दप्तरी, केशव लक्ष्मण : (२२ नोव्हेंबर १८८०–१९ फेब्रुवारी १९५६). प्रसिद्ध ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत. भाऊजी दप्तरी अशा नावाने ते ओळखले जात. जन्म नागपूर येथे. आईचे नाव गंगाबाई. भाईजींचे वडील लक्ष्मणराव ऊर्फ बापूजी नागपूरला शिक्षक होते. त्यांच्याकडून भाऊजींना प्राचीन ग्रंथांचे परंपरागत ज्ञान मिळाले. १९०० मध्ये ते बी. ए झाले. म. म. कृष्णशास्त्री धुले, शिवदासपंत बार्लिंगे, भट्टजीशास्त्री घाटे यांच्यासारख्या विद्वानांचा सहवास लाभल्याने दप्तरींनी ज्योतिर्गणित, फलज्योतिष इ. शास्त्रांचा सखोल अभ्यास केला. १९०४ साली ते कलकत्ता विद्यापीठाची बी. एल्. परीक्षा उत्तीर्ण झाले. नागपूर विद्यापीठाने १९४१ साली त्यांना सन्मान्य डी. लिट्. ही पदवी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेने १९४८ साली ‘विद्वद्रत्न’ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. सुरुवातीला काही काळ त्यांनी नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये गणित व संस्कृत या विषयांचे शिक्षक म्हणून नोकरी केली. १९०५ सालानंतर काटोल, नागपूर येथे वकिलीही केली पण १९२० सालच्या असहकाराच्या चळवळीत त्यांनी वकिली सोडली व १९२१ साली ते राष्ट्रीय महाविद्यालयाचे (नॅशनल कॉलेजचे) प्राचार्य झाले. धर्मनिर्णय मंडळाचे ते एक संस्थापक होते. १९३२ साली दिल्ली कॉग्रेसला मध्य प्रांताचे प्रतिनिधी म्हणून गेले असता, त्यांना अटक झाली व काही काळ तुरुंगवास भोगावा लागला.
दप्तरी यांनी ज्योतिर्गणित व धर्मशास्त्र या विषयांत विशेष संशोधन केले आणि विपुल ग्रंथलेखनही केले. वैदिक वाङ्मय, वेदान्त तत्त्वज्ञान, होमिऑपथी हे त्यांच्या संशोधन-व्यासंगाचे आणखी काही विषय होते. लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून शुद्ध पंचांगाकरिता त्यांनी करणकल्पलता (पूर्वार्ध १९२५, उत्तरार्ध १९७५) हा संस्कृत ग्रंथ लिहिला. महाभारतीय युद्ध कालनिर्णय (१९१८), धर्मरहस्य (१९२६), भारतीय ज्योतिःशास्त्रनिरीक्षण (१९२९), तत्त्वमीमांसापद्धति (१९३७), धर्मविवादस्वरूप (१९४०), जैमिन्यर्थदीपिका (१९४०) इ. त्यांचे ग्रंथ संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. धर्मरहस्य, जैमिन्यर्थदीपिका व धर्मविवादस्वरूप या ग्रंथांच्या दुसऱ्या आवृत्याही अनुक्रमे १९६५, १९६७ व १९६७ मध्ये निघाल्या आहेत. त्यांच्या विविध लेखांचे आतापर्यंत तीन खंड विद्वद्रत्न डॉ. दप्तरी–लेखसंग्रह (१९६९, ७१, ७३) या नावाने प्रकाशित झाले आहेत.
ज्योतिर्गणिताचा अभ्यास करण्यासाठी अनेक वेदवचनांचा त्यांनी विचार केला व वैदिक कालगणनापद्धतीचे संशोधन केले. वेदांगज्योतिषाने पाच वर्षांचे युग मानले आहे पण दप्तरींनी युग हे चार वर्षांचेच असते, हे सप्रमाण सिद्ध केले. महाभारत व निरनिराळी पुराणे यांमध्ये जी ग्रहस्थिती ,सांगितली आहे, त्यांचा विचार करून कालनिर्णय कसा करता येतो, हे दप्तरींनी दाखवून दिले. वायुपुराणात (५३·१०४–१०९) चाक्षुषमन्वंतरारंभीची सप्त महाग्रहांची स्थिती सांगितली आहे. रामायणात (अयोध्या ३·४, २६·९ अरण्य ४७·६–१०) अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेळची ग्रहस्थिती उल्लेखिली आहे. हरिवंशात (विष्णुपर्व २३·२५–३१) कंसवधकाळाची ग्रहस्थिती दिली आहे. या सर्वांचा विचार करून दप्तरींनी शकपूर्व १२७५ वर्षे (इ. स. पू. १३५३) असा भारतीय युद्धाचा कालनिर्णय केला आहे. याचप्रमाणे रामायणाचा व कंसवधाचा काळही त्यांनी निश्चित केला आहे. प्राचीन धर्मशास्त्रकारांनी तयार केलेली पंचांगे जशीच्या तशी वापरणे चुकीचे होईल, त्यासाठी सूर्यसिद्धांत, ऋतुचक्र इत्यादींमध्ये गणितानुसार बदल करून शुद्ध पंचांगे तयार केली पाहिजेत, असे दप्तरी म्हणत. टिळकांच्या पंचांगशुद्धीच्या चळवळीत ते प्रमुख होते. त्यांना ‘आधुनिक भास्कराचार्य’ म्हणत.
