दारूगोळा : शत्रूपक्षातील सैनिक तसेच शत्रूचे युद्धसाहित्य वा महत्त्वाचे बांधकाम (उदा., कारखाने, पूल, विद्युत केंद्रे इ.) यांची नाश–नुकसानी करण्याकरिता तोफांतून उडविण्यात येणारे विविध प्रकारचे गोळे तसेच बंदुका, पिस्तुले यांतून उडविण्यात येणाऱ्या गोळ्या व तदनुषंगिक विविध प्रकारची दारू धारण करणारी काडतुसे, असा या शब्दाचा अर्थ प्रामुख्याने होतो. थोड्या व्यापक अर्थाने यात आखूड पल्ल्याची क्षेपणास्त्रे, हातबाँब व इतर अनेक प्रकारचे बाँब, भुईसुरुंग, पाणसुरुंग, पाणतीर (टॉर्पेडो) इ. व या सर्वांमध्ये इष्ट कार्य इष्ट रीतीने घडावे याकरिता योजलेले ज्वलनशील, स्फोटशील दारूचे विविध प्रकार आणि त्या त्या दारूचे ज्वलन वा स्फोट यांचे नियंत्रण करणारी फ्यूझसारखी साधने यांचाही समावेश होतो. अधिक दूरान्वयाने मोठ्या तोफांतून उडविण्याकरिता सिद्ध केलेले अणुकेंद्रीय बाँब तसेच अणुकेंद्रीय विनाशाग्रे लावलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे यांचाही समावेश या शब्दात होतो.
काजरेकर, स. ग.
दारूगोळ्याच्या वापरासाठी नियंत्रक सैनिक, क्षेपक (तोफ किंवा तत्सम) व दारूगोळ हे त्रिकूट लागते. दारूगोळ्याचा उपयोग आक्रमणाबरोबरच संरक्षणासाठीही केला जातो. शत्रूची आक्रमक गोळामारी निष्प्रभ करण्यासाठी प्रतिगोळामारी केली जाते. संरक्षक दारूगोळा वेगळ्या प्रकारचा असतोच असे नाही. आघात, तोडणे–फोडणे, घुसणे आणि आग लावणे या चार मूलक्रिया दारूगोळ्याच्या साहाय्याने केल्या जातात.
इतिहास: स्फोटक दारूचा शोध लागण्यापूर्वी दगडधोंडे, बाण, भाला, अग्निगोळा इत्यादींचा वापर केला जाई व त्यांच्या क्षेपणासाठी हात, धनुष्य, गोफण यांसारख्या साधनांचा उपयोग करीत असत.
इ.स. सातव्या–आठव्या शतकांत किंवा त्यापूर्वी भारतात प्रथम स्फोटक दारूचा शोध लागून आसाममार्गे तो चीनमध्ये पोहोचला, असे म्हणतात. पण याच काळात हा शोध चीनमध्ये लागला असेही काहींचे म्हणणे आहे. परकीयांच्या आक्रमणातून जाट, राजपूत परागंदा होऊन यूरोपात गेले आणि तेथे तोफनळी व दारू यांचे ज्ञान प्रसृत झाले, असेही म्हटले जाते. तथापि दारूचा शोध प्रथम आशियातच लागला, हे मात्र सत्य आहे. तेराव्या शतकात तुर्क–मोगलांनी यूरोपवरील आक्रमणात दारूचे अग्निबाण वापरले होते व त्यांसाठी बांबूच्या नळ्यांचा उपयोग केला होता. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीपासून अरबांनीही तोफा व दारूगोळा यांचा वापर केला होता. यूरोपात कलशसदृश क्षेपकांतून बाण फेकीत असत. इ. स. १३२४, १३४२ व १३४६ मध्ये यूरोपात अनुक्रमे मेट्स, अल्जसिरस व क्रेसी येथील लढायांत दारूगोळा वापरला गेला. द. भारतात प्रथम बहमनी राज्यकर्त्यांनी अडोणीच्या वेढ्यात (१३६८ साली) दारूगोळा वापरला. तथापि तत्कालीन दारूगोळ्याचे वर्णन उपलब्ध नाही. भारतात वा चीनमध्ये दारूचा शोध लागला हे खरे असले, तरी त्यात सुधारणा करण्याचे कार्य यूरोपातच झाले. तेराव्या–चौदाव्या शतकांनंतरच्या पुढील पाचशे वर्षात यूरोपात दारूगोळा व तोफा–बंदुका यांत सुधारणा करण्याचे जोरदार प्रयत्न झाले. यूरोपीयांची साम्राज्ये जगभर पसरण्यात त्यांनी केलेल्या दारूगोळ्यातील प्रगतीचा फार मोठा वाटा आहे. ग्रेनेड (१३८२), धूरगोळे (१४०५), आगगोळे (१४००–५०), काशाचे गोळे (१४६३) इत्यादींचा शोध लागून त्यांचे उत्पादन सुरू झाले. तोफा व दारूगोळा बनविणाऱ्या तज्ञांचा व कुशल कामगारांचा वर्ग निर्माण झाला. तत्कालीन बंदुकीच्या गोळ्यांचा व्यास सामान्यपणे एक सेंमी. असून वजन ५० ते ६० ग्रॅम असे. गोळ्या एकसंध नसत. दारू व शिशाची गोळी वेगळी असे. ठिणगी लावून दारूचा स्फोट होई व गोळी फेकली जाई. तोफगोळेही याच तऱ्हेने उडविले जात. दारूगोळ्याचा उपयोग तटबंदी फोडण्यासाठी व सुरुंगासाठी केला जाई.
सोळाव्या–सतराव्या शतकांत लोखंडी घनगोळे, पोकळ गोळ्यात स्फोटक दारू असलेला बाँब, लोखंडी पत्र्याच्या दंडगोलात लोखंडी तुकडे भरलेला कॅनिस्टर आणि लोखंडी व शिशाच्या बंदुकीच्या गोळ्या असलेला द्राक्ष्याच्या घडाप्रमाणे एकत्र बांधलेला गोळा (ग्रेप शॉट) असे दारूगोळ्याचे चार नवीन प्रकार पुढे आले. त्यांच्या उपयोगाने तटबंदी फोडणे तसेच उघड्या जागेवर असलेल्या सैनिकांना जायबंदी करणे शक्य झाले. बंदुकीचा पल्ला ३०० मी. पर्यंत वाढला. १५९५ च्या सुमारास इंग्लंडमध्ये सैनिकांच्या हातात सर्रास ठासणी बंदुका (मस्केट) आल्या. या काळातील तोफगोळ्यांचे वजन १५० ग्रॅ. पासून १०० किग्रॅ. पर्यंत असून त्यांचा व्यास २·५ सेंमी. पासून ३५·५ सेंमी. पर्यंत असे. तोफगोळ्यांचा पल्ला २०० ते १,००० मी. पर्यंत असे. जहाजांवरही तोफा बसविण्यास सुरुवात होऊन भर समुद्रातही लढाया होऊ लागल्या. मध्ययुगीन तटबंद्या दारूगोळ्यापुढे निष्प्रभ ठरल्या व गोल बुरूजांची जागा तोफा बसविलेल्या जाड त्रिकोणी बुरूजांनी घेतली. बंदुकीच्या गोळ्या काडतुसाच्या स्वरूपात म्हणजे प्रक्षेपक दारू व शिशांची गोल गोळी एकत्रित असलेल्या स्वरूपात उपलब्ध होऊन बंदुकीचा गोळीबार मिनिटाला एक गोळी या प्रमाणात होऊ लागला. वातीच्या ठिणगीऐवजी बंदुकीत फ्लिंट (गारगोटी) चापाची योजना करण्यात आली. १२, ६ व १·५ किग्रॅ. वजनांचे सुटसुटीत दारूगोळे प्रचारात आल्यामुळे गोळामारीची घनता व वेग वाढला. १७८४ साली इंग्रज लेफ्टनंट श्रॅप्नल यांनी जमिनीपासून थोड्या उंचीवर फुटणाऱ्या, श्रॅप्नल याच नावाने ओळखण्यात येणाऱ्या, तोफगोळ्याचा शोध लावला. त्यामुळे खुल्या मैदानावर लढणाऱ्या सैनिकांचे जीवित धोक्यात आले. अमेरिकेत व्हिटनी यांनी बहूत्पादनाच्या तत्त्वावर बंदुकांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढविले. जर्मनीच्या क्रप कारखान्यात पोलादाच्या भक्कम तोफा तयार करण्यास आरंभ झाल्यामुळे भारी तोफगोळे वापरणे सुलभ झाले. काडतुसाला आघात वाटी (पर्कशन कॅप) जोडल्यामुळे प्रक्षेपक दारूच्या ठिणगीऐवजी आघाताने गोळीबार करणे शक्य झाले. ‘मिनी’ या बंदुकीच्या गोळीमुळे गोळीबाराचा पल्ला वाढला. इंग्रज कर्नल काँग्रीव्ह यांनी भारतातूनच हैदर अली व टिपू सुलतान यांनी वापरलेल्या अग्निबाणाची कल्पना पश्चिमी देशांत नेली. बॉलॉन्य (१८०६), कोपनहेगन (१८०७), आडूर (१८१३) व वॉटर्लू (१८१५) येथील वेढ्यांत व लढायांत अग्निबाण वापरले होते. ब्रह्मदेश पादाक्रांत करतानाही (१८२५-२६) इंग्रजांनी अग्निबाण वापरले. महाराजा रणजितसिंग यांनी दारूगोळा बनविण्याचे कारखाने अमृतसर इ. ठिकाणी काढून यूरोपीय दर्जाचे तोफगोळे तयार केले. हात–ग्रेनेडमध्ये सुधारणा झाल्यामुळे सैनिकांची संहारशक्ती वाढली. अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत यूरोपात तोफगोळ्यांचे घन (सॉलिड), द्राक्षी (ग्रेप), स्फोटक (एक्स्प्लोझिव्ह), कॅनिस्टर व श्रॅप्नल असे पाच प्रकारांत प्रमाणीकरण झाले. शत्रूची सैनिकी रचना, तटबंदी, तोफमोर्चे इ. फोडण्यासाठी विविध प्रकारचा दारूगोळा उपलब्ध झाला. भारतात मराठ्यांनी तोफगोळ्यांचे पुणे, सोनोरी इ. ठिकाणी कारखाने काढले होते पण त्यांचा दर्जा निकृष्ट होता. सैनिकांच्या डोक्यांवर फुटणाऱ्या कॅनिस्टर व श्रॅप्नल या गोळ्यांचा उपयोग इंग्रजांनी सुरिनॅम येथे प्रथम केला.
इ.स. १८५० ते पहिल्या महायुद्धाअखेर (१९१८) दारूगोळ्यात लक्षणीय प्रगती झाली. धातूच्या जाड पत्र्याचा भेद करणाऱ्या (चिलखतभेदी) आणि व्यक्तिसंहारक दारूगोळ्यात सुधारणा झाल्या. घनगोळे वापरातून गेले. लांबट सुप्रवाही स्फोटगोळे, लांबट शंक्वाकार बंदुकीच्या गोळ्या, बिनधुराची दारू, सुरुंग, ‘बूबी’ सापळे (बेसावध माणसाच्या एखाद्या हालचालीने, उदा., एखादी निरुपद्रवी वाटणारी वस्तू हलवण्याने, सहज स्फोट पावेल अशा रीतीने लपविलेला बाँब वा सुरुंग), उखळी (मॉर्टर) तोफगोळे असा नवीन दारूगोळा यूरोपात तयार होऊ लागला. परिणामतः तोफा–बंदुकांचा मारा तर वाढलाच, पण गोळामारी कोठून होत आहे हे समजणे कठीण झाले. नाविक तोफांचा व्यास ३० सेंमी. इतका महाकाय झाला आणि त्यामुळे चिलखती व पोलादी नौ–काया असलेली जहाजे फोडणे वा जाळणे शक्य झाले. १८५०–१९०० या काळात उपलब्ध झालेला दारूगोळाच बहुतांशी पहिल्या महायुद्धात वापरण्यात आला.
