दूधगंगा : कोल्हापूर जिल्ह्याच्या नैर्ऋत्य भागातून वाहणारी कृष्णेची उपनदी. लांबी. सु. १२४ किमी. पैकी ८८ किमी. कोल्हापूर जिल्ह्यातून तर बाकीचा प्रवाह बेळगाव जिल्ह्यातून वाहतो. कोल्हापूर शहराच्या नैर्ऋत्येस सु. ५६ किमी.वर सह्याद्रीत उगम पावून प्रथम ईशान्येस व बेलवलीपासून पूर्वेकडे वाहत जाऊन बेळगाव जिल्ह्यात येडूर येथे कृष्णेस मिळते. हिचे जलवाहन क्षेत्र सु. २,५२८ चौ. किमी. आहे. तिला वाकी व वेदगंगा ह्या प्रमुख उपनद्या मिळतात. ऊस, तांदूळ, ज्वारी, गहू, भाजीपाला ही या नदीखोऱ्यातील पिके होत. या नदीवर जलसिंचनाच्या अनेक छोट्या–मोठ्या योजना सुरू असून त्यांमध्ये राधानगरी तालुक्यातील आसनगाव येथे बांधण्यात येत असलेला ‘दूधगंगा जलसिंचन प्रकल्प’ महत्त्वाचा आहे.
कुलकर्णी, गो. श्री.