धर्मरहस्य हा त्यांचा ग्रंथ म्हणजे ‘केशव’ प्रणीत स्मृतीच होय. दप्तरी हे परिवर्तनवादी होते तथापि आपल्या विचारांसाठी वेदवचनांचा व प्राचीन संस्कृत ग्रंथांतील अनेक वचनांचा त्यांनी आधार घेतला. ‘वेद पौरुषेय आहेत, धर्म हाही पुरुषकृत आहे. निश्रेयसलक्षणधर्म म्हणजे ऐहिक सुखावर आधारित असा धर्म, मृत्यूपूर्वी मिळणारे विषयत्यागजनित सुख हेच सर्वश्रेष्ठ सुख आहे’, हे त्यांचे विचार प्राचीन परंपरागत विचारसरणीस धक्का देणारे होते. ‘अतिशय उच्चतर सुख हे धर्माचे साध्य होय’ असे धर्मलक्षण दप्तरी करतात. वेद, स्मृती, महाभारत, पुराणे इ. ग्रंथांचा अर्थ मोक्षपर न लावता ऐहिक सुख व जीवनातील आनंद या दृष्टीने लावला पाहिजे, असे दप्तरींनी म्हटले आहे.
प्रसिद्ध अशा अकरा उपनिषदांचा या दृष्टीने त्यांनी अभ्यास करून त्यांचे मराठीत भाषांतरही केले. दप्तरींनी उपनिषदांचा वस्तुनिष्ठ व बुद्धिवादी अर्थ लावला आणि उपनिषदांतील विषयांचा खरा अर्थ सांगण्यासाठी औपनिषदिक जीवनसौख्य (१९५७) हा ग्रंथ लिहिला. उपनिषदांच्या अभ्यासास या ग्रंथाने नवी दिशा मिळाली.
दप्तरींनी वैद्यकशास्त्राचे सांगोपांग अध्ययन केले. आयुर्वेदातील प्राचीन चिकित्सापद्धतीमध्ये विपरीत चिकित्सा आणि विपरीतार्थकारी चिकित्सा अशा दोन पद्धती आहेत पण समचिकित्सा किंवा उभयार्थकारी चिकित्सा हीच खरी चिकित्सा होय, असे दप्तरींनी म्हटले आहे. या समचिकित्सेलाच होमिऑपथी म्हणतात. बायोकेमिस्ट्रीमध्येही समचिकित्साच असते. दप्तरी पुष्कळ काळ होमिऑपथीचा वैद्यकीय व्यवसाय करीत होते. व्यासंगी व चिकित्सक ज्ञानयोगी म्हणून त्यांनी केलेले संशोधन अत्यंत मोलाचे आहे. या विषयावरील त्यांचे रहस्यवर्णन (१९४९), सच्चिकित्साप्रकाशिका (१९३६, १९५८, १९७६), चिकित्सा परीक्षण (१९७४) इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
त्यांचे पुष्कळ लेखन अजूनही अप्रकाशित आहे. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. कोणत्याही अधिकारपदाचा स्वीकार त्यांनी केला नाही. तत्त्वनिष्ठा त्यांनी केव्हाही सोडली नाही. दप्तरींच्या धर्मविचारांनी प्रभावित होऊन डॉ. ग. म. डोळके यांनी डॉ. दप्तरी यांची धर्ममीमांसा (१९६९) हा ग्रंथ लिहून प्रसिद्ध केला. या ग्रंथास पुणे विद्यापीठाचे चिपळूणकर पारितोषिक मिळाले (१९७१). नागपूर येथे त्यांचे निधन झाले.
भिडे, वि. वि.
“