दुग्धस्रवण व स्तनपान : सस्तन प्राण्यांना स्तनातून स्रवणाऱ्या दुधप्रवाहाला दुग्धस्रवण म्हणतात. स्तनांचे शरीरक्रियात्मक विशिष्ट कार्य दुग्धस्रवण हे असून ते फक्त जरूरीच्या वेळीच सुरू होते आणि गरज संपली म्हणजे बंद होते. ज्या काळात दुग्धस्रवण चालू असते त्या काळास ‘दुग्धस्रवण काल’ असे म्हणतात. दुग्धस्रवण  क्रियेकरिता शरीरातील ⇨ तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) थोड्याबहुत प्रमाणात व ⇨ अंत:स्रावी ग्रंथी  अधिक प्रामणात महत्त्वाचा भाग घेतात. स्तन ग्रंथी, त्यांची रचना व त्यांचे विकार यांविषयी सविस्तर माहिती ‘स्तन’ या स्वतंत्र नोंदीत दिली आहे.

पुरुष व स्त्री यांच्या स्तन ग्रंथी यौवनावस्थेपूर्वी अगदी सारख्या असतात. स्त्रीच्या स्तनांच्या आकारात यौवनारंभापासून बदल होत जातो व त्यांचा घाटही बदलतो. स्तनवाढ, बगल व जघनस्थानावर होणारी केसांची वाढ यांचा समावेश दुय्यम लैंगिक लक्षणांत होतो. लैंगिक प्रौढावस्थेच्या सुमारास स्त्रीच्या स्तनांत होणारी वाढ ही त्या ठिकाणी वसेचा (स्निग्ध पदार्थाचा) साठा व संयाेजी (जोडण्याचे कार्य करणाऱ्या) ऊतकाची (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहाची) वाढ मिळून होते. वसा व संयोजी ऊतकामध्येच दुग्धवाहक नलिका व दूध स्रवणाऱ्या कोशिकांचे (पेशींचे) बनलेले दुग्धकोश विखुरलेले असतात. स्त्रीच्या अंडकोशापासून स्रवणारी स्त्रीमदजन (इस्ट्रोजेन) व गर्भरक्षक (प्रोजेस्टेरोन) ही हॉर्मोने (रक्तात मिसळणारे उत्तेजक स्राव) स्तनवाढीकरता आवश्यक असतात. पोष ग्रंथीची (मेंदूच्या तळाशी असलेल्या हाडांनी बनलेल्या पोकळीतील ग्रंथीची) विकृती असल्यास किंवा यौवनावस्थेपूर्वीच अंडाशय काढून टाकल्यास स्त्रियांमध्ये स्तनवाढ जवळजवळ होतच नाही. ऋतुचक्रानुसार स्त्रीच्या स्तनांमध्ये सूक्ष्मदर्शकीय मासिक लयबद्ध बदल होत असतात. अनेक स्त्रियांना ऋतुस्राव सुरू होण्यापूर्वी स्तनांचा जडपणा, भरीवपणा व स्पर्शासह्यत्व जाणवते. असेच बदल गर्भारपणीही होतात व ते ऋतुचक्रातील बदलांपेक्षा अधिक असतात. स्तनांचा आकार वाढून प्रत्येक स्तनाचे वजन जवळजवळ अर्ध्या किलोग्रॅमने वाढते. मात्र ही वजनवाढ स्तनातील दुग्धस्रावक भागांच्या वाढीमुळे होते. गर्भारपणातील ही स्तनवाढ पोष ग्रंथीच्या दुग्धस्रावक हॉर्मोनामुळे (प्रोलॅक्टिनामुळे) नियंत्रित केली जाते. याशिवाय अंडाशयाची स्त्रीमदजन व गर्भरक्षक हॉर्मोने वारेतून स्रवणारी हीच हॉर्मोने स्तनवाढीस मदत करतात. स्त्रीमदजनामुळे दुग्धवाहक नलिकांची वाढ होते, तर स्त्रीमदजन व गर्भरक्षक दोन्ही मिळून दुग्धकोशांच्या वाढीस कारणीभूत असतात. याशिवाय दुग्धस्रावक हॉर्मोनाप्रमाणेच कार्यशील असणारा आणखी एक स्राव वार तयार करीत असते. गर्भारपणाच्या पहिल्या दोन महिन्यांत होणारी जलद स्तनवाढ बहुतांशी रक्तवाहिन्यांच्या आकारवाढीमुळे होते. तिसऱ्या महिन्यानंतर मात्र सर्वच ऊतकांची वाढ होऊ लागते. स्तनवाढीच्या प्रमाणावर दुग्धोत्पादन अवलंबून असते. सर्वसाधारपणे प्रत्येक स्तनाची २०० घ.सेंमी. वाढ मूल वाढविण्यास पुरेशी असते.

दुग्धस्रावक हॉर्मोनामुळे दुग्धोत्पादन होते. उंदरांवरील काही प्रयोगान्ती असे आढळून आले आहे की, अवटू ग्रंथिस्राव [अवटुग्रंथि], अधिवृक्क ग्रंथिस्राव [→ अधिवृक्क ग्रंथि], इन्शुलीन व वृद्धी हॉर्मोन्स (सोमॅटोट्रोफोन) स्तनवाढीस व दुग्धोत्पादनास मदत करतात. स्त्रीमदजन व गर्भरक्षक हॉर्मोनांचा दुहेरी पुरवठा (अंडाशय व वार या दोहोंपासून होणारा) फार महत्त्वाचा असावा. कारण गर्भारपणाच्या पहिल्या व दुसऱ्या महिन्यांच्या दरम्यान अंडाशये काढून टाकली, तरी गर्भपातही होत नाही किंवा स्तनवाढही थांबत नाही. गर्भारपणी एका स्त्रीची पोष ग्रंथी काढून टाकल्यानंतरही स्तनवाढ होत राहिली असे दिसून आले. एवढेच नव्हे तर प्रसूतीनंतरही दुग्धस्रवणात बदल झाला नाही.

जन्मानंतर मुलीच्या व मुलाच्याही स्तनातून थोडासा दुधासारखा स्राव येतो. हा स्राव मातेच्या रक्तातील हॉर्मोन्स वारेद्वारे अर्भकाच्या शरीरात पोहाेचलेली असल्यामुळे होतो. दुग्धस्रवणाचा दोन विभागांत विचार करता येतो : (१) दुग्धस्रवण प्रारंभ आणि  (२) दुग्धस्रवण चालू ठेवणे.


दुग्धस्रवण प्रारंभ : गर्भारपणातील हॉर्मोनांचे बदल दुग्धस्रवण प्रारंभास कारणीभूत असतात. गर्भारपणात स्तनवाढ होत असली व दुग्धस्रवण अत्यल्प प्रमाणात सुरू असले, तरी दुग्धस्रवणात भरपूर वाढ फक्त प्रसूतीनंतरच हाते. अकाली प्रसवानंतरही दुग्धस्रवणात वाढ झाल्याचे आढळते म्हणून संपूर्ण गर्भारपणात दुग्धस्रवण वाढू न देणारी यंत्रणा अस्तित्वात असावी. या यंत्रणेबद्दल प्रयोगशाळांतून बकऱ्या, गायी इ. प्राण्यांवर प्रयोग करण्यात आले आहेत. स्त्रीमदजन, गर्भरक्षक व दुग्धस्रावक हॉर्मोन यांच्या एकमेकांविरुद्ध होणाऱ्या काही प्रतिक्रिया या यंत्रणेत भाग घेतात की काय याविषयी शास्त्रज्ञांमध्ये वादविवाद चालू आहेत.

