तुडतुडे : हे कीटक बहुतेक सर्व देशांत अनेक प्रकारच्या पिकांवर, गवतांवर व अन्य वनस्पतींवर आढळून येतात. यांचा समावेश हेमिप्टेरा गणाच्या जॅसिडी कुलात होतो. या कीटकांचा आकार पाचरीसारखा असून त्यांची लांबी ६·२ ते ८·३ मिमी. असते. त्यांचे रंग अनेक प्रकारचे असतात. त्यातल्या त्यात हिरवा, फिकट, पिवळा, वाळलेल्या गवतासारखा किंवा मळकट पांढरा इ. रंग विशेषतः आढळून येतात. हे कीटक तिरपे परंतु जलद चालतात आणि ते नेहमी उडी मारण्याच्या तयारीनेच बसलेले असतात. थोडासा धक्का लागताच ते उडी घेतात. गवतातून अथवा पिकातून जाताना हे उड्या मारताना आढळतात. या त्यांच्या उड्या मारण्याच्या प्रवृत्तीमुळेच त्यांना तुडतुडे असे नाव प्राप्त झाले आहे.
तुडतुड्यांच्या तोंडाची रचना पानात तोंड खुपसून रस शोषून घेण्यासाठी रूपांतरित झालेली असते. तोंडाच्या साहाय्याने हे कीटक व त्यांची पिले पिकांच्या किंवा गवताच्या पानांतील रसाचे शोषण करतात. मादीचे अंडनिक्षेपक (अंडी घालण्याचे साधन) विदारण कार्यासाठी रूपांतरित झालेले असते. त्याच्या साहाय्याने मादी पानांच्या शिरांमध्ये अन्य कोशिकांत (पेशींत) ओळीने अंडी घालते. अंडी आकाराने लांबोळी व पांढऱ्या रंगाची असतात. साधारणतः एका आठवड्यात अंडी उबून त्यांतून पिले बाहेर पडतात. त्यांना पंख नसतात. अंगावरील कात टाकून त्यांची वाढ होते. दोन वेळा कात टाकल्यानंतर पंखांची वाढ सुरू होते. सु. दोन–तीन आठवड्यांत ते पाच वेळा कात टाकून पूर्णावस्थेस पोहोचतात. पूर्ण वाढलेले तुडतुडे बरेच दिवस जगू शकतात. या कीटकांच्या काही जातींत वर्षातून एकच पिढी होते, तर काहींमध्ये अनेक पिढ्या पूर्ण होतात. अतिशय थंडीच्या काळात पूर्ण वाढलेले तुडतुडे सुप्तावस्थेत जातात आणि अनुकूल हवामान येताच पुन्हा त्यांचा जीवनक्रम सुरू होतो.
तुडतुडे आणि त्यांची पिले पानांच्या पाठीमागील बाजूवर राहून रसाचे शोषण करतात. या कीटकांचा प्रादुर्भाव जास्त झाला म्हणजे पाने फिकट पिवळी पडू लागतात. काही पिकांची पाने मुरडल्यासारखी दिसतात आणि पानांच्या कडा करपू लागतात. काही पिकांच्या पानांवर चट्टे पडतात. या कीटकांच्या उपद्रवामुळे कोवळ्या पिकाची वाढ खुंटते आणि त्यामुळे उत्पन्नात बरीच घट येते.
या कीटकांच्या अनेक जाती असून त्यांपैकी कपाशीवरील तुडतुडे (इंपोएस्का डिव्हॅस्टन्स), भातावरील तुडतुडे (नेफोटेटिक्स वंशातील जाती), आंब्यावरील तुडतुडे (इडिओसिरस वंशातील जाती) इ. जातींपासून भारतातील पिकांचे बरेच नुकसान होते. यांशिवाय गहू, बटाटा, वांगे, टोमॅटो, भेंडी अशा अनेक पिकांवर निरनिराळ्या जातींच्या तुडतुड्यांचा उपद्रव होतो. यांच्या काही जाती पिकांच्या व्हायरसजन्य रोगांचा फैलाव करतात.
तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारी डीडीटी, एंड्रीन अथवा कार्बारिल फवारतात.
बोरले, मु. नि.
“