दंगा : (रायट). हुल्लड, तंटा, धामधूम, गोंधळाचा अथवा अव्यवस्थेचा उद्रेक, शांततेचा भंग इ. अर्थांनी या संज्ञेचा वापर होतो. भारतीय फौजदारी कायद्याच्या परिभाषेत पाच वा अधिक व्यक्तींच्या बेकायदेशीर जमावाने किंवा त्यांतील कोणा एकाने समान उद्दिष्टाकरिता बळाचा किंवा हिंसेचा वापर करून शांततेत व्यत्यय आणणे म्हणजे दंगा, अशी साधारणतः दंग्याची व्याख्या केली आहे. काही देशांत दंग्याचा गुन्हा घडण्यास कमीत कमी दोन किंवा तीन व्यक्ती पुरेशा होतात.
दंग्याचा गुन्हा होण्याकरिता भारतीय दंड संहितेप्रमाणे पुढील बाबी सिद्ध व्हावयास पाहिजेत : आरोपी पाच किंवा पाचपेक्षा अधिक असणे व त्यांनी बेकायदेशीर जमाव करणे. (२) ते समान बेकायदेशीर उद्दिष्टांनी प्रेरित असणे, (३) अशा समान उद्दिष्टपूर्तीकरिता बळाचा किंवा हिंसेचा वापर करणे. बेकायदेशीर जमावाने किंवा त्यांतील एखाद्या व्यक्तीने जरी समान उद्दिष्टपूर्तीकरिता बळाचा वापर किंवा हिंसेचा वापर केला तरी, अशा जमावातील प्रत्येक व्यक्ती ही दंग्याच्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरू शकते.
बेकायदेशीर जमावाप्रमाणे दंग्याच्या गुन्ह्यातही बेकायदेशीर उद्दिष्टाकरिता लोक एकत्र आलेले असतात परंतु दंगा हा गुन्हा ठरण्यासाठी हिंसा किंवा बळ यांचा वापर झाल्याचे सिद्ध व्हावे लागते, बेकायदेशीर जमाव हा उपअपराध (मिसडिमिनर) होऊ शकतो पण दंगेखोरांनी केलेले कृत्य किती गंभीर आहे, यावर तो घोर अपराध आहे की उपअपराध आहे हे ठरते.
दंग्याच्या भारतीय व अँग्लो–अमेरिकन संकल्पनांत शांततेचा भंग हा केंद्रबिंदू आहे. इंग्लंड सोडून यूरोप खंडातील इतर देशांत मात्र शांतताभंगाबरोबर सरकारी अधिकाऱ्यास प्रतिरोध होणे आवश्यक असते. उदा., प. जर्मनीमध्ये शांतताभंग गुन्ह्यात मोडण्याकरिता कामावर असलेल्या सरकारी अधिकाऱ्यास प्रतिरोध व्हावयास पाहिजे. फ्रेंच कायद्यात दंग्याची निराळी व्याख्या दिलेली नाही परंतु बंड (रिबेलियन) या सर्वसामान्य शीर्षकाखाली सरकारी अधिकाऱ्यास प्रतिरोध करणे, ही एक विशिष्ट बाब समजण्यात येते. अँग्लो–अमेरिकन संकल्पनेतील दंग्याला फ्रेंच कायद्यात गुन्ह्याच्या दृष्टीने महत्त्व नाही.
खोडवे, अच्युत