गर्भारपणात स्त्रीमदजन व गर्भरक्षक रक्तप्रवाहातून पोष ग्रंथीपर्यंत पाेहोचून तिच्या दुग्धस्त्रावक हॉर्मोनाच्या उत्पादनास प्रतिबंध करीत असावीत. प्रसूतीनंतर वार बाहेर पडल्यानंतर तिची हॉर्मोने रक्तप्रवाहातून वाहणे बंद होते. याशिवाय अंडाशयांच्या या दोन्ही हॉर्मोनांच्या उत्पादनातही घट होते. परिणामी, पोष ग्रंथीच्या दुग्धस्रावक हॉर्मोनाच्या उत्पादनावरील नियंत्रण सैल पडून त्याचे उत्पादन वाढते. त्यामुळे स्तनातील दुग्धस्रावक ऊतकावर परिणाम होऊन दुग्धस्रवणात वाढ होते. याच वेळी अधिवृक्क ग्रंथीच्या रक्तप्रवाहातील हॉर्मोनामध्ये वाढ होते व ती दुग्धस्रवण प्रारंभ यंत्रणेस मदत करीत असावी.

दुग्धस्त्रवण चालू ठेवणे : दुग्धस्रवण चालू ठेवण्याची क्रिया हॉर्मोन स्रवणावर अवलंबून असते. हॉर्मोन स्रवणाचे संतुलन बिघडले, पोष ग्रंथीत विकृती असली किंवा ती अजिबात काढून टाकली म्हणजे दुग्धस्रवण ताबडतोब थांबते. पोष ग्रंथीतून स्रवणारी पुष्कळ हॉर्मोने दुग्धस्रवणात भाग घेत असल्यामुळे त्या सर्वांचा मिळून उल्लेख ‘दुग्धस्रावक हॉर्मोने’ असाच करतात. पोष ग्रंथीच्या ॲड्रीनोकॉट्रिकोट्रोफीन, थायरोट्रोफीन व वृद्धी हॉर्मोन यांचा दुग्धस्रवणाशी असलेला संबंध प्राण्यांवरील तसेच स्त्रीरोगलक्षणांच्या अभ्यासावरून सिद्ध झालेला आहे.

पोष ग्रंथीच्या दुग्धस्रावक व इतर हॉर्मोनांचे स्रवण मेंदूतील अधोथॅलॅमस [→ तंत्रिका तंत्र] हा भाग नियंत्रित करतो. दुग्धस्रावक हॉर्मोनाचे उत्पादन रोखून धरण्याचे कार्य अधोथॅलॅमस करतो. या उलट इतर पोष ग्रंथी हॉर्मोनांच्या स्रवणाच्या चेतनेस तोच कारणीभूत असतो. अधोथॅलॅमसाच्या कार्यावर परिणाम करणारी औषधे दुग्धस्रावक हॉर्मोनाचे स्रवण कमी करतात आणि म्हणून दुग्धस्रवणी कमी होते. याउलट शांतक (मन शांत ठेवणारी) औषधे स्तनवाढीस व दुग्धोत्पादन वाढीस मदत करतात. ही औषधे बहुधा दुग्धस्रावक हॉर्मोनांचे उत्पादन वाढवीत असावीत. मिथ्या गर्भारपणात (प्रत्यक्ष गर्भाशयात गर्भ नसताना गर्भधारणा झाली असल्याचे खोटी समजूत होणे) स्तनवाढ, दुग्धस्रवण, पोटाचा आकार वाढणे यांसारखी खऱ्या गर्भारपणाची लक्षणे आढळतात. या प्रकारच्या मानसिक विकृतीवरून मनाचा व हॉर्मोन स्रवणाचा किती घनिष्ठ संबंध आहे, हे स्पष्ट होते. अती चिंता किंवा फाजील आस्था दर्शविणारे नातेवाईक दुग्धोत्पादनावर दुष्परिणाम करतात. प्रसूतीनंतर ताबडतोब दूध बाहेर पडण्यास सुरुवात होते. पहिले दोन किंवा तीन दिवस त्याचे उत्पादन अत्यल्प असते. या पहिल्या दिवसातील दुधाला ‘प्रथमस्तन्य’ म्हणतात. ते बरेचसे घट्ट आणि पिवळ्या रंगाचे असते. त्यानंतर येणाऱ्या दुधापेक्षा प्रथमस्तन्य दुधात प्रथिने जास्त (प्रत्येक १०० मिलि. मध्ये २·०६–१·०२ ग्रॅम) असतात, वसा कमी (२·०६–४ ग्रॅम) असते व लॅक्टोजही कमी (४·६–६·८) असते. ते जादा क्षारधर्मी (अल्कलाइन) असून त्यात लवणेही जादा (०·३५–०·२० ग्रॅम) असतात. नवजात अर्भकाच्या पोषणास ते उपयुक्त असतेच कारण त्यातील प्रथिने जशीच्या तशीच आंत्रमार्गातून (आतड्यांतून) अवशोषिली जातात. परंतु याशिवाय विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये प्रतिरक्षा पिंडे (रोगसंक्रामणापासून संरक्षण करणारे विशिष्ट पदार्थ) असतात. सर्वसाधारणपणे तिसऱ्या ते सहाव्या दिवसापासून नेहमीचे दूध येऊ लागते. त्याचे उत्पादन नवव्या महिन्यापर्यंत वाढत जाऊन १२ ते १८ महिन्यांनी थांबते. क्वचित वेळा दुग्धस्त्रवण ३६ महिन्यांपर्यंतही चालू असते. सर्वसाधारणपणे दर दिवशी १–१·५ लि. दूध तयार होते. भारतीय स्त्रियांमध्ये (सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गामध्येही) दररोज सर्वसाधारणपणे ४००–७०० मिलि. दूध वर्षभर तयार होते. जागतिक आरोग्य संघटनेने अर्भकास दररोज ८५० मिलि. दूध पुरेसे आहे असे सुचविले आहे. स्तनपान करणाऱ्या नवजात अर्भकास दररोजन पहिले दोन आठवडे/लि. दूध पुरेसे असते. तीन ते सहा महिन्यापर्यंत/लि. पुरते. मातेला काहीही त्रास न होता २·५ ते ३ लि. दूध उत्पादन झाल्याचीही उदाहरणे आहेत.


