दासोपंत : (१५५१–१६१५). एकनाथांच्या निकट सहवासातील आणि ⇨ नाथपंचकातील एक महत्त्वाचे कवी. बेदरच्या बहामनी राज्यातील नारायणपेठ येथले. पित्याचे नाव दिगंबरपंत आईचे पार्वतीबाई. दिगंबरपंत हे नारायणपेठचे देशपांडे असताना एकदा एका दुष्काळी वर्षी त्यांच्याकडून बादशाही रसद वेळेवर न पोहोचल्यामुळे दासोपंताना बादशहाने ओलीस म्हणून ठेवले होते. रसद पोहोचविण्यासाठी दिलेल्या अखेरच्या दिवशी प्रत्यक्ष दत्तात्रेयाने महाराचे रूप घेऊन वसुलीची रक्कम भरली आणि दासोपंतांना सोडविले, अशी आख्यायिका आहे. बादशहाकडून सुटका झाल्यानंतर दासोपंत विरक्त झाले. हिलालपूर, डाकोळगी, प्रेमपूर, नंदिग्राम, राक्षसभुवन आदी गावी त्यांनी काही काळ काढला. दासोपंत दत्तात्रेयाचे उपासक होते तथापि त्यांचा संप्रदाय आनंदसंप्रदाय हा होय. ह्या संप्रदायाची दत्तमूर्ती एकमुखी असते. आंबेजोगाई येथे त्यांचे बराच काळ वास्तव्य झाले.
दासोपंतांची ग्रंथरचना विपुल आहे. आंबेजोगाई येथे असलेल्या त्यांच्या घरातून मिळालेल्या हस्तलिखितांनुसार त्यांनी लिहिलेल्या संस्कृत–मराठी ग्रंथांची संख्या सु. ५० भरते. गीतेवरच ५–६ टीका त्यांनी लिहिल्या. ह्या टीकांपैकी गीतार्णव ही सर्वांत महत्त्वाची. हिची ओवीसंख्या सव्वा लक्ष आहे. एवढी विस्तृत गीताटीका मराठी भाषेत दुसरी नाही. ‘दासोपंती केला गीतार्णव मानवा सवा लाख’ असे तिच्याबद्दल मोरोपंतांचे उद्गार आहेत. सुबोध, ओघवती भाषा हे गीतार्णवाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ते स्वतः व्यासंगी वेदान्तवेत्ते होते. ह्या ग्रंथातही वेदान्तसिद्धांतांचे विवरण आलेले आहे. असे असूनही ग्रंथाचा सुबोधपणा सांभाळण्यासाठी वेदान्ताचे आवश्यक तेवढेच पारिभाषिक शब्द त्यांनी घेतलेले आहेत. अनेक मनोरंजक कथांचाही त्यांनी गीतार्णवात उपयोग करून घेतला आहे. गीतार्णव हा समुद्रासारखा म्हणून गीतार्थबोधचंद्रिका ही गीतेवरील लघुटीका त्यांनी लिहिली. गीतेचा नेमका भावार्थ थोडक्यात सांगण्याचा तो प्रयत्न आहे. दासोपंतांच्या अन्य उल्लेखनीय ग्रंथरचनेत पदार्णव, ग्रंथराज, पंचीकरण ह्यांचा समावेश होतो. ह्यांपैकी पंचीकरण हे १,६०० ओव्यांचे प्रकरण तर अडीच हात रुंद आणि चोवीस हात लांब अशा एका पासोडीवर त्यांनी लिहिले आहे. ह्यात विवेचनाबरोबर काही आकृत्याही आलेल्या आहेत. दासोपंतांनी एकनाथी वळणाची काही भारुडेही लिहिली. पदार्णवात विविध जातिवृत्तांतील भावपूर्ण आणि मधुर असी सव्वा लाख पदे आहेत. ग्रंथराज हा एक वेदान्तपर ग्रंथ. रामदासांच्या ⇨ दासबोधावर त्याचा मोठाच प्रभाव आहे. धुळ्याच्या शंकरराव देवांनी हा समग्रपणे प्रसिद्ध केला आहे.
दासोपंतांच्या गीतार्णवाचा आणि पदार्णवाचा फार थोडा भाग आज मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे. पदार्णवातील १,३९४ पदे महाराष्ट्र सारस्वत ह्या मासिकात प्रसिद्ध झाली. गीतार्णवाचे काही अध्याय (पहिला, दुसरा, बारावा, व तेरावा अपूर्ण) हे महाराष्ट्र–कवि ह्या मासिकात छापले गेले. मराठवाडा साहित्य परिषदेने दासोपंतांच्या पासोडीवरील ओव्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. हनुमदात्मजकृत ओवीबद्ध श्रीदासोपंत चरित्र उपलब्ध असून ते बरेच विश्वसनीय वाटते. ह्या चरित्राचे इंग्रजी भाषांतरही झालेले आहे (१९२७).
संदर्भ : भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत, (डॉ. शं. गो. तुळपुळे ह्यांच्या पुरवणीसह), मुंबई, १९६३.
सुर्वे, भा. ग.