दसनामी : एक शैव पंथ. आद्य शंकराचार्यांच्या शिष्य-प्रशिष्यांनी या पंथाचा पुरस्कार केला. शंकराचार्यांनी भारतात चारही दिशांना मठ स्थापून त्यांवर पद्मपाद, हस्तामलक, सुरेश्वर आणि तोटक या आपल्या चार प्रमुख शिष्यांची नेमणूक केली. या चारांपैकी पद्मपादाचे तीर्थ व आश्रम असे दोन हस्तामलकाचे वन व अरण्य असे दोन सुरेश्वराचे सरस्वती, पुरी व भारती असे तीन आणि तोटकाचेगिरी, पर्वत व सागर असे तीन शिष्य होते. या दहा शिष्यांच्या नावांवरून पुढे निर्माण झालेल्या पंथास ‘दसनामी’असे संबोधण्यात आले. या पंथातील साधूंच्या नावापुढे पुरी, भारती, गिरी इ. शब्द असतात. त्यावरूनच यांची गुरुपरंपरा लक्षात येते.

दसनामी पंथाच्या ५२ गढी वा मठ आहेत. त्यांतील २७ गिरींच्या, १६ पुरींच्या, ४ भारतींच्या, ४ वनांच्या व १ लामांची आहे. दसनामी गोसाव्यांत त्यांच्या आध्यात्मिक पात्रतेनुसार कुटीचक, बहूदक, हंस व परमहंस असे चार भेद आहेत. यांतील पहिल्या दोहोंना त्रिदंडी असेही म्हणतात. शंकराचार्यांच्या शिष्यांपासूनच या पंथाची सुरुवात झाली असली, तरी दसनामी गोसाव्याचे मठ वेगळे असतात. त्यांना ‘आखाडे’म्हणतात. निरंजनी, निर्वाणी, अटल, सनातनी व जुना, अग्नी, अभान व आनंद असे सात आखाडे प्रसिद्ध असून ते काशी, प्रयाग, हरद्वार, झारखंड इ. ठिकाणी आहेत.

पंथाची दीक्षा केवळ संन्याशांना दिली जाते. संन्यास हा ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनाच विहित असल्याने त्रैवर्णिकांनाच या पंथात प्रवेश मिळतो. संन्यास ग्रहण करणाऱ्यास भगवी वस्त्रे नेसावी लागतात, विभूती व रुद्राक्ष धारण करावे लागते. शेंडी–जानवे टाकावे लागते व दीक्षामंत्राचे पालन करावे लागते. तरुण व सशक्त संन्याशांना पंथाची दीक्षा दिली जाऊन आखाड्यात प्रवेश दिला जातो. दर दिवशी एकदाच जेवण करणे, गावाबाहेर राहणे, सातच घरी भिक्षा मागणे, जमिनीवर झोपणे इ. नियम दसनामी साधूला पाळावे लागतात. आखाड्यात राहून त्याला गुरूची सेवा करावी लागते. अशा साधूंना वस्त्रधारी म्हणतात. दहा—बारा वर्षे गुरूची सेवा केल्यावर तो साधू नंगा किंवा नागा साधू होण्यास पात्र ठरतो. कुंभ अथवा अर्धकुंभ पर्वाच्या वेळी त्याला नंगा साधू बनवितात. आखाड्यांत पुष्कळ साधू असतात. त्यांच्या प्रमुखास ‘मंडलेश्वर’किंवा महंत असेही म्हणतात.

शंकराचार्याच्या चार प्रमुख मठांचा जो आचारधर्म सांगितला आहे तो दसनामी पाळतात. निरनिराळ्या आखाड्यांच्या निरनिराळ्या देवता असतात. दसनामी साधू एकमेकांस भेटल्यावर ‘नमःशिवाय’असे म्हणतात. पंथाचे स्वतंत्र असे तत्त्वज्ञान नाही. धर्माचा प्रचार करणे व धर्मरक्षण करणे हेच दसनामींचे प्रमुख काम आहे. ऐतिहासिक काळात धर्मावर संकट आल्यामुळे दसनामी साधू शस्त्रधारी बनले. झारखंडातील निर्वाणी आखाड्यातील दसनामींनी बनारस येथे जी लढाई केली होती ती ‘ज्ञानवापी लढाई’या नावाने ओळखली जाते. १६६४ साली दसनामी साधूंची औरंगजेबाबरोबर लढाई झाली. नंतरच्या काळात मात्र त्यांच्यात मतभेद झाले व आपसातही लढाया झाल्या. आधुनिक काळात आखाड्यांमध्ये परमहंस संन्यासी अध्यात्मशास्त्राचे अध्यापन करतात. आखाड्यांत राहणारे साधू जपजाप्य, अध्ययन इ. साधना करतात. या पंथात काही संसारी गृहस्थही आढळतात.

पहा : गोसावी–बैरागी.

संदर्भ : 1. Ghurye, G. S. Indian Sadhus, Bombay, 1964.

           2. Sarkar, Jadunath, History of Dasnami Naga Sanyasis, Allahabad, 1950.

           ३. गोस्वामी, पृथ्वीगीर हरिगीर, गोसावी व त्यांचा संप्रदाय, यवतमाळ, १९२६.

भिडे, वि. वि.