दुग्धस्रवण चालू ठेवण्याच्या क्रियेस अर्भकाचे स्तनचूषण दोन प्रकारे मदत करते. त्यामुळे पोष ग्रंथीच्या दुग्धस्रावक हॉर्मोनाच्या उत्पादनास चेतना मिळते. त्याशिवाय पोष ग्रंथीच्याच ऑक्सिटोसीन नावाच्या हॉर्मोनाच्या उत्पादनासही चेतना मिळते. या हॉर्मोनामुळे दुग्धस्रवणात वाढ होत नाही परंतु दुग्धकोश व दुग्धवाहिन्या यांच्या भोवतालच्या स्नायुकोशिकांचे आकुंचन या हॉर्मोनामुळे होते व तयार असलेले दूध बाहेर पडण्यास सुरुवात होते. अर्भकाने स्तनचूषणास सुरुवात केल्यापासून केवळ तीसच सेकंदात ही क्रिया सुरू हाेते. ही एक प्रतिक्षेपी क्रिया [→ तंत्रिका तंत्र] असून तिला ‘दुग्धोत्क्षेपण’ म्हणतात. यामुळेच पुष्कळ वेळा मुलाच्या तोंडात नसलेल्या बोंडीतूनही दुधाचे थेंब ठिपकू लागतात. स्तनांच्या तंत्रिका तंत्राचा दुग्धस्रवणाशी फारसा संबंध नसावा. याबाबतीत पुढील उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. ढुंगणाची बाजू एकमेकांस जन्मजात जुळलेल्या दोन मुलींपैकी एक गर्भार राहिली व पुढे प्रसूतही झाली. या जुळ्या मुलींना स्वतंत्र जनन व तंत्रिका तंत्रे होती. त्यांचे रक्त मात्र एकमेकींत मिसळत असे. जिला मूल झाले नव्हते तिची स्तने तर वाढलीच पण शिवाय दुसरीच्या प्रसूतीनंतर दुग्धस्रवणही सुरू झाले. वर सांगितलेल्या औषधाशिवाय दारू पिणाऱ्या स्त्रियांच्या दुग्धोत्क्षेपण क्रियेवर अनिष्ट परिणाम होतो. स्त्रीचा दुग्धस्रवण काल चालू असताना संभोगाच्या वेळी तिच्या स्तनातून दूध आपोआप बाहेर पडू लागते, कारण संभोगामुळे पोष ऑक्सिटोसीन स्रवण वाढते.

गर्भारशी नसलेल्या विशेषेकरून मूल होण्याचे वय असलेल्या स्त्रियांमध्येही स्तनचूषणाने दुग्धस्रवण सुरू होऊ शकते. १८ वर्षापूर्वी शेवटचे मूल झालेल्या ६० वर्षे वयाच्या म्हातारीने आपल्या नातवास त्याची आई मृत झाल्यानंतर तो एक वर्षाचा होईपर्यंत स्वतः स्तनपानावर वाढविल्याचे उदाहरण आहे. नैसर्गिक जरूरीपेक्षा कमी पाणी पिणे व स्तन घट्ट आवळून बांधणे यांमुळे दुग्धात्पादन कमी होते. संततिप्रबंधक औषधे चालू असल्यास दुग्धस्रवण कमी होते. स्तनचूषणाचा व ऋतुचक्र सुरू होण्याचा संबंध असावा.

दुग्धस्त्रवण

स्तनपान : नवजात अर्भकास मातेच्या किंवा दाईच्या स्तनापासून स्रवणाऱ्या दुधावर वाढविण्यास स्तनपान म्हणतात. कृत्रिम रीत्या बनविलेल्या व शक्यतो मानवी दुधाशी जुळणाऱ्या दुधावर अर्भकाचे पोषण करण्यास ‘कृत्रिम दुग्धपान’ म्हणतात.


बालकाच्या सुयोग्य व सुदृढ वाढीकरिता स्तनपान अत्यंत आवश्यक असते. अलीकडील संशोधनावरून असे आढळून आले आहे की, गर्भारपणात मातेच्या अपपोषणामुळे गर्भाच्या पोषणावर दुष्परिणाम होतात. असे दुष्परिणाम व जन्मानंतरच्या पहिल्या काही महिन्यांतील अर्भकाचे निकृष्ट पोषण अर्भकाची शारीरिक वाढ खुंटविण्यास कारणीभूत तर होतातच शिवाय त्याच्या मंदबुद्धित्वासही कारणीभूत असतात. मूल वाढविणे म्हणजे त्यास योग्य वेळी योग्य अन्न पुरविणे व पुरेशी झोप मिळू देणे एवढाच अर्थ नसून या दोन्ही उत्कट इच्छा पूर्ण करण्यामागे त्यास निरोगी मनःस्वास्थ्य मिळू देणे हा प्रमुख हेतू असतो. स्तनपानाच्या वेळी कुशीत घेणे व गोंजारणे यांनाही विशेष महत्त्व असते. इच्छापूर्ती करणारी व्यक्ती, बहुतकरून माता व तिचे प्रेम यांची सांगड घालावयास अर्भकाचे मन लवकर सुरुवात करते. या गोष्टी साधण्याकरिता मातेने दिलेल्या स्तनपानासारखा दुसरा पर्यायच नाही. स्तनपानामुळे पुढील फायदे मिळतात : (१) मानवी स्तनातील दूध स्वच्छ व निर्जंतुक असते. (२) आर्थिक दृष्ट्या ते बिनखर्चाचे असते. (३) स्तनातील दूध केव्हांही मिळू शकते व त्याचे तापमान नेहमी सुयोग्य असते. (४) अर्भकाची भूक भागविण्यास ते बहुधा पुरेसे असते. (५) स्तनदुग्धात बायफिडस घटक असल्यामुळे लॅक्टोबॅसिलस बायफिडस नावाच्या सूक्ष्मजंतूंची अर्भकाच्या आंत्रमार्गात सहज वाढ होते. त्यामुळे लॅक्टिक अम्ल व फॉर्मिक अम्ल यांचीही वाढ होते. या वाढीव अम्लधर्मामुळे बॅसिलस कोलाय यासारख्या अतिसार उत्पादक सूक्ष्मजंतूंची वाढ होत नाही. अतिसार किंवा हगवण या विकाराविरुद्ध नवजात अर्भकामध्ये परार्जित प्रतिरक्षेचा अभाव असतो. (६) दुग्धामध्ये अनेक सर्वसाधारण संक्रामणजन्य रोगांविरुद्ध प्रतिकार करू शकणारी प्रतिपिंडे असतात. (७) स्तनदुग्धातील प्रथिने गायीच्या दुधातील प्रथिनांपेक्षा अधिक महत्त्वाची असतात. मानवी दुधात त्याचे प्रमाण कमी असले, तरी त्यात फॉस्फरसाचे प्रमाण योग्य असेच असते. यांशिवाय गायीच्या दुधात सिस्टीन व मिथिओनीन ही महत्त्वाची ॲमिनो अम्ले नसतात. (८) स्तनदुग्धातील वसा अधिक चांगली असते. त्यामध्ये ६०% आवश्यक असंतृप्त वसाम्ले असतात [→ वसाम्ले]. यांशिवाय लिनोलीइक अम्लाचे प्रमाण गायीच्या दुधापेक्षा २ ते ७ पटींनी अधिक असते. आवश्यक वसाम्लांपैकी हे एक महत्त्वाचे वसाम्ल असून ही वसाम्ले शरीरातील ⇨ प्रोस्टाग्लँडिने नावाच्या हॉर्मोनांच्या संश्लेषणाकरिता आवश्यक असतात. (९) स्तनदुग्धात लॅक्टोज (दुग्धशर्करा) अधिक असते. त्यामुळे कॅल्शियमाच्या अवशोषणास व नायट्रोजनाच्या अवधारणेस (जरूरीपुरता राखून ठेवण्यास) मदत हाते. केंद्रीय तंत्रिका तंत्राच वसावरणयुक्ततेस लॅक्टोज उपयुक्त असते. (१०) स्तनदुग्धात अर्भकास आवश्यक तेवढीच खनिजे असतात. (११) ड जीवनसत्त्वाखेरीज इतर सर्व जीवनसत्त्वे स्तनदुग्धात असतात. (१२) स्तनपानापासून अधिहर्षतेचे (ॲलर्जीचे) भय नसते.

