्याचे वर्णपट घेण्यासाठीच या उपकरणाचा उपयोग होतो. स्नो दूरदर्शकातील मुख्य उपकरणाची नळी क्षितिजसमांतर असल्याने सूर्याच्या उष्णतेचा त्याच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणात होतो. एका (१० ते ५० मी.) उंच मनोऱ्यावर एक सीलस्टॅटचा आरसा बसविला असून त्यावरून परावर्तित होणारे सूर्यकिरण एका उदग्रनलिकेतून खाली घेतले जातात व मग ते वर्णपटलेखकाच्या फटीवर पडतात. या उपकरणाच्या साहाय्याने अधिक रेखीव व स्पष्ट वर्णरेषा मिळतात. या पद्धतीचा एक दूरदर्शक भारतात कोडईकानल वेधशाळेत बसविला आहे.

आधुनिक सुधारणा : मोठे ज्योतिषशास्त्रीय दूरदर्शक डोळ्याने निरीक्षण करण्यासाठी अजिबात वापरले जात नाहीत. त्यांचा उपयोग छायाचित्रीय निरीक्षणांसाठीच केला जातो. या दृष्टीने पाहता आधुनिक मोठ्या दूरदर्शकाचा उपयोग केवळ दूरच्या ज्योतींचा प्रकाश केंद्रित करणारे उपकरण याच तऱ्हेने होत असतो.


 छायाचित्रीय निरीक्षण नेत्रीय निरीक्षणापेक्षा अनेक तऱ्यांनी जास्त प्रभावी ठरते. पहिली गोष्ट म्हणजे छायाचित्रण फिल्म व काचा आता अत्यंत विकसित झालेल्या असून त्यांची संवेदनशीलता डोळ्यापेक्षा जास्त असते. जास्त वेळ उद्‍‌भासन (प्रकाशकिरणांची क्रिया होण्यासाठी छायाचित्रण फिल्म वा काच उघडी ठेवण्याची क्रिया) करून दूरदर्शकाच्या मदतीनेही डोळ्याला कधीच दिसू न शकणारे अंधुक तारे आणि अतिदूरच्या दीर्घिका छायाचित्रित करता येतात. दुसरी गोष्ट ही छायाचित्रे एक चिरकाल टिकणारी नोंद ठरते. ताऱ्यांच्या वा दूरच्या ग्रहांच्या आकाशातील स्थितीत होणारे अत्यंत अल्प बदल त्यामुळे ओळखता येतात. डोळ्यापेक्षा छायाचित्रीय काचा अधिक तरंगलांब्यांना संवेदनशील असतात. त्यामुळे निरीक्षणाच्या कक्षा वाढतात. छायाचित्रांवरून ताऱ्यांच्या तेजस्वीपणाचे जास्त बिनचूक मापन करता येते.

ताऱ्यांच्या छायाचित्रणासाठी दूरदर्शकातील मुख्य परावर्तकाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी छायाचित्रीय काच बसविण्याची व्यवस्था असते. या कामासाठी एकूण व्यवस्थेचे छिद्रव्यास/ केंद्रांतर हे गुणोत्तर जितके जास्त तितके मंद प्रकाशी तारे चित्रित करण्याची क्षमता वाढते. प्रतिमेचे आकारमान मोठे हवे असेल, तर परावर्तकाचे परिणामी केंद्रांतर जास्त हवे. यासाठी कॅसेग्रेन पद्धती जास्त उपयोगी पडते. छायाचित्रणासाठी वर्णविपथनाचे निराकरण जास्त चांगले करावे लागते.

साध्या दूरदर्शकाच्या साहाय्याने एकाच वेळी आकाशाचे फारच अल्प क्षेत्र (सु.१° चौ.) चित्रित होऊ शकते. श्मिट पद्धतीच्या दूरदर्शकाच्या साहाय्याने सु.६ पट मोठ्या क्षेत्राचे एकाच वेळी छायाचित्र घेता येते. श्मिट (व माक्सूटोव्ह) पद्धती याचसाठी प्रगत करण्यात आली. श्मिट कॅमेऱ्याच्या साहाय्याने आता सर्व आकाशाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पडणाऱ्या उल्कांच्या छायाचित्रणासाठी जास्त विस्तृत क्षेत्राचे चित्रण करणारे खास श्मिट कॅमेरे वापरतात.

ताऱ्यांच्या वर्णपटांच्या अभ्यासाने त्यांची घटना, तेथील भौतिक स्थिती, त्यांचे वय आणि त्यांची अरीय गती यांबद्दल माहिती मिळते [→ तारा वर्णपटविज्ञान].

ताऱ्यांचे प्रकाशमापन करण्यासाठी त्यांच्या छायाचित्रांचा उपयोग करता येतो किंवा दूरदर्शकामुळे तयार होणारी ताऱ्याची प्रतिमा प्रकाशविद्युत् घटावर पाडून किंवा तपयुग्माच्या संधीवर पाडून प्रकाशमापन करता येते [→ प्रकाशमापन].

