त्रुटिजन्य रोग : आहाराचे निरनिराळे घटक असतात. समतोल आहारात [⟶ आहार व आहारशास्त्र] या घटकांचे प्रमाण ठरलेले असते. या घटकांचे प्रमाण कमी झाले किंवा त्यांचा पूर्णपणे अभाव असला म्हणजे शरीरावर जे दुष्पपरिणाम होतात त्यांचा समावेश ‘त्रुटिजन्य रोग’ या संज्ञेत केला जातो. हे रोग उद्भवण्यापूर्वी काही काळपर्यंत ही त्रुटी आहारात असावी लागते. आहारातील एकूण घटकांपैकी केवळ एखाद्याच घटकाची न्यूनता सहसा आढळत नाही, बहुधा एकापेक्षा अनेक घटकांची न्यूनता कमीजास्त प्रमाणात आढळते. त्रुटिजन्य रोगांचे केवळ आहारातील न्यूनता हे एकच कारण असते असे नव्हे. अगदी समतोल आहार घेणाऱ्यांमध्येही हे रोग उद्भवण्याची शक्यता असते. अन्न शिजवण्याची चुकीची पद्धत त्याचे चर्वण, गिळणे आदी क्रियांतील अडथळे अन्न आंत्रमार्गात (आतड्याच्या मार्गात) शिरल्यानंतर शोषणातील बिघाड शोषणानंतर साठा व योग्य उपयोगातील अडचणी प्रमाणापेक्षा जादा उत्सर्जन इ. अनेक कारणे त्रुटिजन्य रोग उत्पन्न होण्यास मदत करतात.
प्रत्येक आहार घटकाचे विशेष असे कार्य असते परंतु ते पार पडण्याकरिता इतर काही घटकांची गरज असतेच. कॅल्शियम या खनिजाचे कार्य नीटपणे होण्यासाठी फॉस्फरस खनिजाची जरुरी असते म्हणून कॅल्शियमन्यूनतेमुळे झालेला रोग केवळ त्या खनिजाच्या त्रुटीमुळेच उद्भवतो, असे म्हणता येणार नाही फॉस्फरसन्यूनतेचाही त्यात मोठा वाटा असू शकेल.
शरीराची वाढ आहारामुळे होते. आहारातील प्रथिन घटक वाढीस मुख्यतः जबाबदार असतात. शरीरवाढीमध्ये इतर घटकांचाही वाटा असतोच. ⇨जीवनसत्त्वे आणि ⇨ अंतःस्रावी ग्रंथी यांचा घनिष्ट संबंध आहे. या ग्रंथींच्या स्रावामुळे शरीरातील विशिष्ट क्रिया सुरळीत चालतात व वाढीस मदत होते. जीवनसत्त्वांप्रमाणेच खनिजांवरही शरीराची वाढ अवलंबून असते. विशेषतः यांत कॅल्शियम, फॉस्फरस व लोह यांना महत्वाचे स्थान आहे. प्रथिने व ⇨ वसाम्ले वाढीस उपयुक्त असतात. प्रथिन, कॅल्शियम व लोह एकत्र आले म्हणजे वाढ उत्तम होते असे अनेक प्रयोगान्ती आढळून आले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, शरीराच्या वाढीकरिता अनेक आहारघटकांची गरज असते.
योग्य अन्नाचे सेवन, त्यानंतर त्याचे शोषण व योग्य उपयोगानंतर तयार होणाऱ्या टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन इ. क्रिया व्यवस्थित चालल्या म्हणजेच शरीराचे स्वास्थ्य उत्तम राहू शकते. पोहणारा किंवा खेळाडू सुरुवातीला थकला, तरी नंतर त्याचा उत्साह वाढतो हे वरील सर्व क्रिया योग्य होत असल्याचेच लक्षण आहे.
मूत्रपिंडांचे कार्य शरीरातील टाकाऊ पदार्थ मूत्रातून शरीराबाहेर टाकण्याचे आहे. पाण्याबरोबरच चयापचयामुळे (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक–रासायनिक बदलांमुळे) उत्पन्न होणारे यूरिया, यूरिक अम्ल, क्रिॲटिनीन इ. टाकाऊ पदार्थ मूत्रातून बाहेर पडतात. मूत्रपिंडांचे कार्य नीट न झाल्यास हे पदार्थ रक्तात साचून विषारी परिणाम दिसू लागतात. मूत्रपिंडांच्या उत्सर्जन कार्यात बिघाड झाला म्हणजे त्रुटिजन्य रोग उद्भवण्यास मदत होते.
आहारातील निरनिराळे घटक व त्यांच्या न्यूनतेमुळे उत्पन्न होणारे रोग यांविषयी येथे माहिती दिली आहे.
