त्रिरत्न : जैन धर्मातील एक महत्त्वाची संकल्पना. उमास्वामिकृत तत्त्वार्थाधिगमसूत्र या ग्रंथातील पहिल्या सूत्राचा अर्थ असा, की सम्यग्‌दर्शन, सम्यग्‌ज्ञान व सम्यक्‌चारित्र या तीन गोष्टी मिळून मोक्षमार्ग होतो. जैनांचे सर्व मोक्षशास्त्रच यांवर आधारलेले असून त्यांना ‘त्रिरत्न’ किंवा ‘रत्नत्रय’ म्हणतात. ते आत्म्याचे गुण असून आत्म्यामध्येच वास करतात. व्यवहार–रत्नत्रय आणि निश्चय–रत्नत्रय असे यांचे दोन प्रकार आहेत.

सम्यग्‌दर्शन म्हणजे महावीराचे सर्वज्ञत्व आणि तीर्थंकरांनी सांगितलेली तत्त्वे यांवर नितांत श्रद्धा किवा भक्ती. सम्यग्‌ज्ञान म्हणजे जैनांच्या नऊ तत्त्वांचे (दिगंबरांच्या मते सात तत्त्वांचे) संपूर्ण ज्ञान वा साक्षात्कार. सम्यक्‌चारित्र म्हणजे साधूने साधुधर्म किंवा यतिधर्म पाळणे व श्रावकाने श्रावकधर्म किंवा गृहस्थधर्म पाळणे. ही तीन रत्ने संकलितपणे मोक्षकारक आहेत, असे दिगंबरांचे मत आहे परंतु श्वेतांबरांच्या मते ज्ञानानंतर दर्शन, दर्शनानंतर आचार आणि शेवटी आचारातून मोक्ष अशा आध्यात्मिक विकासाच्या पायऱ्या आहेत.

‘रत्नत्रयव्रत’ नावाचे एक जैन व्रतही आहे. बौद्ध धर्मातही बुद्ध, धर्म आणि संघ या त्रयीला ‘त्रिरत्न’ म्हटले जाते. बुद्ध हे आध्यात्मिक तत्त्व सर्वच गोष्टींचे मूलकारण, धर्म हे भौतिक तत्त्व विश्वाचे घटनात्मक कारण आणि संघ हे बुद्ध व धर्म यांचे मिश्रण असून तो विश्वाचे गुणात्मक कारण आहे. प्रत्येक बुद्धाने सकाळ–संध्याकाळ त्रिरत्नवंदना करण्याने चित्ताला शांती मिळते आणि पुण्यप्राप्ती होते. ‘बुद्धं सरणं गस्सामि…….’ हा त्रिरत्नवंदनेचा मंत्र आहे.

पाटील, भ. दे.