स्तनपान कसे व केव्हा द्यावे : मातेने एका कुशीवर झोपून अर्भकाचे डोके कोपराच्या पुढच्या मऊ मांसल भागावर टेकवून पाजावे अथवा अंथरुणावर किंवा मऊ आसनावर बसून थोडेसे पुढे वाकून, अर्भकास अर्धवट उभे धरून स्तनाग्र तोंडात द्यावे. खुर्चीवर बसून पाजावयाचे असल्यास खुर्ची फार उंच असू नये म्हणजे मातेचे पाय जमिनीस अनायासे टेकलेले राहून मुलास मांडीवर नीट घेता येते. नेहमी अर्भकाच्या डोक्याचा भाग त्याच्या शरीराच्या इतर भागापेक्षा उंच असावा. चिडखोरपणा, राग, तिटकारा इ. मनोभाव जागृत न होऊ देता मन शांत व आनंदी ठेवावे. स्तनाग्रासहित (बोंडीसहित) भोवतालचा स्तनमंडळाचा (बोंडीभोवतालचा गोल रंजकद्रव्ययुक्त त्वचेचा भाग) जास्तीत जास्त भाग अर्भकाच्या तोंडात असणे महत्त्वाचे असते. स्तनमंडळामध्ये माँटगोमेरी ग्रंथी (डब्ल्यू. एफ्. माँटगोमेरी या आयरीश प्रसूतिवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या ग्रंथी) पसरलेल्या असतात. या ग्रंथीचा स्राव अर्भकाच्या हिरड्यांच्या दाबामुळे होणाऱ्या संभाव्य इजेपासून संरक्षण करतो. याशिवाय बोंडी जेवढी अधिक मुखात शिरेल तेवढे तिचेही संरक्षण होते. चूषणाच्या वेळी अर्भक जबड्यांच्या व ओठांच्या स्नायूंचा उपयोग करते. जो स्तन अर्भकाच्या मुखात दिला असेल त्यास दुसऱ्या बाजूच्या हाताने आधार द्यावा. बोंडी तोंडातून सारखी निसटू नये म्हणून मधले बोट व तर्जनी स्तनाग्राच्या बाजूस ठेवावे. त्यामुळे अर्भकाच्या नाकपुड्या स्तनामुळे झाकल्या जाऊन त्याच्या श्वासोच्छ्‌वासास अडथळा उत्पन्न होण्याचा धोका टळतो.


पहिल्या दिवशी प्रत्येक स्तन प्रत्येक वेळी एक मिनिटभर तोंडात द्यावा. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी दोन किंवा तीन मिनिटे स्तनपान द्यावे. हा काळ हळूहळू वाढवीत जावा. सर्वसाधारणपणे एका बाजूने ७ ते १० मिनिटे स्तनपान अर्भकास पुरते. म्हणजेच दोन्ही बाजू मिळून १५  ते २० मिनिटे एका वेळच्या स्तनपानास पुरेशी असतात. बहुतकरून आलटून पालटून स्तन द्यावे. कधीकधी एकाच बाजूस संपूर्ण स्तनपान करू देणे हितावह असते. त्यामुळे ती बाजू पूर्णपणे रिकामी होऊन दुग्धोत्पादनास चेतना मिळते. दूध ओढता ओढता अनेक वेळा अर्भक अर्धवट स्तनपान झाले असतानाच झोपते. अशावेळी चिमटे घेणे, पायावर चापट्या मारणे वगैरे उपाय मुलास जागे करण्यास असमर्थ असतात. मात्र एका बोटाने मुलाचा गाल दाबत ठेविल्यास मूल जागे होऊन पुन्हा पिऊ लागण्याचा संभव असतो. पिणे संपल्यावर बोंडी हळूच बाहेर काढावी. दात आलेल्या किंवा येत असलेल्या मुलाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी. कारण बोंडी खसकन बाहेर ओढल्यास तिला इजा होण्याचा संभव असतो. किती वेळा पाजावे याविषयी ठराविक नियम नाहीत. याबाबत दोन पद्धती अस्तित्वात आहेत. योजनाबद्ध किंवा ठराविक वेळीच पाजणे व मूल मागेल तेव्हा पाजणे. पहिले चोवीस तास मूल जवळजवळ झोपेतच असते. दुसऱ्या व तिसऱ्या दिवसापासून दर चार तासांनी स्तनपान द्यावे. सकाळी ६, १०, दुपारी २, ६ व रात्री १० या स्तनपानाच्या वेळा सुखावह असतात. रुग्णालयातून रात्री परिचारिका जरूर पडल्यास ५% ग्लुकोजचे निर्जंतुक केलेले पाणी पाजतात. मागेल तेव्हा देण्यात येणाऱ्या स्तनपानास ‘मागणी स्तनपान’ म्हणतात. ही पद्धतीही नैसर्गिकच आहे. मूल भुकेमुळे रडले म्हणजे पाजावयाच्या या पद्धतीत ते भुकेमुळेच रडते किंवा कसे हे ओळखणे जरूर असते. त्याकरिता स्वच्छ धुतलेले बोट रडणाऱ्या मुलाच्या तोडात दिले म्हणजे भूक लागलेली असल्यास ते रडावयाचे थांबून चोखू लागते. अर्भकाचे पोट भरले म्हणजे ते अापोआपच स्तनपान बंद करते.

प्रत्येक अर्भक प्रत्येक स्तनपानाच्या वेळी थोडी तरी हवा गिळतेच. जठरात गेलेली ही हवा जरूर असलेल्या दुधापेक्षा कमी दूध घेण्याकडे प्रवृत्त बनविण्यास कारणीभूत होते. शिवाय त्यामुळे कधीकधी पेटके येणे व अस्वस्थपणाही उत्पन्न होतो. म्हणून प्रत्येक स्तनपानानंतर अर्भकास मातेने खांद्याशी उभे धरून त्याच्यापाठीवरून हलकेच हात फिरविल्यास किंवा थोपटल्यास ही गिळलेली हवा बाहेर पडण्यास मदत होते. या क्रियेला ‘ढेकर प्रवृत्ती उत्पन्न करणे’ म्हणतात. ही क्रिया सर्वसाधारणपणे 10 मिनिटे केल्यास अर्भक दोनतीन वेळा हवा बाहेर टाकते. मातेच्या मांडीवर बसवूनही क्रिया करता येते.