दुसऱ्या महायुद्धकाळात (१९३९–४५) आणि त्यानंतर रणगाडे व विमाने यांच्या रणांगणातील वर्चस्वामुळे रणागाडाभेदी दारूगोळ्यात बरीच विविधता आली. चिलखतभेदी तोफगोळ्यांची भेदक शक्ती जसजशी वाढत गेली, तसतशी चिलखताची जाडी वाढविण्यात आली. ब्रिटिशांजवळ प्रारंभी सु. ०·९ किग्रॅ. (२ पौंडी) रणगाडाभेदी गोळे होते, पण क्रमाक्रमाने त्यांना सु. ७·७ किग्रॅ. (१७ पौंड) पर्यंतचे गोळे वापरावे लागले. लढाऊ विमाने टिपण्यासाठी १८ किग्रॅ. वजनाचे स्फोटगोळे लागले. पुढे विलंबित (ठराविक कालावधीनंतर स्फोट होणारे) स्फोटगोळे वापरात आले. त्यांसाठी निरनिराळ्या फ्यूझ यंत्रणा शोधण्यात आल्या. उदा., चलसमय (व्हेरिएबल टाइम) फ्यूझ, सामिप्य (प्रॉक्झिमिटी) फ्यूझ इत्यादी. त्यामुळे गोळे वा बाँब हव्या त्या क्षणी व स्थानी टाकणे आणि त्यांचा स्फोट करणे शक्य झाले. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैनिकांविरुद्ध ज्वालाक्षेपकही मोठ्या प्रमाणात वापरले गेले. अग्निबाणांचा उपयोग एकोणिसाव्या शतकाअखेर बंद झाला होता त्यांचे दुसऱ्या महायुद्धात पुनरुज्जीवन करण्यात आले. विमानातून व इतर क्षेपकयंत्रणातून ते टाकले जातात. अग्निबाणांची संहारशक्ती त्यांच्या इतक्याच वजनाच्या गोळ्यांहून जास्त असते. जर्मनांनी व रशियनांनी या क्षेत्रात बरीच प्रगती केली होती. १९४५ पासून अमेरिकेत व १९४९ पासून रशियात व तदनंतर इतरही काही देशांत अण्वस्त्रे तयार होऊ लागली. यामुळे पारंपारिक दारूगोळा व अण्वस्त्रे असे प्रकार निर्माण झाले. व्हिएटनामच्या युद्धात अमेरिकेने व्यक्तिनाशक दारूगोळ्यात व ‘बूबी’ सापळ्यात मोठी प्रगती साधली. ‘क्लेमोर’ या सुरुंगाचे तुकडे हवेत न उडता जमिनीसपाट उडतात. ‘ग्लॅड आय्’ व ‘सॅड आय्’या गोळ्यांतून अनेक छोट्या बाँबचा चोहीकडे वर्षाव होतो. रासायनिक व स्फोटक गोळे टाकून फुटबॉलच्या मैदानाएवढे क्षेत्र अल्पावधीत बेचिराख करता येते.
दुसऱ्या महायुद्धानंतर जरी अण्वस्त्रांचे युग उदयास आलेले असले, तरी नियंत्रित वा सीमित युद्धांत तसेच गनिमी युद्धतंत्रात पारंपारिक दारूगोळा आणि शस्त्रास्त्रेच वापरणे सोयीचे ठरते असे कोरिया, व्हिएटनाम इ. देशांत झालेल्या युद्धांमधून दिसून आले आहे.
दीक्षित, हे. वि.
पारिभाषिक संज्ञा : दारूगोळ्याच्या बाबतीत मेट्रिक व ब्रिटिश या दोन्ही मापन पद्धती प्रचारात असल्यामुळे प्रस्तुत नोंदीत दोन्ही पद्धतीचा जरूरीनुसार वापर केलेला आहे. तोफगोळ्यांचे तसेच बंदुकांच्या गोळ्यांचे आकारमान गोळ्यांच्या व्यासाच्या उल्लेखाने सांगण्याचा प्रघात आहे. उदा., ‘७५ मिमी.’ गोळा हा ‘७५ मिमी.’ अंतर्व्यास असलेल्या तोफेच्या नळीतून उडविला जातो. ‘०·३०३ इंच’ बंदुकीच्या गोळीचा अर्थ याप्रमाणेच लावावयाचा. क्वचित तोफगोळ्याच्या वजनावरून त्याचा व त्याच्या तोफेचा उल्लेख करतात उदा., ‘२५ पौंडी’ तोफगोळा उडविणारी ‘२५ पौंडी’ तोफ. तोफा व त्यांचे गोळे यांच्या व्यासाला वरची मर्यादा ठरलेली नाही, उपयुक्ततेने. पण या शब्दांनी व्यक्त होणाऱ्या पदार्थांच्या व्यासाची खालची मर्यादा २५ मिमी. ही संकेताने ठरली आहे. या मर्यादेखालील व्यासाच्या बंदुका, पिस्तुले आदी शस्त्रांना ‘लघुशस्त्रे’ (स्मॉल आर्म्स) व त्यांतून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या वस्तूंना लघुशस्त्रांचा दारूगोळा म्हणतात. अमेरिकेत ही मर्यादा १५ मिमी. धरतात.
दारूगोळ्याच्या तंत्राचा विकास : मध्ययुगीन तंत्र : बंदुकीच्या दारूचा शोध लागल्यानंतर [ → बंदुकीची दारू]. तिच्या साह्याने तोफेच्या तसेच बंदुकीच्या नळीतून योग्य आकाराच्या गोळ्याचे वा गोळीचे प्रक्षेपण घडवावे, हे रणनीतिज्ञांना सुचणे साहजिकच होते. त्यानुसार मागचे तोंड बंद असलेल्या पोलादाच्या नळीत आधी पुरेशी काळी दारू ठासून, तिच्यावर घट्ट बसेल असे मऊ लाकडाचे बूच बसवून त्यावर (किंवा बूच न बसवता प्रत्यक्ष दारूवरच) नळीच्या अंतर्व्यासापेक्षा किंचित कमी व्यास असलेला असा दगड, शिसे, कासे यांपैकी योग्य पदार्थांचा बनविलेला गोळा बसवून तो उडविण्याचा उपक्रम काही शतके चालू होता. नळीच्या बुडापाशी बाजूला एक लहान छिद्र पाडलेले असे व त्यातून घातलेल्या फटाक्याच्या वातीसारख्या वातीने नळीतील दारू पेटविली जात असे. लहान व्यासाच्या नळ्यांतून धातूचे गोळे उडविले जात, तर मोठ्या व्यासाच्या नळ्यांतून दगडाचे गोळे उडवीत. धातूचे गोळे तेवढ्याच आकाराच्या दगडाच्या गोळ्यापेक्षा अधिक वजनदार असल्याने त्यांच्या दडपणामुळे नळीतील ज्वलनोद्भव उष्ण वायूंचा जोरदार कोंडमारा होऊन तोफच फुटण्याचा संभव असल्याने तोफांमधून उडविण्याकरिता दगडाचे गोळे वापरीत. काही प्रसंगी एका गोळ्याऐवजी मध्यम आकाराचे अनेक गोळे तोफेतून एकाच वेळी उडवून अधिक विस्तृत क्षेत्रावर गोळामारी केली जाई.
दारू व छर्रे भरलेले गोळे : सोळाव्या शतकाच्या सुमारास तोफगोळ्यांच्या स्वरूपात एक सुधारणा झाली. काळ्या दारूने भरलेले पोकळ गोळे उखळी तोफांतून उडविण्याचा उपक्रम सुरू झाला. गोळ्यामध्ये काळी दारू भरून, त्याचे तोंड बंद करून व गोळ्याला पाडलेल्या लहान छिद्रात वात बसवून गोळा उडविण्यात येई. या सुधारणेची पुढची पायरी म्हणजे कुलपी गोळ्यांचा प्रयोग सुरू झाला. योग्य आकाराच्या पत्र्याच्या गोळ्यात दारू व लहान गोळे, धातूचे टोकदार तुकडे इ. एकत्र दाबून भरीत व गोळा उडवीत. लक्ष्यावर पोचल्यावर गोळ्यातील दारूचा भडका उडून आग लागावी व शिवाय आतील लहान गोळे, धातुखंड इ. सर्वत्र उडावेत ही योजना असे.
बंदुकांच्या बाबतीत मात्र अठराव्या शतकापर्यंत फारशी प्रगती झाली नाही. नळीत ठासलेल्या दारूवर शिशाची एक गोळी किंवा अनेक लहान गोळ्या–छर्रे–बसवून उडविणे हीच पद्धती आधीची सु. चार शतके चालू होती.
तोफा व बंदुका यांच्या रचनेतील प्रगती : पुढे एकोणिसाव्या शतकात तोफांच्या व बंदुकांच्या रचनेत व कार्यपद्धतीत दोन महत्त्वाच्या सुधारणा झाल्या. पहिली सुधारणा म्हणजे दारू व गोळा नळीत भरावयाचा, तो तिच्या मुखावाटे न भरता तिच्या मागील बाजूस त्यासाठी बनविलेल्या सोयीच्या द्वारातून (पश्चद्वारातून, ब्रीचमधून) भरता यावा अशी योजना सिद्ध झाली. गोळा व दारू आत भरल्यानंतर हे द्वार असे पक्के बंद करता येते की, नळीतील दारूचा भडका उडाल्याने निर्माण होणारे उष्ण, दाबयुक्त वायूही कुठल्या फटीतून मागे बाहेर पडू शकत नाहीत. दुसरी महत्त्वाची सुधारणा म्हणजे शस्त्राच्या नळीच्या आतील पृष्ठभागावर सर्पिल किंवा मळसूत्री वळणाच्या पन्हळी कोरण्याचे तंत्र सिद्ध झाले. या पन्हळी चौकोनी छेदाच्या व अल्प खोलीच्या असतात. आ. १ वरून ही रचना समजेल. या रचनेला ‘रायफलिंग’ म्हणतात व बंदुकांच्या बाबतीत यथार्थतेने अशी रचना असलेल्या बंदुकीला ‘रायफल’, तर नळीचा आतील पृष्ठभाग गुळगुळीत असलेल्या बंदुकीला, उदा., शिकारीच्या बंदुकीला, ‘गन’ म्हणतात.
गोळ्याच्या (गोळीच्या) आकारातील सुधारणा : शस्त्राच्या नळीतील मळसूत्राच्या अनुषंगाने प्रक्षेप्य गोळ्याच्या वा गोळीच्या आकारात एक महत्त्वाची सुधारणा झाली, ती म्हणजे या वस्तू इतःपर गोलाकार न राहता त्यांचा आकार लांबट व पुढील टोकास निमुळता केला गेला. यामुळे त्या प्रक्षेप्य वस्तूंना होणारा हवेचा विरोध कमी होऊन पल्ल्याचे अंतर वाढू शकले. दुसरी गोष्ट कठीण पोलादाच्या नळीतून पुढे जाताना गोळ्याचा किंवा गोळीचा नळीला चिकटणारा व तुलनेने नरम असणारा पृष्ठभाग या पन्हळींच्या मळसूत्रात घट्ट बसून पुढे जात असल्याने या प्रक्षेप्य वस्तूंना पुढे घुसण्याच्या वेगाबरोबरच स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याचा-फिरकीचा–वेग प्राप्त होतो व तो प्रती मिनिटाला काही हजार फिरक्या इतका असतो. यामुळे लक्ष्याकडे झेपावताना त्यांचे अग्र सदैव पुढे राहून वाटेत उलटेपालटे होण्याचा संभव मुळीच उरत नाही व लक्ष्यावर अचूक पोहोचण्याची क्षमता वाढते. प्रक्षेप्य वस्तू नळीतून पुढे जात असताना वस्तू व नळी यांमध्ये फट उरण्याचा व तीतून वस्तूमागील दाबयुक्त वायू बाहेर पडून वाया जाण्याचा संभवही उरत नाही.
प्रक्षेपक दारूचे नवे स्वरूप-निर्धूम दारू : गोळ्याचे प्रक्षेपण घडविणाऱ्या नळीमध्ये झालेल्या वरील सुधारणांबरोबरच प्रक्षपक दारूमध्ये व ती प्रज्वलीत करणाऱ्या साधनांमध्ये आमूलाग्र सुधारणा झाली. काळ्या दारूची जागा नायट्रोसेल्युलोज, नायट्रोग्लिसरीन (आणि अलीकडे काही विशेष मिश्रणांत त्यांच्या भरीला नायट्रोग्वानिडीन) या संयुगांपासून बनविलेल्या व सु. तिपटीने अधिक शक्तिशाली असणाऱ्या दारूने घेतली. या दारूचा धूर होत नाही (किंवा अत्यल्प होतो) व गोळा उडाल्यानंतर मागे नळीत रक्षाही प्रायः राहत नाही, तसेच दमट हवेपासूनही तिला फारसा धोका नसतो. काळ्या दारूत हे दोष प्रकर्षाने असतात. तिच्या साहाय्याने प्रक्षेपित केलेल्या गोळ्याच्या पाठोपाठ तोफेच्या नळीतून धुराचा मोठा लोट बाहेर पडे व तोफेची जागा शत्रूच्या ध्यानी येण्याचा धोका असे. धुराप्रमाणेच काळ्या दारूच्या राखेचे प्रमाणही मोठे असल्याने तिची राख तोफेत साठून राही व तिची सफाई हा मोठाच प्रश्न असे.
