दान : (गिफ्ट). दा (ददाति) या धातुवरून ‘दान’ या मूळ संस्कृत शब्दाची निर्मिती झाली आहे. एका व्यक्तीची संपत्ती विनामोबदला दुसऱ्याच्या मालकीची होण्याच्या तीन प्रमुख विधिप्रक्रिया म्हणजे दान. मृत्युपत्र आणि उत्तराधिकार यांपैकी दानामुळे एका व्यक्तीची संपत्ती तिच्या हयातीतच दुसऱ्या व्यक्तीस मिळते. मृत्युपत्रान्वये मुळ स्वामीच्या मरणानंतर त्याची संपत्ती दुसऱ्या व्यक्तीस मृत्युपत्राच्या तरतुदीनुसार मिळते आणि उत्तराधिकारान्वये अशी संपत्ती मूळ माणसाच्या निधनानंतर सर्वसाधारण कायद्याच्या तरतुदीनुसार मिळते. म्हणजे पहिल्या दोन प्रकारांमध्ये मूळ मालकाची इच्छा हेच संपत्तीच्या हस्तांतरणाचे मुख्य कारण होय. औदार्य व परोपकार ह्यांमध्ये मानवतेची प्रतिष्ठा सामावलेली असल्यामुळे सत्पात्री दान करण्याच्या प्रवृत्तीचा सर्व धर्मांनी पुरस्कार व गौरव केलेला आढळून येतो. जे जे म्हणून आपले आहे, ते ते दुसऱ्याला देऊन टाकणे ही गोष्ट अत्यंत पुण्यप्रद व आधिभाैतिक दृष्ट्या अतिशय लाभदायक आहे, अशी सर्वसाधारणपणे सर्व धर्मांच्या अनुयायांची समजूत आहे. म्हणूनच शौर्यापेक्षा दानशूरतेमुळे महारथी कर्णाचे नाव सर्वतोमुखी झालेले आहे.

पूर्वकाळापासून कायद्याने दानाची विशेष दखल घेतली असून त्याविषयी काटेकोरपणे नियम केलेले आहेत. भारतीय कायद्यानुसार दानविषयीचे नियमउपनियम भारतीय संपत्ती हस्तांतरण अधिनियमांच्या कलम १२२ ते १२९ यांमध्ये अंतर्भूत केलेले आढळतात. त्यांचा गोषवारा येणेप्रमाणे : दान म्हणजे दात्याने प्रतिग्रहित्यासाठी केलेले व प्रतिग्रहित्याने स्वीकारलेले संपत्तीचे विनाप्रतिफल हस्तांतरण होय. प्रतिग्रहित्याने दानाचा स्वीकार दात्याच्या हयातीत व तो दान करण्यास पात्र असतानाच केला पाहिजे. दान स्थावर अथवा जंगम संपत्तीचे असू शकते. स्थावर संपत्तीचे दान फक्त साक्षांकन व नोंदणी केलेल्या लेखाने होऊ शकते, तर जंगम संपत्तीचे दान हे उपरोक्त रीतीने वा दान वस्तूचा कबजा देऊन करता येते. असा कबजा प्रत्यक्ष वा प्रतीकात्मक दृष्ट्यासुद्धा देता येतो. उदा., एखाद्या कोठारात ठेवलेल्या वस्तूंचा कबजा त्या कोठाराची किल्ली देण्याने दुसऱ्याकडे सुपूर्द करता येतो. आपल्या अस्तित्वात असलेल्या संपत्तीचे दान करता येते परंतु भावी संपत्तीचे दान मात्र करता येत नाही. दोन प्रतिग्रहित्यांस दान एकसमयावच्छेदेकरून केलेले असता त्यांपैकी एकाने त्याचा स्वीकार न केल्यास ते त्याच्यापुरते रद्दबातल ठरते. दान हे परिवर्तनीय असू शकते. परंतु दान हे दात्याच्या मर्जीनुसार परिवर्तनीय किंवा परत घेण्याजोगे असावे, असा दाता आणि प्रतिग्रहिता यांच्यामध्ये करार झालेला असल्यास सदरहू दान हे रद्दबातल ठरते. दात्याने प्रत्यासन्नमरणसमयी केलेल्या दानास वा मुसलमान व्यक्तीने केलेल्या दानास उपरोक्त नियम लागू होत नाहीत. उदा., मुसलमान व्यक्तीने केलेल्या दानास साक्षांकनाची वा नोंदणीची गरज नाही. परंतु प्रत्यासन्नमरणसमयी दान करीत असल्यास वारसांच्या संमतीशिवाय मुसलमान दात्यास आपल्या संपत्तीच्या १/३ पेक्षा जास्त भागांचे दान करण्याचा अधिकार नाही.

दानाला जसे धार्मिक तसेच सामाजिक महत्त्व असल्यामुळे भूदान, दुष्काळप्रसंगी वस्त्रदान, अन्नदान वगैरे दानांच्या मोहिमेचा हिरिरीने पुरस्कार व प्रचार हल्ली करण्यात येतो. दानाचा पुरस्कार सामाजिक न्यायाच्या व परोपकाराच्या दृष्टीने विशेषेकरून करण्यात येत असल्यामुळे व हल्ली बऱ्याच प्रसंगी दान हे स्वार्थी हेतूने, एका विशिष्ट संबंधित व्यक्तीस संपत्ती देण्याच्या दृष्टीने व बहुधा दात्यास आयकर चुकविण्यास मदत करण्याच्या हेतूने देण्यात येत असल्यामुळे १९५८च्या दान कर अधिनियमान्वये दानावर कर बसविण्यात आला आहे.

पहा : धर्मांदाय.

रेगे, प्र. वा.