प्रथिने : आहारातील प्रथिनन्यूनतेचा परिणाम शरीरातील कोशिकांना (पेशींना) जरूर असलेल्या ⇨ ॲमिनो अम्लांवर होतो. या अम्लांचा तुटवडा कोशिकांच्या संश्लेषण क्रियाशीलतेवर दुष्परिणाम करतो. ऊतकांची (समान रचना आणि कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहांची) वाढ आणि हानी भरून काढण्याकरिता प्रथिनांची जरूरी असते. आंत्रमार्गाच्या उपकला (अगदी जवळजवळ असलेल्या कोशिकांमुळे बनलेल्या एक वा अनेकपदरी पटलाच्या) अस्तराच्या कोशिका सतत झडून पडतात. त्यांची जागा भरून काढून हे अस्तर नेहमी कार्यक्षम ठेवण्याकरिता प्रथिने आवश्यक असतात. आंत्रमार्गाची श्लेष्मकला (बुळबुळीत पदार्थ स्रवणारे अस्तर) उत्तम असेल, तरच अन्नाचे पचन व शोषण व्यवस्थित होईल. प्रथिनन्यूनता पुढील कोणत्याही कारणामुळे उद्भवू शकते : (अ) आर्थिक परिस्थिती वा भूक न लागल्यामुळे अल्प सेवन, (आ) पचन व शोषण दोष : उदा., जठराचा काही भाग शस्त्रक्रियेने काढून टाकल्यानंतर वा अग्निपिंड विकृती, (इ) संश्लेषण दोष : शोषिलेल्या ॲमिनो अम्लांचे अल्ब्युमिनात रूपांतर न होणे, (ई) प्रमाणापेक्षा अधिक नाश : काही रोगांमध्ये उदा., मूत्रपिंडशोथ (मूत्रपिंडांची दाहयुक्त सूज), जलोदरयुक्त ⇨ यकृत–सूत्रण रोग वगैरेंमध्ये प्रथिनांचा अतिरिक्त नाश होतो. प्रथिनन्यूनतेचे निदान रक्तरसातील (रक्तातील घन पदार्थविरहीत रक्तद्रवातील) प्रथिनांच्या मोजणीवरून करता येते. रक्तरसात प्रत्येक १०० मिली. मध्ये ५·८ ते ७·८ ग्रॅ. प्रथिने असतात. त्यांपैकी अल्ब्युमिनाचे प्रमाण ४ ते ५ ग्रॅ. एवढे असते. हे प्रमाण ३·५ ग्रॅ. पेक्षा कमी आढळले म्हणजे प्रथिनन्यूनता झाली असे समजले जाते. अशक्तपणा, रक्तक्षय (ॲनिमिया), सूज, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, तसेच जखमा लवकर भरून न येणे इ. लक्षणे प्रथिनन्यूनता दर्शवितात. लहान मुलांमध्ये ⇨ क्वाशिओरकोर रोग होतो.
कार्बोहायड्रेटे : (पिष्टमय पदार्थ). शरीराला ताबडतोब लागणारी ऊर्जा कार्बोहायड्रेटांपासून मिळते. उष्ण कटिबंधातील गरीब रहिवाशांना लागणाऱ्या दैनंदिन ऊर्जेपैकी ९०% ऊर्जा कार्बोहायड्रेटांपासून मिळते. शरीरात त्यांचा एकूण साठा फक्त ३००–४०० ग्रॅ. एवढाच असतो. म्हणजेच संपूर्ण साठा वापरूनही एका सबंध दिवसाची शरीराची गरज भागणार नाही. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्यांच्या आहारातही कार्बोहायड्रेटे भरपूर प्रमाणात असतात कारण ते घटक असलेले अन्नपदार्थ स्वस्त असतात. या कारणामुळे त्यांची न्यूनता सहसा आढळत नाही. दुष्काळामध्ये वा इतर कारणांमुळे झालेल्या उपासमारीत कार्बोहायड्रेटन्यूनता आढळण्याची शक्यता असते. उपासमार आणि कार्बोहायड्रेटन्यूनता अर्भकांमध्ये कीटोनाधिक्य (ॲसिटोॲसिटिक अम्ल ॲसिटोन, हायड्रॉक्सिब्युटिरिक अम्ल इ. कीटोनांची वाढ) उत्पन्न करते, परिणामी अम्लरक्तता (रक्तातील अम्लाचे प्रमाण वाढणे) व शरीराचे निर्जलीकरण होते. पिष्टमय पदार्थांच्या अतिसेवनाने शरीरास हानी पोहोचण्याचा संभव असतो. अशी लहान मुले फोफशी, रोगसंसर्ग चटकन होणारी, पोट फुगलेली व अतिसार, पोटदुखी वगैरेंनी ग्रस्त असतात.
वसा : अन्नातील स्निग्ध पदार्थांत हा घटक असतो. शरीरातील वसेचा प्रमुख उपयोग ऊर्जा साठा म्हणून होतो. एक ग्रॅम वसा ९ कॅलरी म्हणजे प्रथिन किंवा कार्बोहायड्रेटांपेक्षा दुप्पट ऊर्जा उत्पन्न करू शकते. वसा साठा हा बँकेतील शिलकीसारखाच जरूरीच्या वेळी उपयुक्त ठरणारा असतो. अ, ड, ई आणि के या जीवनसत्त्वांच्या शोषणाकरिता वसेची जरूरी असते कारण ती सर्व वसाविद्राव्य (वसेत विरघळणारी) असतात. वाढ आणि पोषण दोन्हींकरिता वसाम्ले जरूर असतात. आवश्यक वसाम्ले शरीराला अत्यल्प प्रमाणात पुरतात म्हणून वसात्रुटिजन्य रोग आढळत नाहीत. मात्र वरील जीवनसत्त्वांच्या त्रुटीमुळे रोग उद्भवतात. जादा वसायुक्त पदार्थांचे सेवन हे लठ्ठपणाचे एक कारण असू शकते. काहींच्या मते वसाम्लांची त्रुटी रोहिणी भित्तीवर दुष्परिणाम करून त्यांच्या अपकर्षास (ऱ्हासास) कारणीभूत होत असावी. मात्र याला सबळ पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. संपृक्त (ज्यातील कार्बन शृंखलेतील कार्बन अणू एकापेक्षा जास्त बंधांनी जोडलेले नसतात अशी) वसाम्ले मांसाहारातून अधिक प्रमाणात सेवन केली जातात. त्यामुळे रक्तरसातील कोलेस्टेरॉल वाढते. त्यामुळे हृद्रोहिण्यांवर परिणाम होऊन हृद्रोग उत्पन्न होण्याची शक्यता असते. अशा वेळी वनस्पतिजन्य असंपृक वसाम्लांचेच सेवन केल्यास धोका टाळता येतो. लोणी व मलई यांसारखे पदार्थ अवश्य टाळावेत.
