तुर्कमेनिस्तान : (तुर्कमेनिया). सोव्हिएट रशियाच्या पंधरा घटक राज्यांपैकी एक राज्य. क्षेत्रफळ ४,८८,१०० चौ. किमी. लोकसंख्या २४·३ लाख (जानेवारी १९७४). याच्या पश्चिमेस कॅस्पियन समुद्र, वायव्येस कझाकस्तान, उत्तरेस व पूर्वेस उझबेकिस्तान, आग्नेयीस अफगाणिस्तान आणि दक्षिणेस इराण आहे. अश्काबाद ही राजधानी आहे.
भूवर्णन : राज्याचा ९०% भाग सखल, मैदानी काराकुम वाळवंटाने व्यापलेला आहे. वायव्येस उश्तउर्त पठाराचा काही भाग आहे आणि दक्षिणेस कूगीतांगताऊ व कोपेत दा पर्वतांच्या रांगा अडीच–तीन हजार मी. उंचीच्या आहेत. त्यांमधून अमुदर्या नदी या राज्यात येते व वाळवंटी मैदानातून पुढे अरल समुद्राकडे जाते. तेद्झेन, मुरगाब या वाळवंटात लुप्त होणाऱ्या आणि कॅस्पियनला मिळणारी आत्राक या इतर नद्या होत. डोंगराळ भागातून अनेक प्रवाह येतात परंतु बहुतेक वाळवंटातच गडप होतात. कोपेत दा हा भूशास्त्रदृष्ट्या अर्वाचीन पर्वत असून त्या भागात १९२९ व १९४८ प्रमाणे अद्यापही विनाशकारी भूकंप होतात.
हवामान : हा प्रदेश खंडीय, तुराणी प्रकारच्या हवामानाचा आहे. उन्हाळ्यात तपमान ३५° से. पर्यंत असते. आग्नेय काराकुम भागात ते ५०° से. पर्यंत जाते. हिवाळ्यातील तपमान –४° से. पर्यंत उतरते तर अगदी दक्षिणेकडील कुश्क येथे ते –३३° से. इतके खाली येते. पाऊस १० ते २० सेंमी. पर्यंत पडतो तथापि डोंगराळ भागात तो ४० सेंमी. पेक्षा जास्तही असतो. तथापि एकंदरीत प्रदेश कोरडाच आहे. क्वचित हिमवृष्टी होते. वसंत ऋतूत थोडा पाऊस येतो. तथापि उन्हाळे कोरडेच जातात. उत्तरेकडून थंड व कॅस्पिनकडून सौम्य वाऱ्यांचे लोट येत असतात.
वनस्पती : येथील बहुतेक वनस्पती मरूप्रदेशीय आहेत. मरूद्यानांत व डोंगराळ भागात मात्र दाट झाडी आढळते. अमुदर्याच्या काठी ब्लॅक पॉप्लर, वाळुंज, लव्हाळे, वेत इ. आहेत. बऱ्याच भागांत स्टेप प्रकारचे खुरटे गवत आहे. कोपेस दा च्या दऱ्याखोऱ्यांत व उघड्या उतारांवर रानद्राक्षे, ज्युनिपर, बदाम, अक्रोड, खजूर, पिस्ता, अंजीर इत्यादींची झाडे आहेत.
प्राणी : येथील प्राणी विविध प्रकारचे परंतु थोडे आहेत. स्टेप खोकड, पर्शियन खोकड, रानमांजर, काराकुम कुरंग, कासव इ. प्राणी सखल भागात तर पर्वतीय भागात रानमेंढे, रानखोकड, रानगाढव, रानडुक्कर, सायाळ, चित्ता, लिंक्स, हिमचित्ता इ. प्राणी आहेत. अमुदर्याच्या खोऱ्यात दुर्मीळ ‘पिंक’ हरिण आढळते. काळवीट कमी होत आहेत. तुर्कस्तानी वाघ क्वचित आढळतो. कॅस्पियनच्या पूर्व किनाऱ्यावर हिवाळ्यात बदके, हंस, राजहंस यांचे प्रचंड थवे उत्तरेकडून येतात. समुद्रात हेरिंग, स्प्रॅट, रोच, बेलुगा, स्टर्जन इ. मासे विपुल आहेत. अमुदर्या नदीतही पुष्कळ मासे सापडतात.
इतिहास : आठव्या व नवव्या शतकांत तुर्कमेनांवर अरबांची सत्ता होती. सेल्जुक तुर्कांचे मार्जियानावर राज्य होते, तेव्हा मर्व्ह (आजचे मारी) ही त्याची राजधानी होती. तेराव्या शतकात मंगोलांनी हा प्रदेश जिंकला. तो तैमूरलंगाच्या साम्राज्याचा एक भाग झाला. पंधराव्या शतकात तैमूरलंगाचे साम्राज्य लयाला जाताच हा भाग उझबेकी वर्चस्वाखाली व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस खिवा खानतकडे गेला. १८६९–७५ या काळात रशियाने हा प्रदेश जिंकून घेतला व त्याचा रशियन तुर्कस्तान असा कारभारी विभाग बनविला. रशियन क्रांतीनंतर २७ ऑक्टोबर १९२४ मध्ये हा प्रदेश सोव्हिएट संघराज्यांतर्गत स्वतंत्र समाजवादी प्रजासत्ताक म्हणून जाहीर करण्यात आला.
राज्यव्यवस्था : कारभारासाठी राज्याचे अश्काबाद, चार्जोवू, मारी, तशऊझ व क्रॅस्नोव्हॉट्स्क असे पाच विभाग केलेले असून त्यांचे ३४ ग्रामीण जिल्हे, १५ शहरे व ७१ नागरी वस्त्या आहेत. राज्याचा कारभार निवडलेल्या सुप्रीम सोव्हिएटद्वारे चालतो. दर ५,००० लोकांस एक याप्रमाणे २८५ डेप्यूटी (प्रतिनिधी) दर चार वर्षांनी निवडले जातात. मतदान हक्क अठराव्या वर्षी तर उमेदवारी हक्क तेविसाव्या वर्षी प्राप्त होतो. १९७१ मध्ये १०० डेप्यूटी महिला होत्या तर १९३ डेप्यूटी कम्युनिस्ट होते. १९७३ मध्ये प्रादेशिक, जिल्हा, नागरी व ग्रामीण भागांसाठी निवडलेल्या २०,१०७ डेप्यूटींपैकी ४४·६% स्त्रिया, ५७·१% अपक्ष व ६८·१% औद्योगिक कामगार व सामुदायिक शेतकरी होते. तत्त्वतः राज्य स्वतंत्र असले व त्याचा स्वतंत्र ध्वज, राष्ट्रगीत व राष्ट्रचिन्ह असले तरी वास्तविक सत्ता सोव्हिएट संघराज्याच्या सुप्रीम प्रेसिडियम व पॉलिटब्यूरो यांकडेच आहे. राज्याच्या सुप्रीम सोव्हिएटची बैठक वर्षातून दोनदा होते व त्यास सोव्हिएट संघराज्याच्या राष्ट्रीय सुप्रीम प्रेसिडियमवर प्रतिनिधित्व असते. अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, सचिव व अकरा सभासद यांचे बनलेले राज्याचे प्रेसिडियम ‘कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स’ (मंत्रिमंडळ) निवडते व त्याचा अध्यक्ष राष्ट्रीय मंत्रिमंडळाचा सभासद असतो.
राज्यात सर्वोच्च न्यायालय असून जिल्हे, गावे यांसाठी ‘जनता न्यायालये’ आहेत.
आर्थिक स्थिती : राज्याची अर्थव्यवस्था शेती, पशुपालन, खाणी व उद्योगधंदे यांवर आधारलेली आहे.
