दसरी: (बाहमनी, भामन हिं. बिंडा, पान्स्रक. तुग्गिगिड लॅ. कोलेब्रुकिया ऑपोझिटिफोलिया कुल–लॅबिएटी). हे अनेक शाखायुक्त आणि सु. १·२५—३·१० मी. उंच केसाळ झुडूप भारतातील डोंगराळ भागात (विशेषतः सह्याद्रीवर) सु. १,२०० मी. उंचीपर्यंत आढळते. याची पाने साधी, संमुख (समोरासमोर), फिकट हिरवी, जोडीने किंवा तीनाच्या झुबक्यांनी बहुधा फांद्याच्या टोकास येतात ती लंबगोल, दोन्हीकडे निमुळती, टोकदार, दातेरी व केसाळ असतात. याची लहान, असंख्य, पांढरी फुले तीन किंवा अधिक आणि ५ – १० X १·२ सेंमी. कणिशावर डिसेंबर–एप्रिलमध्ये येतात. संवर्तात पाच संदले असून तो केसाळ व तुऱ्या सारखा असतो. पुष्पमुकुट चार प्रदलांचा असून चार केसरदले अंतस्थित असतात [⟶फूल]. फळे बनल्यावर कणिशे खारीच्या शेपटीप्रमाणे दिसतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लॅबिएटी कुलात (तुलसी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळे (कपालिका) शुष्क, लवदार, एकेकटी आणि टोकास केसाळ पाने जखमांवर व खरचटल्यावर लावतात शिवाय म्हशी, रेडे यांना चारा म्हणून घालतात. मूळ अपस्मारावर (फेफऱ्यावर) गुणकारी आहे. लाकूड करडे–पांढरे, घन, मध्यम कठीण व जड असून बंदुकीच्या दारूकरिता लागणारा कोळसा बनविण्यासाठी उपयोगात आहे.
परांडेकर, शं. आ.
“