दाशराज्ञ युद्ध: ऋग्वेदकाळी लढले गेलेले एक महत्त्वाचे युद्ध. हे युद्ध ऋग्वेदकाळी भरतवंशी राजा सुदास आणि त्याचे वायव्येकडील व पश्चिमेकडील शत्रू यांच्यामध्ये झाले. हे शत्रू दहा राजे होते असे ऋग्वेदात (७·८३·७) म्हटले आहे. म्हणून या युद्धाला दाशराज्ञ असे नाव पडले. त्या नावाचा उल्लेख ऋग्वेदात ७·३३·३ आणि ७·८३·७ या ऋचांमध्ये आला आहे. या युद्धाचे हुबेहुब वर्णन ऋग्वेदात ७·१८ या सूक्तात केले आहे. हे सूक्त वसिष्ठ ऋषींनी युद्धानंतर लागलीच रचलेले दिसते. ऋग्वेदात ७·३३ आणि ७·६३ यांतही या युद्धाचा उल्लेख आहे पण ती नंतरच्या काळात वसिष्ठगोत्री ऋषींनी रचली असावीत.
या युद्धाचे कारण विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्यामधील परस्पर मत्सर हे सामान्यतः मानले जाते. विश्वामित्र हा सुदासचा आरंभीचा पुरोहित होता. त्याने सुदासला विपाशा (बिआस) आणि शुतुद्रि (सतलज) या नद्यांच्या काठी आपल्या मंत्रसामर्थ्याने विजय मिळवून दिला होतो पण पुढे त्याचे त्या राजाशी बिनसले. नंतर सुदासने वसिष्ठांना आपला पुरोहित नेमले. म्हणून विश्वामित्राने दहा राजांना चिथावून त्यांच्याकडून सुदासच्या प्रदेशावर स्वारी करविली, असे मानण्यात येते पण त्याला ऋग्वेदातील वरील सूक्तांत आधार नाही. त्या युद्धात द्रुह्यूचा पुरोहित वृद्ध कवष होता. त्याचा उल्लेख ऋ. ७·१८·१२ आहे. पण विश्वामित्राचा उल्लेख त्या किंवा इतरही दोन सूक्तांत नाही तेव्हा या युद्धाचे कारण दुसरेच काही तरी असले पाहिजे.
ऋ. ७·१८·५ मध्ये दाशराज्ञ युद्धाच्या वर्णनापूर्वी इंद्राने सुदासकडून परुष्णी (रावी) नदी पार करवून पश्चिमेच्या शिम्यू नामक उद्धट शत्रूला शासन करविल्याचा उल्लेख आहे. यातूनच दाशराज्ञ युद्ध उद्भवले असावे. शिम्यूने दहा राजांना परुष्णी पार करून सुदासच्या राज्यावर आक्रमण करण्यास चिथावले असावे. सुदासचे राज्य परुष्णीच्या पूर्वेस सरस्वती, दृषद्वती आणि आपया या नद्यांच्या खोऱ्यात पसरले होते. पुढे दाखविल्याप्रमाणे त्याचे बहुतेक शत्रू परुष्णीच्या पश्चिमेकडील होते. त्यावरूनही हे अनुमान संयुक्तिक दिसेल.
सुदासचे शत्रू दहा होते असे ऋ. ७·८३·७ मध्ये म्हटले आहे. काहींच्या मते ‘दहा’ ही संख्या अनेकत्वद्योतक असावी. हे शत्रू दहाच असल्यास ऋ. ७·१८ या सूक्तांत उल्लेखिलेले असावे : असिक्नी किंवा चिनाब आणि परुष्णी किंवा रावी यांच्यामधील प्रदेशातील तुर्वश, द्रह्यू, अनू मथुरेच्या पश्चिमेचे मत्स्य व सरस्वतीच्या तीरावरचे पुरु हे पाच राजे आर्यवंशीय होते. यात काहींच्या मते मत्स्यांच्या ऐवजी यदूंची गणना होते. याशिवाय खालील टोळ्यांच्या प्रमुखांनीही या युद्धात भाग घेतला होता. काफिरीस्तानाच्या पूर्व भागातील अलिन, पख्तुनिस्तानातील पख्त, बोलन खिंडीजवळचे भलानस, सिंधुतीरावरील शिव आणि विषाणिन. याशिवाय पृश्निगु व दोन विकर्णवंश यांचाही या युद्धात पराभव झाल्याचा उल्लेख आहे.