साहाय्यक उपकरणे : मोठे दूरदर्शक नेहमी घुमटात बसविलेले असतात. निरीक्षण करण्यासाठी घुमटाच्या वरच्या बाजूला उघडता व मिटता येण्याजोगी फट असते. सबंध घुमट एका उदग्र अक्षाभोवती जरूरीनुसार फिरविता येतो. यासाठी विद्युत् चलित्रे वापरली जातात. खुद्द दूरदर्शकही फार अवजड असल्याने त्याची फिरवाफिरव करण्यासाठी विद्युत् चलित्रे असतात. विषुववृत्तीय पद्धतीने आरोपित केलेला दूरदर्शक ध्रुवीय अक्षाभोवती पृथ्वीच्या वलनाबरहुकूम फिरत रहाण्यासाठी खास विद्युत् चलित्राची योजना केलेली असते.

एकच दूरदर्शक विशिष्ट प्रयोगाच्या आवश्यकतेनुसार, न्यूटन पद्धतीनुसार किंवा कॅसेग्रेन अथवा कूड पद्धतीनुसार वापरता यावा अशी योजना केलेली असते. त्याचप्रमाणे मुख्य परावर्तकाच्या केंद्रबिंदूपाशी छायाचित्रण पट्टी बसवून छायाचित्रे घेण्याची सोय केलेली असते. वर्णलेखकाच्या साहाय्याने वर्णपटांची छायाचित्रे घेण्याचीही सोय असते. यासाठी लागणारा वर्णपटलेखक दूरदर्शकावरच पक्का बसवितात किंवा तो फार अवजड असल्याने जमिनीवर पक्का बसवून त्याची फट कूडे केंद्रबिंदूवर येईल, अशी योजना करतात.


 दूरदर्शकाला प्रकाशमापकाचीही जाेड दिलेली असते. छायाचित्रांवरून ताऱ्यांचे प्रकाशमापन करण्यासाठी सूक्ष्मप्रकाशमापक हे उपकरणही वेधशाळेत असावे लागते. ताऱ्यांचे व्यास निश्चित करण्यासाठी दूरदर्शकाच्या पुढच्या तोंडावर व्यतिकरणमापक [→ व्यतिकरणमापन] हे उपकरण जरूर तेव्हा बसविले जाते.

अवकाशातील दूरदर्शक :  पृथ्वीवरून दूरदर्शक वापरण्यात काही तोटे आहेत व ते म्हणजे (१) दिवसाउजेडी ताऱ्यांचे वेध घेणे शक्य होत नाही (२) आकाशात असलेल्या ढगांमुळेही वेध घेण्यात व्यत्यय येतो (३) हवेच्या थराथरांतील हालचालीमुळे दूरदर्शकाची विभेदनक्षमता कमी होते व त्यातील प्रतिमा विकृत होऊ पाहतात, हे होत. जंबुपार प्रारण वातावरणात मोठ्या प्रमाणात शोषले जाते परंतु काही श्वेत लघुतम तारे वातावरणात शोषल्या जाणाऱ्या प्रारणाचे खूप प्रमाणात उत्सर्जन करतात व म्हणून त्यांचा अभ्यास व्हावयास पाहिजे तसा होऊ शकत नाही. अभ्रिकांचे व दीर्घिकांचे छायाचित्रण निळ्या प्रकाशात केल्यास ती चित्रे अधिक तपशील दाखवितात. या सर्व गोष्टींमुळे वातावरणाच्या बाहेर जाऊन जर दूरदर्शक वापरता आला, तर ते फार फायदेशीर होईल, ही गोष्ट कृत्रिम उपग्रहावर दूरदर्शक ठेवून व वेध घेण्यासाठी  त्यात एक किंवा दोन निरीक्षक बसविल्याने शक्य होईल. यासंबंधीच्या योजना अमेरिका व रशिया या देशांत तयार होत आहेत. प्राथमिक स्वरूपाच्या अशा योजना काही उपग्रहांत व स्कायलॅब या फिरत्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष कार्यवाहीत आणण्यात आलेल्या होत्या. यात अडचणी पुष्कळ आहेत, पण त्या दूर करणे मानवी बुद्धीच्या आवाक्याबाहेर आहे असे वाटत नाही. यातील काही प्रमुख अडचणी अशा : (१) पृथ्वीशी संपर्क ठेवण्यासाठी पृथ्वी व कृत्रिम उपग्रह यांमध्ये वाहतुकीची व्यवस्था करणे (२) परावर्तनी दूरदर्शक वापरावयाचा झाल्यास त्याच्या प्रमुख परावर्तकाचा छिद्रव्यास सु. ३०० सेंमी. ठेवावा लागेल. असा परावर्तक बनविणे फार कठीण आहे व तो तसा बनविला गेल्यास अवकाशात त्याचे आकारमान जसेच्या तसेच ठेवणे त्याहून कठीण आहे. परंतु या व अशा अडचणींवर मात करून निरीक्षकांसह दूरदर्शक, कॅमेरा, वर्णपटलेखक इ. आवश्यक सामग्री आत असलेला कृत्रिम उपग्रह सोडणे काही काळाने शक्य होईल.