नवसंशोधित निर्धूम दारूमध्ये वर उल्लेखिलेले गुण असले, तरी तिची अग्निसंवेद्यता (सुलभतेने पेटण्याची क्षमता) पुरेशी नसते, उलट काळी दारू बऱ्याच अधिक प्रमाणात अग्निसंवेद्य आहे. यामुळे तोफेच्या काडतुसातील निर्धूम दारू नीट पेटावी म्हणून थोडी काळी दारू अनिवार्यतेने वापरावी लागते.
प्रक्षेपक दारू पेटविण्याच्या तंत्रातील सुधारणा : काडतुसातील दारू वातीने पेटवावी लागण्याची गैरसोयीची पद्धतही क्रमाने बंद होऊन तिची जागा नव्या सोयीच्या तंत्राने घेतली. ह्या तंत्राचा आराखडा पुढीलप्रमाणे आहे: ‘अल्प जोराच्या आघाताने ठिणगीमध्ये रूपांतरित होणाऱ्या विशिष्ट सुलभचेतन दारूमिश्रणाची ठिणगी काडतुसात निर्धूम’ दारूच्या मध्यभागी बसविलेल्या प्रायमरमधील (ज्वलनवर्धकातील) काळ्या दारूच्या खड्यांवर पाडून त्यांचे ज्वलन प्रथम घडवायचे व त्याने निर्माण होणाऱ्या पुरेशा मोठ्या आकाराच्या ज्वालेने प्रक्षेपणाला मुख्यत्वे साह्यभूत होणाऱ्या निर्धूम दारूचे प्रज्वलन घडवायचे.’ यातील तपशील पुढे थोडक्यात दिला आहे. सर्वप्रथम ज्या दारूपासून ठिणगी निर्माण व्हावयाची, ती आद्यस्फुरी दारू मर्क्युरी फल्मिनेट, पोटॅशियम क्लोरेट, अँटिमनी सल्फाइड इ. पदार्थांच्या मिश्रणाची बनवलेली असते (फल्मिनेटरहित दुसरीही मिश्रणे वापरात आहेत) व तांब्यासारख्या मऊ धातूच्या अगदी लहान आकाराच्या एका वाटीत (पर्कशन कॅपमध्ये) तिचा पातळ थर दाबून बसवून त्याच्यालगत वर पत्र्याची एक पातळ चकती चिकटवून दारूमिश्रण हवाबंद केलेले असते. ही वाटी तोफेच्या वा बंदुकीच्या काडतुसाच्या मागील बाजूस ती साठी केलेल्या खोबणीत तिचे तोंड पुढे करून घट्ट बसविलेली असते. काडतूस आपल्या जागी व्यवस्थित बसविल्यावर व शस्त्राचे पश्चद्वार बंद केल्यावर गोळा (वा गोळी) उडविण्याकरिता जेव्हा शस्त्राचा घोडा ओढला जातो, तेव्हा स्प्रिंगच्या जोरामुळे शस्त्राच्या धोट्याचे (आघात करणाऱ्या सळईचे स्ट्रायकरचे) निमुळते बोथट टोक वाटीच्या पाठीवर आदळते आणि या आघाताने वाटीची पाठ आत दाबते. हे घडताच दारूच्या थराच्या पृष्ठभागापासून अल्प अंतरावर असणारा काडतुसातील एक उंचवट्याचा भाग आणि वाटीची पाठ यांमध्ये दारू चिरडली जाते आणि ठिणगी उत्पन्न होते. ठिणगीचे तापमान आणि आकारमान हे जवळची काळी दारू पेटविण्यास पुरेसे असतात.
विशिष्ट दारू आघाताने चिरडून स्फुल्लिंग निर्माण करण्याच्या या आघाताद्वारे पेटविण्याच्या योजनेमुळे वातीने दारू पेटविण्याची जुनी गैरसोयीची पद्धती अर्थातच वापरातून गेली.
आधुनिक दारूगोळ्याच्या काही प्रकारांत वाटीतील आद्यस्फुरी दारू वीजप्रवाहाने पेटविण्याची व्यवस्थाही आवश्यकतेनुसार केलेली असते.
क्रमाने वाढत्या आकारमानाच्या व वाढत्या तीव्रतेच्या ज्वालांची अशी मालिका (पेटमालिका) सिद्ध करणे, हे गोळा तोफेतून उडविण्याकरिता लागणारे अनिवार्य तंत्र आहे. आ. २ वरून या मालिकेतील टप्पे समजतील तसेच काडतूस, त्यातील आघात–वाटी व ज्वलनवर्धक यांच्या रचना आणि त्यांची जुळणी ध्यानी येईल. ज्वलनारंभ करणारी आघात–वाटी व ज्वलनवर्धन करणारी प्रायमरची नळी यांच्या एकत्रित जुळणीलाही ‘प्रायमर’ म्हणण्याचा प्रघात आहे.
बंदुकांच्या काडतुसांच्या बाबतीत त्यांमधील निर्धूम दारूचे तुकडे लहान आकारमानाचे असल्याने त्यांना प्रज्वलित करण्यास काळ्या दारूची जरूरी नसते. आघात–वाटीमधील ठिणगीने ते सुलभतेने पेटतात.
काडतुसातील दारूचे प्रज्वलन योग्य तऱ्हेने होऊन गोळ्याला नळीच्या मुखातून निघताना नियोजित वेग मिळावा याकरिता दारूतील घटक पदार्थांचे परस्परप्रमाण, तसेच तिच्या दाण्यांचे विशिष्ट आकार व आकारमान यांची योग्य योजना केलेली असते. जेणेकरून दारूचे प्रज्वलन सुरू झाल्यानंतर नळीत निर्माण होणारा उष्ण वायूंचा दाब व दाबाच्या वाढीचे प्रमाण इष्ट तसे राहते व गोळा नळीतून पुढे जात असताना त्याची वेगवाढ इष्ट तशी होऊन नळीच्या तोंडातून बाहेर पडताना गोळ्याला नियोजित वेग येतो.
निर्धूम दारूचा अंगभूत दोष व त्यावर उपाय : या दारूतील घटक पदार्थ नायट्रोसेल्युलोज, नायट्रोग्लिसरीन इ. यांचे रासायनिक विघटन (रेणूंचे तुकडे होण्याची क्रिया) सूक्ष्म प्रमाणात पण सतत चालू असते. एवढेच नव्हे, तर विघटनातून निर्माण होणारे पदार्थ विघटनक्रियेची वाढ करणारे असतात. उष्ण हवामानात विघटनक्रिया अधिक त्वरेने होते. याकरिता विघटनोद्भव पदार्थांचे परिणामकारक निरसन करणारे व दारूला रासायनिक स्थैर्य देणारे विशेष पदार्थ तयार करताना तीत घातलेले असतात पण तरीही या दारूच्या बाबतील ती काडतुसात भरलेली असो किंवा अद्याप भरावयाची असे, योग्य कालांतराने तिची रासायनिक परीक्षा करीत राहणे क्रमप्राप्त असते.
दारूगोळ्याचे आधुनिक स्वरूप
काडतुसे : पितळेच्या काडतुसांची प्रथा सुरू होण्यापूर्वी तोफेच्या पश्चद्वारातून आधी तोफगोळा नळीत बसवून त्याच्यामागे योग्य तेवढी निर्धूम दारू भरलेली कापडाची किंवा रेशमाची पिशवी आत सरकवून व द्वार बंद करून गोळा उडविण्याची पद्धत असे. अद्यापही काही मोठ्या तोफांच्या बाबतीत ही पद्धत चालते. पुढे पितळी नळीच्या काडतुसांचा उपक्रम सुरू झाला. त्यामुळे गोळे एकामागून एक त्वरेने उडविणे शक्य झाले. पितळेच्या काडतुसाची नळी पुढे निमुळती असते आणि तिच्या पत्र्याची जाडी पुढच्या बाजूस उत्तरोत्तर कमी होत गेलेली असते. तोफेच्या वा बंदुकीच्या मागील तोंडाचा काडतूस बसविण्याच्या जागेचा आकारही काडतुसाची नळी त्यामध्ये सर्व बाजूंनी नीट चिकटून बसावी असा असतो. काडतुसाचे बूड मात्र पुरेसे जाड असते व त्यात तोफेच्या काडतुसाच्या बाबतीत मध्यभागी काळी दारू धारण करणारे प्रायमर बसविण्याकरिता पेच पाडलेले असतात आणि प्रायमरच्या बुडाच्या मध्यभागी आघात–वाटी बसविण्याची खोबण असते, तर बंदुकीच्या काडतुसाच्या बाबतीत मध्यस्थ काळ्या दारूची जरूरच नसल्याने काडतुसाच्याच बुडाच्या मध्यभागी आघात–वाटीची खोबण असते. दारूचे प्रज्वलन सुरू होताच जो दाब निर्माण होतो, त्याने काडतुसाच्या नळीचे योग्य प्रसरण होऊन ती तोफेच्या वा बंदुकीच्या अंतर्भागाल अगदी घट्ट चिकटते व त्या दोन पृष्ठभागांमधून दाबयुक्त वायू शस्त्राच्या पश्चद्वाराकडे जाण्याची शक्यता उरत नाही. प्रायमरच्या पेचातून, तसेच प्रायमर व आघात–वाटी यांमधील संभाव्य फटीतूनही वायू बाहेर पडू नये याकरिता विशेष योजना केलेली असते. प्रक्षेप्य वस्तू शस्त्रातून बाहेर पडून आतील दाब ओसरताच काडतुसाची नळी तिच्या स्थितीस्थापकत्वामुळे (ताण काढून घेतल्यावर मूळ स्थितीत परत येण्याच्या गुणधर्मामुळे) आकसते आणि पश्चद्वारातून काडतूस ओढून काढता येते. पश्चद्वार उघडताना हे घडावे अशी विशेष यंत्रणा तेथे बसविलेली असते. आ. ३ व ९ यांवरून काडतुसांच्या रचनेची कल्पना येईल.
पितळेतील तांबे या मुख्य घटकधातूच्या दुर्मिळतेमुळे दुसऱ्या महायुद्धानंतर विशिष्ट गुणधर्माच्या पोलादाच्या काडतुसांचे संशोधन होऊन त्यांचे तंत्र प्रस्थापित झाले आहे. संशोधनाची पुढची पायरी म्हणजे काडतुसाच्या नळीचा पदार्थ आतील दारूच्या भडक्यानंतर पूर्ण जळून जावा अशी निःशेष पण अल्पमोली काडतुसेही सिद्ध झाली आहेत.
काडतूस व गोळा (वा गोळी) यांची जुळणी: काही तोफगोळ्यांच्या बाबतीत ते फ्यूझसह काडतुसाच्या नळीत पक्के बसवून त्यांची एकसंध जुळणी केलेली असते. विमानवेधी मारगिरीसारख्या प्रसंगी जेव्हा त्वरेने गोळ्यामागून गोळे उडवणे आवश्यक असते तेव्हा असे एकसंध गोळे वापरावे लागतात व ते उडविणाऱ्या तोफाही स्वयंचलित असतात. सामान्य गोळ्यांच्या बाबतीत काडतुसे, गोळे (आणि गोळ्यांपुढे बसवायचे फ्यूझही) वेगवेगळ्या पेट्यांत ठेवलेले असतात. त्यांतून काढून योग्य तो फ्यूझ गोळ्याच्या तोंडाला बसवून आधी गोळा व नंतर काडतूस तोफेत बसवितात. तर काही बाबतींत गोळ्याचा जो पल्ला इच्छित असेल त्यानुसारचे दारूचे परिणाम साधण्याकरिता काडतुसांतील दारूच्या पिशव्यांची योग्य ती काढघाल करता येते. तसे करून काडतूस गोळ्यामागे व्यवस्थित बसविणे आणि पश्चद्वार बंद करून तोफ उडविणे असा क्रम या बाबतीत असतो. काही मोठ्या तोफांत फ्यूझसह गोळा बसविल्यानंतर प्रक्षेपक दारू भरलेल्या वेगवेगळ्या लहानमोठ्या कापडी पिशव्याच पश्चद्वारातून आत भरून तोफ उडविली जाते व योग्य पल्ला साधला जातो. येथे पितळी काडतूस नसते. बंदुकांच्या बाबतीत मात्र काडतूस व गोळी हे अर्थातच एकसंध असतात. आ.३ व ९ यांवरून या जुळण्याची कल्पना येईल.
उपयोगानुसार काडतुसांचे प्रकार: उपयोगानुसार ठरणारे काडतुसांचे काही महत्त्वाचे प्रकार खाली दिले आहेत.
गोळीमारीचा सराव करताना सैनिकांनी वापरावयाच्या काडतुसांत (व गोळ्यांतही) दारूऐवजी दुसरे निर्धोक पदार्थ घालून ती बनविलेली असतात. वजन आणि बाह्यस्वरूप यांबाबतीतही ती खऱ्या काडतुसांच्या सारखीच असतात.
सलामीकरिता वापरावयाच्या काडतुसात प्रक्षेपक दारू बंदिस्त स्वरूपात असते, पण काडतुसावर गोळा (वा गोळी) बसविलेला नसतो. या काडतुसाचा आवाज होतो, पण गोळ्यामुळे होणाऱ्या दुखापतीचा संभव नसतो.
बंदुकीच्या साह्याने हातबाँब (हँडग्रेनेड) फेकण्याकरिता जे काडतूस वापरतात त्यातही गोळी बसविलेली नसते.
प्रक्षेपक दारूचे परिमाण नेहमीपेक्षा जास्त असलेले व गोळ्याचे (वा गोळीचे) वजनही जास्त असलेले एक विशेष काडतूस असते. हे उडविण्याने शस्त्राच्या नळीत अर्थातच नेहमीपेक्षा अधिक दाब निर्माण होतो. तो अपेक्षित अधिक दाब सहन करण्याइतके संबंधित शस्त्र व दारूगोळा इ. मजबूत आहेत का नाहीत, याची तपासणी दारूगोळ्याचे तंत्रज्ञ या काडतुसाच्या साह्याने करतात.
काडतुसांना जोडावयाच्या गोळ्यांचेही उपयोगानुसार विविध प्रकार असतात. काडतूस व गोळा यांच्या संलग्न स्थितीत हे प्रकार चटकन ओळखता यावेत म्हणून त्यांवर संकेतानुरूप रंगांच्या खुणा केलेल्या असतात.
प्रत्यागतिरहित तोफेचे काडतूस : काडतुसाचा हा एक विशेष प्रकार आहे. सामान्य तोफेच्या बाबतीत तीतून गोळा व त्यामागील वायू बाहेर पडताच तिला जी प्रत्यागती (उलट दिशेने प्राप्त होणारी गती) येते, ती सौम्य करण्याकरिता व इतक्याउपरही तोफ थोडी मागे ढळते, तिला पुन्हा ठीक पूर्वस्थानावर आणण्याकरिता (थोडक्यात तिचा लक्ष्यावरचा नेम पूर्ववत राखण्याकरिता) तिच्या खाली ‘प्रत्यागती यंत्रणा’ (रिकॉईल सिस्टिम) नामक यंत्रणा बसविलेली असते. या यंत्रणेचे वजन फार असते व त्यामुळ तोफ अवजड होते अवघड जागी व त्वरेने तिची ने–आण करणे अशक्य होते. यावर उपाय म्हणून ही ‘प्रत्यागतिरहित तोफ’ सिद्ध केली गेली. हिच्या काडतुसात प्रक्षेपक दारूचे परिमाण साध्या काडतुसातल्यापेक्षा जास्त असते. तोफेच्या तोंडातून गोळा व वायू बाहेर पडत असतानाच आतील वायूतील नियोजित अंश तिच्या पश्चद्वारावर बसविलेल्या कर्ण्याच्या आकाराच्या एका लहान नळीतून बाहेर पडावा, अशी योजना तेथे असते. यामुळे तोफेच्या पुढील बाजूस बाहेर पडणारा गोळा+वायू आणि मागील बाजूस बाहेर पडणारा आंशिक वायूचा झोत यांच्या प्रतिक्रिया समसमान होऊन तोफ पुढे किंवा मागे मुळीच हालत नाही. परिणामतः अनिष्ट गैरसोय टळते पण तोफेच्या कामगिरीबाबतचा इष्ट हेतू मात्र साधला जातो. प्रज्वलनोद्भव वायूला मागील कर्ण्याकडे घुसण्यास अवसर मिळावा याकरिता या प्रकारच्या काडतुसाच्या नळीला अनेक भोके पाडलेली असतात. या तोफेच्या सुटसुटीतपणामुळे रणगाडाविरोधी लढाईत ती फार उपयुक्त ठरते. आ. ४ वरून या तोफेची व काडतुसाची कल्पना येईल.
तोफगोळे : तोफगोळ्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत. एका प्रकारात गोळ्यामध्ये प्रस्फोटक दारू (हाय एक्स्प्लोझिव्ह) भरलेली असते आणि तिच्या स्फोटाने लक्ष्याची हानी घडावी अशी योजना असते. गोळ्याच्या कवचात भरलेल्या दारूच्या स्फोटाने गोळा पडलेल्या ठिकाणी खिंडार पडणे, पडझड होणे असे नुकसान होतेच पण मुख्य म्हणजे ओतीव लोखंडाच्या बनविलेल्या सु. एक सेंमी. जाडीच्या या कवचाचे बंदुकीच्या गोळीसारखे योग्य आकाराचे लहान लहान तुकडे होऊन ते अत्यंत वेगाने सर्वत्र फेकले जातात आणि शत्रूसैनिकांची, शत्रूच्या सामग्रीची हानी घडवितात. यांना कवची गोळे (शेल) म्हणणे योग्य होईल.
दुसऱ्या प्रकारच्या गोळ्यात सामान्यतः दारू भरलेली नसते. गोळ्याचे वेष्टन पातळ असते व त्याच्या आत अतिशय कठीण पोलादाचा बनविलेला व पुढील अग्र निमुळते, टोकदार असलेला एक भरीव दंडगोल बसविलेला असतो. क्वचित हा दंडगोल विनावेष्टनही असतो. हा गोळा रणगाड्याच्या जाड व मजबूत पत्र्याचा भेद करण्याकरिता वापरतात. या ‘भेदक दंडगोला’ला वरील शेल शब्दाचा व्यत्यासाने ‘शॉट’ असे म्हणतात. या गोळ्यात दारूच नसल्याने तिच्या स्फोटाचे नियंत्रण करण्याचा प्रश्न नसतो व या कामाकरिता एरवी लागणारे फ्यूझ नावाचे साधन याच्या अग्रावर बसविलेले नसते.
या भेदक दंडगोलाचा एख अधिक प्रभावी प्रकार म्हणजे HVAP (Hyper-Velocity-Armour-Piercing म्हणजे अतिवेगी–चिलखतभेदी) शॉट हा होय. या प्रकारामधील टोकदार दंडगोल पोलादापेक्षाही अधिक कठीण अधिक घन अशा टंगस्टन कार्बाइड या पदार्थाचा केलेला असतो. घनता जास्त असूनही या दंडगोलाचे व त्यावरील हलक्या वेष्टनाचे एकंदर वजन नेहमीच्या गोळ्यापेक्षा कमी असते पण याबरोबरच याच्या काडतुसातील प्रक्षेपक दारूचे परिमाण मात्र नेहमीपेक्षा जास्त असते. या परिस्थितीमुळे प्रस्तुत दंडगोलाला सामान्य गोळ्यापेक्षा कितीतरी अधिक वेग प्राप्त होतो व रणगाड्याच्या कठीण कवचाचा भेद करून तो त्याचे तुकडे तुकडे उडवतो.
कवची गोळा व अतिवेगी–चिलखतभेदी गोळा यांची चित्रे आणि आनुषंगिक माहिती आ. ५ मध्ये दिली आहेत. आ. ३ मध्येही अधिक माहिती आढळेल.
या दोन मुख्य प्रकारांतील फायदे साधणारा एक संमिश्र प्रकारचा गोळा परिस्थितीनुरूप वापरतात. बेताचा कठीण पृष्ठभाग असलेल्या लक्ष्याचा भेद करून गोळा आत शिरल्यानंतरच त्यात भरलेल्या थोड्या दारूचा स्फोट व्हावा हा परिणाम येथे साधतात. याच्या कार्याचे नियंत्रण करणारा फ्यूझ गोळ्याच्या बुडाशी बसविलेला असतो (आ. ३ अ).
रणगाड्याच्या चिलखताचा भेद करणाऱ्या आणखी एका विशेष प्रकारच्या गोळ्याचे तंत्र दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास सिद्ध झाले. यामध्ये प्रस्फोटक दारूच्या स्फोट–शक्तीचा उपयोग केला जातो पण त्याची रीत फार वेगळी आहे. येथे दारूच्या स्फोटाच्या तरंगांचे केंद्रीकरण घडवून सिद्ध होणाऱ्या अरुंद, शक्तिशाली झोताने चिलखताला गिरमिटाने पाडावे तसे खोल छिद्र पाडले जाते. आ. ६ व ७ यांवरून या विशेष प्रकारच्या गोळ्याची व त्यातील तत्वाची कल्पना येईल. या गोळ्यामध्ये हलक्या वेष्टनातील प्रस्फोटी दारूच्या एका दंडगोलाकृती ठोकळ्याला पुढच्या बाजूस शंकूच्या आकाराची पोकळी ठेवलेली असते व तेथील पृष्ठभागावर पातळ पत्र्याचे अस्तर बसविलेले असते. ठोकळ्याच्या मागील बाजूस मध्यबिंदूपाशी स्फोट सुरू केला जातो.
ठोकळ्याच्या भरीव भागातून पार होऊन स्फोटाचे लोण–त्याचे तरंग–जसजसे शंक्वाकृती अस्तराच्या पुढच्या बिंदूंवर पोहोचतात, तसतसे ते आतील बाजूस वळतात व त्यांचा उत्तरोत्तर अधिक शक्तिमान झालेला एक झोत सिद्ध होतो. हा झोत मूळ तंरगांच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने समोरच्या चिलखती लक्ष्यात घुसून खोल भोक पाडतो (आ. ७). या प्रकारचा गोळा लक्ष्याच्या अगदी समीप पण त्यापासून विशिष्ट अंतरावर असतानाच स्फोट पावणे आवश्यक असते. गोळ्याच्या अग्रावर बसविलेल्या निमुळत्या टोपणामुळे ही परिस्थिती साधणे शक्य होते. टोपणाचे अग्र लक्ष्याला (शत्रूच्या रणागाड्याच्या चिलखती पत्र्याला) स्पर्श करताच प्रस्फोटक दारूच्या मागील बाजूस बसविलेला फ्यूझ दारूच्या मागील भागात स्फोट घडवतो. या गोळ्याला HEAT (High-Explosive-Anti-Tank) असे विशेषनाम आहे. या नामाला ‘प्रस्फोटी-रणगाडाभेदी’ हा प्रतिशब्द योग्य होय.
तोफगोळ्यांना ते पुढे झेपावत असताना प्राप्त होणारी फिरकी या प्रकारच्या गोळ्याची परिणामकारकता कमी करते. दुसरी गोष्ट या गोळ्याचा वेगही कमी असणेच फायद्याचे असते. या दोन कारणांमुळे सामान्य तोफेच्या तुलनेने कमी वेग व कमी फिरकी देणाऱ्या प्रत्यागतिरहित तोफांतून या प्रकारचे गोळे प्रक्षेपित केले जातात, तसेच साध्या नळकांड्यातून प्रक्षेपित केली जाणारी बझूका रॉकेटे व बंदुकीच्या तोंडावर बसवून क्षेपित केले जाणारे रणगाडाभेदी ग्रेनेड यांच्या स्वरूपात हे गोळे आधिक्याने उडविले जातात.
ज्वलनशील दारू भरलेले तोफगोळे : कवची गोळ्यांचा हा एक उपप्रकार आहे पण येथे घातक तुकडे होणारे कवच नसते व आत स्फोट होणारी दारूही नसते. वर वेष्टन असणे व आत दारू भरलेली असणे एवढेच साम्य या दोन प्रकारांत आहे. यांच्या साह्याने शत्रूसैनिकांचा किंवा शत्रूच्या युद्धसाहित्याचा नाश अपेक्षित नसतो, पण यांत भरलेल्या शोभेच्या दारूच्या आविष्काराने अनेक युद्धोपयोगी कामे करून घेतली जातात. तोफेतून निघालेला गोळा नियोजित उंचीवर किंवा अंतरावर पोहोचल्यावर त्यातून आत बसविलेले दारूकामाचे घटक बाहेर पडावेत व त्यांच्या ज्वलनाने दिवसा वापरावयाच्या गोळ्यातून नियोजित रंगाचा धूर उत्पन्न व्हावा अशी योजना असते. तर रात्रीच्या वेळी उडवायच्या गोळ्यातून धुराऐवजी लाल, हिरवा इ. नियोजित रंगांचे ताडगोळे उडावेत असे दारूकामाचे घटक त्यात भरलेले असतात. युद्धक्षेत्रावरील शेजारच्या सैन्यगटांना संदेश पोहोचविण्याकरिता या रंगीत दारूकामाच उपयोग करतात. शत्रूपक्षाला आपल्या हालचाली न दिसाव्यात म्हणून उभय सैन्यांमधील प्रदेशांत पांढऱ्या धुराचा एक पडदा निर्माण करणारे दारूकामाचे घटक ज्या गोळ्यांत बसवले आहेत असेही विशेष प्रकारचे धूम्रगोलक असतात. याच्या उलट रात्रीच्या वेळी शत्रुव्याप्त प्रदेश नीट दिसावा म्हणून त्या प्रदेशावर प्रखर पांढरा प्रकाश पाडणारे चंद्रज्योतीची दारू भरलेले तोफगोळेही आवश्यकतेनुरूप वापरतात. दारूकामाचे हे सर्व घटक योग्य त्या दारू–मिश्रणांच्या, दाबयंत्राच्या साह्याने बनविलेल्या दंडगोलाकृती ठोकळ्यांच्या (पेलेट्सच्या) स्वरूपात असतात.
