दासबोध : समर्थ रामदासांचा आणि रामदासी संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ. ओवीसंख्या ७,७५१. ह्या ग्रंथांत एकूण वीस दशक असून प्रत्येक दशकात दहा समास आहेत. दोनशे समासांचा हा समर्थरचित ग्रंथ आज  दासबोध ह्या नावाने ओळखला जात असला, तरी समर्थ आपल्या प्रत्येक उपदेशाला ‘दासबोध’ असेच म्हणत असत, असे दाखवून देणारी प्रमाणे आहेत. आजच्या दोनशे समासी दासबोधापूर्वी एकवीस समासांचा एक दासबोध त्यांनी रचिलेला होता आणि समर्थ सांप्रदायिकांच्या हस्तलिखितांतून ‘जुना दासबोध’ असे त्याचे वर्णनही आढळते. दोनशे समासी दासबोधातील सातव्या दशकालाही एके कळी दासबोध असे संबोधिले जाई. रामदासी साहित्याचे एक अभ्यासक श. श्री. देव ह्यांनी दासबोधाचे एकूण तीन अवतार मानिले आहेत. एकवीस समासी दासबोध हा पहिला अवतार त्यानंतरचा दासबोध पहिल्या सहा दशकांपर्यंतचा, म्हणजे हा दुसरा अवतार सातवा दशक हा तिसरा अवतार. आजच्या वीस दशकी दासबोधातील आठवा दशक हा ‘ज्ञानदशक’ म्हणून ओळखला जातो. त्याचा उल्लेख चौथ्या आणि पाचव्या दशकाच्या दहाव्या समासांत आलेला आहे. उपर्युक्त सातव्या दशकाला ह्या आठव्या ज्ञानदशकाची जोड देऊन देवांनी ‘दशक ८ पर्यंतच काय तो दासबोध ग्रंथ अशी एकवार श्री समर्थांची कल्पना असावी’ आणि ‘पुढे शिष्यांनी वारंवार प्रश्न विचारून त्यांची उत्तरे देण्यात बरेच फुटकळ समास लिहिले गेल्यामुळे त्यांच्यात संगती जुळवून ते सर्व समास दासबोधांत सामील करण्यात आले असावे’ असा आपला अंदाज व्यक्तविला आहे. तथापि ह्या अंदाजाला भक्कम आधार नाहीत, असे न. र. फाटकांसारख्या अभ्यासकांनी दाखवून दिलेले आहे. वारकरी संप्रदायाच्या ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ह्यांसारख्या ग्रंथांप्रमाणे, आपल्या वाढत्या शिष्यसंप्रदायासाठी एखादा ग्रंथ रचून आपला सारा उपदेश व्यवस्थितपणे मांडून ठेवावा, असा विचार वीस दशकी दासबोध रचनेमागे संभवतो. हा ग्रंथ सिद्ध करण्यासाठी जुन्या एकवीस समासी दासबोधातील समासांचाही उपयोग करण्यात आलेला आहे. उदा., वीस दशकी दासबोधाच्या तिसऱ्या दशकातला दहावा समास म्हणून जुन्या दासबोधातील सहाव्या समासाची योजना करण्यात आली आहे. दासबोध हा केव्हा आणि कोठे रचिला गेला, ह्या प्रश्नांची उत्तरे निर्णायकपणे मिळालेली नाहीत. सहाव्या दशकाच्या चौथ्या समासात ‘चार सहस्र सातशे साठी । इतुकी कलियुगाची राहाटी’ असे म्हटले आहे. गतकली ४७६० म्हणजेच शके १५८१. ह्या उल्लेखावरून हा विशिष्ट समास मात्र इ. स. १६५९ मध्ये लिहिला गेल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हा ग्रंथ कोठे रचिला गेला, ह्याबाबतही एकमत नाही. शिवथरच्या घळीत तो लिहिला गेला, असे देवांचे मत आहे हनुमंतस्वामीच्या बखरीत समर्थ रामघळीस ग्रंथ लिहीत बसल्याचा उल्लेख आहे, तर समर्थप्रतापकार गिरीधर दासबोध सज्जनगडावर लिहिला गेल्याचे सांगतो. ‘आत्माराम दासबोध l माझे स्वरूप स्वतः सिद्ध’ ही समर्थांची दासबोधाकडे पाहण्याची दृष्टी होती, तसेच त्यांचा सारा उपदेश आणि तत्त्वज्ञान ह्या ग्रंथात एकवटलेले आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेता तो वेळोवेळी आणि ठिकठिकाणी लिहिला गेला असण्याची शक्यता अधिक आहे.