पहिले तीन महिने स्तनपान आवश्यक असते, सहा महिन्यांपर्यंत उपयुक्त असते व नऊ महिन्यांपर्यंत चालू शकते. स्तनपानाचा काळ देशपरत्वे निरनिराळा असल्याचे दिसून येते. स्तनपानाचे महत्त्व बहुतेक देशांतील वैद्यांनी मान्य कलेले असूनही अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात पाच बाळंतिणींपैकी फक्त दोनच स्तनपान देताना आढळतात. कॅनडा व अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनातील काही प्रसूतिगृहांच्या पहाणीत केवळ १% ते २% स्त्रियाच स्तनपान देताना आढळल्या आहेत. यापेक्षा ब्रिटनमध्ये स्तनपानाचे प्रमाण पुष्कळच अधिक आढळले आहे. केरळातील एका पाहणीत स्तनपानापेक्षा कृत्रिम दुग्धपान देण्याकडे अधिक प्रवृत्ती होत असल्याचे त्रिवेंद्रम् मेडिकल कॉलेच्या बालस्वास्थ्य विभागास आढळून आले आहे. याउलट बंगालातील खेड्यातून ९९% स्त्रिया स्तनपानावरच मुले वाढवितात. भारतात उच्चभ्रू आणि श्रीमंत घराण्यांतील स्त्रियांची व शहरवासी शिक्षित स्त्रियांची कृत्रिम दुग्धपानाकडे प्रवृत्ती असली, तरी बहुसंख्य स्त्रिया स्तनपानच देतात. खेड्यातून तर स्तनपानाचा काळ पुष्कळ वेळा वर्ष किंवा दोन वर्षेही असतो.

स्तनपान बंद करून मुलास मिश्रान्न (प्रथिने व स्टार्चयुक्त घट्ट पदार्थ) देण्याची सुरुवात करण्याला ‘अंगावरून तोडणे’ म्हणतात. सर्वसाधारणपणे ६ महिन्यानंतर मुलास अंगावरून तोडावे व अन्नात हळूहळू बदल करण्यास सुरुवात करून नवव्या महिन्यापर्यंत पूर्ण करावे. अंगावरून तोडणे जरूरीचे असते कारण त्याहून अधिक काळपर्यंत नुसते दुधावरच वाढविलेली मुले बहुधा रक्तक्षयी असतात. अतिशय गरिबी असल्यास मातेने स्तनपान अधिक काळ चालू ठेवणे हितावह असते. कारण मातेच्या दुधातून योग्य तेवढी व वाढीस उपयुक्त प्रथिने आर्थिक ओढाताण न होता मिळतात. काही उष्ण कटिबंधीय देशांतून स्तनपान सर्रास दोन वर्षे चालू असते.

पहिले घट्ट अन्न म्हणून चेचून मऊ केलेले केळ देणे उत्तम. कारण हे फळ उत्तम पिकलेले व सहज उपलब्ध होणार असते. तांदूळ, मका, गहू यांपासून दुधात शिजवून तयार केलेली साखर घातलेली पेज, दुधातून अंड्याचा पिवळा बलक, शिजवून ठेचून, मऊ केलेल्या भाज्या, उकडून ठेचून मऊ कलेले बटाटे इ. पदार्थ सुरुवातीस देता येतात. टोमॅटोचा रस किंवा संत्र्यासारख्या फळांचा रस पूरक अन्न म्हणून १५ दिवसांच्या अर्भकासही देता येतो. स्तनपानातही काही अडचणींचा संभव असतो.


अपूर्ण स्तनपान : सर्वसाधारणपणे प्रत्येक स्तनपानाच्या वेळी अर्भकास किती दूध मिळाले हे मोजता येत नाही. अर्भकात पुढील लक्षणे आढळल्यास अपूर्ण स्तनपान होत असावे. स्तनपानाच्या दोन वेळांमध्ये अतिशय रडणे, बद्धकोष्ठ, वजन न वाढणे व अधूनमधून उलट्या होणे, रात्री रडणे व कमी झोप लागणे. स्तनपानाने मुलाचे पोट भरले किंवा नाही हे ओळखण्याकरिता स्तनपानापूर्वी आणि नंतर अर्भकाचे वजन करून नोंद ठेवता येते. अपूर्ण स्तनपान होत असल्यास वरचे दूध पूरक अन्न म्हणून द्यावे.

अती स्तनपान : ज्या स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर एक आठवड्यानंतर दुग्धोत्पादन सुरू होते त्यांचे स्तन बहुधा नेहमी दुधाने भरपूर भरलेले राहतात. त्यामुळे अर्भक अधिक काळपर्यंत स्तनपान करीत राहूनही स्तन रिकामे होत नाहीत व अर्भक जादा दूध पिते. यामुळे उलट्या व जुलाब होतात परंतु अर्भकाचे वजन घटत नाही. याबाबतीत स्तनपान देण्याची एखादी पाळी टाळणे, दूध स्तनातून काढून टाकणे वगैरे उपाय उपयुक्त ठरतात.

दुग्धस्तंभित स्तन आणि स्तन विद्रधी : स्तन दुधाने अती भरलेले असले म्हणजे स्तनपान वेदनोत्पादक होण्याचा संभव असतो. स्तनपानापूर्वी व नंतर दूध हाताने सहज काढून टाकता येण्यासारखे असल्यास काढून टाकावे. स्तनांना योग्य तेवढा आधार देणे, ते स्वच्छ ठेवणे व जरूर पडल्यास स्टिल्बेस्ट्रॉलसारखी औषधे देऊन दुग्धोत्पादन कमी करणे इ. इलाज उपयुक्त असतात.

स्पर्शासह्यत्व असणाऱ्या दुग्धस्तंभित स्तनाच्या बोंडीवर अर्भकाच्या चावण्यामुळे इजा झाल्यास, स्तनाग्रे स्वच्छ न ठेवल्यास स्तन विद्रधी (गळू) होण्याचा संभव असतो. स्तनाग्रांची काळजी घेणे व शक्यतो दूध स्तनात साठू न देणे या उपायांनी विद्रधी होण्याचे टाळण्यास मदत होते. त्याकरिता ‘स्तन पंप’ नावाचे उपकरण त्रास न होता दूध काढून टाकण्याकरिता वापरतात. रबरी फुगा व काचनळीचे हे उपकरण स्तनातून दूध चोषून घेते काच नळीवरील गोल फुगवट्यात दूध साठले म्हणजे ते सहज काढून घेता येते. हा फुगवटा नेहमी दूध त्यातच वाहील असाच स्तनावर पंप बसविताना असावा. हे उपकरण बऱ्याच वेळा वापरावयाचे असल्यास ते नेहमी स्वच्छ व निर्जंतुक ठेवणे महत्त्वाचे असते.

आ. २. स्तन पंप : (१) रबरी फुगा, (२) काच नळी, (३) फुगवटा.

