तुपकडी : (काटेरी तुकटी, कुतरी, खरेती हिं. व म. जंगली मेथी हिं. गुलसकरीस गु. कंटाळो बळ क. कल्लंगड्ॅले सं. नागबला इं. प्रिकली सिडा लॅ. सिडा स्पायनोजा कुल–माल्व्हेसी). एक केसाळ वर्षायू (वर्षभर जगणारे) शाखायुक्त झुडूप. हे भारतात सर्वत्र तणाप्रमाणे रूक्ष जागी उगवते आणि उष्ण व उपोष्ण कटिबंधांत सामान्यपणे आढळते. ⇨ चिकणा व तुपकडी एकाच वंशातील असल्याने त्यांची अनेक लक्षणे सारखी आहेत. तुपकडीची सामान्य शारीरिक लक्षणे भेंडी कुलात [→ माल्व्हेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात. याची पाने साधी, एकाआड एक, लंबगोलाकृती, पाच सेंमी. लांब, स्थूलदंतुर (बोथट दाते असलेली) व तळाशी गोलसर असून देठांच्या खाली, तळाशी लहान दोन–तीन वाकडे काटे व खालचा पृष्ठभाग करडा असतो. याला ऑक्टोबर ते नोव्हेंबरात पानांच्या बगलेत पांढरी किंवा फिकट पिवळी व लहान फुले एकेकटी किंवा झुबक्यांनी येतात. पुष्पमुकुट संवर्तापेक्षा किंचित मोठा असून पाच किंजदलांपासून बनलेल्या पालिभेदी, केसाळ टोकाच्या शुष्क फळात गुळगुळीत, काळसर पिंगट बिया असतात [→ फूल फळ]. फळाच्या प्रत्येक भागास (फलांशाला) दोन प्रशुके (लांबट राठ टोके) असतात.
या झुडपाची मुळे, पाने व मुळांची साल शामक (शांत करणारी), शीतक (थंडावा आणणारी) असून मूत्रमार्गदाह (मूत्रमार्गाची आग) व प्रमेह (परमा) यांवर गुणकारी असतात. मुळे पौष्टिक व स्वेदकारी (घाम आणणारी) असून दुर्बलता व ज्वर यांवर त्यांचा काढा देतात. पाने पाण्यात कुस्करून तो रस गाळून औषधाकरिता वापरतात किंवा पाने शिजवून खातात. फळे स्तंभक (आकुंचन करणारी) व शीतकर असतात. खोडापासून चांगला धागा मिळतो. गुलसकरी ह्या हिंदी नावाने या वनस्पतीचे वर्णन आयुर्वेदीय ग्रंथांत आढळते व तुपकडी हेच नाव चिकणा ह्या दुसऱ्या जातीला वापरलेले आढळते. आधुनिक इंग्रजी व शास्त्रीय ग्रंथांत ही दोन्ही नावे एकाच वनस्पतीला (सिडा कार्पिनिफोलिया ) लावलेली आढळतात.
जोशी, गो. वि.
“