दुग्धज्वर : दुग्धज्वर हे नाव फसवे आहे कारण या रोगामध्ये ज्वर येत नाही व दुग्ध या शब्दाचा संबंध जनावर व्याल्यानंतर दूध सुरू होण्याच्या वेळी हा रोग होतो इतपतच आहे. हायपोकॅल्शिमिया व बाळंतपक्षाघात (विण्याच्या वेळी होणारा अंशपक्षाघात) या नावांनीही हा रोग ओळखला जातो. रक्तातील कॅल्शियमाचे विशेषतः आयनीभूत (विद्युत् भारित अणू वा रेणू या स्वरूपात रूपांतरित झालेल्या) कॅल्शियमाचे प्रमाण कमी झाल्यामुळे उद्भवणारा हा रोग आहे. पाळीव पशूंच्या व्यवस्थापनेतील कृत्रिम पद्धतीमुळे चयापचयात (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींत) दोष निर्माण झाल्यामुळे रोगोद्भव होतो. वन्य पशूंमध्ये हा रोग आढळत नाही. जास्त दूध देणाऱ्या गायीमध्ये तीन वेतांनंतरच्या वेतांच्या वेळी हा विशेषेकरून आढळून येतो व सामान्यपणे व्याल्यानंतर २ ते ३ दिवसांत तो उद्भवतो. काही दुग्धशाळांमध्ये २५ ते ३०% गायींना हा रोग झाल्याचे आढळून आले आहे. जर्सी जातीच्या गायींमध्ये रोगाचे प्रमाण त्यामानाने अधिक आहे. क्वचित काही गायींच्या प्रजेमध्ये रोगाचे प्रमाण सातत्याने आढळते. विण्यापूर्वी काही दिवस, विताना आणि व्याल्यानंतर ४८ तास ह्या काळामध्ये रोगलक्षणे दिसून येतात. घोडी, मेंढी, शेळी, डुकरीण व कुत्री यांनाही हा रोग होतो. डुकरीणीमध्ये हा रोग फारसा आढळत नाही परंतु मेंढ्यांच्या कळपामध्ये मात्र साथ आल्यासारखा बऱ्याच मेंढ्यांमध्ये एकाच वेळी दिसून येतो. वयस्क मेंढ्यांत विण्यापूर्वी सहाव्या आणि व्याल्यानंतर दहाव्या आठवड्याच्या सुमारास रोगोद्भव होतो. भारतामध्ये दुधाळ गायी–म्हशींमध्ये हा रोग आढळून आला आहे.
कारणे : विण्याच्या सुमारास सर्व जनावरांमध्ये रक्तातील कॅल्शियमाचे प्रमाण थोडे कमी होतेच पण ते आणखी कमी झाले की, रोगोद्भव होतो. गायीच्या रक्तरसामध्ये (रक्तातील घन पदार्थविरहित रक्तद्रवात) असणारे प्रतिशत १० मिग्रॅ. हे कॅल्शियमाचे प्रमाण ३ ते ७ मिग्रॅ. एवढे कमी झाले की, रोगलक्षणे दिसू लागतात. गायीच्या खाद्यातील कॅल्शियमाचे प्रमाण वाढविले, तरी खात्रीलायकपणे रोगप्रतिबंध होऊ शकत नाही. मात्र रागोद्भव झाल्यावर ताबडतोब कॅल्शियमयुक्त औषधांची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) दिल्यास रोगी बरा होतो. रक्तातील कॅल्शियमाचे प्रमाण कमी होण्यास नेमके काय कारण घडते, हे अद्याप नीटसे समजलेले नाही. व्याल्यानंतर चिकामधून अगर दुधामधून मोठ्या प्रमाणावर कॅल्शियमाचा व्यय होणे, आतड्यांमधून कॅल्शियमाचे शोषण कमी प्रमाणात होणे, हाडातील कॅल्शियमाचा साठ रक्तामध्ये आवश्यक इतक्या त्वरेने न येणे ही ढोबळ कारणे संभवतात. एच्. ड्रेअरी आणि जे. आर्. ग्रेग यांच्या मते ⇨ परावटू ग्रंथीच्या निष्क्रियतेमुळे कॅल्शियमाच्या चयापचयावर होणाऱ्या परिणामामुळे हाडातील कॅल्शियमाचा साठा रक्तात येत नसावा. साधारणपणे गायीच्या दुधावाटे रक्तात असलेल्या कॅल्शियमाच्या १२ पट कॅल्शियम रोज शरीराबाहेर जात असते. यावरून दूध देण्याच्या काळात गायीला तितके कॅल्शियम आहारातून शोषून घेता आले पाहिजे, हे उघड आहे. शोषणाचे कार्य शरीरातील हॉर्मोने (अंतःस्रावी ग्रंथींमधून रक्तात मिसळणारे उत्तेजक स्राव) व ज्ञानतंतूच्या नियंत्रणाने चालते. जास्त दूध देणाऱ्या गायींच्या ⇨ पोष ग्रंथी अधिक प्रमाणात हॉर्मोन उत्पन्न करतात. त्यामुळे इतर काही हॉर्मोने जास्त प्रमाणात उत्पन्न होऊन शोषण कार्यामध्ये व्यत्यय येणे शक्य आहे असे दिसते. परावटू ग्रंथीच्या कॅल्सिटोनीन या हॉर्मोनाच्या अधिकतेमुळे (रक्तातील कॅल्शियम कमी करण्यावर या हॉर्मोनाचा परिणाम होतो) हे घडत असावे अशी एक शक्यता आहे. गाभणकालाच्या शेवटी शेवटी फॉस्फरसाचे खाद्यातील प्रमाण वाढविल्यास परावटू ग्रंथीची कार्यक्षमता वाढते व थोड्याफार प्रमाणात रोगप्रतिबंध होतो, असेही प्रयोगान्ती दिसून आले आहे. खाद्यातील कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांचे एकमेकांच्या शोषणावर असणारे अवलंबित्व लक्षात घेता व या विकारात रक्तातील फॉस्फेटे आणि मॅग्नेशियम यांचे प्रमाणही कमी होते हे लक्षात घेतल्यावर रोगोद्भव होण्याच्या वेळी कॅल्शियमाचे प्रमाण नेमके का कमी होते, ही अजून तरी पूर्णपणे न सुटलेली समस्या आहे. डुकरीण सोडल्यास गायीशिवाय इतर जातीच्या जनावरांमध्ये या रोगाचा विण्याशी फारसा संबंध दिसत नाही. उदा., मेंढ्यांमध्ये दूरचा प्रवास, अतिश्रम, उपासमार ह्यांमुळेही रक्तातील कॅल्शियमाचे प्रमाण कमी होते आणि रोगोद्भव होतो.
लक्षणे : रोगाच्या सुरुवातीस गायीमध्ये क्षोभ, अस्वस्थता, संकंप (आकडी), अतिसंवेदनशीलता, पायांच्या आणि डोक्याच्या स्नायूंचे कंपन, जीभ तोंडाबाहेर लोंबणे, दात खाणे, भेदरलेली नजर ही लक्षणे दिसतात. रोग वाढत गेल्यावर स्नायूंच्या चलनवलनात समन्वय नसल्यामुळे हेलकावे देत चालणे, खाली पडणे, उठण्याचा प्रयत्न करताना धडपडणे, शुद्ध अर्धवट हरपणे, पाय ताणून डोके एका बाजूस वळवून मान छातीवर टाकून निपचित पडून राहणे ही लक्षणे दिसतात. मान सरळ केली, तरी पुन्हा तशीच होऊन पडते, हे लक्षण महत्त्वाचे मानले जाते. तापमान नेहमीपेक्षा कमी असते (३६° ते ३८° से.). नाडी जलद (मिनिटाला ८०) पण क्षीण होते व हळूहळू शुद्ध पूर्णपणे हरपते व नाडी आणखी मंद होऊन आकडी येऊन १२ ते ४८ तासांत मृत्यू ओढवतो.
मेंढीमध्येही अशीच रोगलक्षणे दिसतात, पण रोग अतिजलद वाढत जाऊन ६ ते १२ तासांच्या आत मृत्यू येतो. डुकरीणीत वरीलप्रमाणेच लक्षणे दिसतात. कधीकधी ती वीत असतानाच आकडी इ. लक्षणे दिसून लागतात व प्रसूती अडून राहते. कुत्रीमध्ये व्याल्यानंतर काही दिवसांत किंवा जास्त पिल्ले असल्यास एक महिन्याने रोगोद्भव होतो व वरील लक्षणे दिसून येतात. घोडीमध्ये हा विकार क्वचित आढळतो पण अशीच लक्षणे दिसणारा दुग्धकाल संकंप नावाचा रोग आढळून आला आहे.
