दिंडा : (१) पान व फुलोरा, (२) फूल, (३) फळाचा उभा छेद, (४) आडवा छेद.

दिंडा : (हिं., बं. ढोलसमुद्र क. दिंडलमर ढोल समुद्रिका लॅ. लीआ मॅक्रोफिला कुल–व्हायटेसी). सुमारे ३०–९० सेंमी. उंचीची ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), मोठी, हिरवट, बारीक शाखायुक्त ⇨ ओषधी भारतातील उष्ण भागांत सर्वत्र आढळते. शिवाय ब्रह्मदेश, थायलंड, लाओस येथेही आढळते. मूळ लाल, बहुवर्षायू व ग्रंथिल (गाठाळ) पाने साधी, अंडाकृती–हृदयाकृती, फार मोठी, खालची ६० सेंमी. व वरची १५–२३ सेंमी. व्यासाची, दातेरी किंवा काहीशी विभागलेली. फुले पांढरी व गुलुच्छासारख्या वल्लरीत [→ पुष्पबंध] जुलै–सप्टेंबरात येतात. सामान्य लक्षणे ⇨ व्हायटेसी कुलात (द्राक्ष कुलात) वर्णिल्याप्रमाणे. मृदुफळ बारीक, काळे, ६–८ सेंमी. व्यासाचे, गोलसर बसके, ३–६ खंडित असून बिया चपट्या असतात. पानांची भाजी करतात व पत्रावळीसारखा त्यांचा उपयोगही करतात. फळे खाद्य. लाल मुळे श्लेष्मल (बुळबुळीत), स्तंभक (आकुंचन करणारी) वेदनाहारक असून जखमा, नायटे, गजकर्ण, नारू इत्यादींवर उपयुक्त. त्यांच्यामुळे रक्तस्राव थांबतो. ब्रह्मी लोक रक्तस्राव थांबविण्यासाठी ती जखमांवर लावतात.

दिंडा हेच नाव लीआ वंशातील इंडिका (सँबुसीना) जातीस लावलेले आढळते परंतु तिचे ‘कर्कणी’ हे नाव प्रचारात असून खरे दिसते (हिं. कुर्कुरजिव्हा क. अंदिलू). या लहान वृक्षाचा अथवा १–४ मी. उंच झुडपाचा भारतात दिंड्यापेक्षा अधिक प्रसार आहे. शिवाय ते अंदमान, फिलिपीन्स, चीन, इंडोचायना, श्रीलंका आणि मलाया येथेही आढळते. पाने (३८–५० सेंमी. लांब) संयुक्त, पिसासारखी (२–३ वेळा विभागलेली) दले दातेरी (७·५–२० X ४–९ सेंमी.) फुले पांढरी फळे (६–८ मिमी. व्यासाची) जांभळट काळी, साधारणपणे दिंड्याप्रमाणे. पाने आणि फळे खातात. पानांचे खत बनवितात. खोडातील ⇨ भें वनस्पति विज्ञानाच्या प्रयोगशाळेत वनस्पतींच्या भागांचे छेद घेण्यास (‘एल्डर पिथ’ ऐवजी) उपयुक्त असते. मुळे शीतकर (थंडावा देणारी), स्वेदकारी (घाम आणणारी) असून जुनाट अतिसार, शूल (तीव्र वेदना), आमांश (आव) इत्यांदीवर देतात. भोवळ आल्यास पाने भाजून डोक्यास लावतात.

संदर्भ : Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Delhi, 1975.

परांडेकर, शं. आ.