शेती व जलसिंचन : राज्यातील नद्या वर्षास सु. सहा–साडेसहा कोटी घ. मी. पाणी वाहून नेतात. परंतु नद्या मुख्यतः पूर्व भागात तर सुपीक जमिनी दक्षिण, पश्चिम व ईशान्य भागात यांमुळे सिंचन योजनांस येथे विशेष महत्त्व आहे. अमुदर्या, तेद्झेन, मुरगाब, आत्राक या प्रमुख नद्यांवर व इतर लहानमोठ्या जलप्रवाहांवर बांध घालून व धरणे बांधून अनेक जलाशय निर्माण करण्यात आले आहेत. काराकुम मरूप्रदेशातून काराकुमस्की कालवा व त्याचे फाटे लेनिनच्या नावाने बांधले जात आहेत. १,४०० किमी. लांबीचा मुख्य कालवा १९७५ मध्ये पुरा व्हावयाचा होता. तो जगातील सर्वांत मोठा जलसिंचन व जलवाहतूक कालवा होईल. यामुळे एकूण १० लाख हे. भूमी सिंचित होईल. १९७३ मध्ये सु. ७·६ लाख हे. जमीन भिजत होती. योजना पूर्ण झाली म्हणजे बरीच जादा जमीन लागवडीखाली येईल.
शेती मुख्यतः मरूद्यानांतच विकसित झालेली आहे. कोपेत दा, मुरगाव, तेदझेन स्त्रेदने–अमुदर्या, निझ्ने–अमुदर्या ही प्रमुख मरूद्याने आहेत. अमुदर्या गाळाची, सुपीक माती वाहून आणते. सिंचाईमुळे आता पिकांतही बदल झाला आहे. पूर्वी गहू हेच महत्त्वाचे पीक होते. आता तलम तंतूचा कापूस मोठ्या प्रमाणात होतो. गहू, बार्ली, कलिंगडे, भरडधान्ये, तीळ, रताळी, खजूर, ताड, अंजीर, ऊस, ऑलिव्ह ही महत्त्वाची पिके आहेत. द्राक्षमळे व रेशीम संवर्धन केंद्रेही आहेत.
राज्यात १९७३ मध्ये ३३४ सामुदायिक शेते, ५५ शासकीय शेते होती. प्रत्येक सामुदायिक शेत सु. १,४३२ हेक्टरचे असून त्यावर ४५८ कुटुंबे होती. देशात ३०,१०० ट्रॅक्टर व ९०० धान्य कापणी, मळणी आणि कापूस वेचणी यंत्रे होती. १९७३ मध्ये ४४,००० मे. टन गहू, १०·३ लाख मे. टन कापूस, १,९७,००० मे. टन भाज्या, ५५,००० मे. टन द्राक्षे, ३४,००० मे. टन फळे, ६०,००० मे. टन मांस, २१८ मे. टन दूध, १४·४ मे. टन लोकर व १४·८ कोटी अंडी असे प्रमुख उत्पादन झाले. केनाफ हे नवीन औद्योगिक महत्त्वाचे तंतू पीक होऊ लागले आहे. चारा म्हणून मका, ल्युसर्न गवत ही करतात.
पशुपालन हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. १९७३ अखेर राज्यात ४४ लाख शेळ्या–मेंढ्या, ४·९ लाख गुरे व १ लाखाहून अधिक डुकरे होती. प्रत्येक सामुदायिक शेतावर ८,००० शेळ्या–मेंढ्या पाळावयास दिलेल्या असतात. वाळवंटी भागात लठ्ठ शेपटीच्या मेंढ्या, काराकुल मेंढ्या व उंट पाळणे हा प्रमुख व्यवसाय आहे. राज्यातील ७०% मेंढ्या काराकुल प्रकारच्या आहेत. अखल–तेके व योमुत जातीचे देखणे, चपळ, वेगवान व अथक घोडे आणि अरब उंट यांची पैदास हा येथील शतकानुशतकांचा जुना व्यवसाय आहे. कॅस्पियन समुद्रात व नद्यांत मासेमारी महत्त्वाची आहे.