प्रस्तुत उपप्रकारात लक्ष्यावर पोहोचताच तेथे आग लावणारे तसेच विषारी द्रव्यांनी भरलेले गोळेही समाविष्ट होतात. प्रस्फोटकपूरित गोळ्यांपेक्षा वेगळ्या अशा या गोळ्यांना ‘रासायनिक गोळे’ असे गटवाचक नाव आहे.
प्रक्षेप-रेखी गोळे : तोफगोळ्यांची मारगिरी एकाच विशिष्ट लक्ष्यावर चालू असेल, तर प्रक्षेपित गोळे ठीक नियोजित जागी पोहोचतात का नाही हे कळण्याकरिता दर ९–१० नगांनंतर एक विशेष प्रकारचा नग उडवला जातो. याच्या मागील भागात शोभेच्या दारूच्या मिश्रणाची एक गुलिका बसविलेली असते आणि ती जळताना चकचकीत पांढरा किंवा लाल प्रकाश पडतो. गोळा तोफेच्या बाहेर पडतानाच नळीतील जाळाने ही गुलिका पेट घेते आणि तो लक्ष्याकडे झेपावत असताना त्याच्या मागे जळत राहते. यामुळे गोळ्याच्या पाठोपाठ एक प्रकाशरेखा उठलेली दिसते व तिच्यावरून गोळ्याच्या प्रक्षेप–पथाची कल्पना येते. ही रेखा ठीक लक्ष्यापर्यंत पोहोचते का नाही यावरून गोलंदाजांना मारगिरी लक्ष्यवेधी होत आहे का ते सहज कळते. आ. ५ (आ) मध्ये गोळ्यात मागील बाजूस प्रक्षेप–रेखी गुलिका (६) बसविलेली दाखविली आहे.
उखळी तोफांतून उडविले जाणारे गोळे : यांचा एक वेगळा गट होतो. या बाबतीतील विशेष म्हणजे उखळी तोफा (मॉर्टर्स) या जरूरीप्रमाणे जमिनीशी ७५–८० अंशांपर्यंतचा मोठा कोन करून उभ्या ठेवतात आणि त्यांचे गोळे तोफांच्या मुखाकडून आत सोडले जातात (या तोफांना पश्चद्वार नसते). गोळ्याचा बहिर्व्यास व तोफनळीचा अंतर्व्यास यांमध्ये अत्यल्प पण पुरेसे अंतर असल्याने आणि तोफेच्या उभेपणामुळे गोळा सुलभतेने खाली घसरतो व त्याच्या मागील बाजूस मध्यभागी बसविलेली ज्वलनारंभक आघात–वाटी नळीच्या बुडातील बोथट खिळ्यावर आपटून ज्वलनारंभ होतो व क्रमाने त्याचा विकास होतो. गोळा आणि नळी यांमधील फट अत्यल्प असल्याने ज्वलनोद्भव उष्ण वायू गोळ्याच्या अंगावरून फारसे पुढे घुसत नाहीत. गोळा मात्र नळीतून पुढे उंच उडवला जातो. या तोफनळ्यांच्या आतील पृष्ठभागावर सामान्यतः मळसूत्र कोरलेले नसते. यामुळे गोळ्यांना फिरकी मिळण्याची शक्यता नसते, तेव्हा नळीतून बाहेर पडल्यावर गोळ्याने कोलांट्या खाऊ नयेत याकरिता त्याच्या मागील बाजूस बाणाला मागे पिसे लावतात तशी धातूच्या पडद्यांची योजना केलेली असते. पडद्यांच्या मध्यवर्ती असलेल्या सच्छिद्र नळीत प्रक्षेपक दारू भरलेले कागदाचे काडतूस बसविलेले असते व त्याच्या मागील बाजूस मध्यभागी आघात–वाटी बसविलेली असते. आघात–वाटीतील ठिणगीने या प्राथमिक काडतुसातील दारू पेटते व भोवती शेजारशेजारच्या पडद्यांमध्ये बसविलेल्या दुय्यम काडतुसांतील दारूस पेटवते. दुय्यम काडतुसे ज्वालाग्राही अशा कचकड्याच्या (सेल्युलॉइडाच्या) पत्र्याची केलेली असतात. यांची संख्या कमीजास्त करून गोळ्याचा पल्ला इष्ट तेवढा कमीजास्त करता येतो. या गोळ्यांना ‘मॉर्टर शेल’ न म्हणता ‘मॉर्टर बाँब’ म्हणण्याचा प्रघात आहे. आडोशाआडच्या तसेच खंदकातील लक्ष्यांवर मारा करण्यास हे उपयुक्त ठरतात. उखळी तोफा इतर तोफांच्या तुलनेने फारच हलक्या असल्याने थेट आघाडीवरच्या हालचालीस सोयीच्या असतात. आ. ८ मध्ये उखळी तोफांच्या गोळ्यांचे प्रस्फोटक द्रव्ययुक्त व धूम्रोत्पादक असे दोन प्रकार दाखविले आहेत.
स्फोटक्रियांचा क्रम : गोळ्यात भरलेल्या मुख्य प्रस्फोटक दारूचा स्फोट घडविताना वर (काडतुसातील ज्वलनशील दारूच्या बाबतीत) उल्लेखिलेल्या ‘पेटमालिके’च्या चालीवर एक स्फोटमालिका सिद्ध करावी लागते. गोळ्याला जोडलेल्या फ्यूझमध्ये बसविलेल्या डेटोनेटरमध्ये अत्यल्प आघाताने स्फोट पावणाऱ्या दारूमिश्रणाचा एक थर बसविलेला असतो. या सुलभचेतन दारूवर फ्यूझमध्ये त्याकरिता बसविलेल्या खिळ्याच्या टोकाचा आघात होऊन स्फोटाचा एक लहानसा धक्का निर्माण होतो. या धक्क्याने डेटोनेटर आणि गोळ्यातील मुख्य दारू यांच्यामध्ये बसविलेल्या विवर्धक दारूच्या गुलिकेचा स्फोट होतो आणि या पुरेशा मोठ्या स्फोटधक्क्याने गोळ्याच्या पोटातील मुख्य दारूचा प्रस्फोट होतो. गोळा लक्ष्यावर आदळताच त्याचा स्फोट न होता तो थोड्या विलंबाने, उदा., गोळा इमारतीच्या छपरातून आत शिरल्यावर व्हावा हे प्रसंगोपात साधण्याकरिता स्फोटमालिकेत बसविलेला विलंबक घटक व पूरक डेटोनेटर यांमधून स्फोटाचे लोण पुढे विवर्धकाकडे जावे, असा विशेष बदल गोळा उडविण्यापूर्वी करता येतो, एरवी नेहमीप्रमाणे गोळ्याचा स्फोट प्रायः तात्काळ होतो. डेटोनेटरमधील दारूत लेड ॲझाइड, लेड स्टिफनेट इ. द्रव्यांचे मिश्रण असते. त्या मिश्रणाची आघाताच्या बाबतीतील संवेद्यता तीव्र असते, म्हणजे ते सुलभचेतन असते पण त्याची स्फोट–शक्ती मात्र बेताची असते. त्याच्या स्फोटधक्क्याने स्फोट पावमारी मध्यस्थ दारूची गुलिका ही बहुधा टेट्रिल या स्फोटक द्रव्याची केलेली असते. टेट्रिलाची स्फोटसंवेदनक्षमता लेड ॲझाइड इत्यादींपेक्षा कमी असते पण त्याच्या स्फोटाने तोफगोळ्यात भरलेल्या टीएनटी, ॲमॅटॉल (म्हणजे अमोनियम नायट्रेट व टीएनटी यांचे मिश्रण) इ. मुख्य स्फोटकांचा स्फोट सुलभतेने होतो. टीएनटी इ. पदार्थ नुसत्या डेटोनेटरच्या स्फोटाच्या चेतनेने स्फोट पावण्याइतके संवेदनाक्षम नसतात. आ. २ वरून या स्फोटमालिकेची कल्पना येईल.
फ्यूझ : गोळ्यातील दारूच्या कार्याचे नियंत्रण करणारे साधन. स्फोटक द्रव्ये भरलेला गोळा तोफेतून बाहेर पडल्यानंतर त्यातील द्रव्यांचा स्फोट गोळा थेट लक्ष्यावर पोहोचल्यावर व्हावा, का वाटेत व्हावा, का लक्ष्यामध्ये घुसल्यानंतर व्हावा याचे नियंत्रण गोळ्याला जोडलेल्या फ्यूझ नावाच्या साधनाच्या साह्याने केले जाते. त्याचप्रमाणे ज्वलनशील दारू भरलेल्या गोळ्यातील दारूचे ज्वलन गोळा प्रक्षेपपथावरून जात असताना केव्हा आणि कोठे व्हावे याचेही नियंत्रण अशा बसविलेल्या फ्यूझद्वारा होते. गोळा तोफेत चढविण्यापूर्वी त्याच्या तोंडावर हे साधन बसविले जाते पण एकसंध गोळ्याच्या बाबतीत ते गोळ्याला आधीच बसविलेले असते. रणागाडावेधी गोळ्यांना ते गोळ्याच्या बुडाशी बसविलेले असते, तर सामान्य व विमानवेधी गोळ्यांच्या अग्रभागी बसविलेले असते.
या साधनाती अंतर्रचना गुंतागुंतीची असते. गोळ्यातील मुख्य दारूचे ज्वलन वा स्फोट घडविण्याकरिता आद्यस्फुरित आणि मध्यस्थ दारूंचे योग्य परिमाणांतील साठे तर त्यात असतातच पण त्यांचे कार्य नेमक्या नियोजित वेळीच व्हावे अवेळी कधीही (उदा., तोफेत गोळा चढविताना, तोफेतून तो बाहेर पडत असताना किंवा आधीच्या काळात दारूगोळ्याच्या गुदामात, वाहतुकीत, हाताळताना फ्यूझ वा फ्यूझ लावलेला गोळा चुकीने उलटापालटा कसाही पडला, आपटला तरी) अनपेक्षित स्फोट किंवा ज्वलन होऊ नये, हे कटाक्षाने संभाळणारी यंत्रणा फ्यूझमध्ये बसविलेली असते. गोळा तोफेतून बाहेर पडताना त्याला व त्याच्याबरोबरच्या फ्यूझला जी जोरदार फिरकी मिळते तिच्यामुळे निर्माण होणाऱ्या केंद्रोत्सारी (केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या) प्रेरणेमुळे फ्यूझमध्ये आपापल्या जागी बसविलेल्या डेटोनेटर व खीळ या दोन महत्वाच्या घटकांमध्ये एरवी असणारा एक धातूचा पडदा दूर सारला जातो आणि खीळ डेटोनेटरामधील आद्यस्फुरित दारूवर आपटण्याचा मार्ग मोकळा होतो. थोडक्यात पुढील कृतीच्या दृष्टीने फ्यूझ‘सिद्ध’ होतो. यापूर्वी तो ‘बद्ध’ स्थितीत असतो. पुढे गोळा लक्ष्यावर आदळताच मिळणाऱ्या धक्क्याने खीळ इष्ट आघात करते व नंतरच्या घटना यथाक्रम घडतात.