अशा रीतीने दूरदर्शक पृथ्वीच्या वातावरणाबाहेर ठेवण्यात यश मिळाल्यास काय फायदे होतील याची थोडक्यात कल्पना पुढीलप्रमाणे आहे : (१) उपग्रहात ठेवलेला ३० सेंमी. छिद्रव्यासाचा प्रकाशीय दूरदर्शक पृथ्वीवरच्या २५० सेंमी. छिद्रव्यासाच्या दूरदर्शकाइतके काम देतो (२) अवकाशात जंबुपार किरणांचे शोषण होत नसल्याने दीर्घिकांचे निरीक्षण अधिक चांगल्या रीतीने करता येईल आणि त्यामुळे विश्वाची उत्पत्ती व उत्क्रांती यांसंबंधी अधिक खुलासेवार माहिती मिळू शकेल.

रेडिओ दूरदर्शकांच्या दृष्टीनेही एक फायदा असा होईल की, पृथ्वीवरील रेडिओ गोंगाटाचा त्रास जवळजवळ नाहीसा होईल व अवकाशातील रेडिओतरंगांचे पृथ्वीच्या वातावरणात होणारे शोषण नाहीसे झाल्याने पृथ्वीवर प्राप्त न होणाऱ्या सु. १ मिमी.च्या तरंगलांब्या प्राप्त होऊ शकतील.

सुमारे २५० सेमी. छिद्रव्यासाचा एक दूरदर्शक कृत्रिम उपग्रहात ठेवून त्याच्या साहाय्याने खगोलीय निरीक्षण करण्याची योजना  १९७६ मध्ये अमेरिकेत तयार झाली. तिच्या खर्चाला काँग्रेसची मान्यता मिळाल्यास हा दूरदर्शक १९८३ मध्ये कार्यवाहीत येऊ शकेल. त्याच्या साहाय्याने अवकाशात हल्लीच्या दूरदर्शकांपेक्षा १० पट जास्त अंतरांपर्यंतही निरीक्षणे करता येतील. क्वासार, नवीन जन्म घेणारे तारे यांच्याबद्दल या दूरदर्शकाच्या साहाय्याने अधिक माहिती मिळू शकेल.

संदर्भः 1. Dimitroff, G. Z. Baker, J. G. Telescopes and Accessories, London,1947.

           2. Jones, H. S. General Astronomy, London,1961.

          3. King, H. C. The History of the Telescope, London, 1955.

          4, Kopal, Z. Telescopes in Space, London, 1968,

          5. Kuipar, G. P. Middlehurst, B. M., Eds. Telescopes, Chicago, 1960.

          6. Riemer, M. F. The Telescope and the World of Astronomy, Stamford 1961.

राजोपाध्ये, वि. य. पुरोहित, वा. ल.


२५४ सेंमी. (६० इंची) हूकर दूरदर्शक (मौंट विल्यम व पॅलोमार वेधशाळा, अमेरिका).

१५२ सेंमी. (६० इंच) दूरदर्शक (मौंट विल्सन व पॅलोमार वेधशाळा, अमेरिका).

५० मी. उंचीचा मनोरा दूरदर्शक (मौंट विल्सन व पॅलोमार वेधशाळा, अमेरिका).

१२२ सेंमी. (४८ इंची) श्मिट दूदर्शक (मौंट विल्सन व पॅलोमार वेधशाळा, ्मेरिका).


५०८ सेंमी. (२०० इंची) हेल दूरदर्शकाचा घुमट व त्याचे उघडलेले झाकण (मौंट विल्सन व पॅलोमार वेधशाळा, अमेरिका).

uहेल दूरदर्शकाच्या मुख्य केंद्रबिंदजवळील निरिक्षकाचा पिंजरा व आरशाचा परावर्तक पृष्ठभाग
खस्वस्तिकाकडे रोखलेला हेल दूरदर्शक (दक्षिणेकडून दिसणारे दृश्य) हेल दूरदर्शकाच्या मुख्य केंद्रबिदूजवळील पिंजऱयात निरिक्षक बसलेला ्सून मार्गदर्शक नेत्रभिंग आणि निरिक्षकाच्या हातातील छायाचित्रण फिल्मकार दिसत आहे. दूरदर्शनाचा ग्रामीण प्रेक्षकवर्ग