खनिजे व उद्योगधंदे : खनिजसंपत्तीमुळे हे राज्य व त्याचा वाळवंटी भागही महत्त्वाचा ठरला आहे. सोव्हिएट रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे नैसर्गिक वायूचे व प्रथम क्रमांकाचे ओझोसेराइट (खनिज मेण) चे उत्पादन या राज्यात होते. शिवाय खनिज तेल, कोळसा, मॅग्नेशियम, पोटॅशियम, गंधक, खनिज मीठ यांचेही उत्पादन होते. सैंधवाच्या पन्नासांहून अधिक खाणी तुर्कमेनिस्तानात आहेत. कॅस्पियनच्या कारा बोआझ आखातावर सल्फेट उद्योग स्थिरावला आहे. चेल्यिक्येन द्वीपकल्पात समुद्राच्या पाण्यातून आयोडीन आणि ब्रोमीन काढले जाते. क्रॅस्नोव्हॉट्स्कच्या तेलशुद्धी कारखान्यात सल्फानोलही होते. न्यिबीत दाग येथे खनिज तेल उद्योग विकसित झाला आहे. १९५० नंतर नैसर्गिक वायूचे बावीस साठे राज्यात सापडले आहेत. त्यात शाखेतली येथील साठा १,००,००० कोटी घ. मी. चा आहे. खनिज तेल उत्पादनात या राज्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो. कॅस्पियनमध्ये व त्याच्या किनाऱ्यावर तेल मिळते. तेल व नैसर्गिक वायू नळांनी अश्काबाद, क्रॅस्नोव्हॉट्स्क येथे व रशियातील अन्य ठिकाणी नेले जातात. चार्जोवू येथे रसायन उद्योग स्थापन झाला आहे. यंत्रे, रेल्वेचे सामान, तेलखाणीस व शेतीस लागणारी अवजारे व यंत्रे यांचे कारखाने आहेत. खाद्य तेले, मांस डबाबंदी, लोणी, मद्य, कापड, पादत्राणे, सिमेंट यांचे कारखाने असून गालिचे व रग यांचा परंपरागत उद्योग व ‘काराकुल’ मेंढीची लोकरीसह कातडी यांसाठी हा प्रदेश पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.
राज्यात १९७३ मध्ये १६२ लाख मे. टन खनिज तेल, ५,३४,००० मे. टन सिमेंट, २,८६४·५ कोटी घ. मी. नैसर्गिक वायू, १९७ लाख मी. कापड, २३ लक्ष पादत्राणे, २३० कोटी किवॉ. ता. वीज असे उत्पादन झाले. औष्णिक विद्युत् केंद्राची वाढ होत आहे. राज्यातील प्रचंड सौरशक्ती व वायुशक्ती कार्यान्वित झाली तर त्याचा कायापलट होईल व काराकुम मरूप्रदेश हा वरदान ठरू शकेल.
कारखान्यांतून व कचेऱ्यांतून काम करणारे १९७३ मध्ये ५,३८,००० लोक होते आणि ५८,००० उच्च शिक्षित तज्ञ होते. कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या ६०० संघटना व मंडळे होती.
वाहतूक व दळणवळण : वाहतुकीसाठी रेल्वे, सडका, जलमार्ग, विमानमार्ग, तेलनळ या सर्वांचा उपयोग केला जातो. रेल्वेमार्ग २,१२० किमी. आहेत. प्रमुख मार्ग सेंट्रल एशियन रेल्वे हा असून तो क्रॅस्नोव्हॉट्स्क, अश्काबाद व पुढे ताश्कंद यांस जोडतो. चार्जोवू–कुनग्रात व चार्जोवू–ऊर्ग्येच हे नवीन मार्ग झाले आहेत. सडकांची एकूण लांबी ८,८०० किमी. असून मोटारमार्ग वेगाने वाढत आहेत. अश्काबादहून इराणमधील मेशेदपर्यंत महामार्ग जातो. अंतर्गत जलमार्ग १,३०० किमी. चे असून क्रॅस्नोव्हॉट्स्क हे कॅस्पियनवरील बंदर आहे. तेथून मुख्यतः कापूस, खनिज तेल पदार्थ व मासे निर्यात होतात. विमानमार्गांनी राज्यातील व देशातील प्रमुख शहरे जोडलेली आहेत.