खनिज घटक : सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन, तांबे, कोबाल्ट इ. अकार्बनी पदार्थांचा अन्नातील खनिज घटकांमध्ये समावेश होतो. त्यांचे अन्नातील प्रमाण अत्यल्प तर असते पण त्यांचे शोषण आणि उत्सर्जन इतर घटकांप्रमाणे सहज होत नाही.
सोडियम : मानवी शरीराला दैनंदिन १० ग्रॅ. सोडियम क्लोराइड (मीठ) लागते. ज्यांना अतिशय घाम येतो त्यांना जादा सोडियम क्लोराइडची गरज असते. अन्नात सोडियम क्लोराइड भरपूर प्रमाणात असते किंबहुना जेवताना निराळे मीठ घेण्याचीही गरज नसते. सोडियमन्यूनता अल्प सेवन वा अतिरिक्त नाश यामुळे उद्भवू शकते. उष्ण कटिबंधीय प्रदेशातील जलद औद्योगिकीकरणामुळे जड काम करणारे व एंजिनात कोळसा भरणारे कामगार यांच्यामध्ये सोडियमन्यूनतेचा धोका उत्पन्न झाला आहे. त्यांना अशक्तपणा जाणवून कामाचा उत्साह कमी होतो. पेये, गोळ्या इ. स्वरूपांत त्यांचा मिठाचा पुरवठा वाढविल्यास हे दुष्परिणाम नाहीसे होतात. काही विकृती सोडियमन्यूनता उत्पन्न करतात. उदा., अतिवमन (अतिशय उलट्या होणे), अतिसार, मूत्रपिंड विकार, ⇨ ॲडिसन रोग वगैरे. शरीरातील ३०% सोडियम एकदम नाश पावल्यास रुधिराभिसरणजन्य अवपात होऊन मृत्यू येतो. सोडियमन्यूनता बहुधा शरीराच्या जलन्यूनतेशी संबंधित असते. फक्त सोडियमन्यूनतेत चक्कर येणे, क्षुधानाश, पोटरीत पेटके येणे, नीला अवपात, हातपाय थंड पडणे, रक्तदाब कमी होणे इ. लक्षणे आढळतात. क्लोराइड कोशिकाबाह्य द्रवातील प्रमुख धनायन (द्रवातून विद्युत् प्रवाह जाऊ दिल्यास धनाग्राकडे जाणारा ऋणविद्युत् भारित अणुगट) असते. सोडियम व क्लोराइड यांच्या न्यूनता बहुधा बरोबरच असतात. जठरनिर्गमी संकोच या रोगात उलट्यांमुळे बरेचसे हायड्रोक्लोरिक अम्ल बाहेर फेकले जाते आणि त्यामुळे सोडियमपेक्षा क्लोराइड अधिक नाश पावते. याउलट, अग्निपिंड नाडीव्रण विकृतीत क्लोराइडापेक्षा सोडियम अधिक नाश पावते.
पोटॅशियम : पोटॅशियमन्यूनतेला अल्पपोटॅशियमरक्तता (हायपोकॅलिमीया) म्हणतात. ही न्यूनता अनेक कारणांमुळे उद्भवते. अल्पसेवन, उपासमार, आंत्रमार्गातील पाचक रसांच्या उलट्या, अतिसार वगैरेंमुळे होणारा नाश, शस्त्रक्रियेच्या वेळी होणारा ऊतकनाश, शस्त्रक्रियेनंतर करावे लागणारे अग्निपिंड, आंत्रमार्ग इत्यादींचे निःसरण (रबरी नळीचा तुकडा ठेवून त्यामधून द्रव सतत बाहेर पडू देणे) इत्यादींमुळे अल्पपोटॅशियमरक्तता उद्भवते. शरीरात एकूण १२० ग्रॅ. पोटॅशियम असते. त्यापैकी १०% म्हणजे १२ ग्रॅ. नाश पावले म्हणजे न्यूनतेची लक्षणे उद्भवतात. ही लक्षणे इतर कारणांमुळे होणाऱ्या गंभीर लक्षणांमुळे दडली जाण्याची शक्यता असते. क्षुधानाश, मळमळणे आणि स्नायुदौर्बल्य या लक्षणांकडे विशेष लक्ष पुरवावे लागते. अल्पपोटॅशियमरक्ततेमुळे आंत्रमार्गाच्या स्नायूंचा ताण कमी पडून पोट फुगते व शेवटी आंत्रावरोध उत्पन्न होतो. रक्तरसात सर्वसाधारणपणे १४ ते २० मिग्रॅ. पोटॅशियम प्रत्येक १०० मिलि. मध्ये असते. हे प्रमाण १२ मिग्रॅ. पेक्षा कमी झाले म्हणजे हृदयाच्या स्नायूंवर परिणाम होण्याची शक्यता असते.
