दर्भ: (हिं. दब, दवोली गु. दभ सं. कुश, पवित्र, दर्भ लॅ. पोआ सायनोसुरॉइड्स, एरग्राेस्टिस सायनोसुरॉइड्स कुल–ग्रॅमिनी).सु. ३०–९० सेंमी. उंच व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) गवत. हे भारतात सर्वत्र उष्ण भागात व ओलसर ठिकाणी सापडते कोकण, नासिक, गुजरात, काठेवाड, सिंध, हैदराबाद, न्यूबिया, ईजिप्त, सिरिया इ. प्रदेशांत आढळते. तळापासून याला अनेक फांद्या येतात. याचे जमिनीतील खोड (मूलक्षोड) जाडजूड, आडवे वाढणारे व तिरश्चर (जमिनीवरील खोडाच्या तळभागापासून निघून पुन्हा जमिनीसरपट वाढणारी शाखा) कणखर, चकचकीत आवरकांनी (खोडास वेढणाऱ्या पानांच्या तळांनी) झाकलेले असतात. पाने साधी, एकाआड एक, अनेक, अरुंद, सु. ५० सेंमी. लांब व ताठर असून तळाशी झुबक्यांनी येतात. त्यांच्या कडा केसाळ, आवरक गुळगुळीत, जिव्हिका (लहान जिभेसारखे उपांग) केसांच्या रांगेप्रमाणे असते. फुलोरा शाखायुक्त (परिमंजरी) १५–४५ X १·३ – ३·८ सेंमी., सरळ स्तंभाप्रमाणे वा शंकूप्रमाणे व खंडित असतो. त्यातील फांद्या आखूड आणि दाटीने येत असून त्यावर डिसेंबरात कणिशके येतात. कणिशकांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे तृण कुलात [⟶ ग्रॅमिनी]व तृण गणात [⟶ग्रॅमिनेलीझ]वर्णिल्याप्रमाणे असतात.
दर्भाला हिंदूंच्या धार्मिक विधींत (होमहवन, श्राद्ध–पक्ष इ.) महत्त्व आहे. पिठोरी अमावस्येला दर्भ जमिनीतून काढून घ्यावेत, तरच ते पवित्र असतात असे श्रावण पुराणात सांगितले आहे. ऋग्वेद आणि तदुत्तर ग्रंथांत याचा उल्लेख असून अथर्ववेदात याचा उपयोग क्रोध किंवा दुःख निवारण्यास तोडगा म्हणून सांगितला आहे.‘भूरिमूल (अनेक मुळ्यांचा), सहस्रपर्ण व शतकंद’ अशी याची नावे दिली आहेत. याचे खोड व फांद्या उत्तेजक व मूत्रल (लघवी साफ करणाऱ्या) असून कोकणात इतर औषधांबरोबर काढा करून आमांश (आव) आणि अत्यार्तव (विटाळातील अतिस्राव, धुपणी) यांवर देतात. मुळ्या शीतल (थंडावा देणाऱ्या), मूत्रल आणि तृषाशामक (शोष कमी करणाऱ्या) आहेत. त्यांचाही वरच्याप्रमाणे उपयोग होतो. दोर बनविण्यास दर्भाचे धागे उपयोगात आहेत स्वस्त बदामी कागद बनविण्यास त्या धाग्यांचा उपयोग होतो, असे प्रयोगान्ती आढळले आहे. दर्भाच्या चटया बनवितात.
गाडगीळ, सी. ना. परांडेकर, शं. आ.