स्तनपान केव्हा देऊ नये : काही वेळा दुग्धस्रवणास प्रारंभच होत नाही. कलकत्त्यातील एका पाहणीत १८% सुखवस्तू स्त्रियांमध्ये दुग्धस्रवणास प्रारंभच न झाल्याचे आढळले होते. मातेला मधुमेह, सक्रिय (लक्षणे स्पष्ट असलेल्या व रोगक्रिया चालू असलेल्या अवस्थेतील) क्षयरोग, देवी किंवा प्रसूतीनंतर होणारा चित्तभ्रम यासांरख्या विकृती असल्यास स्तनपान देऊ नये. फुप्फुसशोथ (फुप्फुसांची दाहयुक्त सूज), विषमज्वर, प्रसूतिपश्च जंतुरक्तता (सूक्ष्मजंतूंचा रक्तात प्रवेश होऊन ते रक्तपरिवहनांबरोबर सर्व शरीरात पसरणे), पटकी यांसारख्या रोगांत माता अतिशय अशक्त बनत असल्याने स्तनपान देण्यास असमर्थ असते. जोराचा रक्तक्षय, अपस्मार (फेफरे), हृदयरोग व चिरकारी (दीर्घकालीन) मूत्रपिंडशोथ हे रोग असल्यास तंज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय स्तनपान देऊ नये. स्तन विद्रधी, बोंडीवरील भेगा किंवा स्तनाग्र नेहमीपेक्षा आत दबलेल्या स्थितीत असल्यास स्तनपान देऊ नये. अकाल प्रसवाचे अर्भक (गर्भारपणाचे दिवस पूर्ण होण्यापूर्वीच काही महिने अगोदर जन्मलेले मूल) स्तनपान करण्यास असमर्थ असते. जन्मजात हृद्‌रोग, ⇨ खंडौष्ठ आणि ⇨ खंडतालू असणारी मुलेही स्तनपान करू शकत नाहीत. वरील कारणांपैकी काहींमध्ये विशेषेकरून आर्थिक हलाखीची स्थिती असल्यास मातेच्या स्तनातील दुधाचा उपयोग कसा करता येईल याचा संपूर्ण विचार करणे जरूरीचे असते.

मातेने सेवन केलेली काही औषधे तिच्या दुधातून उत्सर्जित होतात. कुष्ठरोगी माता त्या रोगावरील डॅप्सोन नावाचे औषध सेवन करीत असल्यास तिच्या नवजात अर्भकास स्तनदुग्धाद्वारे आपोआप मिळणारे हे औषध काही महिने रोगांविरुद्ध संरक्षण देण्यास मदत करते. याउलट काही औषधे अर्भकास हानिकारक असतात. तंबाखू (विडी, सिगारेट ओढणे किंवा पानातून अथवा चुना लावून तशीच तंबाखू खाणे), आर्सेनिक असलेली औषधे, बार्बिच्युरेटे (अपस्माराकरिता सतत घ्यावी लागणारी औषधे), आयोडाइडे, पारायुक्त औषधे, अफु, सल्फा यांसारखी मातेच्या दुधातून उत्सर्जित होणारी औषधे अर्भकास हानिकारक असल्यामुळे ती घेण्यापूर्वी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेणे जरूरीचे असते.


दुग्धस्रवण काळात घ्यावयाची काळजी : गर्भारणपासूनच स्तनांची काळजी घेण्यास सुरुवात करणे हितावह असते. स्तनांच्या बोंड्या दबलेल्या असल्यास शेवटच्या तीन महिन्यांपासून काच किंवा प्लॅस्टिकच्या गोल विशिष्ट आकाराच्या (तव्याच्या आकराच्या) व मध्ये भोक असलेल्या तबकड्या स्तनाग्रे त्या भोकातून बाहेर येतील अशा प्रकारे स्तनावर बांधण्याकरिता योग्य काचोळ्या वापराव्यात. हाताच्या बोटांनी अशी स्तनाग्रे अधूनमधून ओढून बाहेर काढण्याचाही प्रयत्न करता येतो. दुग्धनलिका खुल्या राहाव्यात म्हणून हलक्या हाताने स्तनमर्दन करावे व गर्भारपणाच्या शेवटास थोडा स्राव (प्रथमस्तन्य) मुद्दाम दाबून बाहेर काढावा. प्रत्येक स्तनपानापूर्वी व नंतर निर्जंतुक केलेल्या पाण्याने बोंड्या स्वच्छ कराव्यात. यामुळे अर्भकाच्या मुखात जंतुवाढ होत नाही व त्यास अतिसारादी जठरांत्र रोग होत नाहीत. दररोज अंघोळीच्या वेळी स्तन साबण व पाण्याने स्वच्छ करून कोरडे करावेत. जमल्यास योग्य मापाच्या व पुढूनच चटकन सैल करता येण्यासारख्या काचोळ्या स्तनपानकालात वापराव्यात.

कृत्रिम दुग्धपान : कृत्रिम दुग्धपानाचे ‘पूरक’ आणि ‘अनुपूरक’ असे दोन भाग करता येतात. ज्या वेळी स्तनातील दुधाचा पुरवठा अपुरा पडतो त्या वेळी वरचे म्हणजे गायीचे व म्हशीचे दूध द्यावे लागते, यालाच ‘पूरक दुग्धपान’ म्हणतात. परंतु काही कारणामुळे मातेचे स्तनपान देणे बंद करावे लागते किंवा माताच मृत झाल्यास अर्भक संपूर्ण बाहेरच्याच दुधावर वाढवावे लागते, यालाच ‘अनुपूरक दुग्धपान’ म्हणतात.

कृत्रिम दुग्धपानाचे काही प्रकार पुढीप्रमाणे आहेत : (१) गायीचे ताजे दूध,  (२) म्हशीचे ताजे दूध, (३) बाजारी तयार दूध भुकटी (पावडर), (४) संघनित (कंडेन्स्ड) दूध.

गायीचे ताजे दूध : स्वस्त व सहज उपलब्ध असणारे हे दूध जसेच्या तसे पचनसुलभ नसते आणि म्हणून त्यात फेरफार करून ते शक्यतो मातेच्या दुधाशी जुळणारे बनवावे लागते. त्याकरिता पुढील क्रिया करणे जरूर असते :(अ) उकळलेले गयीचे दूध उकळलेल्या पाण्याबरोबर १ : १ याप्रमाणात मिसळून सुरुवातीस दुग्धपानास योग्य असते. हळूहळू हे प्रमाण २ : १ करावे यामुळे केसिनापासून बनणारे जठरातील दह्याचे प्रमाण आणि वसेचे प्रमाण योग्य बनते. (आ) दूध उकळण्यामुळे ते निर्जंतुक तर बनतेच शिवाय ते पचनसुलभही बनते. (इ) पाणी घातल्यामुळे पातळ झालेल्या दुधाचे कॅलरीमूल्य कमी झाल्यामुळे त्यात साखर घालून ते वाढवावे. (ई) उकळण्यामुळे क जीवनसत्त्वाचा नाश होतो म्हणून ते वरून द्यावे. मूळातच गायीच्यादुधात ड जीवनसत्त्व व लोह कमी असतात तीही वरून देता येतात.

म्हशीचे ताजे दूध : भारतात गायीच्या दुधापेक्षा सहज उपलब्ध असणाऱ्या या दुधाचे प्रमाण पुढील कोष्टकात दिले आहे.

वय (महिने)

दूध (मिलि.)

पाणी (मिलि.)