कॅल्शियम : मानवी शरीरात सर्वसाधारणपणे एकूण १,२०० ग्रॅ. कॅल्शियम असते. रक्तरसात त्याचे प्रमाण प्रत्येक १०० मिलि. मध्ये १० मिग्रॅ. एवढे असते. कोशिकाबाह्य द्रवातही कॅल्शियम असते. परिसरीय तंत्रिकांची (मज्जांची) व स्नायूंची उत्तेजनक्षमता कॅल्शियमावर अवलंबून असते, तसेच रक्तक्लथनाकरिता (रक्त साखळण्याकरिता) ते आवश्यक असते. हाडे तयार होण्याकरिता त्याची जरूरी असते. लहान मुलांच्या वाढीकरिता, हृदयाच्या स्नायूंच्या क्रियाशीलतेकरिता, तसेच केशवाहिन्यांची (सूक्ष्म रक्तवाहिन्यांची) पारगम्यता टिकवून ठेवण्याकरिता कॅल्शियम लागते. ड जीवनसत्त्व आणि कॅल्शियम यांचा चयापचयात्मक संबंध फार जवळचा आहे. फॉस्फरस आणि कॅल्शियम यांचाही तसाच निकट संबंध आहे. ⇨ परावटू ग्रंथीचे रक्तरसातील आयनीय कॅल्शियमावर नियंत्रण असते. कॅल्शियमन्यूनता अनेक कारणांमुळे उदा., परावटू ग्रंथीस्रावाधिक्य, ड जीवनसत्त्वन्यूनता वगैरेंमुळे उद्भवू शकते. फक्त कॅल्शियमच कमी असेल, तर अस्थिसुषिरता (कॅल्शियम नाहीसे होऊन हाडांची सच्छिद्रता वाढणे) उत्पन्न होते. लहान मुलांतील मुडदूस आणि स्त्रियांमध्ये गर्भारपणी होणारा अस्थिमार्दव (हाडामध्ये नेहमीप्रमाणे कॅल्शियमाचा संचय न झाल्यामुळे हाडे कमजोर बनणारा) रोग ड जीवनसत्त्व आणि कॅल्शियम यांच्या न्यूनतेमुळे होतो. रक्तरसातील आयनीय कॅल्शियम कमी पडले म्हणजे ⇨ आकडी ही विकृती उद्भवते. अम्लरक्तता, परावटू ग्रंथिस्त्रावन्यूनता, तीव्र अग्निपिंडशोथ इत्यादींमध्ये कॅल्शियमन्यूनता होऊन आकडी उद्भवते. तंत्रिका तंत्राची अतिउत्तेजनक्षमता हे कारण असते.
फॉस्फरस : अर्भकांच्या रक्तरसात प्रत्येक १०० मिली. मध्ये ५ ते ६ मिग्रॅ. आणि प्रौढांच्या रक्तरसात ३·५ ते ५ मिग्रॅ. फॉस्फरस असतो. सर्वसाधारण आहारात फॉस्फरस पुरेसा असल्यामुळे आहारजन्य फॉस्फरसन्यूनता सहसा आढळत नाही. मूत्रपिंडविकारामुळे मूत्रातून फॉस्फेटाचे अधिक उत्सर्जन होणारा व वामनता (खुरटी वाढ) असलेला एक रोग ‘फॅन्कोनी रोग’ (जी फॅन्कोनी या स्वीस बालरोगतज्ञांच्या नावावरून) म्हणून ओळखला जातो. हा रोग क्वचितच प्रौढातील अस्थिमार्दवास कारणीभूत होतो. ड जीवनसत्त्व प्रतिरोधी मुडदूस नावाच्या आनुवंशिक रोगात रक्तातील फॉस्फरस कमी झालेला असतो. अधिक फॉस्फरस असलेले अन्न, कॅल्सिफेरॉल व तोंडाने डायसोडियम हायड्रोफॉस्फेट रोज १० ग्रॅ. दिल्यास रोग बरा होतो.
लोह : शरीरात रक्ताचे सतत उत्पादन चालू असते. रक्त उत्पादनाकरिता लोह, ब१२ जीवनसत्त्व, फॉलिक अम्ल, ⇨ अवटू ग्रंथिस्राव (फायरॉक्सिन) आणि क जीवनसत्त्व यांची जरूरी असते. यांपैकी कोणत्याही एका घटकाची न्यूनता रक्तक्षयास कारणीभूत होते. येथे फक्त लोहाचा विचार केला आहे. लोहन्यूनताजन्य रक्तक्षय हा नेहमी आढळणारा रोग आहे. लोहन्यूनता पुढील कारणांमुळे उद्भवते : (अ) अपुरा पुरवठा, (आ) शोषण दोष, (इ) नेहमीपेक्षा वाढलेली गरज, (ई) सदोष वापर आणि (ए) रक्तस्रावामुळे झालेला नाश.
शरीरात एकूण ३ ते ५ ग्रॅ. लोह असून त्यापैकी निम्म्याहून अधिक रक्तारुणात (हीमोग्लोबिनात) असते. लोहन्यूनता रक्तारुणाच्या उत्पादनावर परिणाम करते. दैनंदिन आहारात पुरेसे लोह असूनही आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या वर्गात काही विशिष्ट कारणामुळे लोहन्यूनता उत्पन्न होण्याची शक्यता असते. उदा., कालपूर्व जन्मलेले मूल, जुळी मुले, अनेक गर्भारपणे, वाढते वय वगैरे. तृणधान्यांतील फॉस्फेट व फायटेट यांचे जास्त प्रमाण लोहाच्या शोषणात अडथळा आणते. लोहन्यूनताजन्य रक्तक्षय ओळखण्याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे नखांचा चापटपणा किंवा दर्वी नखे (चमचा किंवा पाळीसारखी खोलगट नखे) हे होय. रक्ततपासणीने निदान निश्चित करता येते. लोहयुक्त औषधे तोंडाने घेणे उपयुक्त असते. ज्या वेळी शोषण दोष, अतिसार, उलट्या इ. विकार असतील त्या वेळी ते अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) देता येते.
