थुजा : (इं. आर्बर–व्हिटी कुल-क्युप्रेसेसी). प्रकटबीज वनस्पतींपैकी [⟶ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] व शंकुधारी वनस्पतींच्या [⟶ कॉनिफेरेलीझ] गणातील एका लहान आणि फक्त पाच (ए. बी. रेंडेल यांच्या मते सहा) जातींच्या वंशाचे हे नाव असून, त्यात समावेश केलेल्या सर्व वनस्पतींना ‘जीवन वृक्ष’ (इं. ट्री ऑफ लाइफ) असे म्हणतात. ह्या शोभिवंत, शाखायुक्त, सदापर्णी, काष्ठमय व लहानमोठ्या वृक्षांची शोभेकरिता बियांपासून लागवड करतात. त्यांचा प्रसार उत्तर समशीतोष्ण कटिबंधात आहे भारतात ते उद्यानांत लावलेले आढळतात. या रेझीनयुक्त सुगंधी वृक्षांना आखूड पण आडव्या पसरलेल्या मोठ्या फांद्या असून त्यांवर पिसासारख्या व चपट्या लहान फांद्या असतात त्यांवर समोरासमोर खवल्यांसारखी लहान पण फांदीशी समांतर राहणारी व रेझीन प्रपिंडीय (स्रावक ग्रंथियुक्त) सुगंधी पाने असतात. फांद्यांच्या टोकाशी असलेल्या पानांवर कण्यासारखा उंचवटा काहींवर दिसतो. स्त्री–शंकू व पुं–शंकू (प्रजोत्पादक विशिष्ट फुलांशी अथवा फुलोऱ्यांशी तुलना करण्यासारखे अवयव) लहान फांद्यांच्या टोकास एकाच झाडावर येतात. ते लहान (१–१·५ सेंमी. लांब) असतात. स्त्री–शंकू गोलसर असून त्यावर ८–१२ खवले समोरासमोर जोडीने येतात एक अथवा दोन जोड्या फलनक्षम आणि सर्वांत वरचे व सर्वांत खालचे वंध्य असून शंकूत दोन ते पाच बिया बनतात. पुं–शंकूतील केसरदले बहुधा सहा व समोरासमोर येतात. बायोटा वंशातील काही जाती येथे समाविष्ट करतात त्या वंशात खालच्या खवल्यावर बिया असतात. उत्तर जुरासिक (सु. १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) व पूर्व क्रिटेशस (सु. १४ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) पादप जातींत (वनस्पतींच्या जातींत) थुजा आणि क्युप्रेसस यांच्या फांद्यांसारखी संरचना दर्शविणारे जीवाश्म (शिळारूप अवशेष) सापडले आहेत परंतु उपलब्ध झालेल्या शंकूंच्या जीवाश्मांचा पुरावा खात्रीचा नसल्याने ह्या वनस्पतींचे त्या काळातील अस्तित्व संशयास्पद आहे.

थुजा (पांढरा सीडार) : पक्व शंकूसह फांदी.

पांढरा सीडार : (इं. कॉमन आर्बर–व्हिटी लॅ. थुजा ऑक्सिडेंटॅलिस). हा नोव्हास्कोशा ते मॅनिटोबा आणि उ. कॅरोलायना ते दक्षिणेस टेनेसीपर्यंत आढळतो. हा साधारण त्रिकोणी व सु. १८–२० मी. उंच वृक्ष असून त्याचे सु. पन्नास प्रकार बागेतून लावलेले आढळतात. याचे लाकूड सुगंधी, टिकाऊ, फार हलके, नरम, ठिसूळ, फिकट पिवळट तपकिरी असून पातळ तक्ते, कुंपणाचे व तारायंत्राचे खांब, होड्या, नावा इत्यादींकरिता वापरतात. पानांचा काढा रक्तपित्त रोगांवर उतारा असल्याची समजूत होती. पानांतील बाष्पनशील (उडून जाणारे) तेल कफनाशक, संधिवातहारक, आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारे) असून कातडीच्या रोगांवर लावण्यास चांगले असते. ते अस्तरांत वापरतात. झाडे कुंपणाच्या कडेने लावतात. तेलाला ‘सीडार तेल’ म्हणतात.

प्रचंड जीवन वृक्ष : (इं. अमेरिकन जायंट आर्बर–व्हिटी वेस्टर्न रेड सीडार लॅ. थुजा प्‍लिकॅटा). हा वृक्ष वायव्य अमेरिका आणि पॅसिफिक प्रदेशातील असून त्याची उंची ४६–६२ मी. असते. याचे लाकूड नरम पण फार टिकाऊ असून तक्ते, कपाटे, होड्या, खांब, दारे इत्यादींकरिता उपयुक्त असते.

जपानी हिबा : (इं. चायनीज आर्बर–व्हिटी लॅ. थुजा ओरिएंटॅलिस). हा सु. ८ मी. उंच वृक्ष इराण ते पूर्व आशिया येथे आढळतो. तो जपानात बहुधा लागवडीत आहे. याचे अनेक प्रकार शोभेकरिता लागवडीत आहेत. याच्या चपट्या लहान फांद्या उभ्या पातळीत राहतात. शंकू गोलसर किंवा दाबल्यासारखे असतात. पानांना उग्र वास येतो व त्यांपासून पिवळा रंग काढतात.

पहा: कॉनिफेरेलीझ.

संदर्भ: 1. Datta, S. C. An Introduction to Gymnosperms, Meerut, 1966.

            2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. I, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ.