थेऊर : महाराष्ट्रातील एक देवस्थान. पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील हे गाव मुळा–मुठेच्या काठी, पुण्याच्या पूर्वेस सु. २० किमी. वर आहे लोकसंख्या ६,३६० (१९७१). येथील गणपती फार प्राचीन असून त्याची गणना अष्टविनायकांत होते. येथील देऊळ चिंचवडच्या मोरया गोसाव्याचे पुत्र चिंतामण देव यांनी बांधले असून थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सभामंडप बांधून या मंदिराचा विस्तार केला, तर हरिपंत फडके यांनी मंदिराची दुरूस्ती केली. येथील गणपतीचा उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीला असतो. थोरले माधवराव पेशवे याच ठिकाणी निवर्तले. त्यांची पत्नी रमाबाई ही त्यांच्याबरोबर सती गेली. येथील सतीचे वृंदावन प्रसिद्ध आहे. येथे एक साखरकारखानाही आहे.
चौधरी, वसंत
“