मॅग्नेशियम : शरीरातील एकूण मॅग्नेशियम २४ ग्रॅ. असून त्यापैकी निम्म्याहून अधिक अस्थींमध्ये असते. अल्पसेवन, उलट्या, आंत्रमार्ग नाडीव्रण, मूत्रातून जादा उत्सर्जन, अपपोषण इ. कारणांमुळे न्यूनता उत्पन्न होते. कॅल्शियम व पोटॅशियम यांच्या न्यूनता मॅग्नेशियमन्यूनतेबरोबरच असतात. तंत्रिका–स्नायू उत्तेजनक्षमतेवर या न्यूनतेचा परिणाम होत असावा. अंगावरील कपडे किंवा पांघरूणाशी अर्थहीन चाळा करणे, कंप, पेटके येणे, झटके येणे इ. लक्षणे आढळतात. पुष्कळ वेळा कॅल्शियमन्यूनतेप्रमाणेच आकडी उद्भवते. काहींच्या मते ती मॅग्नेशियमन्यूनतेचे लक्षण नसते. दृष्टिभ्रम, निर्वस्तुभ्रम, मानसिक गोंधळ इ. लक्षणेही आढळतात. इलाजाकरिता दिवसातून दोन वेळा २ मिलि. मॅग्नेयशियम सल्फेट अंतःक्षेपणाने देतात.
फ्ल्युओरीन : मानवी शरीरातील हाडे, दात, अवटू ग्रंथी, त्वचा व रक्त यांमध्ये फ्ल्युओरीन असते. पिण्याच्या पाण्यात आणि अन्नात फ्ल्युओरीन असते. पिण्याच्या पाण्यात प्रत्येक १०० मिली. मध्ये ०·१ मिग्रॅ. फ्ल्यु्ओरीन असल्यास ते उत्तम मानले जाते. वाढणाऱ्यात दातांच्या दंतवल्कामध्ये फ्ल्युओराइडांचा संचय होतो. फ्ल्युओरीनाचा अत्यल्प पुरवठा दातकिडीस प्रतिबंध करतो, हे निश्चित समजले आहे. अमेरिकेत ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यात फ्ल्युओरीन नाही त्या ठिकाणी ते मुद्दाम फ्ल्युओरीनमिश्रित बनविण्यात येते. त्यामुळे त्या भागातील लहान मुलांना होणाऱ्या दातकिडीचे प्रमाण घटल्याचे दिसून आले आहे.
आयोडीन : शरीरात एकूण २० ते ५० मिग्रॅ. आयोडीन असते. रक्तरसात ते प्रथिनबद्ध अवस्थेत प्रत्येक १०० मिलि. मध्ये ४ ते ८ मायक्रोग्रॅम असते. एकट्या अवटू ग्रंथीतच ८ मिग्रॅ. आयोडीन असते आणि अवटू ग्रंथिस्त्रावाचा ते महत्त्वाचा घटक असते. आयोडिनाची शरीरातील क्रियाशीलता त्याच्या अवटू ग्रंथिस्रावातील मिश्रण अवस्थेवरच अवलंबून असते म्हणून या स्रावाच्या परिणामाशी आयोडिनचा फार निकट संबंध असतो. या स्रावामुळे (१) ऊतक–चयापचयात वाढ होऊन अधिक ऑक्सिजन वापरला जातो, (२) ग्लायकोजेनाचे ग्लुकोजामध्ये रूपांतर होते, (३) हृदयाची गती वाढते आणि (४) हाडातील कॅल्शियम व फॉस्फरस कमी होऊन मूत्रातील त्यांचे उत्सर्जन वाढते. आयोडीनन्यूनता ⇨ गलगंडास कारणीभूत होते. ही न्यूनता पिण्याचे पाणी वा दैनंदिन आहारातील आयोडिनाच्या कमतरतेमुळे उद्भवते. काही प्रदेशांतील जमिनीतच त्याचे प्रमाण कमी असल्यामुळे तेथील धान्यांतही आयोडीन अत्यल्प असते किंवा अजिबात नसते. हिमालयाचा प्रदेश, आल्प्स, अँडीज, पिरेनीज, झाईरे या प्रदेशांत अशा प्रकारचे गलगंड आढळते व त्याला प्रदेशनिष्ठ गलगंड म्हणतात. गर्भारपण, ऋतुस्राव आणि ऋतुनिवृत्ती या काळांत स्त्रियांमध्ये आयोडीनन्यूनता उद्भवण्याचा संभव असतो. काही प्रदेशातून जडवामनता [⟶ क्रेटिनिझम] आयोडीनन्यूनताजन्य असते. या विकृतीमध्ये अवटू ग्रंथिस्रावन्यूनता, शारीरिक व मानसिक वाढ खुंटलेली असते आणि ती गर्भावस्थेत किंवा जन्मानंतर काही दिवसांतच उत्पन्न होते.
जस्त : सर्व जिवंत ऊतकांमध्ये जस्त असते. मानवी आहारात १० ते १५ मिग्रॅ. जस्त असते. ऑयस्टरमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते. मानवी शरीरात एकूण १ ते २ ग्रॅ. जस्त असते. जस्तन्यूनता जठरांत्रमार्गाच्या बिघाडास कारणीभूत होते. लोहन्यूनताजन्य रक्तक्षय आणि शरीराची वाढ खुंटणे यांमध्येही जस्तन्यूनता भाग घेत असावी.
वरील खनिजांशिवाय गंधक, कोबाल्ट, तांबे व मँगॅनीज यांचीही शरीराला गरज असते परंतु त्यांच्या त्रुटीमुळे मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणांमांची निश्चित माहिती अजून उपलब्ध झालेली नाही.