कालनियंत्रित फ्यूझ : गोळा लक्ष्यावर पोहोचण्यापूर्वीच नियोजित कालावधीनंतर स्फोटादी घटना घडविण्याकरिता एक विशेष प्रकारचा ‘कालनियंत्रित फ्यूझ’ गोळ्याला जोडतात. या फ्यूझच्या एका प्रकारात अंतर्भागात घड्याळासारखी यंत्रणा बसविलेली असते व तिच्या साह्याने गोळा तोफेच्या तोंडातून निघाल्यानंतरचे सेकंद व सेकंदाचे अंश मोजले जातात आणि नियोजित वेळी डेटोनेटर कार्यान्वित होतो. दुसऱ्या प्रकारात पुढीलप्रमाणे योजना असते. काळ्या दारूसारख्या ज्वलनशील दारूचे एक मिश्रण फ्यूझच्या धातूच्या बैठकीत कोरलेल्या एका वाटोळ्या चरात दाबून बसविलेले असते व गोळा तोफेतून उडविला जाताच ते चराच्या एका टोकाकडून जळू लागते. ठराविक कालवधीत चरातील दारूची ठराविक लांबी जळावी, अशी त्या दारूची गुणवत्ता असते. या चरातील किती लांबीचा भाग जळाल्यानंतर त्याची ज्वाला मधूनच डेटोनेटरकडे जावी, हे चराच्या पृष्ठभागावर बसविलेल्या व असाच दुसरा जळाऊ चर धारण करणाऱ्या एका कड्याच्या साह्याने निश्चित करता येते. गोळा तोफेत चढविण्यापूर्वी हे कडे योग्य तेवढे फिरवून गोळ्यामधील नियोजित क्रिया सुरू होण्याचा क्षण निश्चित करतात.
विमानवेधी गोळ्यांच्या बाबतीत विमानाचा वेग व गोळ्याचा वेग यांच्या माहितीवरून केलेल्या आडाख्यानुसार गोळा शत्रूच्या विमानाजवळ पोहोचताच गोळ्याचा स्फोट व्हावा याकरिता पूर्वी वरील घड्याळी फ्यूझचा उपयोग करीत. नियंत्रितपणे जळणाऱ्या दारूच्या फ्यूझचा उपयोग या बाबतीत अनेक कारणांमुळे विश्वासार्ह नसल्याने या कामी करीत नाहीत पण खंदकात लपून बसलेल्या शत्रूसैनिकांना इजा पोहोचविण्याकरिता, तसेच इष्ट ते दारूकाम उडविण्याकरिता गोळा जमिनीवर पडण्यापूर्वी हवेतच उंचीवर त्याचा स्फोट वा ज्वलन घडावे, हे साधण्याकरिता या ज्वलनशील फ्यूझचा उपयोग होतो.
सामीप्य–प्रभावी फ्यूझ : विमानरोधी तोफगोळ्यांवर बसविण्याकरिता अतिशय उपयुक्त असा हा फ्यूझ दुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धात अमेरिकन तंत्रज्ञांनी सिद्ध केला. याच्या कार्यपद्धतीची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे. फ्यूझमध्ये रेडिओ कंपने उत्पन्न करून त्यांचे प्रेषण करणारा (प्रेषक) व प्रेषित कंपने आसपासच्या पदार्थांवरून उदा., शत्रूच्या विमानावरून परावर्तित होऊन आल्यानंतर त्यांचे ग्रहण करणारा (ग्राही) असे दोन सूक्ष्म आकारमानाचे इलेक्ट्रॉनीय घटक यात बसविलेले असतात. यांच्या कार्याला लागणाऱ्या विजेची सोय पुढीलप्रमाणे केलेली असते. पातळ काचेच्या लहान कुप्यांतून अम्ल भरून त्या फ्यूझच्या आतील भागी योग्य तेथे बसविलेल्या असतात. गोळा तोफेतून निघताच त्याला मिळणाऱ्या फिरकीच्या जोराने या कुप्या फुटतात व त्यांतील अम्ल शेजारच्या विद्युत् घटाच्या प्रस्थांवर (विद्युत् पट्ट्यांवर) शिंपडले जाते. यामुळे विद्युत् घट व त्याच्या विजेवर चालणारे रेडिओ प्रेषक व ग्राही कार्यान्वित होतात. प्रेषित व ग्राहित कंपनाच्या संयोगातून ‘डॉप्लर कंपने’ [→ डॉप्लर परिणाम] नामक वेगळी कंपने निर्माण होतात आणि गोळा लक्ष्याच्या जसजसा जवळ जाईल तसतशी या डॉप्लर कंपनांची कंप्रता दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांची संख्या वाढत जाते. अखेरीस त्यांची कंप्रता व तीव्रता अशा एका पूर्वनियोजित परिमाणास पोहोचतात की, त्यांतून मिळणाऱ्या प्रेरणेने फ्यूझमध्ये बसविलेली स्फोटमालिका कार्यान्वित होते, गोळ्याचा स्फोट होतो व लक्ष्याचा–शत्रूच्या विमानाचा –नाश होतो. गोळ्याच्या प्रवासकाळात जमिनीवरून परावर्तित होणाऱ्या कंपनांचे ग्रहण झाल्यानेही डॉप्लर कंपने निर्माण होतात पण त्या कंपनांची कंप्रता आणि तीव्रता उत्तरोत्तर कमी होत जाते आणि त्यामुळे फ्यूझच्या कार्यात व्यत्यय किंवा घोटाळा होण्याचा संभव नसतो. विमानाचे निशाण हुकलेच, तर गोळ्याचा स्फोट दूर वरच्यावरच होऊन भूपृष्ठावरील (आपल्याच प्रदेशात) होणारा नाश टळावा, अशी योजनाही फ्यूझमध्ये बसविलेली असते. सामान्य फ्यूझमध्ये असणाऱ्या सुरक्षिततेच्या यंत्रणा या फ्यूझमध्ये अर्थातच असतात.
उंचावरून जमिनीवरील लक्ष्याकडे झेपावणाऱ्या तोफगोळ्यांना हा फ्यूझ बसविल्यास गोळा जमिनीवर प्रत्यक्ष आदळण्यापूर्वीच जमीन पुरेशी समीप येताच याचा स्फोट घडविणे शक्य झाल्याने उघड्यावरील, तसेच खंदकातील शत्रुसैनिकांची आणि त्यांच्या युद्धसामग्रीचा नाश घडविणारे हे एक अधिक परिणामकारक साधन ठरते.
फ्यूझ हे नियंत्रक साधन केवळ तोफगोळ्यांसारख्या प्रक्षेपित पदार्थांवरच बसविलेले असते असे नव्हे. भुईसुरुंगासारख्या स्थिर पदार्थांवरही ते बसविलेले असते. संबंधित दारूगोळ्याचा स्फोट वा ज्वलन निर्देशित परिस्थिती प्राप्त होताच व्हावेच, पण एरवी मात्र अनिष्टपणे कधीच घडू नये, या दोन्ही अटी पार पाडण्याची कामगिरी या साधनाची असते. आ. ३ मधील गोळ्याला जोडलेल्या व सुट्या फ्यूझच्या चित्रावरून या साधनाची कल्पना येईल.
लघुशस्त्रांचा दारूगोळा : या दारूगोळा प्रकाराची बरीच माहिती वर मधून मधून आली आहे. लघुशस्त्रांतून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या वस्तूला ‘गोळा’ न म्हणता ‘गोळी’ म्हणणे इष्ट होय. गोळीचे काडतूस व गोळी एकसंध असतात. पिस्तुलांची गोळी बंदुकीच्या गोळीपेक्षा कमी लांब व टोकाकडे कमी निमुळती असते. पिस्तुलाच्या गोळीचा अपेक्षित पल्ला व त्यामुळे वेगही कमी असल्याने वरीलप्रमाणे फरक असतो (आ.९).
बंदुकीच्या सामान्य गोळीचे दोन घटक असतात. शिसे व ॲटिमनी यांच्या मिश्रधातूच्या सळईचा योग्य लांबी–जाडीचा व टोकाकडे निमुळता असलेला एक तुकडा व त्याच्यावर बसविलेले निकेल–तांब्याच्या किंवा काशाच्या पत्र्याचे वेष्टन अशी या गोळीची रचना असते. गोळीच्या बुडापासून थोड्या अंतरावर तिला सर्व बाजूंनी आत दाबून तेथे कमरेसारखी एक निरुंद खाच केलेली असते. गोळी काडतुसात बसविल्यावर त्याच्या तोंडाचा काठ या खाचेत वळवून दाबतात. वेष्टनाचा पत्रा बंदुकीच्या नळीच्या पोलादापेक्षा पुरेसा मऊ असल्याने गोळी नळीच्या मळसूत्रात घट्ट बसून पुढे घुसत व फिरत जाते.
विमानाच्या पत्र्यासारख्या पत्र्याचा भेद करू शकणाऱ्या चिलखतभेदी गोळीमध्ये कठीण पोलादाच्या सळईचा टोकदार तुकडा बसविलेला असतो आणि त्याच्या व बाहेरील वेष्टनाच्या मध्ये शिसे–अटिमनी मिश्रधातूचे पातळ अस्तर असते. या चिलखतभेदी गोळीच्या उपप्रकारात लक्ष्य भेदताना होणाऱ्या आघाताने पेटणारे दारूचे एक मिश्रण गोळीत भरलेले असते. विमानादींच्या पेट्रोल टाक्यांना आग लागावी या हेतूने ही ‘आगलावी’ गोळी बनविलेली असते.
बंदुकीच्या गोळ्यांचे पुढील मुख्य प्रकार असतात. वर उल्लेखिलेली शत्रुसैनिकांच्या संहाराकरिता प्रामुख्याने वापरली जाणारी सामान्य गोळी, लक्ष्यभेदी व लक्ष्यभेदी–आगलावी, सरावाकरिता वापरावयाची दारूरहित गोळी, सलामीकरिता वापरतात ती नुसता आवाज करणारी गोळी, शस्त्राची मजबूती तपासण्याकरिता शस्त्र–तंत्रज्ञांनी वापरावयाची ती अधिक शक्तिमान परीक्षा–गोळी, ग्रेनेड प्रक्षेपित करणारे गोळीहीन काडतूस, तसेच प्रक्षेप–रेखी गोळी. प्रक्षेप–रेखी गोळीची पुढीलप्रमाणे सुधारित आवृत्ती बहुधा वापरतात. प्रक्षेप–रेखी गोळीच्या बाबतीत बंदुकीच्या नळीतील प्रज्वलनाने गोळीच्या बुडात बसविलेली प्रकाशदायी गुलिका पेटते हे खरेपण ती पेटण्याआधी तिच्याही तळाशी बसविलेला दुसऱ्या एका दारू–मिश्रणाचा थर पेटतो व अल्पकाल जळतो. हे मिश्रण जळताना कसलाही प्रकाश निघत नाही पण याचे जळणे संपताना ते प्रकाशदायी गुलिकेला पेटवते. यामुळे ही गोळी बंदुकीपासून पुरेशी दूर आल्यावरच प्रकाशरेखा उठलेली दिसते व बंदुकधारी सैनिकाचे स्थान शत्रूला कळू शकत नाही. या प्रकाराला ‘विलंबित प्रक्षेपरेखी’ गोळी (डार्क इग्निशन ट्रेसर किंवा डीम इग्निशन ट्रेसर) म्हणतात.
भारतीय सैन्यदलाची लघुशस्त्रे व त्यांचा दारूगोळा : दुसऱ्या महायुद्धानंतर काही वर्षांपर्यंत भारतात ०·३०३ इंच रायफल हेच सेनेतील जवानाचे प्रमुख वैयक्तिक शस्त्र होते. या बंदुकीतून उपरोक्त विविध प्रकारच्या गोळ्या उडविता येतात. आता ७·६२ मिमी. (म्हणजे ०·३ इंच) अंतर्व्यासाची भारतातच बनविली गेलेली रायफल जुन्या रायफलची जागा घेत आहे. ही नवी बंदूक अंशतः स्वयंचलित आणि म्हणून अधिक सोयीची व परिणामकारक आहे.
सैनिकांच्या लहानलहान गटांनी वापरावयाच्या मशीनगन, ब्रेनगन आदी स्वयंचलित शस्त्रांमधून ०·३०० इंच गोळ्या उडवता येतात.
वरील लांब पल्ल्याच्या शस्त्रांबरोबरच आखूड पल्ल्याच्या शस्त्रांचीही सैन्यास आवश्यकता असते. शत्रुसैनिक ३०–४० मी. वर येऊन भिडले व ते संख्येने अनेक असले, तर वापरण्यास सोयीचे व सुटसुटीत असे स्वयंचलित शस्त्र असते. त्याला कार्बाइन किंवा सबमशीनगन म्हणतात. भारतात ९ मिमी. (अंतर्व्यासाच्या नळीचे) कार्बाइन (स्टेनगन) वापरात आहे. या शस्त्रातून वापरता येणाऱ्या गोळ्या ‘९ मिमी. स्वयंपूरित पिस्तुल’ या दुसऱ्या लहान शस्त्रामध्येही चालतात. ‘०·३८० इंच पिस्तुल’ हे आणखी एक लहान शस्त्र सैन्यात वापरात आहे.
जमिनीवरून किंवा विमानातून शत्रूच्या विमानावर मारा करण्याकरिता २० मिमी. व ३० मिमी. स्वयंचलित बंदुकांचा उपयोग केला जातो.
