दलिताश्म: (मायलोनाइट). भूकवचातील हालचालींमुळे तीव्र दाब पडून भरडला गेलेला तसेच चूर्णन (चूर्ण होण्याची क्रिया) व लाटन (लाटला जाण्याची क्रिया) झालेला आणि त्याच वेळी दाबाने घट्ट झालेला परंतु रसायनतः न बदलेला खडक. पर्वत निर्माण करणाऱ्या अशा तीव्र हालचालींमुळे विभंग (भेगा), प्रवाहण (वाहण्याची क्रिया) व कणीभवन (बारीक तुकडे होण्याची क्रिया) या क्रिया होऊन खडकाचे मूळ स्वरूप बदलते आणि कठीण, पट्टित दलिताश्मांचा थर बनतो. तीव्र हालचालींचे हे पट्टे काही मी. पासून १०० मी. पर्यंत रुंद असतात आणि अशा प्रदेशांत बहुधा जगभर दलिताश्म आढळतात. दलिताश्म सूक्ष्मकणी असून त्यातील चूर्णित द्रव्य लाटन यंत्रातून गेल्याप्रमाणे दिसते. खऱ्या दलिताश्मामध्ये भरडल्या न गेलेल्या मूळ खडकांतील खनिजांचे तुकडे हालचालीच्या दिशेला समांतर अशा भिंगाकार पट्ट्यांच्या रूपात राहिलेले आढळतात, मात्र सूक्ष्मदर्शकाने परीक्षण केल्यास त्यांच्यावर हालचालींचा परिणाम झाल्याचे दिसून येते. प्रवाही हालचालींमुळे विविध संघटनांचे वा निरनिराळ्या आकारमानांच्या कणांचे थर निर्माण होऊन पट्टित संरचना निर्माण होते. तसेच दलिताश्म अणकुचीदार तुकड्यांचा बनलेला असल्याने त्यात कणाश्मी संरचनाही दिसते. कधीकधी दलिताश्म फ्लिंटप्रमाणेही दिसतो.
बहुसंख्य दलिताश्मांत क्वॉर्ट्झ असते व सर्वांत सामान्य प्रकारात क्वॉर्ट्झ व फेल्स्पार ही खनिजे प्रमुख असतात, कारण ही खनिजे ठिसूळ आणि निरनिराळ्या तापमानांमध्ये रासायनिक दृष्ट्या स्थिर राहणारी आहेत. परिणामी ग्रॅनाइट, क्वॉर्ट्झाइट, क्वॉर्ट्झ सुभाजा (सहज भंगणारा खडक) व पट्टिताश्म या खडकांमध्ये सामान्यपणे दलिताश्माचे पट्टे आढळतात. मात्र दलिताश्म जवळजवळ सर्व प्रकारच्या खडकांत आढळतात. उदा., विविध पट्टिताश्म, हॉर्नब्लेंड सुभाजा, क्लोराइटी सुभाजा, चुनखडक, डनाइट इत्यादी.
दलिताश्मांमधील पुनर्स्फटिकी भवनाचे प्रमाण मूळ खडकांनुसार कमी जास्त असते. उदा., क्वॉर्ट्झ फेल्स्पार युक्त खडकांतील खनिजांत विशेष बदल होत नाही, तर अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) अग्निज खडकांतील खनिजांमध्ये बराच बदल होतो. अशा पुनर्स्फटिकीभूत दलिताश्मांना ब्लास्टोमायलोनाइट म्हणतात. तीव्र व जलद हालचालींमुळे काही वेळा इतकी घर्षणजन्य उष्णता निर्माण होते की, दलिताश्माच्या काही भागातील खनिजकण वितळूही शकतात व अशा ठिकाणी खडक काचमय झालेला दिसतो. कधीकधी हे काचमय द्रव्य फांद्यासारख्या शिरांच्या रूपांत पसरते व शिरांच्या दरम्यान चूर्णित रूपातील आधारकाचे तुकडे असतात. अशा काचमय शिरा असणाऱ्या पट्टिताश्माला ट्रॅप-शॉटेन नाइस म्हणतात. ही वैशिष्ट्ये असलेल्या खडकाचे वयन (पोत) पुष्कळदा चर्ट वा फेल्साइट खडकासारखे असते तेव्हा त्याला अल्ट्रामायलोनाइट (अतीत दलिताश्म) वा फ्लिंटी क्रश रॉक म्हणतात.
क्वेन्सेल यांनी खडकाच्या संरचनाहीन चूर्णाला (म्हणजे कॅटॅक्लॅसाइटाला) मायलोनाइट व समांतर संरचनेच्या चूर्णरूप खडकाला मायलोनाइट- शिस्ट अशा संज्ञा वापरल्या होत्या परंतु चार्ल्स लॅपवर्थ यांना वायव्य स्कॉटलंडमध्ये दलिताश्म प्रथम आढळला आणि त्याची विशिष्ट संरचना व उत्पत्तीची तऱ्हा यांवरून त्यांनी त्याला भरडलेला या अर्थाच्या मायलोन या जर्मन शब्दावरून मायलोनाइट हे नाव दिले. ज्या प्रक्रियेत खडक कणमय आणि चूर्णरूप होऊन दलिताश्म बनतो, तिला दलिताश्मीभवन (मायलोनिटायझेशन) म्हणतात. ही क्रिया सावकाश होणारी असल्याने तीमुळे तापमानाच्या स्थितीत विशेष बदल होत नसावा.
ठाकूर, अ. ना.