लोक व समाजजीवन : तुर्कमेनिस्तानच्या लोकसंख्येपैकी ६६% लोक खुद्द तुर्कमेनी, १५% रशियन, ८·३% उझबेकी, ३·२% कझाक व बाकींचे तार्तर, युक्रेनियन, आझरबैजानी, आर्मेनियन व काराकल्पाक आहेत. सोव्हिएट संघराज्यातील एकूण तुर्कमेनींपैकी ९३% या राज्यात आहेत. दरवर्षी दरहजारी ३४ जन्म व फक्त ७ मृत्यू होत असल्यामुळे लोकसंख्या वेगाने वाढत आहे. तिची वाटणी फार विषम आहे. मरूद्यान प्रदेशात दर चौ. किमी. ला ३०० तर वाळवंटी व डोंगराळ प्रदेशात दर चौ.किमी. ला फक्त १·१५ असे लोकवस्तीच्या घनतेचे प्रमाण आहे. सरासरी घनता दर चौ. किमी. ला ४·४ आहे. जवळजवळ निम्मी वस्ती नागरी असून नगरांची संख्या वाढत आहे. ७०% लोक सुन्नी पंथीय मुस्लिम आहेत. १९१७ च्या क्रांतीपूर्वी तुर्कमेनिस्तानातील लोक अनेक टोळ्यांत व कुळांत विभागलेले होते. शेजारी देशांशी शतकानुशतके चाललेल्या लढायांमुळे ते सर्व दृष्टींनी मागासलेलेच राहिले. आपसातील दुहीमुळे राजकीय दृष्ट्या ते पराधीनच राहिले. रशियन साम्राज्यात आर्थिक विकासाला थोडी संधी मिळाली, तरी सोव्हिएट संघराज्याचे एक घटकराज्य झाल्यावरच राज्याची खरीखुरी प्रगती होऊ लागली.
तुर्कमेनी व रशियन या येथील अधिकृत भाषा आहेत.
शिक्षण : रशियाच्या इतर राज्यांप्रमाणे या राज्यातही सर्व शिक्षण निःशुल्क आहे. १९७३-७४ मध्ये राज्यातील १,७४६ प्राथमिक व माध्यमिक शाळांतून ६,१२,००० विद्यार्थी, ६ उच्च शिक्षण संस्थांतून २९,६०० विद्यार्थी, ३० तंत्र महाविद्यालयांतून २८,३०० विद्यार्थी शिकत होते. ११ संगीत व कला विद्यालये होती. स्थानिक कलांस उत्तेजन दिले जाते. संशोधन कार्यासाठी तुर्कमेन शास्त्रीय अकादमी आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली १६ संस्थांतून ७९६ शास्त्रज्ञ काम करीत आहेत. तसेच ५८ इतर संशोधन संस्थांतून ४,३०० संशोधक काम करतात. शिक्षक प्रशिक्षण, वैद्यकीय व तंत्रशिक्षण महाविद्यालये आहेत. १९५१ मध्ये तुर्कमेनी विद्यापीठ स्थापन झाले. १९७३ मध्ये त्यात १०,१२४ विद्यार्थी होते.
नागरिकांस वैद्यकीय साहाय्य निःशुल्क मिळते. १९७३ मध्ये राज्यात ५,६०० डॉक्टर व रुग्णालयांत २४,४०० रुग्णशय्या होत्या.
दूरध्वनी, दूरदर्शन, रेडिओ, चित्रपट आणि चित्रपटनिर्मिती यांच्या सोयी वाढत असून पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे यांची संख्या वाढत आहे. राज्यात २७ वृत्तपत्रे असून त्यांपैकी १६ तुर्कमेनी भाषेत आहेत. १,००० पेक्षा जास्त ग्रंथालये असून ७ वस्तुसंग्रहालये व ७ नाट्यगृहे आहेत. प्रमुख नाट्यगृहे व नाट्य संगीत संस्था अश्काबाद येथे आहेत.
प्रमुख शहरे : अश्काबाद (लोकसंख्या २,८०,०००–१९७४) राजधानी असून चार्जोवू (१,०४,०००), मारी (७०,०००), न्यिबीत दाग (६२,०००) व क्रॅस्नोव्हॉट्स्क (५३,०००) ही प्रमुख शहरे आहेत.
वर्तक, स. ह. डिसूझा, आ. रे.
“