सांकेतिक–संदेश–प्रेषणाकरिता रंगीत धूम्रगोलक, ताडगोळे इ. प्रक्षेपित करण्याकरिता योग्य आकाराची पिस्तुले व त्यांची काडतुसे सैन्यात वापरात असतात.
पोलीसदलाचे शस्त्र : बाह्यतः ०·३०३ इंच रायफलसारखी असणारी पण फक्त नळी आणि गोळी अधिक रुंद असणारी ‘०·४१० इंच बंदूक’ हे पाेलिसांचे प्रमुख शस्त्र आहे. हिचे काडतूस व काडतूस बसण्याची जागा ०·३०३ इंच बंदुकीसारखीच असते. मात्र काडतुसाच्या तोंडात ०·४१० इंच व्यासाची शिशाची वाटोळी गोळी बसविलेली असते. गोळीला वेष्टन नसते, गोळीचा वेग व पल्ला बेताचा असतो.
शिकारीच्या बंदुकांचा दारूगोळा : शिकारीच्या बंदुकांच्या नळ्यांना सामान्यतः मळसूत्र नसते. गोळ्यांचे काडतूस बळकट कागदाच्या नळीचे बनविलेले असते व त्याला पितळी पत्र्याची बैठक (बूड) बसविलेली असते. काडतुसात शिशाची गोल आकाराची एक मोठी गोळी किंवा अनेक लहान गोळ्या–छर्रे–भरलेले असतात. गोळीचा वेग व पल्ला बेताचा असतो. एकटी मोठी गोळी असलेले काडतूस मोठ्या प्राण्यांच्या शिकारीकरिता , छऱ्यांचे काडतूस लहान प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या शिकारीकरिता वापरतात. ‘१२ बोअरच्या’ बंदुकीच्या काडतुसातील एकट्या मोठ्या गोळीचे वजन १/१२ पौंड असते, म्हणजे १२ गोळ्यांचे वजन एक पौंड भरते. ‘१६ बोअरच्या’ काडतुसातील गोळीचे वजन १/१६ पौंड भरते.
क्षेपणास्त्रे : दुसऱ्या महायुद्धात क्षेपणास्त्रांच्या उपयोगास नव्यानेच सुरुवात झाली. नंतरच्या काळात तिन्ही सेनादलांत आखूड पल्ल्याची क्षेपणास्त्रे ही तोफा–बंदुकांइतकीच महत्त्वाची व नित्याच्या उपयोगाची अशी आवश्यक युद्धसाधने झाली आहेत.
क्षेपणास्त्राच्या रचनेचे मुख्य दोन घटक असतात : अस्त्र लक्ष्यापर्यंत वाहून नेणारे साधन म्हणजेच अग्निबाण (रॉकेट) हा एक व त्याच्या पुढच्या बाजूस बसविलेले, स्फोटक दारू भरलेले व लक्ष्याचा विनाश करणारे ‘विनाशाग्र’ हा दुसरा. क्षेपणास्त्राच्या अग्निबाणाचे कार्य दिवाळीतील अग्निबाणाच्या तत्त्वावरच घडते. अस्त्राच्या अग्निबाणाची रचना पुढीलप्रमाणे असते. पुढचे तोंड बंद असलेल्या योग्य आकाराच्या मजबूत नळीमध्ये प्रक्षेपक दारूचे योग्य आकाराचे ठोकळे व त्यांना प्रज्वलित करणारे साधन बसविलेले असते. अग्निबाणविज्ञानाच्या परिभाषेत प्रक्षेपक दारूला इंधन असाही प्रतिशब्द वापरतात. ज्वलनारंभ विजेच्या साह्याने केला जातो. नळीचे मागील टोक योग्य तेवढे निमुळते करून पुन्हा लहानशा कर्ण्यासारखे उमलते केलेले असते व या दोन विभागांमधल्या गळ्याचे क्षेत्रफळ नेमके इष्ट तेवढे ठेवलेले असते. या निमुळत्या–उमलत्या रचनेला उद्वाहिनी (किंवा प्रोथ) म्हणतात. प्रक्षेपणाच्या वेळी इंधन पेटताच बाणाच्या नळीत उच्च तापमानाचे व दाबाचे वायू तयार होतात पण येथे तोफेतल्यासारखा त्यांचा कोंडमारा होत नाही, तर ते उद्वाहिनीतून एका वेगवान झोताच्या स्वरूपात बाहेर पडतात व इंधन संपेपर्यंत हा झोत मागे निघत राहतो. तोफेतील दारू काही सहस्रांश सेकंदात जळून जाते, तर अग्निबाणातील इंधन योजनेनुसार काही सेकंदांपर्यंत जळून राहते व झोताच्या प्रतिक्रियेमुळे अग्निबाण वाढत्या वेगाने पुढेपुढे झेपावतो. प्रक्षेपित बाण वाटेत उलटापालटा होऊ नये म्हणून त्याच्या मागील बाजूस बाणाच्या पिसांसारखे धातूच्या पत्र्याचे पडदे बसविलेले असतात. त्याचे उड्डाण थेट लक्ष्याच्या दिशेने व्हावे याकरिता योग्य साधनाच्या साह्याने त्याला त्या दिशेस रोखलेला धरून मगच पेटवून प्रक्षेपित करतात.
सामान्य तोफगोळ्याशी तुल्यबल असे क्षेपणास्त्र तयार करण्यास गोळ्याच्या तुलनेने खर्च बराच येतो व स्वयंचलित तोफांच्या गोळ्यांइतक्या त्वरेने क्षेपणास्त्रे एकामागून एक सोडताही येत नाहीत पण याबाबतीत फायदा हा असतो की, येथे तोफेची गरजच नसते. तिचा फार मोठा खर्च वाचतो. शिवाय अल्प वजनाच्या पुरेशा लांबीच्या साध्या नळकांड्यातूनही क्षेपणास्त्र नेम धरून सोडता येत असल्याने रणगाड्यासारख्या लक्ष्यावर अडचणीच्या जागेतूनही मारा करता येतो. वजनाने हलक्यात हलक्या तोफेलाही इतका सुटसुटीतपणा येणार नाही. रणगाडाभेदी क्षेपणास्त्र सु. १·५ मी. लांबीच्या नळकांड्यातून प्रक्षेपित करतात. हे नळकांडे शत्रूच्या रणगाड्याच्या दिशेने रोखलेले असे खांद्यावर धरून एकटा सैनिकसुद्धा नळकांड्यात मागील बाजूस बसविलेले अस्त्र रणगाड्यावर सोडून त्याची वाट लावू शकतो. खांद्यावरून फेकायच्या या अस्त्राला ‘बझूका’ हे नाव आहे. याच्या विनाशाग्रातील स्फोटक दारूचा ठोकळा पुढच्या बाजूस शंक्वाकृती पोकळी असलेला व लंबगोल आकाराचे असतो आणि मागे उल्लेखिलेल्या HEAT गोळ्याच्या तत्त्वानुसार रणगाड्याच्या चिलखताचा भेद करतो.
मार्गदर्शनाची–सुनयनाची-व्यवस्था असलेली क्षेपणास्त्रे : कितीही बरोबर नेम धरून सोडलेल्या क्षेपणास्त्राचा नेम हुकणे शक्य असते व शत्रूचे विमान, रणगाडा यांसारख्या पळत्या–निसटत्या लक्ष्याच्या बाबतीत ही शक्यता अधिकच असते. हा दोष टाळण्याकरिता लक्ष्याकडे निघालेल्या अस्त्राच्या दिशेत वाटेत अल्प पण इष्ट तसा फेरफार करण्याची व परिणामतः अस्त्राला योग्य मार्गावर आणण्याची–सुनयनाची–व्यवस्था या प्रकारच्या क्षेपणास्त्रांत केलेली असते. एका तंत्रान्वये अस्त्राचे उड्डाण चालू असताच रेडिओ संदेशांनी त्याच्या उद्वाहिनीची दिशा इष्ट तेवढी बदलून उड्डाणाची दिशा बदलता येते. हे साधण्याकरिता उद्वाहिनी अग्निबाणाच्या नळीला उखळी सांध्यासारख्या सांध्याने जोडलेली ठेवतात व संदेशाबरहुकूम तिला वळवणारे यांत्रिक साधन अग्निबाणावर बसविलेले असते. दुसऱ्या एका तंत्रात मुख्य अग्निबाणाच्या भोवती चोहोबाजूंस लहान अग्निबाण बसविलेले असतात व त्यांपैकी कोणते केव्हा पेटावेत हे रेडिओ–संदेशाने नियंत्रित केले जाते व अग्निबाण इष्ट दिशेस वळविला जातो.
काही रणगाडावेधी अस्त्रांना मागील बाजूस पतंगाचा दोरा गुंडाळण्या–उलगडण्याकरिता असते तसे रीळ बसविलेले असते. त्यावर बारीक चिवट विद्युत् वाहक तार गुंडाळलेली असते. अस्त्र प्रक्षेपित केले जाताच तार उलगडू लागते व तिचे दुसरे टोक क्षेपणकर्त्या सैनिकापाशी असल्याने तो त्या तारेतून विद्युत् संदेश पाठवून अस्त्र थेट शत्रूच्या रणगाड्यावर जाऊन आदळावे या बेताने त्याची दिशा बदलत राहताे. प्रत्यक्षात सैनिकाने अस्त्राकडे बघायचे नसते, तर आपल्या हातातील सुकाणूच्या काचेतून लक्ष्यावर नेम धरीत राहून लक्ष्य काचेच्या मध्यभागी राहील असे सुकाणू वळवायचे असते. या वळवण्यातून उड्डाणाची दिशा बदलण्याचा संदेश अस्त्राला पोहोचतो. त्या संदेशानुसार अस्त्राची दिशा बदलविणारी वरीलपैकी एखादी यंत्रणा तेथे बसविलेली असते, हे ओघानेच आले.
अवरक्त प्रारणाच्या मागोव्याने लक्ष्यवेध : काही विमानवेधी अस्त्रांवर यापेक्षा परिणामकारक अशी एक स्वयंचलित यंत्रणा बसविलेली असते. शत्रूच्या विमानाच्या जेटमधून निघणाऱ्या अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) प्रारणाचा मागोवा घेणारे एक साधन अस्त्रावर बसवलेले असते. प्रारणाचे उगमस्थान (आणि पर्यायाने शत्रूचे विमान) जिकडे जसजसे वळेल तिकडे तसतसा या साधनाचा–आणि अर्थात अस्त्राचा–मोहरा आपोआप वळावा अशी योजना तेथे बसवलेली असते. परिणामतः अस्त्र शत्रूच्या विमानावर बिनचूक जाऊन आदळते.
रडारद्वारा लक्ष्यवेध : आपल्या प्रदेशात आलेल्या शत्रूच्या विमानाचे वेगवेगळ्या ठिकाणी बसविलेल्या रडार यंत्रणांनी वेध घेऊन आणि त्याप्रमाणे विमानाच्या बदलत्या स्थानाची निश्चिती करून, स्वयंचलित प्रक्षेपण–यंत्रणेच्या साह्याने विमानावर क्षेपणास्त्रांचा मारा करून ते पाडता येते.
क्षेपणास्त्रांची मारगिरी अधिकाधिक बिनचूक होण्याकरिता आणखी अनेक प्रगत शास्त्रीय तंत्रांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे उत्तरोत्तर हे शस्त्र इतर शस्त्रांपेक्षा अधिक परिणामकारक ठरत आहे व त्यामुळे युद्धपद्धतीत बदल घडत आहे.
वर वर्णिलेल्या क्षेपणास्त्रांत रणागाडावेधी अस्त्रासारख्या सु. एक किमी. पर्यंतच्या म्हणजे अगदी लहान पल्ल्याच्या आणि विमानवेधी, जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्यांवर सोडावयाच्या अस्त्रांसारख्या २०–२५ किमी. पल्ल्यांच्या ज्या अस्त्रांचा समावेश होतो ती ‘दारूगोळा’ या सदरात बसू शकतात पण या संहारक साधनाची सु. २,५०० किमी. पल्ल्याची (मध्यम पल्ल्याची) व सु. १०,००० किमी. पल्ल्याची (आंतरखंडीय मारगिरीची आणि विनाशाग्रात महाशक्तिशाली अणुकेंद्रीय बाँब बसविलेली जी प्रचंड स्वरूपे सिद्ध झाली आहेत, त्यांना दारूगोळा या सामान्य नावाखाली मोजणे योग्य नाही, त्यांचे एक स्वतंत्र विज्ञान व तंत्र प्रस्थापित झाले आहे [ → क्षेपणास्त्रे].
संकीर्ण दारूगोळा : तोफा, बंदुका, क्षेपणास्त्रे यांच्या दारूगोळ्याबरोबरच इतर अनेक दारूगोळायुक्त साधने सेनादलांना आवश्यक असतात. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे आहेत.
भुईसुरुंग : प्लॅस्टिकच्या लहानमोठ्या डब्यांतून स्फोटक दारू भरून तयार केलेल्या या वस्तूंवर योग्य फ्यूझ बसविलेला असतो. शत्रूची हालचाल ज्या मोक्याच्या प्रदेशातून होण्याचे अपेक्षित असेल त्या प्रदेशात ठिकठिकाणी भुईसुरुंग अशा कुशलतेने पुरून ठेवतात की, त्यांचा शत्रूला सुगावा लागू नये. सैनिकसंहाराकरिता योजलेले सुरुंग लहान आकारमानाचे असतात व त्यांवर शत्रुसैनिकांपैकी कुणाचा पाय चुकून पडला किंवा सुरुंगाच्या फ्यूझच्या दांडीला बांधलेल्या दोरीला, वेलाला, झुडपाला कुणी सैनिक अडखळला, तरी सुरुंगाचा स्फोट होऊन जवळपासचे सैनिक मृत्युमुखी पडतात व सहकाऱ्यांच्या अशा अपघाती मृत्यूने बाकीच्यांचा धीर खचतो. शत्रूचे रणगाडे निकामी करणारे सुरुंग मोठे व अधिक स्फोटशक्तीचे असतात.
शत्रूने पेरलेले सुरुंग जागच्याजागी उडवून देऊन संबंधित प्रदेश हालचालीस निर्धोक करू शकणारी सुरुंगनाशक साधनेही आघाडीच्या सेनेजवळ आवश्यक असतात [ → सुरुंग].
बाँब : हा शब्द थोड्या सैलपणाने स्फोटक द्रव्ये भरलेल्या विविध प्रकारच्या व विविध उपयोगांच्या बंदिस्त पदार्थांना लावला जातो. उखळी तोफांच्या तोफगोळ्यांनाही बाँब म्हणण्याचा प्रघात आहे. हातबाँब (हँडग्रेनेड) हा सर्वांत लहान आकाराचा बाँब म्हणता येईल. त्याची सुरक्षा खीळ (सेफ्टी पिन) काढून नजीकच्या शत्रुसैनिकांवर तो भिरकावल्यावर ४ ते ५ सेकदांनी (म्हणजे बाँब जमिनीवर पडल्यावरच) त्याचा स्फोट व्हावा अशी योजना असते. दरम्यानच्या वेळात बाँब फेकणारा सैनिक स्वतःच्या बचावाकरिता आडोशाचा आधार घेऊ शकतो. हाच ग्रेनेड (बाँब) बंदुकीच्या तोंडावर बसवूनही फेकता येतो. या वेळी बाँबचा पल्ला व हवेतून जातानाचा काळ जास्त असतो. म्हणून स्फोट ७ ते १० सेकंदांनी व्हावा अशी व्यवस्था तेथे बसविलेली असते. स्फोट होताच बाँबच्या कवचाचे तुकडे उडून ते बंदुकींच्या गोळ्यांसारखे वेगाने सर्वत्र फेकले जातात व शत्रुसैनिकांचा संहार होतो.
HEAT गोळ्याच्या तत्त्वानुसार कामगिरी करणारे प्रस्फोटी–रणगाडाभेदी बाँब (ग्रेनेड) आघाडीचे सैनिक नित्य वापरतात. हे ग्रेनेड बंदुकीच्या तोंडावर बसवून शत्रूच्या रणगाड्यावर प्रक्षेपित केले जातात.
विमानातून टाकावयाचे लहानमोठे बाँब लक्ष्याच्या आकारमानानुरूप वापरतात. यांपैकी एका प्रकारामध्ये विस्फोटक द्रव्यांऐवजी विशिष्ट रसायने मिसळून पाकासारखे दाट व चिकट केलेले पेट्रोल भरलेले असते. बाँब लक्ष्यावर पडल्यावर हा ज्वालाग्राही पदार्थ इष्ट तेवढ्या क्षेत्रावर आणि इष्ट तेवढ्या परिमाणात पसरावा व पेटावा अशी योजना असते. विमानातून टाकलेले बाँब ‘टोक खाली’ अशा स्थितीतच हवेतून खाली पडावेत म्हणून त्यांना मागे धातूच्या पत्र्याचे पडदे बसविलेले असतात, क्वचित हवाई छत्री जोडलेली असते. बाँब खाली पडू लागल्यावर त्यात व विमानात पुरेसे अंतर पडेपर्यंत त्याचा स्फोट होऊ नये ही सुरक्षितता जपलेली असते. तसेच पुढे त्याचा स्फोट जमिनीच्या पुरेसे जवळ पोहोचल्यावर व्हावा, का जमिनीवर प्रत्यक्ष आदळल्यावर व्हावा, का बाँब इमारतींच्या छपरामधून आत घुसल्यावर व्हावा यांपैकी जे ठरले असेल त्यानुसार बाँबच्या फ्यूझमध्ये योजना केलेली असते. आ. १० मध्ये लहान व मोठ्या बाँबची चित्रे दिली आहेत [ → बाँब, ग्रेनेड].
विध्वंसकारी दारूगोळा : सैन्यातील अभियंते हा दारूगोळा वापरतात. सेनेच्या मार्गातील अडथळे, झाडे दूर करणे किंवा शत्रूला उपयोगी ठरणाऱ्या इमारती, पूल इ. पाडणे या कामांकरिता स्फोटक दारूचे सोयीच्या आकाराचे लहानमोठे तयार ठोकळे वापरतात. यांना विवर्धक व योग्य डेटोनेटर जोडून ते इष्ट जागी बसवल्यावर काळ्या दारूच्या वातीने किंवा प्रस्फोटी वातीने किंवा वीजप्रवाहाने ते उडवितात.
दारूगोळ्याचे परीक्षण : दारूगोळ्याकरिता लागणाऱ्या कच्च्या मालाच्या उदा., धातूंचे तसेच कापड, कागद, पुठ्ठा, प्लॅस्टिक यांचे वेगवेगळे घटक भाग, रंग, रोगणे, लुकणे, ज्वलनशील दारूची तसेच स्फोटक दारूची वेगवेगळी मिश्रणे इत्यादींच्या परीक्षा ते पदार्थ दारूगोळ्याच्या निर्मितीत वापरण्यापूर्वी केल्या जातात. नंतर निर्मितीतील नियोजित टप्प्यांवर वस्तू तयार झाल्यावर विविध परीक्षा केल्या जातात. विविध घटकांच्या आकारमानातील बिनचूकपणा अत्यावश्यक असल्याने तो सदैव तपासला जातो. काही विशेष परीक्षा पुढीलप्रमाणे असतात. काडतुसाच्या पत्र्यावरील वेगवेगळ्या ठिकाणची जाडी आणि कठीणपणा तपासून काडतुसाला आवश्यक तो लवचिकपणा, स्थितिस्थापकत्व असल्याची खात्री केली जाते धातूंच्या विविध घटकांमध्ये ते दाबयंत्रामधून काढतानाचे अदृश्य ताण शिल्लक नाहीत ना, हे पाहिले जाते. काडतुसात गोळा वा गोळी प्रमाणाबाहेर घट्ट किंवा सैल बसविले गेले नाहीत ना हे पाहिले जाते. मुख्य म्हणजे तयार दारूगोळ्याच्या सर्व विविध घटकांतून नमुन्याकरिता योग्य तितके नग घेऊन त्यांची नियोजित कामगिरी म्हणजे योजनेनुसार स्फोट पावणे, नियोजित वेग घेणे, लक्ष्यभेद करणे, जळणे, जाळणे, आवाज–प्रकाश–धूर इ. निर्माण करणे पण त्याचबरोबर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत अनिष्टपणे कार्यशील न होणे यांसंबंधीच्या सर्व परीक्षा केल्या जातात.
भारतीय सेनादलांना दारूगोळ्याचा पुरवठा : स्वातंत्र्यपूर्व काळी (१९४४ मध्ये) भूसेना, नौसेना व वायुसेना या तिन्ही दलांना लागणारे विविध साहित्य तयार करणारे सतरा कारखाने भारतात होते. १९७६ मध्ये त्यांची संख्या एकतीस झाली असून तिन्ही सेनांच्या गरजा ते प्रायः पूर्णांशाने भागवतात. यांतील काही कारखाने दारूगोळा तयार करतात. महाराष्ट्रात खडकी, अंबरनाथ, वरणगाव, भंडारा उत्तरेत कटनी, जबलपूर, खमारिया, ईशापूर, काशीपूर तसेच दक्षिणेत हैदराबाद, बंगलोर, अरूवानकडू येथील कारखान्यांत विविध शस्त्रे, त्यांचा दारूगोळा व त्याला लागणारी विविध प्रकारची दारू यांची निर्मिती होते.
पूर्वीच्या ०·३०३ इंच रायफलऐवजी भारतातच विकसित झालेली व अधिक उपयुक्त अशी ७·६२ मिमी. रायफल ही भारतीय सैनिकाचे वैयक्तिक शस्त्र म्हणून प्रस्थापित झाली आहे. तिच्यात वापरता येणाऱ्या गोळ्या ज्यांमध्ये वापरता येतील अशी स्वयंचलित शस्त्रे निर्मिण्याचा प्रकल्पही चालू आहे. पहाडी मुलुखातही वापरता येणाऱ्या ७५ मिमी. या हलक्या तोफेचा विकास भारतीय तंत्रज्ञांनीच केला तिची निर्मिती व सैन्यातील वापर आता पूर्णांशाने प्रस्थापित झाले आहेत. १०५ मिमी. तोफेची (व तिच्या दारूगोळ्याची) निर्मिती प्रायः प्रस्थापित झाली आहे. ५७ मिमी. व १०६ मिमी. या अमेरिकन संरचनेच्या प्रत्यागतिरहित तोफा प्रमुख रणगाडावेधी तोफा म्हणून भूदलाने स्वीकारल्या आहेत. विमानवेधी तोफखान्याकरिता स्वीडनमधील बोफाेर्स कंपनीच्या संरचनेची एल/७० ही तोफ स्वीकृत झाली असून तिची निर्मिती प्रस्थापित झाली आहे. तिच्या गोळ्यांचे सुनयन (मार्गदर्शन) रडार यंत्रणेद्वारा केले जाते.
क्षेपणास्त्रे : रणगाडावेधी व विमानवेधी तसेच जमिनीवरून शत्रूच्या विमानावर व विमानातून जमिनीवर किंवा शत्रूच्या विमानावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसारख्या आखूड पल्ल्याच्या अस्त्रांच्या बाबतीत पुरेशा पुरवठ्याची व्यवस्था झाली आहे. हैदराबाद येथील भारत डायनॅमिक्स लि. ही कंपनी भूसेनेकरिता ‘एस. एस.–२ व एन्टॅक’ ही विद्युत् तारेने नियंत्रित केली जाणारी रणगाडावेधी अस्त्रे बनविते. जमिनीवरून शत्रूच्या विमानावर सोडावयाच्या अस्त्रांबाबत ‘टायगरकॅट’ व त्याच्यापेक्षा अधिक पल्ल्याचे ‘सीकॅट’ ही अस्त्रे ब्रिटनकडून मिळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच कामगिरीकरिता रशियाकडून एस. ए.–२ हे अस्त्र उपलब्ध झाले आहे. नौदलाच्या उपयोगाकरिता बोटीवरून शत्रूच्या बोटीवर वा किनाऱ्यावर मारगिरी करू शकणारे स्टिक्स हे द्रव–इंधनी अस्त्रही रशियाकडून प्राप्त झाले आहे. भारतीय बनावटीच्या मिग–२१ या लढाऊ विमानावर ‘ॲटोल’ हे भारतातच बनविले जाणारे क्षेपणास्त्र बसविले जाते. शत्रूच्या विमानाचा अचूक वेध घेणारी अवरक्त–वेधी यंत्रणा या अस्त्रामध्ये योजिलेली आहे.
पहा : ग्रेनेड तोफ व तोफखाना पाणतीर बंदुकीची दारू बॉंब रॉकेट शस्त्रसंभार शोभेचे दारूकाम सुरुंग स्फोटक द्रव्ये क्षेपणास्त्रे.
संदर्भ : 1. Barness, G. M. Weapons of World War II, New York, 1974.
2. Dupuy, E. Dupuy, T. Encyclopaedia of Military History, London, 1970.
3. Fuller, J. F.C. Armament and History, London, 1946.
4. Ohart, T. C. Elements of Ammunition, New York.
5. Singh, Jaswant, Ed. Indian Armed Forces Year Book 1974–75.
6. Young, Peter Machinery of War, London, 1973.
काजरेकर, स. ग.
“