दिघे, रघुनाथ वामन : (२४ एप्रिल १८९६– ). मराठी कादंबरीकार. जन्म कल्याण येथे. त्यांच्या वडिलांची नोकरी बदलीची असल्यामुळे दिघे ह्यांचे शालेय शिक्षण कर्जत, खोपोली, जळगाव, चाळीसगाव, सोलापूर, रत्नागिरी अशा विविध ठिकाणी झाले पुणे येथे राहून त्यांनी बी. ए., एल्एल्. बी. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण घेतले (बी. ए., १९२२ एल्एल्. बी. १९२५). त्यानंतर पनवेल येथे अल्पकाळ वकिली केल्यानंतर १९२७ मध्ये ते पुण्यास आले आणि १९४२ पर्यंत मुख्यतः फौजदारी कोर्टात त्यांनी वकिली केली. त्यानंतर मात्र वकिलीचा व्यवसाय सोडून देऊन ते शेती करू लागले. खोपोलीजवळच्या विहारी ह्या गावात तेव्हापासून त्यांचे वास्तव्य आहे.
दिघे हे प्रादेशिक कादंबरीकार. ग्रामीण जीवनाच्या प्रत्यक्ष अनुभवातून व निसर्गाच्या रम्य सहवासातून त्यांचे लेखन स्फुरलेले आहे. त्यांनी शिकारीचाही छंद होता. त्यांच्या कादंबऱ्यांत नाट्यपूर्ण, रसरशीत साहसी घटना, अद्भुतरम्य वातावरण, काव्यात्म वर्णने, ठसठशीत व्यक्तिदर्शने, ग्रामीण जीवनाचे प्रत्ययपूर्ण चित्रण ह्यांचे प्राचुर्य असते. दिघे यांनी काही कथालेखनही केलेले आहे. माझा सबूद नावाचे नाटकही त्यांनी लिहिले आहे (१९४९). गातात व नाचतात धरतीची लेकरे (१९५०) नावाचा त्यांचा एक लोकगीतसंग्रहही आहे. पण त्यांची मुख्य मदार आहे ती कादंबरीलेखनावर. गानलुब्धा मृगनयना (१९४७) ऐतिहासिक रम्याद्भुत कादंबरी सोडल्यास त्यांचे कादंबरीलेखन मुख्यतः ग्रामीण जीवनावर आधारलेले आहे.
त्यांची पहिली कादंबरी पाणकळा (१९३९). नगरकडील ग्रामीण जीवनात तीत कहाणी आहे. या कादंबरीच्या आगमनापर्यंत ग्रामीण जीवन कादंबरीविश्वात उपेक्षितच होते विषयाच्या नवाईमुळे आणि शैलीतील काव्यात्मतेमुळे ही कादंबरी बरीच गाजली तिला १९४० साली ना. सी. फडके पारितोषिकही मिळाले. पाणकळाच्या लोकप्रियतेमुळे दिघे यांचा लेखनोत्साह वाढीस लागला. सराई (१९४३), निसर्गकन्या रानजाई (१९४६), वसंतराव आणि चाळीस चोर (१९४६), गानलुब्धा मृगनयना, आई आहे शेतात (१९५६), पड रे पाण्या (१९५८), कार्तिकी या त्यांच्या पाणकळानंतरच्या कादंबऱ्या.
दिघे यांनी आपल्या ग्रामीण कादंबऱ्यांत जो परिसर निवडलेला आहे, तो अंतर्बाह्य ग्रामीण व कृषिव्यवसायात्मक असतो. दिघे स्वतःला अभिमानाने शेतकरी कादंबरीकार म्हणवून घेतात. पुष्कळदा त्यांच्या कादंबऱ्यांत शेतीविषयक प्रश्नांचा व इतर सुधारणांचाही अंतर्भाव होतो. उदा., कोरडवाहू शेती व बांधबंधारे यांचा संबंध त्यांनी पड रे पाण्यात दाखविला आहे कार्तिकीत अस्पृश्यतेच्या विषयाला हात घातलेला आहे, तर आई आहे शेतात मध्ये जमीनदार आणि कूळ यांच्यातील संबंधांना स्पर्श केलेला आहे. शेतीविषयक काही उपयुक्त माहितीही ते आपल्या कादंबऱ्यांतून पेरतात त्यामुळे त्यांची कादंबरी वास्तवता, ज्ञानमुक्तता आणि रम्याद्भुतता अशा पातळ्यांवर एकदम किंवा आलटून पालटून वावरत राहते. ती सामान्यतः लक्षात राहते, तिच्यातील स्वच्छंद (रोमँटिक) काव्यात्म चित्रणामुळे विशेषतः तीतील निसर्गवर्णनांमुळे. ग्रामीण परिसरातील निसर्गाची, त्यांच्या बदलत्या रूपांची वर्णने ते मोठ्या तन्मयतेने करतात ती रूपरसगंधांच्या दरवळीने भारावलेली असतात ती एका यक्षनगरीत नेऊन सोडतात ही वर्णने बाह्यतः सूक्ष्म, चैतन्यपूर्ण व प्रत्ययकारी तर असतातच पण या चैतन्याचा स्पर्श यातील पात्रांनाही झालेला असतो येथे निसर्ग व मानव यांचा एक गूढ परस्परसहानुभाव सूचित होतो. त्यांची सारी पात्रे म्हणजे या निसर्गाचीच अपत्ये आणि धरणीची लेकरे असतात निसर्गाचा मूलस्त्रोत त्यांत तरळता असतो. ही पात्रे सामान्यतः निसर्गावलंबी असली, तरी त्यांच्या ठिकाणी एक रोखठोक कडवेपणा, इमानदारीही वास करते ती त्यांच्या एरव्हीच्या दैन्ययुक्त जीवनातूनही व्यक्त होते. झुंजारवृत्तीने ती परिस्थितीला तोंड देतात परिस्थितीने ती वाकतात, पण मोडत नाहीत एक अशिक्षित, पण उपजत माणुसकी त्यांच्या ठिकाणी वास करते एक स्वाभाविक अध्यात्मभाव आढळतो. पड रे पाण्यातील संतू मगर हा साऱ्याचे मूर्तिमंत उदाहरण अ सेंट कॉमनर असेच त्याचे वर्णन दिघे यांनी केलेले आहे.
दिघे ह्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही काढण्यात आले आहेत.
कुलकर्णी, गो. म.