जीवनसत्त्वे : अन्नातील अनेक साहाय्यक घटकांना जीवनसत्त्वे हे नाव देण्यात आले असून त्यांपैकी पुष्कळांची मानवी शरीराच्या वाढीकरिता व स्वास्थ टिकवण्याकरिता गरज असते, हे सिद्ध झाले आहे. शरीराला जरूर असणाऱ्या जीवनसत्त्वांची दैनंदिन गरज अत्यल्प असली, तरी तेवढाही पुरवठा शरीर स्वनिर्मितीने करू शकत नाही म्हणून त्यांचा आहारातून होणारा पुरवठा अधिक महत्त्वाचा असतो. जीवनसत्त्वांचा शरीरातील उपयोग पुढील गोष्टींवर अवलंबून असतो. (१) उपलब्धता : सर्वच जीवनसत्त्वे शोषणयोग्य अवस्थेत असतात असे नव्हे. तृणधान्यातील निकोटिनिक अम्ल ज्या अवस्थेत बद्ध असते तीमुळे आंत्रमार्गातून त्याचे शोषण होत नाही. वसाविद्राव्य जीवनसत्त्वांचे शोषण वसा चयापचयात बिघाड झाल्यास नीट होत नाही. (२) प्रतिजीवनसत्त्वे : नैसर्गिक अन्नपदार्थात असे काही पदार्थ असतात की, जे जीवनसत्त्वांच्या शोषणास प्रतिरोध करतात किंवा आंत्रमार्गातच त्यांचा नाश करतात. (३) पूर्वगामी–जीवनसत्त्वे : अन्नातील काही घटक प्रत्यक्ष जीवनसत्त्वे नसतात परंतु त्यांपासून नंतर ती तयार होतात. कॅरोटिनापासून नंतर अ जीवनसत्त्व बनते. ट्रिप्टोफेन या ॲमिनो अम्लापासून काही प्रमाणात निकोटिनिक अम्ल बनू शकते.
(४) जैवसंश्लेषण : आंत्रमार्गातील नेहमीचे सूक्ष्मजंतू संश्लेषणाने काही जीवनसत्त्वे बनवू शकतात. के जीवनसत्त्व, निकोटिनिक अम्ल, रिबोफ्लाविन, ब१२ जीवनसत्त्व इ. अशा प्रकारे तयार होऊ शकतात. वरील कारणांमुळे केवळ अन्नपुरवठ्यातील कमतरता जीवनसत्त्वन्यूनतेस कारणीभूत होईल, असे म्हणता येणार नाही. फक्त प्रयोगशाळांतूनच केवळ एकाच जीवनसत्त्वाच्या न्यूनतेचे परिणाम अभ्यासता येणे शक्य आहे. प्रत्यक्ष जीवनात नेहमी एकापेक्षा अधिकच जीवनसत्त्वांची न्यूनता आढळते [⟶ जीवनसत्त्वे] .
पुढील कोष्टकात त्रुटिजन्य रोगांचा आढावा घेतला असून त्यामध्ये जीवनसत्त्वांचाही समावेश केला आहे.
पानसे, के. वि.; ढमढेरे, वा. रा.; भालेराव, य. त्र्यं.
पशूंतील त्रुटिजन्य रोग : पशूंच्या शरीरपोषणाला आवश्यक असणाऱ्या काही पोषकांच्या कमतरतेमुळे किंवा अभावामुळे जनावरांत त्रुटिजन्य रोग आढळतात. कॅल्शियम, फॉस्फरस, तांबे, लोह, कोबाल्ट, जस्त, मॅग्नेशियम व मँगॅनीज यांसारखी मूलद्रव्ये आणि अ, ड, ई आणि के ही जीवनसत्त्वे यांतील एक किंवा त्यापेक्षा अधिक पदार्थांच्या खाद्यातील उणीवेमुळे असे रोग जनावरांत झाल्याचे आढळून आले आहे. यांतील काही मूलद्रव्यांचा काही भागांतील जमिनीमध्ये अभाव असल्यामुळे त्यावर उगवणाऱ्या गवत आणि इतर पिकांमध्ये (पशुखाद्यामध्ये) त्यांचा अभाव असतो. अशा भागांतील पशूंमध्ये हे रोग प्रामुख्याने उद्भवल्याचे दिसून येते.
पशूंमधील त्रुटिजन्य रोगांचे निदान सर्वसाधारणपणे पुढील तीन प्रश्नार्थक सूत्रांवर आधारित असते. (१) ज्याच्या त्रुटीमुळे रोग झाला असेल तो पदार्थ खाद्यामध्ये पशूंना लागणाऱ्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात आहे काय? (२) पशूंमध्ये दिसणारी आजाराची लक्षणे त्या पदार्थाच्या कमतरतेमुळे दिसू शकतील काय? व (३) तो पदार्थ खाद्यामध्ये समाविष्ट केल्यावर रोग बरा झाला किंवा किमान रोगाला प्रतिबंध झाला आहे काय ? ही ती तीन सूत्रे आहेत. प्रायोगिक रीत्या खाद्यामध्ये एखाद्या पदार्थाची कृत्रिम उणीव उत्पन्न करून दिसणाऱ्या लक्षणांच्या अभ्यासाने आणि त्यावर केलेल्या उपचारात्मक उपायांनी दुसऱ्या व तिसऱ्या प्रश्नांची उत्तरे प्रयोगान्ती सिद्ध केलेली आहेत.
