दरभंगा : बिहार राज्याच्या तिरहुत विभागातील दरभंगा जिल्हाचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,३२,०५९ (१९७१). हे छोट्या बाघमती नदीच्या डाव्या काठावर वसले असून पाटण्याच्या ईशान्येस ९६·५ किमी. आहे. दरभंगी खान या लुटारूच्या नावावरून यास हे नाव पडले असावे. ‘दर–इ बंगाल’ (बंगालचे द्वार) असेही यास म्हटले जाते. मोगल काळात हे लष्करी ठाणे होते. सोळाव्या शतकात स्थापन झालेल्या ‘दरभंगाराज’ या राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. अठराव्या शतकात प्रतापसिंह महाराजांनी हे राजधानीचे ठिकाण केले. तेव्हापासून याचा विकास होऊ लागला. त्यावेळचा आनंदबाग राजवाडा आजही पहावयास मिळतो. १८६४ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. हे दळणवळणाचे मुख्य केंद्र असून लोहमार्गाचे प्रस्थानक आहे. येथे शेतमालाची, आंब्याची व माशांची बाजारपेठ असून याच्या आसमंतात ज्वारी, मका, गहू, जव, तेलबिया, भात, ताग, ऊस ही पिके होतात. तांदूळ, ताग यांच्या गिरण्या आणि साखर कारखाने, लेस तयार करणे हे येथील मुख्य उद्योगधंदे आहेत. जिल्हाची मुख्य कार्यालये लहेरिया सराई या उपनगरात आहेत. शहरात राजवाडे, दवाखाने, गोशाळा, वैद्यकीय व इतर महाविद्यालये, राजग्रंथालये इ. असून लहानमोठे तलावही आहेत. कामेश्वरसिंग दरभंगा संस्कृत विद्यापीठ (१९६१), मिथिला विद्यापीठ (१९७२) आणि कामेश्वरसिंग दरभंगा विद्यापीठ ही विश्वविद्यालये येथे आहेत.
कांबळे, य. रा.