तुळस : (हिं. गु. क. सं. तूर्य, तुलसी इ. सेक्रेड बेसिल, होली बेसिल लॅ. ऑसिमम सँक्टम कु–लॅबिएटी). ही परिचित ⇨ ओषधी मऊ, वर्षायू (वर्षभर जगणारी), केसाळ, शाखायुक्त, ३०–७५ सेंमी. उंच असून भारतात सर्वत्र आढळते. हिमालयात १,८०० मी पर्यंत व अंदमान आणि निकोबार बेटांवरही आढळते. हिची सामान्यतः बागेत लागवड करतात. चरक संहितेत व पाणिनीच्या अष्टाध्यायीत सुरस या नावाने तुळशीचा उल्लेख आला आहे. तसेच काही पुराणे व उपनिषदे यांत तुळशीसंबंधीच्या कथा आढळतात. आयुर्वेदीय उपचारातही तुळशीचे गुण सांगितले आहेत. पाने साधी, समोरासमोर, लांबट गोल, अखंड किंवा बहुधा दंतुर (दातेरी) व दोन्ही बाजूंस लवदार आणि प्रपिंडीय (ग्रंथियुक्त) असतात. फुले किरमिजी किंवा जांभळट, लहान, फांद्यांच्या व मुख्य खोडाच्या शेंड्यावर साध्या किंवा शाखायुक्त मंजिऱ्यांवर [पुंजवल्लरी → पुष्पबंध] येतात. बी गोलसर, थोडे चापट, गुळगुळीत, फिकट भुरे किंवा तांबूस असते [→ लॅबिएटी]. सर्व हिंदूंना तुळस पवित्र असून ती मंदिराभोवती व घरी लावतात. अनेक धार्मिक विधींत पूजेकरिता ती वापरली जाते. लागवडीत तिचे मुख्यतः दोन प्रकार आहेत : एक हिरवी (श्री तुळस) व दुसरी किरमिजी फांद्यापानांची (कृष्ण तुळस). बियांपासून रोपे बनवून तुळस व्यवस्थित लावता येते. चूर्ण भुरी, मूळकूज, करपा वगैरे रोग तिच्यावर पडतात.
पानांपासून वाफेने ऊर्ध्वपातन (वाफेचे बुडबुडे तप्त द्रवातून सोडून घटक अलग करण्याची क्रिया) करून पिवळे जर्द, किंचित लवंगेसारख्या वासाचे, बाष्पनशील (उडून जाणारे) तेल मिळते. ते जंतुनाशक व कीटनाशक असते. बियांपासून १७·८ टक्के हिरवट पिवळे स्थिर तेलही मिळते.
पाने कफोत्सर्जक (कफ काढून टाकणारी), त्यांचा रस घाम आणणारा व पाळीच्या तापावर उपयुक्त असून उत्तेजक व श्वासनलिकादाह कमी करणारा आहे. कानदुखीवर कानात रसाचे थेंब टाकतात आणि नायटे व इतर चर्मरोगांवर बाहेरून लावतात. वाळलेल्या पानांचे चूर्ण पडसे आले असता तपकिरीप्रमाणे ओढतात. बिया मूत्रविकारांवर आणि जननेंद्रियांच्या काही विकारांवर गुणकारी असतात. मुळाचा काढा तापात घाम आणण्यास चांगला, पानांचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) मुलांना पोटाच्या विकारांवर उपयुक्त असतो.
रानतुळस : (रामतुळस सं. वृद्धतुलसी इं. श्रबी बेसिल लॅ. ऑसिमम ग्रॅटिसिमम). हे बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) १–२·५ मी. उंच झुडूप असून भारतात सर्वत्र व लक्षद्वीप बेटांतही आढळते. हिची अनेक शारीरिक लक्षणे तुळशीप्रमाणे आहेत. फुले फिकट हिरवट पिवळी असून मंजिऱ्यांवर अधिक दाट मंडलांमध्ये येतात. हिला वास जास्त आणि तेल जंतुरोधक व कमी विषारी असते. तेलाचा उपयोग कानदुखी, दातदुखी व लहान मुलांची पोटदुखी यांवर करतात. पानांचा काढा शुक्र (वीर्य) दुर्बलतेवर व परम्यावर देतात. रानतुळस पाचक, पौष्टिक, उत्तेजक, शामक (शांत करणारी), मूत्रल (लघवी साफ करणारी), पूतिरोधक (सूक्ष्मजंतूंची वाढ होण्यास प्रतिबंध करणारी वा त्यांचा नाश करणारी) व वांतिरोधक (ओकारी थांबविणारी) असते खोकल्यावर देतात. पानांचा रस पोटदुखीवर देतात. बी डोकेदुखी, तंत्रिका शूल (मज्जातंतूंतील तीव्र वेदना), आमांश इत्यादींवर उपयुक्त असते.
तुळशीच्या मुळांच्या किंवा खोडांच्या मण्यांच्या माळा (तुळशीमाळा) वैष्णव पंथी लोक गळ्यात घालतात.
कापूर-तुलसी : (लॅ. ऑसिमम किलिमँडॅस्कॅरिकम). या तुळशीच्या वंशातील अन्य जातीपासून कापूर मिळतो. या क्षुपाची (झुडूपाची) लागवड केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तमिळनाडू येथे करून मोठ्या प्रमाणावर कापूर उत्पादनाचे प्रयत्न सुरू आहेत.
पहा : कापूर लॅबिएटी सब्जा.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.
“