या युद्धाचे सुस्पष्ट वर्णन वरील सूक्तात येते. प्रथम सुदासच्या शत्रूची सरशी होऊ लागली, तेव्हा वसिष्ठ पुढे झाले आणि त्यांनी आपल्या मंत्रसामर्थ्याने जयाचे पारडे फिरविले तेव्हा एखादा पुरोहित आसनाकरिता दर्भ कापतो त्याप्रमाणे सुदासने शत्रूंना कापून काढले. त्या रणयज्ञात तुर्वश पुरोडाश झाला (ठार मारला गेला). मत्स्य, भृगू आणि द्रुह्यू यांचीही तीच गती झाली. शत्रूंनी पळ काढला तेव्हा त्यांनी स्वरक्षणार्थ एकमेंकाना मदत केली. परुष्णी नदी दुथडीने भरून वाहत असल्यामुळे ती पार करताना कित्येक वाहून गेले. इतर काहींनी मूर्खपणाने तिचा प्रवाह वळविण्याचा प्रयत्न केला, पण त्यात शत्रू तसाच त्याचा शहाणा पुरोहित हे दोघेही कामास आले. इंद्राने आपल्या वज्राने परुष्णीच्या प्रवाहात द्रुह्यू आणि त्याचा पुरोहित कवष या दोघांनाही जलसमाधी दिली. त्याने शत्रूंचे सातही दुर्ग आणि इतर दुर्भेद्य आश्रयस्थळे यांचा नाश करून अनूच्या वंशजांची संपत्ती सुदासपक्षीय तृत्सूंना दिली. लुटीकरता आलेल्या अनू आणि द्रुह्यू यांचे प्रत्येकी सहा हजार योद्धे रणभूमीवर शयन करते झाले. इंद्राने त्यांच्या सहासष्ट सेनानायकांना ठार केले. ते सुदासपक्षीय तृत्सू पाण्याच्या भयंकर प्रवाहाप्रमाणे शत्रूवर तुटून पडले, तेव्हा कंजूष शत्रूंनी आपली सर्व संपत्ती रणांगणांवर टाकून पळ काढला. सुदासची सेना थोडी होती, तरी एखाद्या बकऱ्याने सिंहीणीला ठार करावे, त्याप्रमाणे इंद्राने तिला तो अपूर्व विजय मिळवून दिला.
सुदासने दहा राजांवर विजय मिळविला खरा, पण त्याला त्यांचा पाठलाग करता आला नाही असे दिसते. कारण त्याच वेळी पूर्वेकडील भेदनामक शत्रूच्या आधिपत्याखाली अज, शिग्रू आणि यक्षू या आर्येतर टोळ्यांशी यमुनेच्या परिसरात त्याला सामना द्यावा लागला. याही युद्धात त्याला जय मिळाला, तेव्हा शत्रूंनी त्याला उत्कृष्ट अश्वांचे नजराणे दिले.
ऋ. ७·१८ या सूक्तांच्या अखेरच्या ऋचांत सुदासने या युद्धात मिळालेल्या विजयाने आनंदित होऊन वसिष्ठांना दिलेल्या देणग्यांचे वर्णन आहे. त्याने त्याला दोनशे गाई, घोड्या जुंपलेले दोन रथ आणि सुवर्णालंकारांनी सजविलेले चार घोडे दिले. शेवटी सातही नद्या सुदासची कीर्ती गात आहेत त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि त्याचे राज्य चिरकाल चालो अशी मरुतांची प्रार्थना वसिष्ठांनी केली आहे.
या युद्धाचा काळ बऱ्याचशा निश्चितपणे ठरविता येतो. पुराणात म्हटले आहे की, सृंजय हा भारतीय युद्धापूर्वी ३० पिढ्या होऊन गेला. प्रत्येक पिढी १५ वर्षांची मानल्यास त्याचा काळ ख्रि.पू. १८५० हा येतो. कारण भारतीय युद्ध ख्रि.पू. १४०० च्या सुमारास झाले होते असे दिसते. सुदासनंतर चार पिढ्यांनी सृंजय होऊन गेला. म्हणून सुदासचा काळ सु. ख्रि. पू. १९०० असा येतो. हे काळ अर्थातच अनुमानाने ठरविले आहेत. त्यात थोडीबहुत चूक असण्याचा संभव आहे.
संदर्भ : Majumdar, R. C. Ed. The Vedic Age, London, 1957.
“