विण्याच्या वेळी गायी गर्भाशयाला किंवा पर्युदराला (उदरातील इंद्रियांवरील पडद्यासारख्या आवरणाला) झालेल्या जखमांमुळे विषरक्तता (रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात विष भिनणे) होते व त्या वेळीही सर्वसाधारण लक्षणे वरीलप्रमाणेच दिसतात पण रक्तरसातील कॅल्शियमाचे प्रमाण तपासून दुग्धज्वराचे निदान करणे शक्य होते. मेंढ्यांमध्ये गाभाणकालात होणाऱ्या विषरक्ततेतही अशीच लक्षणे दिसतात पण त्या रोगामध्ये मेंदूवर परिणाम झाल्यामुळे दिसणारी इतर लक्षणे व फक्त गाभण मेंढ्यांमध्येच त्याचे मर्यादित अस्तित्व यांमुळे रोगाची अलगता ओळखता येते.
उपचार : रक्तातील कॅल्शियमाचे प्रमाण पूर्ववत आणण्यासाठी कॅल्शियमाची अंतःक्षेपणे देणे हा रोगावरील उपाय आहे. यासाठी कॅल्शियम बोरोग्लुकोनेट औषधाचा उपयोग केला जातो. गायीमध्ये या औषधाच्या २५% विद्रावाचे ४०० ते ८०० मिलि. मात्रेचे शिरेमध्ये अंतःक्षेपण करतात. काही वेळा अर्धे औषध शिरेमध्ये आणि अर्धे अधस्त्वचीय (त्वचेखाली) देतात गुण न आल्यास याच मात्रेने पुन्हा औषध देतात. बहुधा दोनदा औषध दिल्याने गाय बरी होते. मॅग्नेशियम न्यूनता असल्यास वरील विद्रावात मॅग्नेशियम व द्राक्षशर्करा (ग्लुकोज) घालतात. कासेत हवा भरण्याचा आणखी एक उपाय या रोगावर करतात. स्तनामध्ये निर्जंतुक नळी घालून सायकलच्या पंपाने हवा भरण्यात येते. हवेच्या मार्गावर ती निर्जंतुक करण्यासाठी आयोडीन वा दुसऱ्या निर्जंतुक औषधाने भिजविलेल्या मलमलसारख्या कापडामधून ती गाळली जाईल अशी व्यवस्था करतात. चार तासांनंतर कासेवर दाब देऊन हवा काढून टाकतात. याचा परिणाम कसा होतो हे नीटसे समजलेले नाही, पण हा उपयुक्त उपाय आहे.
मेंढीमध्ये वरील औषधी उपाययोजना गुणकारी असून ती अर्ध्या तासाच्या आत उठून उभी राहते व एकदोन दिवसांत संपर्णू बरी होते. इतर प्राण्यांमध्येही गायीप्रमाणेच उपाय योजतात.
गायीमध्ये रोगप्रतिंधक उपाय म्हणून खाद्यामध्ये फॉस्फेटांचे प्रमाण वाढविता. यामुळे रक्तरसात फॉस्फेटांचे प्रमाण वाढून परावटू ग्रंथीची कार्यक्षमता वाढते व परिणामी हाडातील कॅल्शियमाचा साठा रक्तामध्ये येण्यास मदत होऊन त्याचे रक्तातील प्रमाण योग्य राहते. कॅल्शियमाचे आतड्यातून शोषण होण्याच्या क्रियेत ड जीवनसत्त्व महत्त्वाचे असल्यामुळे या जीवनसत्त्वाचे खाद्यातील प्रमाण वाढवितात. विशेषतः विण्यापूर्वी काही दिवस हे केल्यास रोगप्रतिबंध होण्यास मदत हाते.
मानवातील दुग्धज्वर : मानवात ही संज्ञा प्रसूतीनंतर तिसऱ्या अथवा चौथ्या दिवशी, दुग्धस्रवणाच्या प्रारंभी येणाऱ्या लावण्यात येत असे. या काळात स्तन मोठे व कठीण होतात आणि त्यामुळे हा ज्वर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या दुग्धस्रवणाने येतो, असा पूर्वी समज होता. अलीकडील संशोधनावरून हा ज्वर जननमार्गातील एखाद्या भागावरील जंतुसंक्रामणामुळे उद्भवण्याची शक्यता असते, असे दिसून आले आहे. आधुनिक औषधांमुळे (उदा., अंडाशयातील हॉर्मोने) या ज्वरावर परिणामकारक उपाय करणे शक्य झाले आहे.
संदर्भ : 1. Blood, D. C Henderson, J. A. Veterinary Medicine, London, 1973.
2. Miller, W. C. West, G. P. Ed. Black’s Veterinary Dictionary, London, 1962.
गद्रे, य. त्र्यं.
“