कॅल्शियम, फॉस्फरस व ड जीवनसत्त्व : कॅल्शियम व फॉस्फरस यांचे शोषण एकमेकांवर अवलंबून आहे. फॉस्फरसाचे खाद्यातील प्रमाण जास्त झाल्यास कॅल्शियमाचे व याउलट झाल्यास फॉस्फरसाचे शोषण कमी होते. परिणामी खाद्यात हे पदार्थ असूनही त्यांची शरीराला न्यूनता भासू लागते. पशुखाद्यामध्ये कॅल्शियम व फॉस्फरस यांचे प्रमाण २ : १ ते १ : १ असणे जरूर आहे. फॉस्फरसाच्या न्यूनतेमुळे होणारे परिणाम ड जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमुळे अधिक तीव्रपणे दिसून येतात. खाद्यातील बहुतांशी कॅल्शियम व फॉस्फरस हाडांच्या वाढीसाठी वापरले जातात. ड जीवनसत्त्वाचाही हाडांच्या सुदृढतेशी संबंध आहे.
कॅल्शियम, फॉस्फरस व ड जीवनसत्त्व यांच्या कमतरतेमुळे हाडांचे विविध गुंतागुंतीचे रोग उद्भवतात. यांत मुडदूस, अस्थिमार्दव, अस्थिसुषिरता, अस्थींच्या कॅल्सीकरणातील (कॅल्शियमाचा समावेश होण्याच्या क्रियेतील) दोष, अस्थींची तंतुमयता व अस्थिशोथ इत्यादींचा समावेश आहे. यांतील कोणत्या रोगाची सुरुवात नेमकी कोणत्या पदार्थाच्या कमतरतेमुळे झाली, याचा शोध घेणे कठीण होते इतका चयापचयातील त्यांचा संबंध गुंतागुतीचा आहे.
तथापि कॅल्शियमाच्या कमतरतेमुळे जनावरांच्या एकंदर वाढीवर व दातांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. डुकरांमध्ये तसेच गायीगुरांमध्ये विशेषतः वाढीस लागलेल्या वयाच्या पशूंमध्ये स्नायु–संकंप (प्रेरक तंत्रिकांची अतिउत्तेजित अवस्था आणि स्नायूंमध्ये वेदनायुक्त पेटके येणे ही लक्षणे असलेला रोग) दिसून येतो. स्नायूंचा ताठरपणा, हाडे ठिसूळ होणे व त्यामुळे ती मोडण्याचे प्रकार घडणे, कष्टप्रसूती, दूध कमी होणे, प्रजननक्षमता कमी होणे इ. लक्षणे दिसून येतात. कोंबड्या कवचहीन अंडी घालतात [⟶ दुग्धज्वर].
फॉस्फरसाच्या कमतरतेमुळे वाढ खुंटणे, दूध कमी होणे, प्रजननक्षमता कमी होणे (कधीकधी ७०% वरून २०% पर्यंत कमी होणे), अस्थिमार्दव इ. लक्षणे दिसतात.
ड जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमुळे भूक न लागणे, खाल्लेले अन्न अंगी न लागणे, वजन कमी होणे, अस्थिमार्दव इ. लक्षणे दिसतात.
तांबे : रक्तातील रक्तारुण तयार करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो आणि त्यामुळे त्याच्या न्यूनतेमुळे मेंढ्या व डुकरे या पशूंमध्ये रक्तक्षय होतो. मॉलिब्डेनम या मूलद्रव्याचा खाद्यातील तांब्याच्या शोषणावर विपरीत परिणाम होतो, असे दिसून आले आहे. दुधामध्ये तांब्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे फक्त दुधावर वाढविल्या जाणाऱ्या वासरांमध्ये (२ ते ३ महिन्यांच्या) आणि कोकरांमध्ये तांब्याच्या न्यूनतेमुळे रोगलक्षणे दिसू लागतात. हेलकावे देत चालणे, थोड्याशा श्रमाने श्वासोच्छ्वास व नाडीचे ठोके जलद पडणे, अंशतः पक्षाघात ही लक्षणे प्रामुख्याने कोकरांत दिसून येतात. शिंगरांमध्ये सांध्यांची सूज, पायांमध्ये ताठरपणा, घोडकंडरा आकुंचन पावल्यामुळे खुराचा मागील भाग जमिनीवर न टेकणे ही लक्षणे दिसून येतात. मेंढ्यांच्या लोकरीतील कुरळेपणा कमी होऊन लोकरीचा धागा जाड व सरळ होतो. गाभण मेंढीमध्ये तांब्याची न्यूनता असेल, तर जन्मलेली कोकरे स्नायुदौर्बल्यामुळे हेलकावे देत चालतात व ३-४ दिवसांत मरण पावतात.
गायीगुरांत अतिसार, त्वचेवर रंगहीन ठिपके दिसणे ही लक्षणे दिसतात. काही वेळा काहीही लक्षणे न दिसता जनावर खाली पडते व तात्काळ मरण पावते, याला फॉलिंग रोग म्हणतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील वालुकामय प्रदेश, यूरोपमधील काही नव्याने भरणी केलेल्या दलदलीच्या भागातील जमिनींमध्ये तांब्याचे प्रमाण कमी असल्यामुळे तांब्याच्या न्यूनतेमुळे होणारे रोग या ठिकाणी अधिक प्रमाणात आढळतात.