ह्या ग्रंथाचा पहिला समास स्तवनाचा असून ह्याच्या अगदी आरंभीच ग्रंथाचे दासबोध हे नाव आणि भक्तिमार्गाचे विशदीकरण हा त्याचा हेतू समर्थांनी स्पष्ट केलेला आहे. त्यानुसार मनुष्यजन्माचे सार्थक होण्यासाठी भक्तिमार्गाची आवश्यकता प्रतिपादन करीत असताना देहासक्तीचा निषेध त्यांनी केलेला असला, तरी भक्तीचा आविष्कार करण्यासाठीसुद्धा देह हेच माध्यम माणसाला उपलब्ध असल्यामुळे नरदेहाची त्यांनी स्तुतीही केली आहे. तथापि देहाची खरी उपयुक्तता ध्यानी न घेतल्यामुळे देहाभिमान आणि मीपण हे दोष ज्याच्या ठायी उत्पन्न होतात त्याला परमार्थ साधत नाही असा माणूस ‘बद्ध’ होय. मूर्ख, पढतमूर्ख, कुविद्य, करंटा, टोणपा आदी विशेषणे बद्धांना दिलेली आहेत. दुश्चितपण, आळस, झोप, संशय आणि भीड ही परमार्थमार्गातील मोठी विघ्ने होत. सदगुरुसेवा आणि अध्यात्मश्रवण ही त्यांना पराभूत करण्याची महत्त्वाची साधने. सावधपणा, साक्षेपीपणा व दक्षता हे गुण मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक आहेत. प्रतिमा, अवतार, अंतरात्मा आणि निर्विकारी ‘ऐसे हे चत्वार देव’ समर्थांनी मानलेले आहेत. ह्यांपैकी प्रतिमा आणि अवतार हे नश्वर सृष्टीचेच भाग होत. अंतरात्मा हा श्रेष्ठ कोटीतला आत्मा आणि अंतरात्मा एकच होत तो सृष्टीचा आरंभ त्याचा ध्यास घ्यावा आणि निर्गुण ब्रह्म गाठावे. तथापि अंतरात्मा चंचळ आहे तो अशाश्वताचा मस्तकमणी आहे ह्याचे भान सुटता कामा नये आणि खरा परमार्थ अंतरात्म्याच्या पलीकडे आहे, असा समर्थांचा अभिप्राय आहे. विश्वाच्या आरंभी आणि अखेरीस उरणारे तत्त्व म्हणजे ब्रह्म. ते निर्गुण, निराकार, निर्द्वंद्व, निश्चल आदी विशेषणांनी विवेचिलेले आहे.


निर्गुण, केवल परब्रह्माचा साक्षात्कार भक्तिपूर्वक करून घेणे, हे मनुष्याचे अंतिम ध्येय समर्थांनी दासबोधात वारंवार प्रतिपादिले. अंतिम सत्य किंवा परमार्थ म्हणजे निर्गुण परब्रह्म सत्ता होय, असे सांगितल्यामुळे दृश्य विश्व हे मायिक म्हणजे मायानिर्मित होय, हे शांकर वेदान्तातील मायावादाचे तत्त्व त्यांनी स्वीकारले. दृश्य विश्व हे क्षणभंगूर, सतत बदलणारे, चंचल असल्यामुळे विश्वाचे मूळ कारणही चंचल आहे, असे निगमन निघते. ह्या चंचल तत्त्वालाच समर्थांनी ‘माया’ म्हटले. वायू हा चंचल होय. त्यासारखीच माया चंचल असल्यामुळे मायेस त्यांनी कित्येकदा ‘वायू’ असेही म्हटले आहे. त्याचा अर्थ, पंचमहाभूतातला वायू नव्हे, हे लक्षात ठेविले पाहिजे. अंतरात्म्यासही चंचल म्हटले आहे, ह्याचे कारण शुद्ध परमात्म्याचा, मायारूप उपाधीमुळे अंतरात्मा हा आविष्कार बनला आहे. उपाधी चंचल, म्हणून ज्याचा उपाधी, तोही चंचल असा भास होतो. परब्रह्म हे मायेपासून अलिप्तच राहते.

