त्सेपेलीन, फेर्दिनांद फोन : (८ जुलै १८३८–८ मार्च १९१७). त्सेपेलीन या हवाई नौकेचा जर्मन निर्माता व लष्करी अधिकारी. जर्मनीतील पूर्वीच्या बाडेन राज्यामधील कॉन्स्टन्स या गावी जन्म. वयाच्या विसाव्या वर्षी लष्करात कमिशन. पुढे अमेरिकेचे यादवी युद्ध (१८६३), ऑस्ट्रिया–प्रशिया युद्ध (१८६६) आणि फ्रान्स–प्रशिया युद्ध (१८७०–७१) इ. युद्धांत त्याने लष्करी कामगिरी केली. १८९१ साली लेफ्टनंट–जनरल हे अधिकारपद मिळाल्यावर सेनेतून निवृत्त. निवृत्तीनंतर हवाई नौकेच्या निर्मितीत व्यग्र. २ जुलै १९०० रोजी त्याच्या एल् झेड्–१ या पहिल्या हवाई नौकेचे उड्डाण झाले. पहिल्या जागतिक महायुद्धात बऱ्याच त्सेपेलीन विमानांच्या साह्याने इंग्‍लंड वगैरेसारख्या दूर ठिकाणी बाँबहल्ले करण्यात आले. १९१९–३९ या कालात यूरोप–अमेरिका हवाई वाहतूक करण्यात त्सेपेलीन विमानांनी यश मिळविले. कोणत्याही हवाई नौकेला त्सेपेलीन म्हणण्याची प्रथा यामुळेच पडली. याचा मृत्यू बर्लिनजवळ शार्‌लाँटनबुर्क येथे झाला.

दीक्षित, हे. वि.