लोह : शरीरातील अर्धेअधिक लोह रक्तातील रक्तारुणात असते. लोहन्यूनतेमुळे डुकरांच्या पिलांमध्ये रक्तक्षय होऊन ती मरण पावतात. जन्मतः त्यांच्या रक्तातील असणारे रक्तारुणाचे शेकडा ९ ते ११ ग्रॅ. हे प्रमाण पहिल्या ८ ते १० दिवसांत ४ ते ५ ग्रॅ. इतके कमी होते. श्लेष्मकला व त्वचेचा रंग फिका किंवा पिवळट दिसतो. श्वासोच्छ्वास करण्याला त्रास पडतो. डोके व शरीराच्या पुढच्या भागावर जलशोफ (द्रवयुक्त सूज) दिसून येतो आणि पिलू एकाएकी मरण पावते.
आयोडीन : पशूंमध्ये आयोडिनाच्या न्यूनतेमुळे गलगंड होतो. खाद्यातील आयोडिनाच्या न्यूनतेशिवाय त्यातील कॅल्शियमाचे प्रमाण वाढल्यास आयोडिनाच्या शोषणामध्ये दोष उत्पन्न झाल्यामुळे आयोडीनन्यूनता दिसून येते. तरुण वयाच्या गायीगुरांमध्ये खंगत जाणे, दूध कमी होणे, अशक्तपणा, माज दिसून न येणे, गर्भपात, मृतजातांचे वाढते प्रमाण ही लक्षणे दिसून येतात, तर वळूंमध्ये कामप्रेरणा कमी होते.
कोबाल्ट : कोबाल्टचा उपयोग रोमंथिकेमध्ये (रवंथ करणाऱ्या जनावराच्या पोटातील पहिल्या कप्प्यामध्ये) ब१२ जीवनसत्त्व तयार करण्यासाठी तसेच प्रोपिऑनिक अम्लाच्या चयापचयामध्ये होत असतो. या लेशमूलद्रव्याच्या न्यूनतेमुळे चयापचयामध्ये अडथळा उत्पन्न होऊन जनावराला भूक लागत नाही व जनावर खंगत जाऊन मृत्यू पावते.
जस्त : मांसासाठी पाळण्यात येणाऱ्या डुकरांच्या पिलांना अधिक खुराक देण्यात येतो व अशा डुकरांच्या पिलांमध्ये (७ ते १० आठवडे वयाच्या) पॅराकेराटोसीस नावाचा रोग जस्ताच्या न्यूनतेमुळे होतो. या रोगामध्ये पोटाच्या खालील व जांघेमधील त्वचेवर लालसर चट्टे उठतात. या चट्ट्यांवर पिटिका उठून त्यांचे खवल्यांमध्ये रूपांतर होऊन त्वचा जाड व कोरडी होते आणि तिला लहानमोठ्या भेगा पडतात. रोग वाढत जातो तेव्हा हे चट्टे कान व शेपटीच्या अवतीभोवती व पायांच्या सांध्यांच्या बाजूला दिसू लागतात. गायीगुरांमध्ये त्वचेच्या ४०% भागावर असे चट्टे दिसून केस गळून पडतात. मेढ्यांमध्ये लोकरीचा नाश होतो व ती गळून पडते.
मँगॅनीज व मॅग्नेशियम : मँगॅनीजन्यूनतेमुळे गायी माजावर येण्याचे लांबते व गाभण राहण्याचे प्रमाण घटते. वळूंमध्ये वीर्य निकृष्ट प्रतीचे होते. मॅग्नेशियमाच्या कमतरतेमुळे दूध देणाऱ्या गायींमध्ये स्नायूंचे कंपन, स्नायुदौर्बल्य, चालताना हेलकावे देत चालणे इ. लक्षणे दिसून येतात.
जीवनसत्त्वे : जीवनसत्त्वांपैकी अ, ई आणि के ही जीवनसत्त्वे पशूंना सामान्यतः पुरेशा प्रमाणात हिरव्या चाऱ्यामधून मिळतात. ज्या वेळी हिरव्या चाऱ्याची कमतरता असते त्या वेळीच ह्या जीवनसत्त्वांच्या न्यूनतेमुळे होणारे आजार उद्भवतात. रवंथ करणारे पशू ब आणि क ही जीवनसत्त्वे आपल्या शरीरामध्ये तयार करतात. त्यामुळे यांच्या न्यूनतेमुळे होणारे आजार या पशूंमध्ये दिसून येत नाहीत. मात्र कोंबड्या, घोडे व कुत्रे या प्राण्यांमध्ये हे आजार दिसून येतात. अ जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमुळे रातांधळेपणा, डोळ्यांचे व त्वचेचे विकार, प्रजननक्षमता कमी होणे इ. लक्षणे दिसून येतात तर ई जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमुळे वासरे व कोकरे यांमध्ये स्नायुदौर्बल्य, श्वासोच्छ्वास करण्याला त्रास होणे ही लक्षणे दिसून येतात [⟶ जीवनसत्त्वे].
वर उल्लेखिलेल्या खनिजांच्या न्यूनतेमुळे दिसणारी लक्षणे व विकार त्या त्या खनिजापासून मिळणाऱ्या लवणांचा खाद्यामध्ये पुरवठा केल्यास बरे होतात. इतकेच नव्हे तर काहींच्या बाबतीत आश्चर्य वाटावे इतक्या लवकर बरे होतात. जीवनसत्त्वांच्या न्यूनतेच्या बाबतीतही हे खरे आहे.
संदर्भ : 1. Anita, F. P. Clinical Dietetics and Nutrition, Bombay, 1966.
2. Blood , D. C. Henderson, J. A. Veterinary Medicine, London, 1971.
3. Davidson, S. Maclead, J. The Principles and practice of Medicine, Edinburgh, 1971.
4. Davidson, S. Passmore, R. Brock, J. F. Human Nutrition and Dietetics, Edinburgh, 1973.
5. Scott, R. B., Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, Oxford, 1973.