हा ग्रंथ जरी अध्यात्मविद्येचे आणि परमार्थमार्गाचे विवेचन करणारा असला, तरी त्याने प्रपंचाने महत्त्वही आवर्जून मांडलेले आहे. ‘संसार त्याग न करिता lप्रपंचउपाधी न सांडिता l जन्मामध्ये सार्थकता l विचारेचि होय’ अशी समर्थांची धारणा आहे. तथापि प्रपंचाच्या ठायी आसक्ती ठेवावयाची असा ह्याचा अर्थ नाही. विवेकशील, अलिप्त वृत्तीने संसारात राहावे व असा संसार किंवा प्रपंच परमार्थाला पूरक ठरतो, अशी ही शिकवण आहे. ‘येहलोक’ आणि ‘परलोक’ हे दोन्ही साधणारा समर्थप्रणीत परमार्थ म्हणजे आध्यात्मिक मानवतावाद होय, असे मत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी मांडले आहे. हा आध्यात्मिक मानवतावाद ज्याच्या अंगी बाणला असले, तोच समर्थांचा ‘उत्तम पुरुष’ होय. ह्या उत्तम पुरुषाची वेधक चित्रे समर्थांनी दासबोधात अनेक ठिकाणी उभी केलेली आहेत. तो जसा सिद्ध, साधू, भक्त, संत, ज्ञानी तसाच तो निःस्पृह, व्यवहारचतुर, शहाणा आहे. उत्तम पुरुषाची कल्पना स्पष्ट करीत असताना दैनंदिन, व्यावहारिक जीवनात उपयुक्त अशा अनेक गुणांचे विवेचन समर्थांनी केलेले आहे.

‘राजकारण’ हा शब्द दासबोधात अनेकदा आलेला आहे. समर्थांनी हा शब्द निर्माण केला. अकराव्या दशकातील पाचवा आणि एकोणिसाव्या दशकातील नववा, असे दोन समास राजकारणाचे म्हणूनच आलेले आहेत. समर्थांनी हा शब्द कोणत्या अर्थाने योजिला, हा प्रश्न वादग्रस्त आहे. ‘पॉलिटिक्स’ किंवा राजनीती ह्या अर्थाने तो आला आहे, असे मानणारा एक पक्ष आहे तथापि युक्ती, शहाणपण, चातुर्य, तीक्ष्ण बुद्धी असा त्याचा अर्थ समर्थांना अभिप्रेत आहे, असे मत न. र. फाटक ह्यांनी मांडले आहे. समर्थांनी स्वीकारलेल्या ध्येयवादाला त्यांनी ‘देवकारण’ असे म्हटले आहे. सकळांची अंतरे जाणणाऱ्या निःस्पृह, अलौकिक पुरुषांनी करावयाची धर्मस्थापना हेच समर्थांचे राजकारण होते आत्म्याचे अनंत राजकारण म्हणजे विश्वप्रपंच ते जसे गुप्तपणे चालते, तसेच मानवी प्रपंचाचे राजकारण महंताने चालविले पाहिजे. असा समर्थांच्या शिकवणीचा अन्वयार्थ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी लावलेला आहे.

मानवी सद्‌गुणांचे परिवर्धन घडून लोक परमार्थप्रवण आणि कर्तृत्वसंपन्न व्हावेत, ही तळमळ दासबोधातून स्पष्टपणे प्रत्ययास येते. सामान्यांना समजतील इतक्या सुबोध पण सडेतोड भाषेत समर्थांनी आपले विचार मांडण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. त्यांतील अनेक उद्‌गारांना आज सुभाषितांचे स्वरूप आलेले आहे. परमार्थखेरीज कवित्व, लेखन आदी स्फुट विषयही दासबोधात आलेले आहेत. कवित्व हे परोपकारासाठी असावे, त्याने भगवद्‌भक्ती साधावी, अशी समर्थांची कवित्वविषयक भूमिका असून ती परमार्थाशीच निगडित आहे. धीट, धीटपाठ आणि प्रासादिक असे कवितेचे तीन प्रकार त्यांनी सांगितले आहेत. मनाला येईल ते बळेच धीटपणे लिहिणे, हा ‘धीट’ कवित्वाचा प्रकार. जे दृष्टीस पडले तेच भक्तीवाचून वर्णिले तर त्याला ‘धीटपाठ’ म्हणावयाचे. हे दोन्ही प्रकार हीन होत. कवित्व प्रासादिक असावे आणि देवकृपेने मुखातून निघणारे बोल प्रासादिक ठरतात, असे ते म्हणतात. कवींना त्यांनी ‘शब्दसृष्टीचे ईश्वर’ म्हणून संबोधिले आहे.

या ग्रंथाची महाराष्ट्रात अनेकांकडे श्रद्धापूर्वक पारायणे केली जातात. १९०५ साली धुळे येथील रामदासी साहित्याचे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव ह्यांनी कल्याणस्वामीने स्वहस्ते लिहिलेली दासबोधाची प्रत प्रसिद्ध केली आणि तिला स्वतःची एक विस्तृत प्रस्तावना जोडून ह्या ग्रंथाच्या अभ्यासाची एक दिशा दाखविली.

संदर्भ : १. फाटक, न. र. रामदास वाङ्मय आणि कार्य, मुंबई, १९५३.

          २. फाटक, न. र. श्रीसमर्थ चरित्र, पुणे, १९५१.

कुलकर्णी, अ. र.