दादोजी कोंडदेव : (? १५७७–७ मार्च १६४७). शहाजी व शिवाजीचा एक अत्यंत विश्वासू व कर्तबगार कारभारी. शहाजीकडे असलेल्या देशमुखी गावांपैकी मलठणचा तो कुलकर्णी होता. शहाजीने त्यास आपल्या पुणे जहागिरीचा कारभारी म्हणून नेमले होते. विजापूरच्या आदिलशाहाने त्याची कोंढाणा आणि इतर महालांवर सुभेदार म्हणून नेमणूक केली होती पण त्याच्याविषयी कलुषित मत होऊन आदिलशाहाने त्याचा एक हात तोडला.
शहाजीने जिजाबाई व शिवाजी यांची दादोजीबरोबर पुण्याच्या आसपास राहण्याची व्यवस्था केली. त्याने शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी अंगावर घेऊन त्यास युद्धाचे व राजनीतिशास्त्रांचे शिक्षण देवविले. त्या दोघांसाठी पुण्यास लाल महाल हा वाडाही बांधला.
दादोजी येण्यापूर्वी पुणे जहागिरीची स्थिती वाईट होती. विजापुरी सरदार रायाराव याने पुणे जाळून त्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता पण दादोजीने सोन्याच्या फाळाने जमीन नांगरून शेतीला ऊर्जितावस्था आणिली, अशी परंपरागत कथा सांगण्यात येते. परागंदा झालेल्या रयतेस दादोजीने परत बोलावून पुन्हा शेती करण्यास प्रोत्साहन दिले, जमिनीची मोजणी करून प्रतवारी लावली. पुण्यातील आंबील ओढ्याला धरण बांधले. पुणे प्रदेशाच्या सुरक्षिततेची दादोजीने चोख व्यवस्था केली.
देशमुखीतील तंटे मोडून त्यांना स्वराज्याच्या कामगिरीत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. अनेक भांडणांचे निवाडे केले. दादोजी एक लहानसाच ब्राह्मण पण त्याने केलेले निवाडे औरंगजेबासही मान्य झाले, असे पहिल्या शाहूने त्याच्याविषयी उद्गार काढले आहेत. दादोजीला शिवाजीचा पालक आणि स्वराज्याच्या प्राथमिक अवस्थेतील मार्गदर्शक ह्या नात्याने महत्वाचे स्थान आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यास प्रारंभ होण्यापूर्वी तो मरण पावला.
गोखले, कमल