तिशन : (सु. १४८८–२७ ऑगस्ट १५७६). प्रबोधनयुगातील एक श्रेष्ठ इटालियन चित्रकार व व्हेनिशियन चित्रसंप्रदायाचा प्रमुख प्रवर्तक. तित्स्यानो व्हेचेल्यो हे त्याचे इटालियन नाव तथापि तिशन या आंग्ल नावानेच प्रसिद्ध. जन्म आल्प्समधील प्येव्हे दी काडॉरे येथे. वयाच्या नवव्या वर्षी तो व्हेनिसला गेला व तिथे सुरुवातीस त्याने त्सूक्कातो या कुट्टिमचित्रकाराच्या हाताखाली उमेदवारी केली. पुढे तो प्रारंभी जेंतीले बेल्लीनी व नंतर त्याचा बंधू जोव्हान्नी बेल्लीन्नी याच्या कलानिकेतनामध्ये दाखल झाला. त्याचा सहाध्यायी जोर्जोने याच्या समवेत त्याने व्हेनिस येथील ‘फोंदाको तेई तेदेश्ची’ (जर्मन व्यापाऱ्यांची वखार) या वास्तूच्या दर्शनी सजावटीसाठी भित्तिलेपचित्रे रंगवली (१५०८). १५११ मध्ये पेंड्युआ येथील ‘स्कुओला देल सांतो’ साठी त्याने सेंट अँथोनीच्या चमत्कारदृश्यांवर आधारित तीन भित्तिलेपचित्रांची मालिका रेखाटली. १५१६ मध्ये त्याची व्हेनिसचा दरबारी चित्रकार म्हणून नियुक्ती झाली. व्हेनिस येथील ‘सांता मारिआ ग्लोरिओसा देई फ्रारी’ या चर्चमधील ॲसम्प्शन ऑफ द व्हर्जिन हे विख्यात वेदिचित्र त्याने १५१८ मध्ये पूर्ण केले. त्याच्या उत्तरकालीन जीवनात यूरोपमधील राजेरजवाड्यांकडून आणि अमीर–उमरावांकडून त्याच्यावर चित्रमागण्यांचा व मानसन्मानांचा सतत वर्षाव होत राहिला. फेरारा, मॅंचुआ व ऊर्बीनो येथील ड्यूक घराण्यांकडून त्याच्या चित्रांना खास मागणी होती. सम्राट पाचवा चार्ल्स याने त्याला ‘काउंट पॅलटाइन’ हा बहुमानाचा किताब दिला. स्पेनचा दुसरा फिलिपही तिशनच्या चित्रांचा खास चाहता होता. १५४५ मध्ये तो रोम येथे गेला. त्या ठिकाणी पोप तिसरा पॉल व त्याचे नातू ओत्ताव्ह्यो आणि कार्डिनल आलेस्सांद्रो फार्नेसे (१५४६) यांचे समूह–व्यक्तिचित्र त्याने रेखाटले. ते अपूर्ण असले, तरी चित्रित व्यक्तींच्या मानसिक रूपांचे बारकावे टिपण्याबाबत अजोड ठरले आहे. कार्डिनल फार्नेसेसाठी तिशनने डॅनेई (नेपल्स आवृत्ती पुढे त्याने या चित्राच्या अनेकविध आवृत्या रंगवल्या) हे चित्र रंगविले. या वास्तव्यात त्याची मायकेल अँजेलोशी भेट झाली आणि त्याच्याप्रमाणेच तिशनलाही प्राचीन भव्य स्मारकांविषयी आस्था वाटू लागली. १५४८ मध्ये पाचव्या चार्ल्सच्या निमंत्रणावरून तो ऑक्सबुर्खला गेला. त्या ठिकाणी त्याने अनेक मोठमोठ्या नामवंत व्यक्तींची व्यक्तिचित्रे रेखाटली. पाचव्या चार्ल्ससाठी त्याने ट्रिनिटी (ला ग्लोरिआ या नावानेही प्रसिद्ध, १५५४) या भव्य चित्राची निर्मिती केली. १५५३ पासून त्याने दुसऱ्या फिलिपसाठी पौराणिक दृश्यांवर आधारित चित्रमालिका रंगवल्या त्यांत डायना ॲन्ड कालिस्टो व डायना सर्पराइझ्ड बाय ॲक्टिऑन (१५५९), द रेप ऑफ यूरोपा (१५५९) व पर्सस ॲड ॲन्ड्रॉमड (सु. १५५५) ही उल्लेखनीय चित्रे होत. यांखेरीज दुसऱ्या फिलिपसाठी त्याने ‘सान लोरेंत्सो देल एस्कॉरीअल’ च्या मठाकरिता अनेक धार्मिक चित्रे रंगवली. उदा., आदम ॲन्ड ईव्ह (सु. १५७०) आणि मार्टरडम ऑफ सेंट लॉरेन्स (१५६४–६७). १५५२ नंतर तिशन व्हेनिस येथेच राहिला. त्याची राहणी एखाद्या सरदाराप्रमाणे वैभवशाली व विलासी होती. त्याच्या नावावर सु. ३०० चित्राकृती दाखविल्या जातात. आपल्या प्रदीर्घ जीवनकाळात त्याने अनेक चित्रविषयक समस्यांची उकल केली. चित्रातील रंगहाताळणीमध्ये त्याला अपूर्व सिद्धी लाभली होती. त्याची चित्रे त्यांच्या रंगसौंदर्यांबद्दलच विशेष वाखाणली जातात आणि अशी रंगसंगती हेच त्याने पुरस्कारिलेल्या व्हेनिशियन चित्रसंप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्ये होय [→ इटलीतील कला]. त्याच्या कलासाधनेच्या तीन प्रमुख अवस्था मानल्या जातात. पहिल्या अवस्थेमध्ये जोव्हान्नी बेल्लीनी व जोर्जोने यांचा ठळक प्रभाव जाणवतो. उदा., सेक्रेड ॲन्ड प्रोफेन लव्ह (सु.) १५१३) व मॅडोना ऑफ चेरिज (सु. १५१५). सेक्रेड अँड प्रोफेन लव्ह हे चित्र म्हणजे एका नव्या पर्वाची नांदीच होय. या चित्रात नग्न स्वर्गीय व्हीनस व वस्त्रविभूषित पार्थिव व्हीनस यांच्यातील विरोधाभास ठळकपणे रंगवला आहे. निर्मितीच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये (सु. १५१८–१५५०) त्याच्या चित्रांतून प्रबोधनाच्या ऐन उत्कर्षकाळातील कलेची निदर्शक अशी नाट्यात्म भव्यता परिपूर्ण रीतीने साकारली आहे. पेसारो मॅडोना (१५१९–२६) हे व्हेनिसच्या ‘सांता मारिआ ग्लोरिओसा देई फ्रारी’ चर्चमधील वेदिचित्र या कालखंडातील श्रेष्ठ निर्मितीचे निदर्शक आहे. या चित्राची वास्तुसदृश्य भव्यता व मॅडोनाच्या प्रतिमेचे चित्ररचनेच्या केंद्रस्थानापासून एका बाजूला केलेले संयोजन ही वैशिष्ट्ये क्रांतिकारक ठरली. याखेरीज द प्रेझेंटेशन ऑफ द व्हर्जिन (१५३४–३८) व ख्राइस्ट क्राउन्ड वुइथ थॉर्न्स (सु. १५४२) ही या कालखंडातील चित्रेही उल्लेखनीय आहेत. तिशनच्या रंगसंयोजनातील सुसंवादित्व व समृद्धी तसेच ऐंद्रिय आनंदाची अत्त्युच्च अनुभूती यांचा समर्थ प्रत्यय त्याच्या या काळातील वर्शिप ऑफ व्हीनस (१५१९), बॅकस ॲन्ड ऑरिॲडनी (१५२३) व व्हीनस ऑफ ऊर्बीनो (१५३७) यांसारख्या चित्रांतून येतो. चित्रविषय व्यक्तिची चेहरेपट्टी, शारीर ठेवण, व्यक्तिमत्त्व यांच्या अस्सल व हुबेहूब आविष्काराबरोबरच त्या व्यक्तीच्या ठायी वसत असलेल्या दैवी अंशाचे प्रकटीकरण करण्याचे सामर्थ्य त्याच्यात होते. व्यक्तिचित्रकार म्हणून तिशनचे मोठेपण त्यातच सामावले आहे. या काळातही अनेक श्रेष्ठ व्यक्तिचित्रे त्याच्या हातून निर्माण झाली. ला बेल्ला (१५३७), इप्पोलितो रिनाल्डो (सु. १५४५) चार्ल्स द फिफ्थ ॲट द बॅटल ऑफ म्यूलबेर्क (१५४८) ही त्यांपैकी काही होत. तिशनच्या चित्रनिर्मितीच्या अंतिम अवस्थेमध्ये अत्युत्कट भावाभिव्यक्तीचे प्रकटीकरण आढळते. कुंचल्याच्या काहीशा स्वैर क्रीडेतून व रंगाच्या सूक्ष्म वापरातून आत्यंतिक आत्मनिष्ठ व गहनगूढ अशी चैतन्यवृत्ती साकारली आहे. प्येता (१५७६)हे त्याचे अखेरचे चित्र. स्वतःच्या कबरीसाठी म्हणून त्याने ते काढावयास घेतले पण ते अपूर्णच राहिले. ते पुढे पाल्मा जोव्हानेने पूर्ण केले. व्हेनिस येथे प्लेगच्या साथीत तिशन मरण पावला. उत्तरकालीन यूरोपीय चित्रकला त्याच्या सर्जनशक्तीने प्रभावित झाली आहे. रूबेन्स, व्हेलात्थ्केथ यांच्यासारख्या अनेक चित्रकारांवर हा प्रभाव दिसून येतो. तसेच त्याच्या अखेरच्या चित्रांतून दृक्प्रत्ययवादी शैलीची बीजे आढळून येतात.
संदर्भ : 1. Tietze, Hans. Titian, London, 1950.
2. Williams, Jay, The World of Titian, New York, 1968.
इनामदार, श्री. दे.
“