थर्मास : थंड किंवा गरम पदार्थ त्याचे तापमान फारसे न बदलू देता साठवून ठेवण्याचे पात्र. द्रवरूप ऑक्सिजनाच्या साठवणीकरिता सुयोग्य पात्र शोधून काढण्याबद्दलच्या प्रयोगांच्या अनुषंगाने जेम्स देवार (ड्यूअर) या स्कॉटिश शास्त्रज्ञांनी १८९२ च्या सुमाराला या पात्राचा शोध लावला म्हणून त्याला देवार पात्र असेही म्हणतात. थर्मास बॉटल किंवा व्हॅक्युम फ्लास्क (निर्वात पात्र) या व्यापारी नावाने ते बाजारात विकले जाते.

संवहन, संनयन किंवा प्रारण या तीन प्रकारच्या क्रियांनी उष्णतेचे संक्रमण होऊन शकते [⟶ उष्णता संक्रमण]. पहिल्या दोन क्रियांसाठी वास्तव माध्यमाची आवश्यकता असते. तेव्हा वास्तव माध्यम काढून टाकल्यास संवहन व संनयन या क्रिया बंद होतील. दुसरी गोष्ट चकचकीत पृष्ठभागापासून होणाऱ्या उष्णतेच्या प्रारणाचे प्रमाण किमान असते. या दोन तत्त्वांचा उपयोग थर्मास पात्राच्या रचनेत केलेला आहे.

थर्मास : (१) बाहेरचे धातूचे पात्र (किंवा डबा), (२) बाहेरची काचेची बाटली, (३) निर्वात, (४) आतील बाटली, (५) धक्काशोषक, (६) बूच, (७) झाकण, (८) हवा काढून घेतल्यावर बंद केलेले तोंड.

या पात्रातील मुख्य भाग म्हणजे एक काचेची (किंवा धातूची) दुहेरी बाटली होय. पातळ काचेच्या दोन सारख्या आकाराच्या बाटल्या एकीत एक अशा बसवितात. या दोन बाटल्यांमध्ये थोडे (सु. २ मिमी.) अंतर ठेवलेले असून त्यांच्या मधल्या भागातील हवा पंपाच्या साहाय्याने काढून टाकतात (यामुळेच या साधनाला निर्वात पात्र हे नाव मिळाले) यामुळे बाटलीच्या बाजूंमधून होणारे संवहन व संनयन अत्यंत कमी होते. या बाटल्यांच्या पृष्ठभागावर आरशाप्रमाणे पारा वा चांदीचा वर्ख लावून त्यांचे पृष्ठभाग चकचकीत केलेले असतात त्यामुळे उष्णतेच्या प्रारणाचे प्रमाणही अत्यल्प होते. अशा तऱ्‍हेने बाटलीच्या आतून बाहेर किंवा बाहेरून आत होणारे उष्णता संक्रमण किमान झाल्यामुळे आत ठेवलेल्या (थंड वा उष्ण) पदार्थाचे तापमान सु. ८–१० तासांपर्यंत तरी जवळजवळ स्थिर राहू शकते.

ही बाटली पातळ काचेची असल्याने धक्क्याने फुटू नये म्हणून ती पत्र्याच्या किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात बसविलेली असते. बाटलीच्या बुडाखाली आणि गळ्याभोवती रबराचे किंवा प्लॅस्टिकचे धक्काशोषक बसविलेले असतात.

बाटलीचे तोंड प्लॅस्टिकच्या एका बुचाने बंद केलेले असून त्यावरून डब्याच्या तोंडावर बसणारे फिरकीचे झाकण असते. या झाकणाचा उपयोग पेय पिण्यासाठी कपासारखा करता येतो. कित्येकदा बूच व झाकण म्हणून प्लॅस्टिकचा एक जादा कप उपडा ठेवलेला असतो. या सर्व योजनेमुळे बुचावाटे होणारे उष्णता संक्रमण कमी होण्यास मदत होते. इतकी काळजी घेतल्यानंतरही उष्णतेचे जे काही संक्रमण होते ते बव्हंशी या बुचातूनच होते.

बर्फाचे खडे ठेवण्यासाठी खास बनविलेल्या निर्वात पात्राचे तोंड बरेच रुंद (व्यास १० सेंमी. पर्यंत) करतात. अशा पात्रात बर्फ घालून त्यात नीच तापमानाला ठेवणे आवश्यक असणारी औषधे व लसी ठेवून त्यांची वाहतूक करता येते.

चांगल्या बाटलीचे तोंड कानाला लावल्यास घुमणारा आवाज ऐकू येतो. बाटली पिचली असल्यास तिच्यातील ‘निर्वात’ नष्ट होतो व घुमणारा आवाज ऐकू येत नाही.

भारतातील उत्पादन व निर्यात : १९४२ पूर्वी थर्मासांची भारतात आयात करण्यात येत होती. १९४२ मध्ये व्हिक्टरी फ्लास्क लि. हा पहिला थर्मास कारखाना मुंबई येथे निघाला. त्यानंतर १९५५-५६ या काळात मद्रास व मुंबई येथे प्रत्येकी एकेक नवीन कारखाने निघाले. १९७६ मध्ये भारतात सु. १२ कारखाने थर्मास निर्मिती करीत होते. १९७३-७४ साली भारतातील थर्मास करणाऱ्या कारखान्यांची उत्पादन क्षमता ४५ लाख नगांची होती पण या कारखान्यांतून प्रत्यक्ष उत्पादन ५७ लाख नगांचे झाले.

                    भारतीय थर्मास निर्यात (१९६८–७४) 

वर्ष

निर्यात

(कोटी रुपयांत)

१९६८-६९

१९६९-७०

१९७०-७१

१९७१-७२

१९७२-७३

१९७३-७४

०·३३३

६·३८८

१६·५४९

१८·९७१

२२·२१३

२९·९४२

आता थर्मासांची आयात बंद झालेली असून भारतातून रशिया, ब्रिटन, स्वीडन, फ्रान्स, प. जर्मनी, पोलंड, हंगेरी, यूगोस्लाव्हिया, प. आफ्रिका, मध्यपूर्व आशियातील देश, श्रीलंका, फिलिपीन्स, हाँगकाँग, जपान इ. देशांना थर्मासांची निर्यात करण्यात येते. भारतातून १९६८-६९ ते १९७३-७४ या काळात झालेल्या थर्मासांच्या निर्यातीची आकडेवारी वरील कोष्टकात दिलेली आहे.

गोखले, श्री. पु.