साखर (चहाचे तमचे)

किकी वेळा पाजावे

२ पर्यत

४५

४५

३/४

३-४

८५

५७

दिड

११५

३०

दिड

१९०

७-८

२२५


दूध भुकटी : बाजारात विविध नावांनी दूध भुकट्या सीलबंद डब्यातून मिळतात. त्या महाग असतात. ह्या भुकटीपासून दूध तयार करणेही जिकिरीचे असते. सर्वसाधारपणपणे डब्याबरोबर मिळणाऱ्या सपाट मापकाभर भुकटीमध्ये सु. ३० मिलि. पाणी घालतात. सर्वसाधारणपणे वयोमानावर प्रत्येक वेळी हे दूध किती पाजावयाचे हे अवलंबून असते. या दुधावर वाढणाऱ्या मुलांना दररोज ५० मिग्रॅ. क जीवनसत्त्व व ८०० एकक ड जीवनसत्त्व देणे जरूर असते. त्याकरिता कोणतीही बहुजीवनसत्त्वे असलेली पातळ औषधे योग्य प्रमाणात वापरावीत.

संघनित दूध : बाजारात हे दूध सीलबंद डब्यातून मिळते. ते गायीच्या दूधाचे (१/३ उरेपर्यंत) बाष्पीभवन करून तयार करतात. हे दूध बहुधा अकाल प्रसवजन्य अर्भकाकरिता १–२ आठवडेच वापरतात. मुख्य अडचण म्हणजे ते निर्जंतुक ठेवणे अतिशय कठीण असते.

कृत्रिम दुग्धपानातील तत्त्वे : प्रत्येक मातेस ही तत्त्वे प्रसूतिगृहांतच समजावून सांगणे आवश्यक आहे. बाटली, रबरी बोंडी, चमचा किंवा कप अगर वाटी प्रत्येक दुग्धपानापूर्वी वीस मिनिटे उकळून घ्यावयासच हवीत. रबरी बोंडी कमीतकमी ५ मिनिटे उकळलेल्या पाण्यात निर्जंतुक करूनच वापरावी. प्रत्येक दुग्धपानाची तयारी करण्यापूर्वी मातेने किंवा दूध तयार करणाराने हात नीट स्वच्छ केलेच पाहिजेत. आपल्या अर्भकास कोणत्या प्रकारचे दूध योग्य हे वैद्यकीय सल्ल्यानुसार ठरवावे. अलीकडे काही शहरांतून ‘स्तनदुग्ध पेढ्या’ निघाल्या आहेत. अकाल प्रसवजन्य अर्भकांना या पेढ्यांतून दूध मिळाल्यास ते सर्वात उत्तम असते. कोणतेही कृत्रिम दुग्धपान संपूर्ण निर्जंतुक असणे अत्यावश्यक असते. एकदा तयार केलेले दूध न संपल्यास ते न वापरता फेकून द्यावे. घरात एकापेक्षा अधिक अर्भके असल्यास बाटल्यांची वा रबरी बोंड्यांची अदलाबदल होऊ देऊ नये. कृत्रिम दुग्धपानानंतरही ढेकर प्रवृत्ती उत्पन्न करणे जरूर असते. ५ महिन्यांच्या ६ किग्रॅ. वजनाच्या मुलास सर्वसाधारणपणे सु. एक लिटर द्रव पदार्थाची गरज असते. यापैकी सु. ७२० मिलि. दूध व २८० मिलि. पाणी किंवा फळांचा रस द्यावा. ६ महिन्यांनंतर दुधात पाणी न घालता पाजावे. पाजताना बाटली अशी धरावी की, रबरी बोंडी दुधाने पूर्ण भरलेली असेल. बहुजीवनसत्त्वे असलेली द्रव औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसार वापरावीत.

पहा : दूध स्तन.

भालेराव, य. त्र्यं. क्षेत्रमाडे, सुमति

पशूंतील दुग्धस्रवण :  मानवातील दुग्धस्रवण फक्त बालाकांच्या पोषणाकरताच असते. तर गाय, म्हैस, शैळी, मेंढी आणि काही प्रमाणात उंटीण, घोडी व गाढवी यांचे दुग्धस्रवण त्यांच्या नवजातांच्या पोषणाकरिता तर असतेच पण त्यावर मानवाचेही पोषण होत असते.


 आ. ३. गायीच्या कासेचे उभे च्छेद : (अ) जननक्षम होण्यापूर्वीची कास -१. आचळीतील कुंड, २.-दुग्ध कुंड, ३.-दुग्धवाहिनी, ४.-वसा, ५.-लसीका ग्रंथी (आ) अनेक वेळा माजावर आल्यानंतरची कास - दुग्धवाहिन्यांचे जाळे बरेच वाढलेले आहे, पण दुग्धकोशांच्या वाढीला चेतना मिळालेली नाही, (इ) पाच महिन्यांच्या गाभण गायीची कास, स्त्रीमदजन व गर्भरक्षक या हॉर्मोनांच्या क्रियेमुळे दुग्धकोशांच्या जाळ्यात झालेली वाढ -१दुग्धकोशांचे जाळे.पशूंच्या माद्यांच्या दुग्धग्रंथीमध्ये दुग्धस्रवण होते. ही ग्रंथी दुग्धकोश आणि वाहिन्या यांची बनलेली असते. दुग्धकोशाच्या आतील बाजूस उपकलेचे (पातळ पटलाचे) अस्तर असते. हे अस्तर विशिष्ट उपकला कोशिकांच्या एकाच थराचे असून कोशिकांच्या भित्तीला लागूनच केशिका (सूक्ष्म रक्तवाहिन्या), सूक्ष्म लसीका वाहिन्या (ऊतकातून रक्तात मिसळणाऱ्या व रक्तद्रवाशी साम्य असलेल्या द्रव पदार्थाच्या वाहिन्या) व तंत्रिका असतात. दूध तयार होण्यासाठी लागणारे पदार्थ रक्तामधून निवडून घेण्याची कार्यक्षमता या कोशिकांना असते. या कोशिका म्हणजे दूध तयार करण्याचे जणू कारखानेच आहेत. दुधातील काही घटक या कोशिका तयार करतात, तर काही रक्तामधून सरळ घेतले जातात. हे घटक कसे तयार केले जातात याविषयी अद्याप नीटशी माहिती मिळालेली नाही. कासेमधून परतणाऱ्या रक्तामध्ये ग्लुकोज, ॲमिनो अम्ले व वसाम्ले यांचे प्रमाण मात्र बरेच कमी झालेले आढळते. उपकला कोशिकांत तयार झालेले दूध दुग्धकोशाच्या अवकाशिकेत (पोकळीत) जाते व तेथून ते वाहिन्यांमध्ये जाते. काहींच्या मते दूध कोशिकांमधून त्यांच्या भित्तीमधून तर्षण पद्धतीने [→ तर्षण] जाते, तर काहींच्या मते ते भित्ती फाटून ओतले जाते. कासेतून –दुग्धग्रंथीमधून – दूध काढल्यावर ताबडतोब उपकला कोशिकांमध्ये दूध तयार होणे व ते दुग्धकोशातील अवकाशिकेत, वाहिनीमध्ये किंवा दुग्धग्रंथीच्या कुंडामध्ये ओतले जाणे या क्रिया सुरू होता. यामुळेच जास्त दूध देणाऱ्या गायींची धार ३–४ वेळा काढल्यास दुग्धस्रवण मर्यादित प्रमाणात वाढते. दुग्धग्रंथीमधील दूध न काढता तसेच ठेवले, तर ते पुन्हा रक्तात शोषले जाते. दुग्धस्त्रवण ही अव्याहत चालू राहणारी क्रिया आहे. दुधात आढळणारे काही घटक त्या स्थितीत मादीच्या खाद्यात अथवा शरीरात आढळत नाहीत. वर उल्लेखिलेल्या दुग्धग्रंथीतील कोशिका अशा पदार्थांचे संश्लेषण करू शकतात. दुधामध्ये आढळणारे अल्ब्युमीन व केसीन रक्तात आढळत नाही. इतकेच काय केसीन निसर्गात इतरत्र कोठेही आढळत नाही. ग्लुकोज व लॅक्टिक अम्ल यांपासून लॅक्टोज (दुग्धशर्करा) तयार होते व ती इतरत्र कोठेही आढळत नाही. रक्तातील ट्रायग्लिसराइडपासून दुधातील वसा तयार केली जाते. दुधातील लवणे मात्र उपकला कोशिका रक्तातून सरळ घेतात.

अंडाशयाच्या स्त्रीमदजन या हॉर्मोनाच्या प्रभावामुळे मादी माजावर येते. मात्र ही क्रिया अप्रत्यक्ष रूपाने म्हणजे स्त्रीमदजनाची क्रिया पोष ग्रंथीच्या पुढील खंडावर होऊन त्यातून स्त्रवणाऱ्या हॉर्मोनाच्या क्रियेमुळे होते. याच हॉर्मोनाच्या क्रियेमुळे दुग्धग्रंथीची वाढ होते. मादी गाभण राहिल्यावर अंडाशमयामध्ये तयार होणाऱ्या पीतपिंडातून स्रवणाऱ्या गर्भरक्षक या हॉर्मोनामुळे दुग्धग्रंथीतील वाहिन्यांना नवीन फाटे फुटुन त्यावर दुग्धकोशही तयार होतात व दुग्धग्रंथीची आणखी वाढ होते व गर्भावधिकालाच्या मध्यापर्यंत ती पूर्ण होते. या सुमारास पोष ग्रंथीचा हाच खंड लॅक्टोजेन नावाचे हॉर्मोन स्रवू लागतो व त्याच्या प्रभावामुळे दुग्धकोशातील उपकला कोशिका दुग्धस्रवण करू लागतात पण हे दूध म्हणजे चीक (कोलोस्ट्रम) असतो. दुग्धकोशातील अवकाशिक, वाहिन्या व दुग्धग्रंथी कुंड या चिकाने भरून गेल्यामुळे दुग्धग्रंथी आकाराने मोठी झालेली दिसून येते. पोष ग्रंथीच्या प्रोलॅक्टिन, गॅलॅक्टिन, ऑक्सिटोसीन, व्हॅसोप्रेसीन इ. विविध हॉर्मोनांच्या जनावराच्या एकंदर वाढीवरील, गर्भाशयावरील, रक्त्वाहिन्यांवरील इ. कार्यांमुळे पर्यायाने दुग्धस्रवणावर परिणाम घडून येत असतो. पोष ग्रंथीच्या हॉर्मोनांची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) दिल्यास रोजी ७ लिटरपर्यंत दुग्धस्रवण वाढल्याचे दिसून आले. पोष ग्रंथीच्या हॉर्मोनांच्या कमीअधिक स्रवणाने दुग्धस्रवणामध्येही चढउतार होतो, असेही दिसून आले आहे. तसेच अवटू ग्रंथीचे थायरॉक्सिन हे हॉर्मोन दुग्धस्रवणाला चेतक आहे. आयोडीनयुक्त प्रथिनामुळेही दुग्धस्रवणात वाढ झाल्याचे दिसून येते. काही व्यापारी कंपन्या असे पदार्थ पशुखाद्यामध्ये घालण्यासाठी तयार करतात. असे पदार्थ दुग्धकालाच्या अखेरीस १५ ग्रॅ. या मात्रेमध्ये दिल्यास दुग्धस्रवणास ५ ते २०% व दुधातील वसेमध्ये २५ ते ५०% वाढ झाल्याचे आढळून आले आहे परंतु पशुप्रजनकांच्या संघाच्या दुग्धोत्पादनाच्या चढाओढीच्या वेळी असे पदार्थ वापरण्यास मनाई आहे.


वरील विवेचनावरून दुग्धस्रवण ही शरीरक्रियात्मक प्रक्रिया आहे, हे सहज लक्षात येईल. मात्र जनावराची वैयक्तिक दुग्धस्रवणक्षमता ही प्रामुख्याने आनुवांशिक गुणांवर अवलंबून असते. यामुळे आनुवंशिकी सिद्धांताचा उपयोग करून प्रजनन करून मानवाने दुधाळ पशूंच्या–गायी–म्हशी, शेळ्या व मेंढ्या यांच्या–जाती निर्माण केल्या आहेत.

गाभण असताना आणि व्याल्यानंतर काही अंतःस्रावी ग्रंथीच्या स्रावांचा नियंत्रणाखाली दुग्धस्रवण चालू रहाते. काही विदेशी जातींच्या गायींमध्ये पान्वहण्यासाठी–दुग्धप्रवाह सुरू होण्यासाठी वासरांना पाजण्याची जरूरी असतेच असे नाही. अशा वेळी वासरांना वरचे दूध पाजावे लागते. भारतातील गायींच्या बहुतेक जातींत पान्हवण्यासाठी वासरांना पाजण्याची प्रथा आहे. या प्रथेमुळे दुग्धकालही वाढतो, असे दिसून आले आहे. याउलट वासराचा मृत्यू झाल्यास तो कमी झाल्याचेही आढळून आले आहे. म्हशीमध्ये मात्र पान्हवण्यासाठी वासरांची जरूरी आहे, असे दिसत नाही. पेंढा भरलेले वासरू तिच्या पुढ्यात ठेवले, तरी चालते असे दिसते. भारतामध्ये शेतकामासाठी ज्या जातींचे बैल उपयोगी पडतात अशा जातींमध्ये वासरू खोंड असल्यास सामान्यपणे एका आचळातील सर्व दूध त्याला पाजण्याची पद्धत आहे.

यंत्राच्या साहाय्याने दूध काढण्याच्या पद्धतीमध्ये यंत्रातील स्पंदकामुळे स्पंदकाची क्रिया होते. त्यामुळे पान्हा सुटण्यास मदत होते.

पहा : गाय दुग्धव्यवसाय दूध म्हैस.

संदर्भ : 1. Achar, S. T. Pediatrics in Developing Countries, Bombay, 1973.

            2. Dawn, C. S. Textbook of Obstetrics, Calcutta, 1974.

            3. Henderson, H. Q.  Reaves P. M. Dairy Cattle Feeding and Management, New York, 1960.

            4. Kon, S. K. Cowie, A. T. Eds. The Mammary Gland and It’s Secretion, 2 Vols., New York, 1971.

            5. Smith, A. The Body, London, 1960.

            6. Smith, V. R. Physiology of Lactation, Ames, 1959.

दक्षित, श्री. ग.