तोफगोळा वृक्ष : (हिं. तोप–गोळा, शिवलिंगी इं. कॅननबॉल ट्री लॅ. कौरोपिटा गिनीन्सिस कुल–लेसिथिडेसी). हा उंच व काहीसा विचित्र वृक्ष मूळचा गियानातील (द. अमेरिका) असून भारतातील उष्ण व दमट ठिकाणी शास्त्रीय उद्यानात आणि इतरत्र सावली, वैचित्र्य व शोभा यांकरिता लावलेला आढळतो. पाने साधी, एकाआड एक, लांबट, लघुकोनी किंवा रुंदट खड्गाकृती, अखंड किंवा काहीशी दातेरी असून वर्षातून एकदाच सर्व गळतात व पुन्हा फार लवकरच येतात. फुले विचित्र सुगंधी व शोभिवंत असून खोडाच्या आणि फांद्यांच्या पृष्ठभागांपासून येणाऱ्या सु. एक मी. लांबीच्या मंजरीवर येतात. संवर्तनलिका भोवऱ्यासारखी, पाकळ्या सहा, काहीशा अनियमित, पसरट, अंतर्गोल असून त्यांच्या बाहेरील बाजूवर पिवळी व तांबडी छटा असते आणि आतील बाजू किरमिजी निळसर असते. अनेक केसरदलांच्या एका मंडलाचे किंजपुटाभोवती वलय असते व दुसऱ्या मंडलाचे एका बाजूने वाढून त्याच किंजमंडलावर नागफडीसारखे छत्र बनते [⟶ फूल] महादेवाच्या पिंडीवरच्या नागफडीप्रमाणे ते दिसते. कीटक परागण न झाल्यास स्वपरागण घडून यावे अशी संरचना आढळते [⟶ परागण]. फळ कठीण कवचाचे, गोल, १५–३० सेंमी. व्यासाचे, नारळाएवढे, तपकिरी व मगजयुक्त (गरयुक्त) असून तोफेच्या गोळ्याप्रमाणे दिसते, त्यामुळे त्या अर्थाचे इंग्रजी नाव पडले आहे. पिकलेल्या मगजाला दुर्गंध येतो. गियानातील रहिवाशी गुराढोरांना तो खाऊ घालतात. माकडे आवडीने खातात. फळाच्या करवंटीचा भांड्यासारखा उपयोग होतो व मगजापासून पेये बनवितात. अधश्वर (मुनवे) किंवा बियांपासून नवीन लागवड करतात.
जमदाडे, ज. वि.
“